आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे म्हाळुंग/गळलिंबू…
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
शास्त्रीय नाव – Citrus medica
संस्कृतमध्ये: मातुलुंग, बीजपूरक, रुचका
मराठीमध्ये: महाळुंग, मावळींग
गुजरातीमध्ये: बिजोरा
हिंदीमध्ये: बिजोरा नींबू
इंग्रजीमध्ये: सिट्रॉन (Citron)
लिंबू, संत्री, मोसंबी अशा वर्गात महाळुंग/गळलिंबू हे पण एक अत्यंत रुचकर असे फळ आहे. फळ साधारण पेरूच्या आकाराचे पण लिंबा पेक्षा सात आठ पटीने मोठे असते. फळाची साल बरीच जाड असते. फळाचा मध्य भाग आंबट असतो. म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते.
आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर म्हाळुंग सेवन करावे. अत्यंत रुची उत्पन्न करणारे फळ आहे. उचकी, दमा, जुनाट कोरडा खोकला यात म्हाळुंग सेवन करणे लाभदायक आहे. म्हाळुंगचे फळ नियमित खाल्ले की बराच लाभ होतो. विंचू चावला असता म्हाळुंगच्या बिया वाटून लेप लावल्यास फायदा दिसतो.
उलाटी, मळमळ, तोंडाला पाणी सुटणे अशा लक्षणात म्हाळुंगाचे सेवन खूप लाभप्रद दिसते. फळ खाल्ल्यावर रोग्याला तात्काळ आराम मिळून जातो. पोटात दुखत असेल तर, पोटात गोळा आल्यासारखे वाटत असेल तर फळाचे सेवन लाभदायक आहे.
ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही आणि पाळीच्यावेळी फार कष्ट होतात, त्यांच्यासाठी फळ आणि बिया यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा. अजीर्णामुळे पोटात दुखून त्रास होत असेल, तर महाळुंगाचे सेवन अमृततुल्य आहे. म्हाळुंग हे हृदयाला बळ देणारा आहे. आजारामुळे हृदय कमकुवत झाले असेल, तर फळाचे सेवन खूप लाभदायक आहे. म्हाळुंगाच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते. दारू उतरण्याची लक्षणे कमी वाटत असतील, तर सरळ म्हाळुंग खाल्ल्याने भराभर लक्षणे कमी होतात. गळलिंबू आम्ल रसाचे असल्याने क्षारांपासून बनलेल्या मुतखड्यांत अत्यंत प्रभावी ठरते. अनोश्यापोटी १६ वा भाग गळलिंबू चाखून खावा. नंतर १ पेला कोमट पाणी प्यावे. अर्धा तास काहीही न खाता चालावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.