April 18, 2024
mousamai-natural-cave in Meghalaya artile by Rajan Lakhe
Home » मौसमई नैसर्गिक गुहा: निसर्गाची अजब किमया
पर्यटन

मौसमई नैसर्गिक गुहा: निसर्गाची अजब किमया

मेघालय…. गुहांचे राज्य आणि रेन कैपिटल ऑफ द वर्ल्ड (चेरापुंजी )

चेरापूंजी……लहानपणापासून मनाच्या कप्प्यात असलेल, पावसाशी पारंपारिक नात असलेलं आठवणीतील एक गाव. पण……… निसर्गाने या गावाऐवजी सर्वाधिक पाऊस हे नाव आता चेरापूंजी पासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौसिनराम ( Mawsynram ) या गावाला बहाल केले आहे.

राजन लाखे

तवांग पासून १८१ किलोमिटर पहाडी नागमोडी रस्त्याच प्रवास करुन संध्याकाळी कामेंग जिल्ह्यातील बोमडीला शहर गाठले. तेथे रात्री मुक्काम करुन सकाळी शिलॉंग जाण्यासाठी हॉटेल सोडले आणि बोमडीला पासून भालुकपोंग, बालीपाडा, तेजपूर, मार्गे (अधिकतम पहाडी व नागमोडी रस्ता) २४५ किलोमिटरचा प्रवास करीत संध्याकाळी शिलॉंगला पोहचलो. शिलॉंग ही मेघालयची राजधानी. १९७२ ला आसाम राज्यामधून खासी, गारो आणि जयांतिया ही तीन पहाडी क्षेत्र वेगळे करुन मेघालय राज्याची निर्मिती झाली. पुर्वी शिलॉंग ही, आसामची राजधानी होती परंतु शिलॉंग हे मेघालयात गेल्याने आसामची राजधानी दिसपुर झाली तर मेघालयाची राजधानी शिलॉंग झाली. शिलॉंगची भाषा खासी व हिंदी असल्यामुळे येथे हिंदी समजते. त्यामुळे आपल्याला भाषेची अडचण येत नाही.

शिलॉंग पासून ५५ किलोमिटर अंतरावर असलेले चेरापूंजी शहर हे सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वानाच माहीत आहे. लहानपणापासून अभ्यासक्रमात हे नाव पावसामुळे चांगलेच परिचित होते पण ते गाव तेथील संस्कृती, तेथील वैशिष्टे पाहण्याचा, अनुभवण्याचा योग यावा लागतो तो येणार म्हणून उत्सुकता होती, आनंदही होता. त्यासाठी उद्याचा दिवस उजाडण्याची वाट पहाणे आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता चेरापूंंजी येथे जाण्यासाठी सज्ज झालो. सोबत आमच्या गटातील सहकारी मंडळी होतीच. माझ्याप्रमाणे सर्वानाच उत्सुकता होती.

चेरापूंजीच्या मार्गावर १२ किलोमिटरवर उंमडिंगपुन हे गाव लागते जेथे एलिफंट फाल्स आहे. नाव वाचुन फारच मोठा धबधबा असावा असे वाटले. नावातच एलिफंट असल्याने कुणालाही तसे वाटले तर गैर नाही. पण तेथे प्रत्यक्ष गेल्यावर त्या नावातील रहस्य कळले. नावात एलिफंट आणि फॉल्स नव्हे तर फाल्स आहे. धबधबा नव्हे तर धबधबे आहेत. या धबधब्याचे वैशिष्ट म्हणजे हा धबधबा तीन टप्प्यामध्ये ( Three stages) आहे. मनोहारी तसेच दर्शनीय असे हे स्थळ सर्वाना आवडेल यात शंका नाही. हिरवागार निसर्ग सर्वांचे मन वेधून घेतो आणि अशा वातावरणात मनही हिरवे हिरवे होते हे वेगळे सांगायला नको.

धबधब्याच्या नावातील रहस्य म्हणजे या धबधब्याचे नाव पुर्वी खासी भाषेत क्षैद लाई पातेंग खोसिएव ( kshaid- Lai- Pateng ) असे होते. ब्रिटिश ज्यावेळी येथे आले तेव्हा त्यांना येथे हत्तीच्या आकाराचे मोठे रॉक्स आढळले आणि त्यांनी नाव बदलून एलिफंट फाल्स हे नाव दिले. पुढे हे रॉक्स १८९७ साली झालेल्या भूकंपात नष्ट झाले. तीन टप्प्यात कोसळत असलेल्या या धबधब्याचे दृश्य पावसाळ्यात फारच मनोहारी असते. पावसाळ्यात असणारे या धबधब्याचे दृश्य किती भव्य व आकर्षक असेल याची कल्पना साठवूनआणि तसे दृश्य डोळ्यासमोर आणून निसर्गाची किमया असलेली मौसमई गुहा पाहण्यास चेरापूंजीला रवाना झालो.

चेरापूंजी……लहानपणापासून मनाच्या कप्प्यात असलेल, पावसाशी पारंपारिक नात असलेलं आठवणीतील एक गाव. पण……… निसर्गाने या गावाऐवजी सर्वाधिक पाऊस हे नाव आता चेरापूंजी पासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौसिनराम ( Mawsynram ) या गावाला बहाल केले आहे. हिंदमहासागराच्या तापमानातील परिवर्तनामुळे उपग्रहासंबंधातील आकड्यानुसार चेरापूंजी येथे दरवर्षी ०.४२ मिमी. ने वार्षिक घट होत आली असून ताज्या नोंदीनुसार मौसिनराम येथे वर्षाला ११८७१ मिमी. पाऊस पडत असल्याने जगात सर्वाधिक पावसाचे गाव म्हणून ते ओळखल्या जात आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे चेरापूंजी येथे प्रवेश केल्यावर चेरापूंजी या नावाची पाटी येथे कुठेही नाही. या गावाला स्थानिक नाव सोहरा असे आहे. काही ठिकाणी चेरापूंजी नाव कुठे आढळते का याचा शोध घेतला असता सोहरा नावाच्या बाजुला कंसात ( चेरापूंजी) असे निदर्शनास आले हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते. शिलॉंगवरुन जाताना रस्त्यात मधे काही पाहण्यासारख्या स्थळांवर थांबत थांबत ४ तासानी सुमारे १२.३० वाजता मौसमाई गुहेच्या ठिकाणी पोहचलो. हजारो वर्षापुर्वी येथे सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या गुहा म्हणजे निसर्गाची अदभुत किमया आहे. आणि असे कथन करण्याचे कारण की हे प्रत्यक्ष पाहिल्यावर याची प्रचिती येते. या गुहेचे प्रवेशद्वार रुंद आहे तर आत शिरताच फारच अरुंद असल्याने शिताफी व कौशल्याने पुढे जावे लागते. आपले डोके सांभाळत एक एक पाऊल पुढे टाकावे लागते. पायाखाली अनेक मोठे वा छोटे दगड असल्याने तोल सांभाळण्यासाठी आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी बसून पुढे सरकावे लागते अर्थात हे सर्व करत असतांना आमचे डोळे मात्र गुहेच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले आकार पाहून अचंबित होत होते. अर्थात त्यामध्ये पहाड, देवदेवता झाडांचे, प्राण्याचे आकार बघावयास मिळाले. गणपतीचा हुबेहुब आकार आलेल्या शिलेचे दर्शन झाले. आत अंधार असला तरी काही ठिकाणी दिव्याची सोय केल्याने चालणे, सरकणे, फोटो घेणे सोपे जाते आणि म्हणूनच या नैसर्गिक कलेचे बारकावे टिपता येतात.

ही निसर्गाने साकारलेली अदभुत कला अनुभवत लेणीच्या बाहेर येताच काही वेळ का होईना पण आपण एका वेगळ्या विश्वात होतो याची अनुभूती येते आणि आतील नैसर्गिक किमयेची छाप मनपटलावर अशी घट्ट बसते की निसर्गाने केलेली आंतरकला डोळ्यासमोर तरळत राहते.

Related posts

मृगजळ ओळखण्यासाठी जागरूकता हवी

मोठी स्वप्नेच आयुष्य घडवितात…

कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

Leave a Comment