नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी मार्गदर्शक असेच आहेत. हा आदर्श घेऊन अन्य ठिकाणीही हा उपक्रम राबविल्यास निश्चितच पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406
यंदाच्या वर्षी मान्सून वेळाने दाखल झाला आहे. जुन महिन्याचे तीन आठवडे जवळपास कोरडेच गेले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात पुरामुळे अनेक भागात नुकसान झाले. पण यंदा पावसानेच दडी मारल्याने यंदा चिंतेत मोठीच भर पडली आहे. गेल्या दोन दशकांचा विचार केला तर जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग, घटते वन क्षेत्र, जैवविविधतेला धोका असे पर्यावरणाशी संबंधीत विषय मोठ्याच प्रमाणात चर्चेत आले आहेत. याबाबत जनतेत जागृतीही केली जात आहे. पण खरचं जनतेत याबाबत जागरूकता निर्माण होत आहे का ? तर याचे उत्तर निश्चितच होकारार्थी मिळेल. कारण नागरिक जागरूक होत आहेत. काहींना काही तरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात आहे. फक्त या त्यांच्या जागरूकतेला मात्र शास्त्राची जोड मिळणे गरजेचे आहे. जागरूकतेतून जे काही ते करत आहेत ते शास्त्राला धरून असायला हवे. तरच जनतेच्या जागरूकतेचा फायदा पर्यावरण संवर्धनासाठी होईल अन्यथा ते श्रम वाया जाणार आहेत याचा विचार जरूर करायला हवा.
पर्यावरण संवर्धनासाठी अनेक ठिकाणी इव्हेंट केले जातात. हे इव्हेंट केवळ नागरिकांना गोळा करण्यासाठी असतात. प्रत्यक्षात यातून वेगळेच फायदे उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळते. राजकीय लाभासाठी झाडे लावली जातात. ती जगतात का हे कोणी पाहायलाही जात नाही. असे नुसते इव्हेंट करून काहीच हस्तगत होणार नाही. यासाठी जो इव्हेंट केला जातो किंवा जो उपक्रम राबविला जातो तो शास्त्रोक्त पद्धतीचा असावा. त्याचा फायदा पर्यावरण संवर्धनासाठी व्हावा. मुळ हेतू बाजूला ठेवून इव्हेंट घेतले जाऊ नयेत. म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन होईल अन्यथा सर्व वायाच जाणार आहे. हे लक्षात घ्यायला हवे.
गेल्या काही वर्षात काही व्यक्तींनी खरोखरच संवर्धनासाठी ठोस पावले उचलल्याचे पाहायला मिळते. त्याच्या या कार्याची दखल जरूर घ्यायला हवी. त्यांचा हा आदर्श खरोखरच इतरांसाठी मार्गदर्शक असा आहे. वटपौर्णिमेला वडाची पुजा स्त्रिया करतात. हा वटवृक्ष पूर्वीसारखा सर्वत्र पाहायला मिळत नाही. शहरात तर मोठ्या वृक्षांमुळे वादळी पावसात नुकसान होते त्यामुळे असे वृक्ष नाईलाजाने तोडावे लागतात. त्यामुळे शहरी भागात हा वृक्ष आता दुर्मिळच झालेला पाहायला मिळतो. अशाने वटपौर्णिमा साजरी करणे शहरी भागात अडचणीचे ठरत आहे. अशावेळी काही स्त्रिया वडाच्या फांद्या तोडून आणून त्याची पुजा करतात. शहरात हे चित्र बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे. चिपळूणमध्येही हेच घडत होते. तेथील एका वसाहतीमध्ये राहणाऱ्या महिलांना गेल्यावर्षी प्रा. राम साळवी, अभिषेक तटकरी यांनी पुजलेल्या फांद्या आम्हाला द्या आम्ही त्याची झाडे करून आणतो, असे आवाहन केले होते. त्याला महिलांनी प्रतिसाद देत पुजलेल्या फांद्या कचरा कुंडीत टाकण्या ऐवजी त्यांना दिल्या. त्या फांद्या राजन इंदूलकर यांच्या मार्गदर्शनात कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीच्या निवासी शाळेतील मुलांनी रुजविल्या. वर्षभरात या फाद्यातून वडाची रोपे तयार झाली. यंदा ही रोपे या वसाहतीतील महिलांना देण्यात आली व त्याचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ही रोपे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली. साहजिकच यातून वडाच्या झाडाचे संवर्धन चिपळूणच्या प्रयोगभूमीने केले आहे. हा आदर्श घेऊन अन्य शहरातही असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे व संस्कृती दोन्हीचे संवर्धन होईल.
इचलकरंजी शहरातील महिलांनीही पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी महिलांची झाडांची भिशी सुरु केली आहे. जवळपास साठ उच्च शिक्षित महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. डॉ. ज्योती बडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. महिलांनी झाडांच्या भिशीचे नियम ठरवले आहेत. एका वर्षासाठी ही भिशी असून प्रत्येक सदस्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी गुगल पेद्वारे जमा केले जातात. महिन्याच्या वीस तारखेपर्यंत भिशीतील सदस्यांची बैठक होते. या बैठकीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा आराखडा ठरवला जातो. त्यानंतर त्या महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत नियोजित जागेत वृक्षारोपण केले जाते. या झाडांच्या भिशीमध्ये महिन्याला जमवलेल्या रकमेतील ऐंशी टक्के रक्कम ही झाडांच्या खरेदीसाठी वापरली जाते आणि वीस टक्के रक्कम ही झाडांच्या डागडुजीसाठी राखीव ठेवली जाते. सध्या त्यांनी लावलेली रोपे उत्तम प्रकारे वाढलेली असून त्याची काळजी नित्य घेतली जाते. उन्हाळात त्यांना पाणी देण्याचेही काम हा गट करतो.
असे नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी मार्गदर्शक असेच आहेत. हा आदर्श घेऊन अन्य ठिकाणीही हा उपक्रम राबविल्यास निश्चितच पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.