May 18, 2024
Shevanta Pardhin article by Yashwanti Shinde
Home » शेवंता पारधीण
मुक्त संवाद

शेवंता पारधीण

“दादाऽऽऽ मी आलोय बग!” आपल्या हातातील काठी दारात आपटत म्हातारी शेवंता पारधीण घोगर्‍या आणि भारदार आवाजात हाक मारायची. देखणी, गोरीपान, सरळ नाक, घारे डोळे, मध्यम उंची, हातावर – चेहर्‍यावर गोंदण काढलेली, हातात जर्मनचे गोट, काचेच्या-प्लास्टिकच्या बांगड्या घातलेली, बुट्ट्यांची काठापदराची कोल्हापुरी स्टाइलची कासोटा साडी नेसलेली शेवंता पारधीण. घोड्यावर बसून सकाळी सकाळी दारात येऊन उभी ठाकायची. चेहर्‍यावर आठ्यांचे जाळे, रागीट भाव, विसकटलेले केस अशा कडकलक्ष्मीच्या अवतारात यायची. कुणी पाहिले की, आता अंगावर येते की काय, अशी भीती वाटायची.

वर्षातून एकदा खळं झालं की, प्रत्येकाच्या शेतावर शेवंता पारधीण धान्य, पैसे मागत फिरायची. आमच्या भागात ऊस जास्त असायचा आणि पोटापुरता गहू. त्यामुळे गहू किंवा विकत आणलेली ज्वारी, मका आणि पैसे घेतल्याशिवाय ती कुणाच्या शेतातून हलत नसे. आली की दारात हक्काने बसायची. वडिलांना हाक मारायची, “दादा, मी वरसातून एकदा येतोय. दे माझ्या नावचं, काय पिकलं असंल ते!” वडील म्हणायचे, “शेवंता अक्का, या वर्षी ऊसच हाय सगळा. ज्वारी विकत आणली आणि पोटापुरता गहू झालाय. तुला किती द्यायचं त्यातलं?”

“मला किती लागतंय? अन् तुला तुजी लेकरं दिसत्यात. माजी लेकरं मी कशी सांभाळू? मला खायाला लागत नाय का? चार पायली ज्वारी अन् पाचशे रुपय दे. पुना फुडच्या वरसाला मी येतोय. अन् तुला माजा काय तरास हाय का दुसरा? दे माज्या माज्या नावचं!”

आमच्या भागातल्या बाया शेवंता पारधिणीला बहिणीसारखा जीव लावायच्या. आई शेवंता पारधिणीला आपल्या जुन्या साड्या, आमची जुनी कपडे द्यायची. शेवंता पारधीण माझ्या आजीला हक्काने भांडायची, “आई, तुजी लेक वरसातून एकदा येती. एक चोळीचा खण तुला जड हाय का?” असं म्हणत आजीकडून एखादा चोळीचा खण पदरात पाडून घ्यायची. आजीही शेवंता तिला ‘नाही’ म्हणायची नाही. “शेवंता, जरा आडजुनं तर हू दे लुगडं! तुलाच दिती,” असं म्हणत पूर्वीचं एखादं जुनं लुगडं तिला द्यायची.

आम्ही शेवंता पारधिणीला ‘शेवंतामावशी’ म्हणत असायचो. तरीही तिची खूप भीती वाटायची. तिच्या हातातल्या जर्मनच्या बांगड्यांसारख्या बांगड्या आपल्यालाही घालता याव्यात, असे वाटायचे. तिच्या घोड्यावर बसावे वाटायचे. तिने आपल्या घरात आत येऊन बसावं, मग ती आपल्याकडे रागाने बघणार नाही, असंही वाटायचं. पण ती कधीच उंबर्‍याच्या आत येत नसायची. रानात बसायची.



शेवंता घोड्यावर बसून यायची. तिच्यासोबत तिची कुत्रीही असायची. तिच्या कुत्र्यांना आमच्या वस्तीवरची कुत्री भुंकायची. ती वस्तीवर असेपर्यंत कुत्री भुंकतच राहायची. तिला घोड्यावर आलेली बघितलं की आपणही हिच्यासारखं घोड्यावर बसावं वाटायचं. पण तिचा चेहरा इतका रागीट असायचा की, तिच्याकडे बघायचीही भीती वाटायची; मग तिच्या घोड्यावर बसायचं तर दूरच! वाटायचं, ही इतकी रागीट चेहर्‍याने का बघते? सदा न् कदा हिच्या चेहर्‍यावर आठ्याच असतात! ती दुसर्‍यांच्या वस्तीवर आलेली पाहिली की, तिने आपल्या शेतावर यावं असं वाटायचं. घोड्यावर बसून एक स्त्री येते, हे पाहून तिच्याविषयी अभिमान वाटायचा.

शेवंता पारधिणीबरोबर तिचा मुलगा, नातू किंवा एखादी नातसून असायची. सगळ्यांकडून मागून आणलेलं धान्य, कापडचोपड ती घोड्यावर लादायची. आमच्या वस्तीवर हक्काने आणि विश्वासाने आणून टाकायची. सगळ्यांकडून मागून घेऊन येऊन पुन्हा सायंकाळच्या वेळी किंवा कधीकधी दुसर्‍या दिवशी येऊन ती सगळं घेऊन जायची.

आई शेवंतामावशीला भाकरतुकडा, ताक-दही द्यायची. ते ती रानातच बसून घटाघटा प्यायची. तिच्याबरोबर जर्मनचा तांब्या असायचा. त्या तांब्यात पाणी मागून घ्यायची, त्यानंच प्यायची. आई म्हणायची, “शेवंता अक्का, एवढं मोठं नातू झाल्यातं, आता कशाला मागत हिंडत असती? निवांत बसत जा घरी. या पोरांना पाठवत जा कामाला. काय कामधंदा करत नायती का पोरं?”

यावर ती आईला म्हणायची, “वैने, कोण काम देतंय गं आमा पारध्यास्नी? कुत्री अंगावर घालत्यात. कुठं चोरी झाली की, वस्तीवर येऊन पोरास्नी मारत्यात. माजी दोन पोरं- ह्या पोरांचं बा- बेपत्ता हायती की गं. मला तर काय बरं वाटतंय का मागायला? आता मलाबी होत नाय गं! पण ही पोरं मी कशी जगवू सांग तूच!” हे सांगताना तिचा कडकलक्ष्मीचा अवतार गळून पडायचा, डोळे भरून यायचे. तिचे दुःख पाहून गलबलून यायचं. आई तिला चार-दोन पायल्या ज्वारी, गहू, घरातल्या जुन्या साड्या, जुनी कपडे, आजीचं लुगडं असं कायबाय देऊन वाटेला लावायची.

शेवंताच्या नवर्‍याचे नाव भाऊ पारधी. हा भाऊ पारधी इतका देखणा होता की, त्याला भाळून गंगू भोसले नावाची एक मराठ्याची मुलगी त्याच्याबरोबर पळून गेली होती असं म्हणतात आणि तीच गंगू पारधीण म्हणजे शेवंताची सवत. पुढे ही गंगू काय लोकांना पाहायला मिळाली नाही. पण तिचे नाव खूप ऐकले होते. शेवंता पारधिणीला पाच मुलगे होते. त्यांची मुले, नाती, नातसुना अजूनही माझ्या माहेरी दर वर्षी धान्य, पैसे मागायला येतात. परंतु शेवंतामावशीने जसे सगळ्यांशी चांगले संबंध जपले होते, तसे या पुढच्या पिढीतील मुलांना जपता आले नाहीत.

वडीलही शेवंताला बहिणीप्रमाणे वागवायचे. तिच्याशी आदराने बोलायचे. वडिलांनी शेतात नवीन घर बांधले. शेवंता पारधिणीलाही त्यांनी आमंत्रण दिले. तिला ती नेसते त्या पद्धतीची बुट्ट्याची साडी, चोळी, टोपी-टॉवेल असा आहेर दिला. ‘माझ्या भावाने बंगला बांधला’, म्हणून शेवंतामावशीने त्या वेळी 500 रु. आहेर केला होता. वडिलांनी आहेर स्वीकारण्यास नकार दिल्यावर म्हणाली, “तुझी भन काय भिकारी हाय काय? आता माजी जरा अडचण हाय; नाय तर माझ्या भावाला मी संपूर्ण कापडाचा आयार करणार हुतो.”

पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्‍याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती, जावळ काढण्यासारख्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रण असायचे. अशा कार्यक्रमांनाही ती घोड्यावर बसूनच यायची. ती फार स्वाभिमानी स्त्री होती. प्रत्येक कार्यक्रमात आपल्या संबंधांप्रमाणे आहेर करायची. जाताना मुला-नातवंडांसाठी जेवण बांधून न्यायची. तिलाही सगळे जण खाऊ घालून बांधून द्यायचे.

मध्यंतरी आईशी बोलताना तिचा विषय निघाला आणि तिची आठवण जागी झाली. ही शेवंतामावशी आठ-दहा वर्षांपूर्वी वारली. तिचा भारदस्तपणा, कणखरपणा, आवाजातील करारीपणा या गोष्टी तिचे नाव काढले की जशाच्या तशा डोळ्यांपुढे उभ्या राहतात आणि तिच्याविषयीचा मनातील एक कोपरा जागा करतात. तिचे सौंदर्य जपण्यासाठीच ती तशा करारी अवतारात वावरत असावी, असे आता तिच्याविषयी विचार करताना लक्षात येते. नाहीतर पुरुषी जमात तिला तितक्या मुक्तपणे वावरू देईल असे शक्य नाही, हे त्या हुशार स्त्रीने जाणले असावे. हा अंगभूत शहाणपणा तिच्यात नक्कीच होता. अशी ही मनाच्या स्मृतींमध्ये खोलवर रुतून बसलेली शेवंतामावशी! जात-धर्म, गरिबी-श्रीमंती यांच्या पलीकडे माणूस म्हणून मनाला भावणारी, एक कणखर स्त्री बनून अख्ख्या कुटुंबाला जगवणारी. या बाईचा कणखरपणा विशेषत्वाने आठवत राहतो. तिचे स्मरण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांत होतेच होते.

यशवंती शिंदे, कोल्हापूर
मो. 8830179157

Related posts

टकटक

कवी प्रकाश होळकर यांना ‘गोमंतदेवी साहित्य पुरस्कार’ जाहीर

Navratri Theme : जैवविविधतेची जांभळी छटा…

Leave a Comment