September 9, 2024
Book Review of Triparn Author Monika Gajendragadkar
Home » परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या दीर्घकथा
मुक्त संवाद

परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या दीर्घकथा

तिन्ही दीर्घकथांचे वैशिष्ट्य म्हणजे या कथा परदेशी वातावरणात घडतात वा संबंधित आहेत आणि त्यात परदेशात वास्तव्य करणाऱ्या तरुण मुलामुलींचे प्रश्न, नीतिमूल्यांच्या वेगळ्या कल्पना, गोऱ्या सुनांशी नाते जमवताना सासू-सासऱ्यांना वाटणाऱ्या अडचणी, येथील काळ्यांना सतावणारा वर्णद्वेष, वेगळे वातावरण हे सगळे लेखिकेने अतिशय दमदारपणे मांडले आहे.

अशोक बेंडखळे

मलपृष्ठावरील मजकुरात म्हटल्याप्रमाणे वाचकांच्या अभिरुचीला अधिक उन्नत करणाऱ्या आणि मानवी नात्यातल्या गुंतागुंतीच्या माध्यमातून चिरंतन मूल्यांचा शोध घेणाऱ्या या दीर्घकथा आहेत. त्याचबरोबर परदेशातील वेगळ्या वातावरणातील या वेगळ्या दीर्घकथा परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि वाचनाचा प्रगल्भ आनंद देणाऱ्या आहेत.

त्रिपर्ण हा वंश, फ्लेमिंगो आणि सारांश अशा तीन दीर्घकथांचा संग्रह आहे. अल्पावधीत कथा वाङ्मयात चांगले नाव झालेल्या मोनिका गजेंद्रगडकर यांचा हा कथासंग्रह मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. या तिन्ही दीर्घकथांचे वैशिष्ट्य म्हणजे या कथा परदेशी वातावरणात घडतात वा संबंधित आहेत आणि त्यात परदेशात वास्तव्य करणाऱ्या तरुण मुलामुलींचे प्रश्न, नीतिमूल्यांच्या वेगळ्या कल्पना, गोऱ्या सुनांशी नाते जमवताना सासू-सासऱ्यांना वाटणाऱ्या अडचणी, येथील काळ्यांना सतावणारा वर्णद्वेष, वेगळे वातावरण हे सगळे लेखिकेने अतिशय दमदारपणे मांडले आहे.

वंश की दीर्घकथा ज्योतिका या भारतीय तरुणीचा गॅब्रियल या निग्रो तरुणाशी प्रेमविवाह झाल्यानंतर झालेले ब्लॅक कलरचे मूल आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, ताणतणाव सांगणारे आहेत. ज्योतिका अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीत गॅब्रियल या कृष्णवर्णीय तरुणाच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करीत असते. डोरोथी या तिच्या युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसर मैत्रिणीने तिची गॅब्रियलशी ओळख करून दिलेली असते. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन ती त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते. तिचे आई-वडील दोघेही लग्नाला येतात; परंतु त्यांचा लग्नाला विरोध असतो. नाराजी असते. वडील गेल्यानंतरही आईने जेवढ्यास तेवढे संबंध ठेवले होते. त्यांना मुलगा होतो. तोही तुकतुकीत कृष्णवर्णीय. गॅब्रियल आणि ज्योतिकामध्ये काही काळातच दुरावा निर्माण होतो आणि ते दोघं घटस्फोट घेतात. त्याच वेळी ज्योतिकाला कंपनी प्रमोशन देऊन पाच वर्षांसाठी भारतात पाठवते. ती मुलगा जोशूला घेऊन भारतात आईकडे येते. जोशूला ती घराजवळच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालते; पण शाळेतही मुलं त्याला ब्लॅक कलरवरून त्रास देतात. घरी आजीही त्याच्या काळ्या रंगावरून त्याला हिणवत असते. अचानक गॅब्रियलचा तिला एकदा मेल येतो आणि तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला डोरोथीला फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे कळते. ती पूर्ण हादरून जाते. ‘तू आलीस तर तिला निश्चित बरं वाटेल,’ असंही गॅब्रियल कळवतो आणि ती मुलगा जोशूला घेऊन पंधराएक दिवसांसाठी अमेरिकेला जाते. डोरोथी हॉस्पिटलमध्ये असते. ज्योतिका तिच्याच घरी उतरते. तिथे त्या दोघींची मैत्रीण साराही आलेली असते. गॅब्रियलने आपल्याच वंशाच्या इसाबेला या ऑफिसमधल्या तरुणीशी लग्न केलेले आहे आणि त्यांना नॅश नावाचा एक छोटा मुलगा आहे, हे तिला कळते. नात्यात गुंतायचे नाही, अशा बंधमुक्त विचारांच्या ज्योतिकाला अनुभव येतो आणि ती अवाक होते. हॉस्पिटलमध्ये डोरोथीला अशक्त अवस्थेत पाहताना तिला तिची तिने सांगितलेली प्रेमकथा आठवते. कृष्णवर्णीय निकोलस तिच्या आयुष्यात आला होता. तो गॅब्रियलसारखा जीनियस होता; परंतु गौरवर्णीय नव्हता म्हणून तिने त्याला नकार दिला. आणि त्याने आत्महत्या केली. तिने गोरा-कृष्णवर्ण हा भेद जपला तर ज्योतिकाने रंग, वंश, धर्म वा देश न पाहता गॅब्रियलशी लग्न केलं. म्हणून तिच्याबद्दल तिला अपार आदर होता. हॉस्पिटलमध्ये गॅब्रियल ज्योतिकाला भेटतो. इसाबेलाही भेटते. दोघेही तिला जोशूला त्याच्या डॅडशी एकदा भेटवण्याचा आग्रह करतात. शेवटी ती मुलाला गॅब्रिएलाच्या नव्या घरी आणते. तिथं येऊन जोशू खुश होतो. आपल्याच रंगाची माणसं त्याला वेगळा आनंद देतात. तिथं गॅब्रियल, इसाबेला, जोशू आणि नॅशला एकत्र खेळताना पाहून तिच्या मनात येतं, रंगाने तिला यांच्यापासून वेगळं केलं होतं, एकटं केलं होतं आणि रक्ताच्या वंशानेनाही ‘यू आर डिफरंट’ असं म्हणून नाकारलं होतं.

फ्लेमिंगो या दुसऱ्या दीर्घकथेत अमेरिकेत नोकरीला गेलेला सुजय, त्याची अमेरिकन बायको जेसी आणि गोड प्रेमळ मुलगा सॅम यांची कथा आहे. ही कथा बहुतांश भारतात घडते. जयवंतराव आणि लताताई यांचा एकुलता एक मुलगा सुजय नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला जातो. तिथं जेसी या गोऱ्या वर्णाच्या मुलीशी त्याचे लग्न होते. त्यांना सॅम नावाचा १४ वर्षांचा मुलगा असतो; मात्र सुजयचे त्याच्या आई-वडिलांशी औपचारिक संबंध राहिलेले असतात. प्रेमाचा ओलावा नसतो. अनेक वर्षे तो घरीही आलेला नव्हता आणि अचानक मॅसिव्ह हार्ट अटॅकने सुजय गेल्याची बातमी येते. आणि आई-वडील सैरभैर होतात. एकेदिवशी सुजयची बायको जेसीचा त्यांना फोन येतो आणि ती मुलगा सॅमला घेऊन मुंबईला येत असल्याचे कळवते.कारण होते सॅमला डॅडच्या पेरेंट्सना भेटायचे होते. डॅडचे घर, त्याची शाळा, कॉलेज आणि देश पाहायचा होता. त्यांची परदेशातील सून आणि नातू येत होते; पण एखादं संकट चालून यावं, असं त्यांना वाटत होतं. सुजयच्या वडिलांची म्हणजे आजोबांची नातवाची चांगली गट्टी जमते. सॅमला वडिलांच्या अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. ते वरवरचे नसते तर आतून आलेले असते. ते त्याला सुजयची पुस्तके, नोटबुक्स, हॅन्डरायटिंग, फोटो, वस्तूंचे कलेक्शन सगळे दाखवतात आणि त्यातून त्याच्या आवडीनिवडी आपल्या मुलासारख्या आहेत, हे त्यांच्या लक्षात येते. जेसीही सॅमची वडिलांची खूप अटॅचमेंट होती, हे सांगते. तो वडील गेल्यानंतर सैरभैर झाला होता आणि सायकियॅट्रिस्टच्या सांगण्यावरून ती त्यांना भेटायला मुंबईला आली होती, हेही सांगते. आजोबा त्याला त्याच्या वडिलांचे स्कूल, इंजीनियरिंग कॉलेज दाखवतात आणि तो खूश होतो. त्याच्या वडिलांची बंद खोलीही आजी-आजोबा उघडून दाखवतात आणि तिथल्या आजीच्या वस्तू, वडिलांची गिटार, वस्तूंचे कलेक्शन पाहताना त्यांच्या लक्षात येतं की, सुजयने सॅमला त्यांच्याविषयी खूप काही सांगितलं होतं. उत्तम संस्कार केले होते. त्याची आईबरोबर जाण्याची वेळ होते. त्याच्या खांद्यावर वडिलांचे गिटार असते आणि वडिलांनी जमविलेल्या अनेक वस्तू कापडी पिशवीत भरून त्याने हातात घेतलेल्या असतात. जणू तो त्याच्या डॅडला त्या वस्तूंच्या रूपाने घेऊन निघाला होता आणि आजोबा जयंतरावांच्या लक्षात येतं की, आपला सुजय सगळं ओलांडून गेला; पण त्यानं आपल्या वंशाच्या रूपानं त्याची मुळं जोडून ठेवली होती.

तिसरी दीर्घकथा आहे ‘सारांश’ नावाची. ललिता आणि शशिकांत यांची एकुलती एक मुलगी आरती. आरती आणि तिचा युनिव्हर्सिटीमधला मित्र उदय या दोघांचे लग्न होऊन ते अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्या दोघांची मुलगी देविका कॉलेजमध्ये शिकत असते. अकस्मात आरतीचा मृत्यू होतो. त्यापूर्वी तिला नैराश्याचे झटके येत असतात. तिचा मृत्यू नेमका कसा झाला, याभोवती फिरणारी ही परदेशातील वातावरणातील दीर्घकथा आहे.आपलं आयुष्य एवढं मोठं असतं. त्याचा सारांश काढताना त्या केरीला सांगतात, ‘तुझं माणूस तुला भेटलं आहे. माझ्या आरतीने जाताना ते तुझ्यासाठी ठेवलं आहे,’ या पॉझिटिव्ह नोटवर ही कथा विराम घेते.

मलपृष्ठावरील मजकुरात म्हटल्याप्रमाणे वाचकांच्या अभिरुचीला अधिक उन्नत करणाऱ्या आणि मानवी नात्यातल्या गुंतागुंतीच्या माध्यमातून चिरंतन मूल्यांचा शोध घेणाऱ्या या दीर्घकथा आहेत. त्याचबरोबर परदेशातील वेगळ्या वातावरणातील या वेगळ्या दीर्घकथा परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि वाचनाचा प्रगल्भ आनंद देणाऱ्या आहेत.

पुस्तकाचे नाव – त्रिपर्ण
लेखिका – मोनिका गजेंद्रगडकर
प्रकाशन – मौज प्रकाशन
मुखपृष्ठ – अन्वर हुसेन
पृष्ठे १३१, किंमत २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क मोबाईल – ९८२०५३५६४९


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अजून किती लुटाल ?

रामसर स्थळामध्ये भारतातील आणखी पाच जागा

‘स्व”च्या विकासात जगाचा उद्धार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading