June 20, 2024
Behada Terminliya belirika tree article by Pratik More
Home » बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो.

प्रतिक मोरे

पर्यावरण प्रेमी

लहानपणी भेळ्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे उद्योग चालायचे आणि पोटात मांजरें पडतात म्हणून मोठ्यांच्या शिव्या ही पडायच्या… बांधाच्या कडेने असणारे भेळे खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधी नव्हताच.. त्याची जाणीव व्हायची ती त्याला फुलोरा आला आणि त्याचा तीव्र मधमाशीच्या पोळ्यासारखा वास सर्वत्र घुमू लागला की. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट..

शेतीसाठी कवळ तोडले जाते त्यात ऐन किंजळ आणि भेळा हे तीन बिचारे ठरलेले… दरवर्षी भाजावळी साठी यांच्या फांद्या तोडल्या जातात… अश्या एवढ्या दूरवर असणारा भेळा अचानक अगदी मित्रासारखा जवळ आला तो नव्याने भेटल्यानंतर… देवराया फिरत असताना बेहड्याची उंचच उंच झाडं भेटू लागली, अनेक देवरायांची रचनाच या झाडांनी केली असल्याचं दिसून आलं आणि भेल्याची नव्याने ओळख झाली.

देवळाकडे जाताना वाटेवर दोन्ही बाजूने उंचच उंच बेहडे भरपूर रायांमध्ये आहेत आणि त्यांच्या फुलांचा सडा वाटेवर टाकत अजूनही शाबूत आहेत. भेळा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी ने शहारलेला, हिरव्यागार पानांनी नटलेला आणि पिवळसर बहराने लगडलेला अशी आल्हाददायक तर पूर्ण पानझडी होऊन फक्त खोड राहिलेला निष्पर्ण अशी वर्षभर नानाविध रूप धारण करणारा बेहडा… महा धनेश आणि भेळ्याच मात्र अगदी जवळचं नातं आहे… याच्या रुंद पर्णसंभारामध्ये एवढा मोठा हॉर्नबिल अलगद लपून जातो. दुपारी अशीच एखादी दाट सावलीची फांदी बघून तिथं पिसे साफ करताना आणि नंतर डुलकी काढणारा हॉर्नबिल भेळ्यावरच पाहायला मिळतो.

हाच भेळा अनेक वेळा आपल्या ढोल्या असणाऱ्या खोडामुळे ढोलीत घरटे करणाऱ्या पक्ष्यांचा आवडता वृक्ष.. पोपट, मैना, पिंगळा, मलबारी धनेश, राखी धनेश, महा धनेश, घुबडं असे अनेक पक्षी याच्या ढोल्यांमध्ये आपल्या पिलांना जन्म देतात.. लालसर पालवी मध्ये बसून दूरवर ऐकू जाणारे गीत जंगल पिंगळा याच झाडावर बसून देत असतो.. अनेक ऑर्किड सुद्धा यावर वाढलेली दिसतात.. म्हणूनच भेळा पुराण एवढ्यावर थांबणारे नाहीये… जितक्या वेळा भेट होते तितक्या वेळा एखादी नवीन गोष्ट घेऊन हा वृक्ष समोर उभा राहतो…

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी व बागांमध्ये शोभेसाठी लावतात.(बेहडा वृक्ष फार उपयोगी आहे. बेहडा आणि हिरडा या फळांची साल आणि आवळकाठी (म्हणजे वाळलेल्या आवळ्याचे तुकडे) यांपासून ‘त्रिफळा चूर्ण’ हे आयुर्वेदिक रेचक तयार केले जाते. या चूर्णाचे अनेक औषधी उपयोग असून पोटाच्या तक्रारींवर तसेच कफ आणि पित्त या विकारांवर ते गुणकारी असते. हलक्या प्रतीच्या घरबांधणीसाठी, फळ्या बनविण्यासाठी आणि बैलगाड्या व होड्या करण्यासाठी तसेच कागदाचा लगदा, कोळसा व जळाऊ लाकूड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड वापरले जाते. प्लायवुड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड उत्तम समजले जाते.

Related posts

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

वाहतूक व बांधकाम क्षेत्र प्रदूषणास जास्त कारणीभूत !

फक्त पोटापूरतंच पेर..!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406