September 22, 2023
Guru your best friend article by Rajenra Ghorpade
Home » गुरु हा दुःख हरण करणारा खरा मित्र
विश्वाचे आर्त

गुरु हा दुःख हरण करणारा खरा मित्र

गुरु हा मित्रासारखा असतो जो शिष्याच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्याची प्रगती साधतो. निरपेक्ष भावनेने दुःख दुर करून मित्राची प्रगती करणारेच खरे गुरु असतात. हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी मित्रामध्ये गुरुला पाहावे व आपली प्रगती साधावी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती ।
पुसोनि शिणु हरिती । देती सुख ।। 1042 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – जे ( गुरु ) हिताहित पाहतात जे शिष्याच्या हाणीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते, हे विचारून त्याचें दुःख हरण करतात आणि सुख देतात.

सद्गुरु समाधीस्थ झाले तरीही ते भक्तांना अनुभुती देत असतात. त्यांचे मार्गदर्शन अखंड सुरु असते. शिष्याच्या प्रगतीसाठी ते सदैव प्रयत्नशिल असतात. गुरु-शिष्य संबंधामधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच त्यांची समाधी ही संजिवन असते असे म्हटले जाते. अनुभवातून त्याचे महत्त्व स्पष्ट होते. यासाठी तशी भक्तीही असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मृत्यू हा देहाचा होतो. देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. अमर आहे. आत्मज्ञानीपदाला पोहोचलेली व्यक्ती ही सदैव अमर झालेली असते. यामुळेच ते समाधीस्थ झाले तरी ते मार्गदर्शन करतात. शिष्याला अमरत्व प्राप्त करून देणे हेच त्यांचे मुख्य ध्येय असते. त्यामुळे शिष्याच्या सुख-दुःखात ते सहभागी होतात. शिष्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी ते योग्य मार्गदर्शन करतात. त्याचे दुःख जाणून घेऊन त्याला मानसिक आधार देतात.

दुःखामुळे वाईट झालेली अवस्था सद्गुरु दर्शनानेही दूर होते. दुःख व्यक्त केल्यानेही शिष्याचे मन हलके होते. साहजिकच शिष्याची मानसिकस्थिती सुधारते. अशावेळी सद्गुरुंनी मोलाचा सल्ला देऊन दिलेला आधार शिष्यासाठी फायदेशीर ठरतो. शिष्याला यातून मार्ग सापडतो. साहजिकच शिष्याची प्रगती होते. त्यातून तो सुखी-समाधानी होतो. प्रापंचिक घटनात असे प्रसंग अनेकदा येत असतात. अशा प्रसंगात सद्गुरुंच्या समोर व्यक्त केलेल्या दुःखातून निश्चितच मन हलके होते. मानसिक विकासासाठी ही क्रिया आवश्यक आहे. सद्गुरु हे आत्मज्ञानी असल्याने यातून योग्य मार्ग ते दाखवतात.

हे सर्व करण्यामागे सद्गुरुंचा हेतू हा शिष्य सुखी व्हावा. तो योग्य मार्गाने चालावा. यातून हळूहळू तो अध्यात्माकडे ओढला जावा. त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी. हाच हेतू असते. या सर्व गोष्टी निरपेक्ष भावनेने ते करत असतात. कशाचीही अपेक्षा न ठेवता ते करत असतात. जर भक्ताने श्रद्धेने पान, फुल, फळ दिले तर त्याचाच स्विकार ते करतात. अन्यथा कोणतीही आशा न ठेवता त्यांचे सेवाकार्य सुरु असते. शिष्याची सर्वांगिण प्रगती हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. हीच त्यांच्यासाठी शिष्याने दिलेली खरी दक्षिणा असते.

असे संत आज भेटणे मुश्किल आहे. पण असे मित्र असू शकतात. ते भेटू शकतात. कृष्ण हा अर्जुनाचा सखा होता. खास जवळचा असा मित्र होता. गुरु-शिष्य नातेही असेच मित्रत्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे. कृष्णासारखे मित्र आपण करून आपण आपली प्रगती करणे हेच महत्त्वाचे असते. अशा मित्रामध्ये गुरुंना पाहाणे अन् आपली प्रगती साधने महत्त्वाचे आहे. पण असे मित्र भेटणे हे सुद्धा भाग्याचे असते.

Related posts

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

बीज अंकुरण्यासाठी हवा गुरुकृपेचा वर्षाव

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

Leave a Comment