स्मरण-विस्मरणाचा खेळ
शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा मालिकांचा कंटाळाच येत नाही. अशातच मन रमत आहे. अशा मनाला सोऽहमची गोडी कशी लागणार.?
मोबाईल – 9011087406
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
जैं सो ऽहंभावप्रतिति । प्रगट होय ।। 309 ।। अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – ज्यावेळी तें ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो. त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतांत आणि इंद्रियें आपले विषय विसरतात.
सोऽहमचा बोध केव्हा होतो ? आपणास त्याची अनुभूती केव्हा येते ? तो येण्यासाठी काय करावे ? हे प्रश्न सर्वच साधकांना पडतात. या प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता सर्वांनाच असते. सोऽहम ही सहज साधना आहे. सद्गुरुंच्या कृपेने याचा बोध येतो. पण यासाठी साधकांचेही काही कर्तव्य आहे. सोऽहम च्या साधनेत मन रमावे यासाठी त्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. पण हेच तर शक्य होत नाही. मग काय करावे ?
स्मरण-विस्मरण काय आहे याचा अभ्यास करावा. मी स्वतःला विसरलो. तरच मी कोण आहे याचे स्मरण होईल. हा साधा सोपा विचार आहे. पण मी अहंकारी स्वतःला कसा विसरणार? मनात येणारे विविध विचार कसे रोखणार? साधनेच्या काळात तर भोगाचा अधिकच विचार येतो. मनाला शांत करत असतानाच एखादा आनंदाचा क्षण आठवतो. मग त्या आनंदातच साधना सुरू असते. सोऽहमचा नाद सुरू असतो पण मनात वेगळ्याच आनंदाचा विचार असतो.
धकाधकीच्या या जीवनात मनात येणारे विचार रोखणे हे महाकठीण काम आहे. शांत बसले की शेजारच्या खोलीत सुरू असणारा टी. व्ही. चा आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्या आवाजाने मन भरकटते. एकांत, शांत जागा आता पाहायलाच मिळत नाही. मंदिरातही दर्शनाची गर्दी असते. मग साधना करायची कोठे? शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा मालिकांचा कंटाळाच येत नाही. अशातच मन रमत आहे. अशा मनाला सोऽहमची गोडी कशी लागणार.?
कामाचा वाढता व्याप विचारात घेता सोऽहम कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. या सर्व गोष्टींचे विस्मरण झाल्याशिवाय सोऽहमचे स्मरण होणे अशक्यच आहे. या सर्व गोष्टी मनातून त्यागने हाच खरा संन्यास आहे. संसारात राहूनही हे करता येणे शक्य आहे. हेच प्रथम समजून घ्यायला हवे. याचाच बोध प्रथम यायला हवा. संसार सुरूच असतो. त्याचा त्याग करायचा म्हणजे त्यात अडकून राहायचे नाही. नित्यकर्म करतच राहायचे. पण ते मी केले असा अहंकार ठेवायचा नाही. त्यातील मीपणाचा त्याग करायचा. असे केले तरच मनात येणारे विचार कमी होतील. बाहेरच्या आवाजावर नियंत्रणही आपोआपच घडेल.
बाहेरचे आवाज सुरू असतानाच त्यावर लक्ष न देता सोऽहमवर लक्ष केंद्रित करायचे. आपोआपच बाहेरच्या आवाजापासून तुम्ही अलिप्त व्हाल. हा सर्व स्मरण-विस्मरणाचा खेळ आहे. तो खेळ समजून घेऊन खेळायला शिकायचे आहे. बाहेरच्या आवाजाचे विस्मरण जेव्हा होईल तेव्हा सोऽहमचे स्मरण आपोआपच होईल. बाहेरचे विचार थांबले की आतल्या आत्म्याचा आवाज आपोआप ऐकू येऊ लागेल. सोऽहम चा बोध आपोआपच प्रगट होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.