तेरा सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा सहज सुंदर आहे. वाचकाला भावणारी आहे. कथामध्ये सकारात्मकता आहे. नकारात्मकतेचे भरते येत असलेल्या काळात सकारात्मक शेवट असणाऱ्या या कथा वाचकाला निश्चितच आवडतील यात शंका नाही.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
कथा हा तसा एक छान साहित्यप्रकार. कथा संग्रह वाचायला घ्यावा. त्यातील कथा वाचायला घ्यावी. वाचताना कथेत रमावे. काही मिनिटांमध्ये ती वाचून संपवावी. त्या कथेने मनात उठणारे तरंग शांत होईपर्यंत पुस्तक बाजूला ठेवून डोळे बंद करावेत आणि नंतर दुसरी कथा वाचायला सुरुवात करावी. कादंबऱ्यांचे तसे नसते. एखादी सुंदर कादंबरी वाचायला घेतली की संपेपर्यंत ठेवता येत नाही. त्यामुळे कादंबरीपेक्षा कथा हा साहित्यप्रकार मनाला भावतो. अनेक साहित्यिकांनी सुंदर कथा लिहून कथांचे साहित्यदालन समृद्ध केले आहे. यामध्ये जीएंच्या कथा गुढकथा वाटतात. पुलं, वपु यांनी कथांना विनोदाची झालर चढवली. संजय ढोले यांनी वैज्ञानिक तत्त्वामध्ये कथा गुंफल्या. शंकर पाटील, दमा यांनी विनोदी कथेतून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले. आजही अनेक लेखक चांगल्या कथा लिहित आहेत. मात्र त्यातील बहुतांश लेखक आधुनिक युगातील घटनांचा, भवतालाचा, त्यात झालेल्या आणि आलेल्या बदलांचा विचार न करता, जुन्या वातावरणातच रमताना दिसतात.
या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह हाती पडला. हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आहे. सायास पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक केवळ १२० पानांचे आहे. या पुस्तकात तेरा कथा आहेत. सर्वच कथानके ग्रामीण भागातील. कथा छोट्या आहेत, मात्र या सर्वच कथांमध्ये दिर्घकथा किंवा कादंबरीसारखे मोठे कथाबीज दडलेले आहे. त्यांनी पुस्तक अर्पणदेखील कथांमधील पात्रांना केले आहे. त्यांच्या पहिल्या ‘चिन्हांकित यादीतील माणसं’ या कथासंग्रहासंदर्भात माझ्या याच फेसबुक पृष्ठावर पुस्तक परिचय लिहिला होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचा कथेसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला. या कथाही त्याच धाटणीच्या आहेत. या कथासंग्रहातील कथाही सकारात्मक शेवट करणाऱ्या आहेत. या कथा बदलेल्या भवतालाचे, पर्यावरणाचे चित्रण करत प्रथा, परंपरेच्या चौकटीबाहेर जातात.
पहिली कथा ‘सपन’ ही दोन भावातील तरल नात्यावर आधारीत आहे. एका भावाने दुसऱ्या भावाच्या शिक्षणासाठी मोठा त्याग केल्याचे, आपले शिक्षण बंद केल्याची उदाहरणे अनेक गावात आढळतात. शिक्षण घेणारे अनेक भाऊ आपल्या शिक्षणासाठी मदत करणाऱ्या भावाच्या कष्टाला विसरतात. मात्र जाधव सरांच्या कथेतील भाऊ भावाच्या निधनाने हळवा होतो. भावजयीची काळजी घेतो. तिला होणाऱ्या मुलाच्या भविष्याचा विचार करत राहतो. त्यांना जास्त शिकवायचा आणि मोठे आधिकारी बनवायचा निर्धार करताना कथा संपते.
दुसरी कथा ‘धुऱ्याचा धाक’ अस्सल इरसाल ग्रामीण कुरापतीची कथा. असे अनेक किस्से गावागावात घडतात. अशाच एका किस्स्याला छान कथेत गुंफले आहे. साधी सोपी मांडणी असणाऱ्या या कथेतील तात्याही साधाचं, पण डोकेबाज. तो आपला धुरा कोरणाऱ्या आपल्याच बेटातील माणसाला धडा कसा शिकवतो, ते मुळापासून वाचावेसे आहे. ‘चाक’ ही कथा कोरोनाच्या कालखंडातील समाज आणि कुटुंबाकुटुंबावर आलेल्या परिस्थितीचे वर्णन करते. घरी येणारा जावई कशाला भार बनून येतोय असे वाटणारा दादाराव जावयाच्या हुशारीने मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करतो आणि उत्पन्नाचे साधन या गरीब कुटुंबाला मिळते. भार वाटणारा जावई आधार कसा बनतो, हेही वाचनीय.
‘प्रतिनिधी’ ही पुढची कथाही कोरोना काळातील परिस्थितीवर आधारीत. आजच्या काळातही शेतकरी कसे युक्तीच्या चार गोष्टींचा वापर करून शेती फायद्यात आणतात हे सांगणारी आहे. ही शेती पहायला आलेल्या शरदला ही कथा वाचकांसमोर यावेसे वाटत जाते. पुस्तकाचे शिर्षक असलेली ‘आमचं मत आम्हालाच’ ही कथा महिला काय करू शकतात याचं एक छान उदाहरण. गावातील महिला निवडणूक जिंकू शकत नाहीत, अशी धारणा असलेल्या प्रस्थापीत पुढाऱ्यांना माहेरवाशीण म्हणून आलेल्या महिला छान झटका देत, महिलांचा विजय घडवून आणतात. ही कथा वाचताना ओठावर हलके हसू आल्याशिवाय रहात नाही.
‘तिची परीक्षा’ ही सुंदर कथा कोरोना काळातील शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यात निर्माण झालेली दरी दाखवते. मुलांना ऑनलाईन परीक्षा आहे, याचीसुद्धा आठवण करून द्यावी लागते. त्यासाठी प्राध्यापकांना सांगण्यात येते. असा प्राध्यापक लग्न झालेल्या विद्यार्थीनीला फोन करतो. मुलीचा पहिला नंबर वडिलांचा. ते नवऱ्याचा नंबर देतात. त्यानंतरची गंमत प्रत्यक्ष वाचावी अशी. प्रत्यक्षात अनेक शिक्षकांनी हा अनुभव घेतला आहे. ‘चूलबंद’ ही कथा प्रश्न पडणाऱ्या युवकाची आहे. या कथेत पोळ्याचा सण त्यानिमित्त असणाऱ्या प्रथा, परंपरा याचीही माहिती येते. प्रविणला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला कोणीच देत नाही हे पाहून, तो प्रश्नच विचारायचे नाहीत असा निर्धार करतो. कुतुहल शमले पाहिजे आणि मुलांच्या प्रश्नाची तार्किक आणि योग्य उत्तरे न दिल्यास त्यांची घुसमट होते हे दाखवणारी कथा छानच आहे.
‘ब्रेकींग न्यूज’ ही कथा महाराष्ट्रातील २०२२ मध्ये झालेल्या बंडखोरीवर आधारीत आहे. राजकारणात लोककल्याणाचा कोणी कसलाच विचार करत नाही. स्वत:चा विचार करणारे नेहमी सत्तेच्या परिघात राहण्याचा प्रयत्न करतात, हे या कथेत साध्या सोप्या सूत्रातून मांडले आहे. ‘सदा सर्वकाळ’ ही कथा विचारपूर्वक प्रगती साधणाऱ्या माणसाची सुंदर कथा आहे. गावोगावी झालेला शिक्षणाचा प्रसार, त्यातून वाढलेली महाविद्यालये, विद्यापीठांच्या निवडणूका आणि त्या जिंकण्यासाठी शिक्षकांनी वापरलेले अनैतीक फंडे यावर भाष्य करणारी कथा ‘कीड’ मध्ये आली आहे. यामध्ये नको त्या माणसाला मत देण्यासाठी आलेला दबाव झुगारून, त्याला पाडण्यासाठी नायक कोणती क्लुप्ती वापरतो, ते वाचूनच पहायला हवे. ही कथा वाचताना शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड पाहून अस्वस्थ व्हायला होते. समाजशास्त्र हाच विषय घेऊन ही कीड समाजाला कोठे नेणार, असा प्रश्न वाचकांच्या मनात आल्याशिवाय रहात नाही.
एखाद्या मुलाचा आवाज मुलीसारखा असेल तर लग्न जमायला मोठ्या अडचणी येणे स्वाभाविक. त्यात गावातील उपद्व्यापी मंडळी लग्नात वारंवार अडथळा आणत असतात. असंच संतोषच्या बाबतीत होते. तो उच्चशिक्षित असूनही त्याचे स्थळ अनेक मुलींकडून, मुलीच्या वडिलांकडून नाकारण्यात येते. नोकरी नाही, लग्नही नाही, यामुळे तो नैराश्याकडे झुकत चालला होता. मात्र एक चाणाक्ष संस्थाचालक त्याची पात्रता ओळखतो आणि जावई म्हणून त्याचा स्वीकार करतो. त्याला आपल्या संस्थेत नोकरी देतो. नोकरी आणि छोकरी एकदम मिळते आणि त्याचा दोन्हीचा शोध कसा संपतो, याचे छान चित्रण ‘चलगत’ या कथेत केले आहे. प्रत्येक गावात एक ‘उखाड रामा’ असतो. सत्यासाठी कायदा हातात घ्यायलाही मागेपुढे न पाहणारा रामा आई-वडिलांची तशी डोकेदुखी बनलेला असतो. अन्याय, अत्याचाराविरूद्ध लढणारा, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लढणारा नव्हे, तर इतरांना रडवणारा रामा समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजेचा असतो. फक्त त्याच्याकडून मर्यादा उल्लंघन होता कामा नये. याचे भान राखत हा उखाड रामा आपल्याला भेटतो आणि जणूकाही आपल्या मनातल्या भावना, इच्छा त्याच्यामार्फत पूर्ण होतात, असे वाचकाला वाटत राहते. उखाड रामाला मनोमन वाचक आपला मानतो. काही वर्षापूर्वी जसा अमिताभ प्रत्येकाला नायक वाटायचा तसा, उखाड रामाबाबत घडते. अनेक बाबींचा स्पष्ट उल्लेख नसतानाही वाचकाला सर्व काही कळते. खूप सुंदर आणि मनाला भावणारी ही कथा आहे.
‘जग्गू अंकल’ ही कथा वाचताना पुलंचा ‘नारायण’ आठवल्याशिवाय रहात नाही. मात्र पुलंचा नारायण तसा नशीबवान. त्याला सगळे काम सांगतात, मात्र त्याचा अपमान कोणी करत नाही. जग्गू अंकलही असाच. प्रत्येकाला मदत करायला पुढे येणारा. मात्र छोट्या छोट्या कारणावरून जग्गूचा अपमान होतो. जग्गू तो अपमान गिळत असतो. मात्र घरातील लोकांना जग्गूचे असे अपमान सहन करत जगणे असह्य होत असते. तरीही जग्गू प्रत्येकाला मदत करायला जातच असतो. शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे.
अशा १३ सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा सहज सुंदर आहे. वाचकाला भावणारी आहे. कथामध्ये सकारात्मकता आहे. नकारात्मकतेचे भरते येत असलेल्या काळात सकारात्मक शेवट असणाऱ्या या कथा वाचकाला निश्चितच आवडतील यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव – आमचं मत आम्हालाच
लेखक – माधव जाधव
प्रकाशक – सायास प्रकाशन, नांदेड
पृष्ठे – १२०
मूल्ये – रू.१८०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.