April 22, 2025
Jatpanchayatina Muthmati Book Review by Ramdas Kedar
Home » कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास : जातपंचायतींना मूठमाती
मुक्त संवाद

कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास : जातपंचायतींना मूठमाती

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असलेल्या देशात सध्याच्या वर्तमानात कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास हे पांढरे वस्त्र घालून स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या व देश अबाधित आहे अशी पुंगी वाजवण्याऱ्यांना का दिसत नाही ? असा प्रश्न परखड मत मांडणारा चळवळीतला लेखक कृष्णा चांदगुडे यांनी स्वतःच्या कृतिशील अनुभवातून लिहिलेल्या जात पंचायतींना मुठमाती हे पुस्तक वाचल्यानंतर पडतो. हे पुस्तक वाचल्यानंतर आपण कुठल्या देशात वावरतो? स्वातंत्र्याने आपल्या हातात आपलेच मरण दिले की काय? माणसांचे मन सुन्न तर होतेच पण इंग्रजांची राजवटच बरी होती की काय असे वाटू लागते.

रामदास केदार, ९८५०३६७१८५

ढीगभर पदव्या घेऊनही माणूस अंधश्रद्धेला घट्ट चिकटून बसलेला आहे. इतके जाचक अघोरी कृत्य जातपंचायतीच्या माध्यमातून होत असेल तर तुमची स्त्री पुरुष समानता कुठे आहे ? जातपंचायतीत स्त्रीवर अघोरी कृत्य तर केलेच जाते पण संपूर्ण घर बहिष्काराच्या छायेखाली राहते. गावकुसात जगण्या ऐवजी गावकुसाबाहेर जगावे लागते. याच्या पंचायतीतील दिलेला आदेश वाचल्यानंतर अंगावरती शहारे उभे टाकतात इतक्या यातना महिलांना व कोवळ्या कळ्यांना भोगाव्या लागतात. या पंचायतीत महिलांना बोलण्याचा अधिकारच दिलेलो नसतो. आणि एका बाजूला महिला आरक्षणाचा कित्ता चविने गिरवत बसतो.

कृष्णा चांदगुडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून स्वतः याच्या विरोधात लढा दिला आहे. माणसे कितीही हुशार असली, शिकली, सवरलेली किंवा उच्च पदावर असली तरीही जात पंचायतीच्या पुढे त्यांना गुडघे टेकावे लागतात. जर जातपंताचायतीच्या आदेशाला झुगारले तर कायमचे वेशीबाहेर संसार मांडण्याची वेळ कुटूंबावर कशी येते हे लेखक सांगण्याचा प्रयत्न करतो. अनिसच्या माध्यमातून ही प्रथा उजेडात आणण्याचा प्रयत्न केला गेला. काही यशही आले आणि काही ठिकाणी अपयश ही आले आहे. बोलणा-यांचे पंख छाटण्याचे कृत्य या मातीत होते हे पण उदाहरण देता येईल. आपला समाज आपल्या मुठीत ठेवण्यासाठी जात पंचायतींनी त्या त्या जातसमुहात सतत दडपशीहीचा वापर करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणे, हुकूमशाही चालवणे यामुळे महाराष्ट्राच्या मातीला कलंकीत करण्याचे काम अशा जातपंचायती करत असल्याचे लेखकाने सांगितले आहे.

लेखक अहमदनगर जिल्ह्यात वाढलेला आहे. तेथील व परिसरातील घटना पाहून लेखक जागरूक होतो आहे. लेखक परखडपणे लिहितो आहे. महाराष्ट्रात अनेक लेखक, साहित्यिक झाले पण कोणीही अशा व्यवस्थेवर लिहित नाहीत. परंतु अण्णाभाऊ साठे बरबाद्या कंजारी या गाजलेल्या कादंबरीत तर पुढे रामनाथ चव्हाण यांनी बेचाळीस जातीच्या जातपंचायतीवर लेखन केले आहे. तर अलिकडे सैराट चित्रपटात नागराज मंजुळे यांनी जातपंचायत थोडी मांडलेली आहे असे लेखक सांगतो.

लेखकाने जातपंचायतीची रचना कशी असते ? पंचाला देवाचा अवतार समजतात. पुरुषांचे वर्चस्व ठेवतात म्हणून मुलींना यातना भोगाव्या लागतात. जातपंचायतीत पुरुष नेमके काय करतात तर वेगवेगळ्या शिक्षा म्हणून त्या महिलांच्या कपाळावर डागणे, लिंग कापणे, स्त्रिया गहाण ठेवणे, विक्री करणे, डोके भादरणे, मडक्यात पुरुषांनी लघवी करुन ते मडके तिच्या डोक्यावर ठेवून प्रदक्षिणा घालत असताना पुरुषांनी मडक्याला खडे मारणे व लघवी नाकातोंडात आल्यावर ती पवित्र झाली समजणे, बलात्कार झाला की नाही ते तिच्या योनीत कोंबडीचे अंड्डे घालून पाहणे, गोळ्यांची परीक्षा हा अंधश्रद्धेवर आधरलेला अमानुष विधी आहे. महिलांचे चारित्र्य तपासण्यासाठी कंजारभाट समाजात हा विधी केला जातो. अर्धनग्न अवस्थेमध्ये महिलेला पळवत गव्हाच्या पिठाचे गोळे फेकून मारतात. क्रोमार्याची परीक्षा घेणे, लग्नाच्या रात्री नववधू सोबत रात्र घालवल्या नंतर जर कपड्यावर रक्ताचा डाग दिसला नसेल तर तिला हा माल खोटा म्हणून तीला शिक्षा देणे, ती मी खरी आहे असे ओरडते पण कोणी ऐकत नाही. लग्न मोडते. यात त्या मुलींची कसलीही चूक नसताना या अघोरी पंचायतीची बळी जाते. पुढे ही अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मिडीयासोमोर जाते खरे पण रात्रभर त्या हरामखोराने भाळलेलं आणि पंचानी दिलेल्या शिक्षेला खराच न्याय मिळाला हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. म्हणजे लग्नापूर्वी मुलींने शरीर सबंध ठेवला का ही परीक्षा घेणे किती गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार ह्या पंचायतीतून होत असतील तर कशाला आपण स्वातंत्र्याचे गोडवे गायचे?

लैंगिक इच्छा लवकर होऊ नये म्हणून सहा सात वर्षाच्या मुलींवर खतना नावाचा विधी पंचासमोर केला जातो. आणि या लहान बालिकेच्या योनीचा भाग बल्डने कापला जातो. तेंव्हा तीच्या वेदनेचा विचार, मानसिकतेचा विचार का केला जात नाही ? सोलापुरातील दुर्गाचा लढा या व्यवस्थे विरुद्ध खूप मोठा आहे. कर्ज फेडा नायतर बायको धाडा ही परभणी जिल्ह्यातील सेलू येथील घटना आहे. पोलिसात गेलं तर भानामतीची भीती दाखवणे. लेखकाने महाराष्ट्रातील जातपंचायती बरोबरच इतरत्रही घटनेचा आढावा बारकाईने घेतलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये पाचसहा वर्षापूर्वी घटना घडली. पंचायतीने थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावली, मुलींने विरोध केला तेंव्हा त्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याचा आदेश जातपंचायतीने दिला. याला सालशी सभा म्हणतात. किंवा कांगारु कोर्ट म्हणतात. या मुलीचा गुन्हा काय होता तर मुलीने जातपंचायतीत भाग घेऊन उलटे बोलली म्हणून तिला ही शिक्षा दिली. तर मुलगी प्रेमात पडली म्हणून आदिवासी मुलीला झाडाला बांधून तेरा जणांनी तीच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच योनिमार्गात मिरचीची पूड कोंबणारी जातपंचायत ही तर भयावह आहे.

जातीचे प्रश्न जातीच्या बाहेर का घेऊन गेलास ? म्हणून घरातील महिलेला मारहाण करून योनीत मिरचीती पुडी कोंबली गेली. ही बारामतीतील वास्तविक घटना आहे. तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पंचानी मंदाला मोठी शिक्षा सुनावली. नवऱ्याचा बायकोवर संसय आला तर ती पवित्र आहे, अपवित्र हे पाहण्यासाठी उकळत्या तेलात नाणी टाकून त्या महिलेला ती नाणी बाहेर काढायला लावणे. हात भाजला तर चरित्र शुद्ध नाही. तापल्या तेलात हात भाजणारच मग पंच म्हणायचे ही अपवित्र आहे. एवढ्यावरच तीचा संसार उध्वस्त होतो. अशा अनेक अघोरी प्रथा ह्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत होत्या. या प्रथेवर आधारित अँड रंजना गवांदे यांनी कसा गं बाई जातीचा हो किल्ला खूप दर्जेदार लेखन केलेलं आहे.

या व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे. गुप्तपणे लहान मुलींचा सुंता केला जातो. लेखक या प्रथा उजेडात आनू पाहतो आहे. न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न लेखक करतो आहे. देशातील सर्वात मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. खापची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे त्यामुळे त्या सतत चर्चेत असतात. मुलींचा जीव घेतल्याने इज्जत वाढते असा त्यांच्यात मोठा गैरसमज आहे.

लेखकाने अनेक दु:खिताचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. त्यांच्या जगण्याला नवी वाट नवी दिशा देण्याचे काम केले आहे. लेखकाने जातपंचायतीला मुठमाती देण्यासाठी, हा छळ ही अघोरी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी अनिस मार्फत चळवळी उभा करुन जातपंचायतीला नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात पहिला कायदा तयार करून महिलांना थोडे बळ देण्याचे काम केले आहे. लेखकाला व त्यांच्या सोबत असणाऱ्या समितीला अनेकवेळा परिषदा, आंदोलने, मोर्चे, करावे लागले. तीन जुलै २०१७ रोजी कायदा करण्यात आला. या पुर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, उत्तम कांबळे, माधव बावगे ,डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. मच्छिंद्र मुंडे, बाळकृष्ण रेणके, अविनाश पाटील, लक्ष्मण गायकवाड, संजय बनसोडे, अॅड रंजना गवांदे, प्रशांत पोतदार, सतीश चौगुले, नितीन शिंदे, मिलिंद देशमुख, नितीन राऊत, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोळकर, शंकर कणसे, नंदिनी जाधव, अॅड मनीषा महाजन, कृष्णांत कोरे, विनायक सावळे, विजय परब, सुनिल वाघमोडे, अॅड तृप्ती पाटील इत्यादींनी महत्त्वाची भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे लेखक सांगतो आहे.

महाराष्ट्र अनिसच्या सुसंवादातून पंचानी जातपंचायत ह्या बरखास्त करून टाकाव्या लागल्या. हे श्रेय लेखकासह या माणसांना द्यावे लागेल. अहमदनगर जिल्ह्यातील वैदू, पद्मशाली, गोपाळ, नंदीवाले, स्मशान जोगी, तिरमली, मुंबई येथील वैदू, दाभोळखाडीय भोई, नाशिक येथील भटके जोशी, सांगली जिल्ह्यातील कोल्हाटी डोंबारी, चंद्रपूर जिल्ह्यात गौड आदिवासी, परभणीतील गोंधळी, लातूर जिल्ह्यातील भिल्ल इत्यादी बरखास्त करण्यात आली असल्याचे लेखक सांगतो.

अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा अघोरी प्रथा सुरू करुन आपली पैशाची, शरिराची भूक भागवण्यासाठी काहीतरी कृत्य पंचानी करायला लावणे, आपली वेगळी समाजात निर्माण करून दबावात समाजाला ठेवणं ,खोटे नाटे नाटक करण, स्त्रियांना कमी लेखनं, त्यांच्यावर सत्ता गाजवत तीला कमजोर बनवण, जात म्हणील तेच कायदा करणं ,संविधानाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची पायमल्ली करणं ह्या आजपर्यंत जातपंचायतीन केलं. त्याच्या मुळा उपटून टाकण्याचे महत्त्वाचे काम लेखक कृष्णा चांदगुडे यांनी केलेले आहे. अशा जातपंचायतीतून कुस्करलेल्या कळ्यांनी आपल्या इज्जती जातील म्हणून सांगण्याचे धाडस केले नाही. हे कुठेतरी थांबवता येईल का असा विचार लेखकाने केलेला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आपण अशा देशात का जन्माला आलो असे नक्कीच वाटणार. इतकी भयावह अवस्था आजही स्वातंत्र्यानंतर पहावयास मिळते आहे हे चिंता आणि चिंतन करायला लावणारी बाब आहे. या पुस्तकाची पाठराखण अविनाश पाटील यांनी लिहलेली आहे तर प्रस्तावना डॉ. टी आर गोराण यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेली आहे.

अतिशय परखडपणे व वास्तविक प्रश्न या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न लेखक कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे. वाचकांने हे पुस्तक वाचावे असेच आहे. कारण बऱ्याच गोष्टी माहिती नसलेल्या या पुस्तकात आलेल्या आहेत. आपण कुठल्या देशात वावरतो आहे हे लक्षात येईल.

पुस्तकाचे नाव – जातपंचायतींना मूठमाती
लेखक – कृष्णा चांदगुडे
प्रकाशक – विवेक जागरण प्रकाशन, धुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading