एखाद्या संत वा महामानवांच्या जीवनचरित्राचे लेखन एखादा अभ्यासक विवेकी व चिकित्सक दृष्टिने करतो तेव्हा ते चरित्र, चरित्र म्हणून महत्त्वाचे ठरते. अधिक वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाते. ही पुस्तिका त्याचे एक उदाहरण होय.
माधव जाधव, नांदेड
९४२३४३९९९१
‘चोखामेळा संत, कवी आणि माणूस’ ही केवळ पन्नास पानांची डॉ. माधव पुटवाड यांची पुस्तिका शेगावच्या बीज प्रकाशनाने प्रकाशित केली. या पुस्तिकेला दा. गो. काळे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. या पुस्तिकेत डॉ. पुटवाड यांनी आपल्या विवेकी व अभ्यासपूर्ण लेखनातून संत चोखामेळा यांचे व्यक्तिमत्त्व व जीवन उलगडले आहे. अर्थात अनेक अभ्यासकांच्या संदर्भावरुन आणि संत चोखामेळा यांच्या व अन्य संतांच्या अभंगाच्या आधारे त्यांनी या पुस्तिकेची मांडणी केली आहे. संत साहित्यावर विवेकी भाष्य करणे तसे आव्हानात्मकच काम आहे. तरी पण पुटवाड यांनी ते अतिशय संयतपणे केले आहे.
कोणतेही संत, महामानव हे पहिल्यांदा सामान्य माणूसच असतात, म्हणून त्यांचे माणूसपण अगोदर समजून घेतले पाहिजे, असे पुटवाड यांना वाटते. संत कवी चोखामेळा यांचे माणूस असणेच ते विस्ताराने या पुस्तिकेत मांडतात. त्यांच्या मते चोखामेळा संत असले तरी त्यांचे माणूस असणे वजा करता येत नाही. माणूस उणे संत नव्हे तर माणूस अधिक संत त्यांचे मत आहे.
‘चोखामेळा संत कवी आणि माणूस’ या पुस्तिकेत पुटवाड चिकित्सकपणे आपल्या विचारांची मांडणी करतात. संत चोखामेळा यांचे जन्मगाव बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपूरी ते संत नामदेवांसोबत पंढरपुरला गेले असावेत. त्यांनी विठोबाचा भक्त आणि नामदेवांचा शिष्य म्हणून पंढरपूर क्षेत्री राहणे पसंत केले, हे पुटवाड अभ्यासकांच्या संदर्भाआधारे व तर्काधारे सिद्ध करतात.
एखाद्या संत वा महामानवांच्या जीवनचरित्राचे लेखन एखादा अभ्यासक विवेकी व चिकित्सक दृष्टिने करतो तेव्हा ते चरित्र, चरित्र म्हणून महत्त्वाचे ठरते. अधिक वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाते. ही पुस्तिका त्याचे एक उदाहरण होय. सामान्य माणूस म्हणून जीवन जगत असताना भोगाव्या लागलेल्या दुःखाची, अन्यायाची अपमानाची, अत्याचाराची आणि त्यांच्या अर्धपोटी व अर्धनग्न जीवनवास्तवाची अभिव्यक्ती संत चोखामेळ्यांनी आपल्या अभंगातून केली. ही अभिव्यक्ती म्हणजे त्यांचे आत्मनिवेदनच होय. स्वतःच स्वतःशी आणि देवाशी केलेला संवाद होय. भौतिक जीवनातील अपमानाचे अत्याचाराचे, यातनांचे विद्रोहाचे आणि भूक आक्रोशाचे शब्दरुप म्हणजे त्यांचे अभंग होत. हे विवेचन एवढ्याठीच की संत चोखोबा अधिक काळ माणूस म्हणून जीवन जगत होते.
त्यांचं पंढरीच्या पांडुरंगासी सख्य होतं. त्यांची ते भक्ती करीत. त्यांच्या सुरुवातीच्या अभंगातून त्यांची देवदैवशरण मनोवृत्ती दिसते. पण नंतरच्या काळात ते विवेकवादी व विद्रोही होत गेले. तसे ते सामान्य माणूस म्हणूनच जगले. त्यांचे संत असणेही सर्वसामान्यच असल्याचे दिसून येते. त्यांच्या संतत्वाबद्दल अनेक अभ्यासकांनी मिथ्थकं, कल्पनाकथा रचल्या. संत असल्याचा चोखोबांना काहीच फायदा झाला नाही. ना तत्कालीन समाजाने त्यांना न्याय दिला ना पांडुरंगाने. त्यांच्या संतत्वाचे अनेकांनी पोवाडे गायले पण त्यांचे माणूस असणे समजून घेतले नाही.
संत चोखामेळा आणि पंढरपूरचे पांडुरंग यांचे सख्य असणे ही चोखोबाची स्वप्नावस्था होय. कुठल्याही मंदिरातील देव प्रत्यक्षात माणसाला भेटू शकत नाही. माणूस जेव्हा वास्तवात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा ही भूक तो स्वप्नात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जटील, खडतर वास्तव त्यांच्यापासून दूर जात नाही. तसे चोखोबा अनेकदा वास्तवातील वेदनेने व्याकूळ होतात, कासावीस होतात आणि मग स्वप्न पाहतात. त्या मनाची अभिव्यक्ती काही अभंगातून होते.
संत चोखोबांचे संत आणि कवी असणे थोडे बाजूला ठेवले तर त्यांचे माणूस असणे किती खडतर होते हे कळते. चोखोबा अत्यंत बुद्धिवंत व संवेदनशील होते. वेदनेने तळमळणाऱ्या स्वतःच्या रक्तबंबाळ मनाची स्वतःच घातलेली समजूत, मूक रडण्याची शब्दरुप अभिव्यक्ती म्हणजे त्यांचे काही अभंग होत. आपण माणूस असूनही आपणास माणूस म्हणून इतर माणसांसारखे सन्मानाने का जगता येत नाही हा प्रश्न त्यांना सतावतो. समाजव्यवस्थेतला मानवनिर्मित भेदाभेद त्यांना खटकतो ; पण ही परिस्थिती एकट्या दुकट्याने बदलणे शक्य नसते.
संत चोखोबांनी पंढरपूरच्या बडवे, उत्पातांच्या व्यवस्थेविरोधात पहिले बंड केले. त्यांनी भेदाभेदावर व ब्राह्मणी नितिव्यवस्थेवर टीका केली; पण ब्राह्मणी व्यस्थेच्या पगड्यामुळे त्यांचा आवाज क्षीण ठरला. त्यांच्या अनेक अभंगातून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधातील विद्रोह व्यक्त झाला आहे.
डॉ. पुटवाड यांनी ‘चोखामेळा संत, कवी आणि माणूस’ या पुस्तिकेतून नव्याने आपल्या विचारांची मांडणी केली आहे. त्यांचा या मांडणीवर वाद-विवाद होतीलच. ते झाले पाहिजेत. मात्र महत्त्वाचे हे की, दलित, वंचित बहुजन साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी, स्वतःला परिवर्तनवादी समजणाऱ्या अभ्यासकांनी, नवोदित संशोधकांनी आणि समाजशास्त्राच्या अध्यापकांनी ही पुस्तिका मुळातून एकदा वाचने अतिशय महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.
पुस्तकाचे नाव – ‘चोखामेळा संत, कवी आणि माणूस’
लेखक: माधव पुटवाड, मोबाईल – 9423750602
प्रकाशक: बीज प्रकाशन, शेगाव
पृष्ठ. ५०, किंमत – १००