आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे आंबुशी..
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
आंबुशी याला आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसपटी आदी स्थानिक नावाने ओळखले जाते.
इंग्रजी नाव: Indian Sorrel किंवा Creeping Sorrel.
शास्त्रीय नाव: Oxalis corniculata
औषधी उपयोग : सूज येणे, पोटाचे विकार, डायबिटीज यात उपयोगी
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते. ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमण्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. ताज्या पानांची कढी पाचक आहे.आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होतो व सूज उतरते. धोतऱ्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतारा म्हणून देतात. कफ आणि वातात आंबुशी गुणकारी आहे.
पाककृती :
- प्रथम भाजीची लहान पाने आणि नाजूक देठ बघून खुडून घायची.
- निवडलेल्या भाजीला पाण्यात स्वच्छ धुवून घायचे.
- आंबूशीची पाने शिजायला वेळ लागतो म्हणून ती आधी पाण्यात 10 मिनिटे उकडून घ्यावे.
- उकडून झाले कि भाजी थंडी होऊ द्यावी आणि नंतर बारीक कापून घ्यावी.
- कढईत तेल घ्यावे. तेल तापल्या नंतर त्यात मोहरी घालावी.. मोहरी तडतडली कि त्यात बारीक कापलेला लसूण घालावा.
- बारीक कापलेला कांदा घालावा. कांदा शिजला कि लाल मिरची पूड, हळद आणि धने पूड घालावी.
- यात नंतर कापलेले आंबूशी भाजी घालावी आणि वरून झाकून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवावी.
- त्यात नंतर यात भिजवलेले मूंग डाळ घालावी आणि चवी प्रमाणे मीठ घालून एक करावे . भाजीला झाकून 5 ते 10 मिनिटं शिजवावे. गरज पडल्यास पाणी शिंपडावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.