देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन
चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून पुण्यात
अभिनेते मकरंद अनासपुरेंना ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार होणार प्रधान
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०२५ याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी ( २६ डिसेंबर २०२५) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक संदीप ससाणे, प्रतिमा परदेशी, सहसंयोजिका नेहा भुकण, निलेश रसाळ यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व संपादक महावीर जोंधळे व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून “तुंबाड फेम” व लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मायासभा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे, अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेते दीपक दामले, निर्माते गिरीश पटेल, निर्माते अंकुर जे. सिंग, क्रिएटिव्ह कन्सल्टंट व फिल्म समीक्षक आशिष निनगुरकर, पिकल एंटरटेनमेंटचे प्रमुख समीर दीक्षित व ऋषिकेश भिरंगी, दिग्दर्शक व महोत्सव परीक्षक सुनील सुकथनकर व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
२६ डिसेंबर रोजी महोत्सव उद्घाटन झाल्यानंतर दिग्दर्शक राही बर्वे यांच्या चर्चेत असलेल्या व झिरकॉन फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘मायासभा’ या हिंदी सिनेमाचे ओपनिंग फिल्म म्हणून विशेष स्क्रिनिंग होणार आहे. यावेळी या सिनेमाची टीम उपस्थित रसिकांसोबत संवाद साधणार आहे. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील एकूण ७० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट स्क्रिनिंगसोबतच विशेष चित्रपट चर्चा, दिग्दर्शकांशी संवाद सत्रे आणि वैचारिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात ऋत्विक घटक यांच्या ‘सुबर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष संवाद सत्र होणार असून महोत्सवाचा समारोप नितेश हेगडे दिग्दर्शित ‘वाघाची पहाणी’ (Tiger’s Pond)’ या चित्रपटाने होणार आहे तसेच ‘सुलतान’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे. या वर्षीचा ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार – २०२५’ प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक भान जपणारे कलाकार मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला असून, पुरस्कार वितरण सोहळा २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. हा पुरस्कार प्रसिध्द नाटककार,लेखक व प्राध्यापक, अभिनेते प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित AI चित्रप्रदर्शन, भरवण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाचा विचार मांडणारा हा महोत्सव पुण्यातील चित्रपटप्रेमींसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरत आहे. त्यामुळे पुणे व राज्यातील सिनेमाप्रेमींनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
