अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव म्हणजे संघर्ष आणि माणुसकीचा वारसा – डॉ. मोहन आगाशे
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांच्या विचारांना आणि संघर्षशील साहित्याला समर्पित असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. गेली आठ वर्षे सातत्याने सुरू असलेला हा महोत्सव केवळ चित्रपटांचे प्रदर्शन नसून समाजाशी संवाद साधणारी एक वैचारिक चळवळ असल्याचे उद्घाटनप्रसंगी ठळकपणे अधोरेखित झाले.
या महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप भाऊ ससाणे असून, कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये राही अनिल बर्वे (तुंबाड फेम दिग्दर्शक), वीणा जामकर (अभिनेत्री), दीपक दामले (अभिनेते), गिरीश पटेल, अंकुर जे सिंह, शामराव यादव (निर्माते), आशिष निनगुरकर (क्रिएटिव्ह कन्सल्टंट), समीर दीक्षित व ऋषिकेश भिरंगी (प्रस्तुती व वितरण) यांचा समावेश होता. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मयसभा या चित्रपटाने महत्त्वाची सुरुवात झाली या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रास्ताविकात बोलताना महावीर जोंधळे म्हणाले की, “अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सुरू झालेला हा महोत्सव म्हणजे विचारांची चळवळ आहे. कमी साधनांतही प्रभावी चित्रपट निर्माण होऊ शकतात, फक्त कल्पना आणि संवेदना असायला हव्यात. चित्रपट हे समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम आहे.”
डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या शैलीत ठाम शब्दांत सांगितले की, “फुकट गाडी मिळाली म्हणून कोणी ड्रायव्हर होत नाही, तसेच फुकट कॅमेरा मिळाला म्हणून कोणी दिग्दर्शक होत नाही. कॅमेरा कसा, कुठे आणि का वापरायचा, याची जबाबदारी समजणं गरजेचं आहे.”“दुर्लक्षित समाजाचा आवाज प्रामाणिकपणे मांडणं हेच खरं सिने-कर्म”. अण्णाभाऊ साठेंच्या नावाशी संघर्ष, माणुसकी आणि संस्कृती जोडलेली असल्याने हा महोत्सव मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अभिनेत्री वीणा जामकर म्हणाल्या की, “चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. महोत्सवातील चित्रपट नव्या कथा आणि नव्या दृष्टीकोनांना जन्म देतात. अण्णाभाऊ साठेंचे साहित्य आजही नव्या पिढीला सत्य मांडण्याची ताकद देते.”
मुख्य संयोजक संदीप ससाणे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आधारित ‘फकीरा’, ‘आवडी’, ‘वैजंता’ यांसारख्या चित्रपटांचा उल्लेख करत सांगितले की, “हा महोत्सव गौरवाचा नाही, तर स्मरणाचा आणि समजून घेण्याचा आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जपणं, हेच आमचं खरं उद्दिष्ट आहे.” सदरील महोत्सव शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस राष्ट्रीय फिल्म संग्रालय लॉ कॉलेज रोड येथे सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत पार पडणार असून चित्रपट रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
ओपनिंग फिल्म मयसभाला प्रचंड दाद…
चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म ‘मयसभा’ सिनेमाला प्रचंड दाद मिळाली.सभागृह तुडूंब भरले होते…लोकांची गर्दी उत्स्फूर्त होती.एकही खुर्ची रिकामी नव्हती व लोकांनी सिनेमा संपल्यावर एकच जल्लोष केला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
