इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकंरजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयातर्फे सौ. सुषमा दातार तर संमेलन स्मृती ट्रस्टच्यावतीने डॉ. विलास शहा यांनी केले आहे.
आपटे वाचन मंदिर आणि १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती जपणाऱ्या इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी त्या वर्षातील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिले जात आहेत. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांची स्मृती जपणारे हे पुरस्कार आहेत. यंदा पुरस्काराचे २३ वे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या साहित्य जगतात आपटे वाचन मंदिराच्या साहित्यकृती पुरस्काराने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
देण्यात येणारे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार योजनेचा तपशील असा –
काव्यसंग्रह पुरस्कार – आपटे वाचन मंदिराच्यावतीने इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार दोन साहित्यकृतींना देण्यात येतो. दोन हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार – इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने कथासंग्रह, कादंबरी, अनुवाद, ललितगद्य, बालसाहित्यकृती, नाटक व एकांकिका वगळता साहित्यकृती यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये उत्कृष्ट गद्य साहित्यकृतीस पाच हजार रुपये व गौरव पत्र देण्यात येते. लक्षणीय गद्य यामध्ये दोन साहित्यकृतींना दोन हजार रुपये व गौरव पत्र देण्यात येते.
कथासंग्रहासाठी सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कादंबरीसाठी विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अनुवादित साहित्यकृतीसाठीही पुरस्कार देण्यात येतात. भारतीय लेखकाच्या अन्य भाषेतील साहित्याच्या मराठी भाषेतील अनुवादासाठी महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ललित गद्य साहित्यकृतीसाठी पाच हजार रुपये व गौरव पत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. बाल साहित्यकृतीसाठी पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कार देण्यात येतो. तीन हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
युवा पद्मरत्न पुरस्कार रागिणी दादासो जगदाळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. युवा पद्मरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य चालेल पण वय ३० वर्षाच्या आतील प्रथम प्रकाशित पुस्तकासाठी हा पुरस्कार आहे.
एक जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित पुस्तकाच्या प्रथम आवृत्ती या पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत. तरी कवी, लेखकांनी तसेच प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती कार्यवाह, आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक, इचलकरंजी ४१६११५ या पत्त्यावर २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.