September 12, 2024
Narendra Modi speech in Mann Ki Baat
Home » योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
काय चाललयं अवतीभवती

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (96 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.

आज आपण ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शहाण्णव्या भागात संवाद साधत आहोत. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पुढचा भाग हा 2023 या वर्षातला पहिला भाग असेल. तुम्ही सर्वांनी जे संदेश पाठवले आहेत, त्यात 2022 या सरत्या वर्षाबाबत बोलण्याचा आग्रहसुद्धा केला आहे. भूतकाळाचे अवलोकन आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याची प्रेरणा देत असते. 2022 या वर्षात देशातील लोकांचे सामर्थ्य, त्यांचे सहकार्य, त्यांचे संकल्प आणि त्यांच्या यशाची व्याप्ती इतकी जास्त होती की ‘मन की बात’ कार्यक्रमात त्या सर्वाचा आढावा घेणे खरोखरच कठीण होईल. 

2022 हे वर्ष खरेच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायक आणि अद्भुत ठरले. या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला, सर्व देशवासीयांनी एकापेक्षा एक कामे केली. 2022 या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भारताने जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा म्हणजे वर्ष 2022, भारताने 220 कोटी लसीकरणाचा अविश्वसनीय टप्पा ओलांडण्याचा विक्रम म्हणजे वर्ष 2022, भारताने 400 अब्ज डॉलर निर्यातीचा जादुई टप्पा ओलांडणे म्हणजे वर्ष 2022, देशातील प्रत्येक नागरिकाने ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प स्वीकारणे म्हणजे वर्ष 2022, आयएनएस विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वागत म्हणजे वर्ष 2022, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात भारताचा डंका म्हणजे वर्ष 2022, प्रत्येक क्षेत्रात भारताला मिळालेले यश म्हणजे वर्ष 2022. खेळाच्या मैदानात सुद्धा, मग ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, आपल्या तरुणाईने प्रचंड सामर्थ्य दाखवले आहे.

मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.

मित्रहो, या वर्षी G-20 समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी सुद्धा भारताला मिळाली आहे. मागच्या वेळी मी याबाबत सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. वर्ष 2023 मध्ये आपल्याला G-20 च्या उत्साहाला नव्या उंचीवर न्यायचे आहे, या आयोजनाला आता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जगभरात नाताळचा सणही थाटामाटात साजरा केला जातो आहे. येशू ख्रिस्ताचे जीवन आणि शिकवण लक्षात ठेवण्याचा हा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो, आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे अटल बिहारी वाजपेयी जी यांचाही आज जन्मदिवस आहे. देशाला असामान्य नेतृत्व देणारे ते महान राजकारणी होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. मला कोलकाताहून आस्थाजींचे पत्र आले आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीला भेट दिली, त्या भेटीचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यांनी लिहिले आहे की यावेळी त्यांनी पीएम म्युझियमला भेट देण्यासाठी वेळ काढला. या संग्रहालयातील अटलजींचे दालन त्यांना खूप आवडले. तिथे अटलजींसोबत काढलेला फोटो त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. अटलजींनी देशासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाचे दर्शन आपल्याला त्या दालनात घडते. पायाभूत सुविधा असो, शिक्षण असो किंवा परराष्ट्र धोरण असो, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले. मी पुन्हा एकदा अटलजींना हृदयापासून अभिवादन करतो.

मित्रहो, उद्या 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ आहे आणि त्यानिमित्त मला दिल्लीमध्ये साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांच्या हौतात्म्याला समर्पित एका कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहिल.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

सत्यम किम प्रमाणम, प्रत्यक्षम किम प्रमाणम |

अर्थात सत्याला पुराव्याची आवश्यकता नसते. जे प्रत्यक्ष आहे, त्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसते, असे आपल्याकडे म्हटले जाते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राचा विचार केला तर पुरावा हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. योगाभ्यास आणि आयुर्वेद हे शतकानुशतके आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मात्र पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे आपल्या या शास्त्रांसमोर नेहमीच एक आव्हान राहिले आहे. परिणाम दिसतात पण पुरावा नसतो. मात्र पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्राच्या आजच्या युगात, योगाभ्यास आणि आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या आणि कसोट्यांवर यशस्वी ठरत आहेत, याचा मला मनापासून आनंद होतो आहे.

टाटा मेमोरियलचे यश

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. संशोधन, नाविन्यता आणि कर्करोग संबंधी देखभालीच्या क्षेत्रात या संस्थेने चांगले नाव कमावले आहे. या केंद्राने केलेल्या सखोल संशोधनातून, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी योगाभ्यास अत्यंत प्रभावी असल्याचे समोर आले आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी अमेरिकेत आयोजित अत्यंत प्रतिष्ठित परिषदेत, टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या संशोधनाचे परिणाम सादर केले आहेत. या परिणामांनी जगातल्यामोठमोठ्या तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, रुग्णांना योगासनांचा कसा फायदा झाला, हे टाटा मेमोरियल सेंटरने पुराव्यासह सांगितले आहे. या केंद्राच्या संशोधनानुसार, नियमित योगाभ्यासामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना पुन्हा हा आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. अशाप्रकारे भारतीय पारंपारिक उपचार पद्धती, पाश्चात्य पद्धतींच्या कठोर मानकांनुसार पारखली जाण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्याचबरोबर स्तनाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगासने उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध करणारा, हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. त्याचे दीर्घकालीन लाभही समोर आले आहेत. पॅरिसमध्ये आयोजित युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ऑन्कॉलॉजी) परिषदेत टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या अभ्यासाचे निकाल सादर केले आहेत.

सिंकपीवर योगोपचार

मित्रहो, आजच्या युगात पुराव्यावर आधारित भारतीय वैद्यकीय पद्धती जितक्या जास्त असतील तितकी संपूर्ण जगात त्यांची स्वीकारार्हता वाढीला लागेल. याच विचारातून दिल्लीतील एम्समध्येही प्रयत्न सुरू आहेत. आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी एकात्मिक औषध आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धतींचा वापर केला जातो. या केंद्रातर्फे आतापर्यंत नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 20 शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये syncope–सिंकपी या आजाराच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे न्यूरोलॉजी विषयक नियतकालिकामधील शोधनिबंधामध्ये मायग्रेनच्या त्रासावर उपकारक ठरणाऱ्या योगाभ्यासाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त हृदयविकार, नैराश्य, निद्रानाश आणि गर्भधारणेदरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अशा इतरही अनेक त्रासांमध्ये उपकारक ठरणाऱ्या योगासनांच्या फायद्यांबाबत अभ्यास केला जातो आहे.

आयुर्वेद परिषदेत 550 च्यावर शोधनिबंध

मित्रहो, काही दिवसांपूर्वीच जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी मी गोव्यामध्ये गेलो होतो. 40 पेक्षा जास्त देशांमधले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आणि 550 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध सादर करण्यात आले. या परिषदेतील प्रदर्शनात भारतासह जगभरातील सुमारे 215 कंपन्यांनी आपापली उत्पादने प्रदर्शित केली. चार दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांनी आयुर्वेदाशी संबंधित अनुभवांचा आस्वाद घेतला. या आयुर्वेद परिषदेत, जगभरातून जमलेल्या आयुर्वेद तज्ञांसमोरसुद्धा मी, पुराव्यावर आधारित संशोधनाच्या विनंतीचा पुनरुच्चार केला. कोरोना या जागतिक साथरोगाच्या काळात आपण सगळेच योगाभ्यास आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य अनुभवतो आहोत, त्यामुळेत्यासंबंधी पुराव्यावर आधारित संशोधन खूप महत्त्वाचे ठरेल. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे योगाभ्यास, आयुर्वेद आणि आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींशी संबंधित अशा प्रयत्नांबद्दल काही माहिती असेल, तर ती सोशल मीडियावर अवश्य शेअर करा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांत आपण आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली आहे. याचे सगळे श्रेय आपले वैद्यकीय तज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशवासीयांच्या इच्छाशक्तीला जाते. आपण भारतातून स्मॉलपॉक्स, पोलिओ आणि ‘गिनी वर्म’ या आजारांचे समूळ उच्चाटन करून दाखवले आहे.

किटक चावल्याने काळा ताप

आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या श्रोत्यांना मी आणखी एका आव्हानाबद्दल सांगू इच्छितो, जे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.हे आव्हान, हा रोग आहे – ‘कालाजार म्हणजेच काळा ताप’. सँड फ्लायहा समुद्रकिनारी आढळणारा एक किटक चावल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एखाद्याला काळा ताप हा आजार झाला की महिनोन महिने ताप येतो, रक्ताची कमतरता भासू लागते, शरीर अशक्त होते आणि वजनही घटते. हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळा ताप नावाचा हा आजार आता झपाट्याने नष्ट होतो आहे. अलीकडेच 4 राज्यांमधल्या 50 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काळ्या तापाची साथ आली होती, मात्र आता या काळ्या तापाचा प्रादुर्भाव बिहार आणि झारखंडमधल्या 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. बिहार-झारखंडमधल्या लोकांचे सामर्थ्य आणि त्यांची जागरुकता या चार जिल्ह्यांमधूनही हा काळा ताप हद्दपार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत करेल, असा विश्वास मला वाटतो. काळ्या तापाचे रूग्ण असलेल्या भागातील जनतेने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे मला सांगावेसे वाटते.

सँड फ्लायवर नियंत्रण

एक म्हणजे – सँड फ्लाय किंवा वाळूवर आढळणाऱ्या माशांवर नियंत्रण आणि दुसरे म्हणजे या आजाराची लागण झाल्याचे लवकरात लवकर ओळखणे आणि त्यावर पूर्ण उपचार. काळ्या तापावरचे उपचार सोपे आहेत आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही खूप प्रभावी आहेत. तुम्हाला फक्त सतर्क राहायचे आहे.ताप आला तर हलगर्जीपणा करू नका आणि सँड फ्लायला मारणाऱ्या औषधांची फवारणी करत रहा. जरा विचार करा, आपला देश या काळ्या तापापासून जेव्हा मुक्त होईल, तेव्हा आपल्या सर्वांसाठीच ती आनंदाची बाब असेल. ‘सबका प्रयास’ च्या या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंतभारताला टी.बी. मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. तुम्ही पाहिले असेल, मागच्या काही दिवसांत जेव्हा टी.बी. मुक्त भारत मोहीम सुरू झाली, तेव्हा हजारो लोक, टी.बी. रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. हे लोक ‘निक्षय’ मित्र होऊन टी.बी. रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची आर्थिक मदत करत आहेत. लोकसेवेची आणि लोकसहभागाची हीच ताकद प्रत्येक अवघड उद्दिष्टसाध्य करून दाखवते आहे.

 ‘नमामि गंगे’ चा जगभरातील उपक्रमात समावेश

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपली परंपरा आणि संस्कृती यांचे गंगेशी अतूट नाते आहे. गंगा जल हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये देखील म्हटलेच आहे:- 

नमामि गंगे तव पाद पंकजं,
सुर असुरै: वन्दित दिव्य रूपम् |
भुक्तिम् च मुक्तिम् च ददासि नित्यम्,
भाव अनुसारेण सदा नराणाम् ||

अर्थात हे माता गंगा! तू तुझ्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार ऐहिक सुख, आनंद आणि मोक्ष प्रदान करतेस. सर्व तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतात. मी देखील तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतो. अशावेळी, शतकांपासून वाहणाऱ्या गंगा मातेला स्वच्छ ठेवणे हि आपली खूप मोठी जबाबदारी आहे. याच उद्देशाने आठ वर्षांपूर्वी आम्ही ‘नमामि गंगे अभियान’ सुरू केले. भारताच्या या उपक्रमाचे आज जगभरातून कौतुक होत आहे ही आपल्या सर्वांसाठी  अभिमानाची बाब आहे. संयुक्‍त राष्ट्राने ‘नमामि गंगे’ अभियानाचा समावेश हा पर्यावरण पुनर्संचयित करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे. जगभरातील अशा 160 उपक्रमांमध्ये ‘नमामि गंगे’ला हा सन्मान मिळाला आहे, ही अजून एक आनंदाची बाब आहे.

मित्रांनो, लोकांचा निरंतर सहभाग ही ‘नमामि गंगे’ अभियानाची सर्वात मोठी उर्जा आहे. ‘नमामि गंगे’ अभियानात गंगा प्रहरी आणि गंगा दूत यांची भूमिका देखील महत्वाची आहे. वृक्षारोपण,  घाटांची स्वच्छता, गंगा आरती, पथनाट्य, चित्रकला आणि कविता यांच्या माध्यमातून ते जनजागृतीचे काम करत आहेत. या अभियानामुळे जैवविविधतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. हिल्सा मासे, गंगेच्या पत्रातील डॉल्फिन आणि कासवांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगा स्वच्छ झाल्याने  उपजीविकेच्या इतर संधीही वाढत आहेत. येथे मी जैवविविधता लक्षात घेऊन तयार केलेल्या ‘जलचर आजीविका मॉडेल’ ची चर्चा करू इच्छितो. ही पर्यटन आधारित बोट सफारी 26 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. साहजिकच ‘नमामि गंगे’ अभियानाचा विस्तार, त्याची  व्याप्ती ही नदीच्या स्वच्छतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हे अभियान म्हणजे एकीकडे आपल्या इच्छाशक्तीचा आणि अथक प्रयत्नांचा प्रत्यक्ष पुरावा आहे, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगाला एक नवा मार्गही दाखवणार आहे.

संगे शेरपा स्वच्छता मोहिम

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला संकल्प जर दृढ असेल तर मोठ्यातील मोठे आव्हान देखील सोपे होते. सिक्कीमच्या थेगू गावातील ‘संगे शेरपा’ यांनी याचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. मागील 14 वर्षांपासून ते 12,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर पर्यावरण संरक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. संगे जी यांनी सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व असलेले सोमगो सरोवर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी या ग्लेशियर (हिम) सरोवराचे रूप पालटले आहे. 2008 मध्ये जेव्हा संगे शेरपा यांनी ही स्वच्छता मोहीम सुरू केली तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.मात्र अगदी कमी कालावधीतच त्यांच्या या उदात्त कार्यात युवक व ग्रामस्थांसह पंचायतीने देखील त्यांना सहकार्य करायला सुरुवात केली. आज तुम्ही सोमगो सरोवर बघायला गेलात तर आजूबाजूला मोठमोठे कचऱ्याचे डबे दिसतील. आता येथे जमा होणारा कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. येथे येणाऱ्या पर्यटकांना कापडापासून तयार केलेल्या कचऱ्याच्या पिशव्या देखील दिल्या जातात जेणेकरून त्यांनी इकडे-तिकडे कचरा फेकू नये. स्वच्छ झालेले हे सरोवर पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक येथे भेट देतात. सोमगो सरोवराच्या संवर्धनाच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नासाठी संगे शेरपा यांना अनेक संस्थांकडून सन्मानितही करण्यात आले आहे. अशा प्रयत्नांमुळेच आज सिक्कीमची गणना भारतातील स्वच्छ राज्यांमध्ये होते. संगे शेरपाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबतच, पर्यावरण संरक्षणाच्या उदात्त प्रयत्नात व्यस्त असलेल्या देशभरातील लोकांचेही मी मनापासून कौतुक करतो.

स्वच्छतेमध्ये अनावश्यक वस्तू टाकून दिल्याने कार्यालयात जागाच जागा

मित्रांनो, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘स्वच्छ भारत अभियान’ आहे याचा मला आनंद आहे. 2014 मध्ये हे जन आंदोलन सुरु झाल्यापासून या अभियानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांनी अनेक आगळेवेगळे प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न केवळ समाजामध्येच नाही तर सरकारी पातळीवर देखील दिसून येत आहेत. कचरा काढल्याने, अनावश्यक वस्तू टाकून दिल्यामुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी होते, नवीन जागा उपलब्ध होते. पूर्वी जागेअभावी लांब कार्यालये भाड्याने घ्यावी लागत होती. आजकाल या स्वच्छतेमुळे एवढी जागा उपलब्ध होत आहे की, आता सर्व कार्यालये एकाच आली आहेत हे या सततच्या प्रयत्नांचे फलित आहे. मागील काही दिवसांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, शिलॉंग अशा अनेक शहरांमधील आपल्या कार्यालयांमध्ये खूप प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज त्यांच्याकडे नवीन कामासाठी दोन, तीन मजले उपलब्ध झाले आहेत. या स्वच्छतेमुळेच, आम्हाला आमच्या स्रोतांच्या अधिकाधिक वापराचा उत्तम अनुभव मिळत आहे. हे अभियान देशासाठी, समाजासाठी, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये आणि कार्यालयातही सर्वत्र उपयुक्त ठरत आहे.

कलेचे संवर्धन करणारा कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब…

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या कला-संस्कृतीबद्दल आपल्या देशामध्ये एक नवीन जागरुकता, एक नव चेतना जागृत होत आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा उदाहरणांची चर्चा देखील करतो. ज्याप्रमाणे कला, साहित्य आणि संस्कृती ही समाजाची सामूहिक पुंजी असते त्याचप्रमाणे त्यांचा विकास करणे ही देखील संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. असाच एक यशस्वी प्रयत्न लक्षद्वीपमध्ये होत आहे. येथे कल्पेनी बेटावर एक क्लब आहे – कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब. हा क्लब तरुणांना स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देतो. येथे युवकांना कोलकली, परीचाकली, किलिप्पाट्ट आणि पारंपारिक गाण्यांचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच जुना वारसा नवीन पिढीच्या हातात सुरक्षित होत आहे, तो पुढे जात आहे आणि मित्रांनो, असे प्रयत्न देशातच नव्हे तर परदेशातही होत आहेत, याचा मला आनंद आहे. नुकतेच दुबईतील कलारी क्लबने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.दुबईच्या क्लबने विक्रम केला, मग त्याचा भारताशी काय संबंध? असा विचार कोणीही करेल. वास्तविक, हा विक्रम भारतातील प्राचीन मार्शल आर्ट कलारीपयट्टूशी संबंधित आहे. हा विक्रम म्हणजे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी कलारीचे सादरीकरण करण्याच्या कामगिरीचा आहे.कलारी क्लब दुबईने दुबई पोलिसांसोबत याची योजना आखली आणि यूएईच्या राष्ट्रीय दिनी याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात 4 वर्षांच्या मुलांपासून ते 60 वर्षांच्या वृद्धांनी आपल्या क्षमतेनुसार कलारीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विविध पिढ्या एक प्राचीन परंपरा उत्साहाने कशी पुढे नेत आहेत, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.

क्वेमाश्री कला चेतना नावाचे व्यासपीठ

मित्रांनो, मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना कर्नाटकातील गडक जिल्ह्यात राहणार्‍या ‘क्वेमाश्री’जीबद्दल देखील सांगू इच्छितो. दक्षिणेत कर्नाटकातील कला-संस्कृती पुनरुज्जीवीत करण्याच्या कार्यात ‘क्वेमश्री’ गेली 25 वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची तपश्चर्या किती महान आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. यापूर्वी ते हॉटेल मॅनेजमेंट या व्यवसायाशी संबंधित होते. पण, त्यांची संस्कृती आणि परंपरेसाठी असलेली ओढ इतकी खोल होती की त्यांनी यालाच आपले ध्येय बनवले. त्यांनी ‘कला चेतना’ नावाने व्यासपीठ सुरु केले. हे व्यासपीठ आज कर्नाटकातील आणि देश-विदेशातील कलाकारांचे अनेक कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये स्थानिक कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण कामेही केली जातात.

मित्रांनो, देशवासीयांचा त्यांच्या कला आणि संस्कृतीबद्दलच्या या उत्साहातून आपल्या वारशाप्रती असलेली अभिमानाची भावना दिसून येते. आपल्या देशातील कानाकोपऱ्यात असे अनेक रंग विखुरलेले आहेत. त्यांना सजवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपल्याला देखील निरंतर काम केले पाहिजे.

बांबूपासून आकर्षक वस्तू

माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशातील अनेक भागात बांबूपासून अनेक सुंदर आणि उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. विशेषत: आदिवासी भागात कुशल बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार, कुशल कलाकार आहेत. देशात बांबूशी संबंधित ब्रिटीशकालीन कायदे बदलल्यापासून त्याची मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे. महाराष्ट्रातील पालघरसारख्या भागातही आदिवासी, बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवतात. बांबूपासून तयार केलेले बॉक्स, खुर्च्या, चहाची भांडी, टोपल्या, ट्रे यांसारख्या गोष्टी खूप लोकप्रिय होत आहेत. एवढेच नाही तर हे लोक बांबू गवतापासून सुंदर कपडे आणि सजावटीचे सामान देखील तयार करतात. त्यामुळे आदिवासी महिलांना रोजगारही मिळत आहे आणि त्यांच्या कौशल्याला ओळख देखील प्राप्त होत आहे.

सुपारीच्या तंतुंपासून अनोखी उत्पादने

मित्रांनो, कर्नाटकातील एक जोडपे सुपारीच्या तंतुंपासून बनवलेली अनेक अनोखी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत. कर्नाटकातील शिवमोगा येथील हे जोडपे आहे – श्री सुरेश आणि त्यांची पत्नी श्रीमती मैथिली. हे लोक सुपारीच्या तंतूपासून ट्रे, प्लेट्स आणि हँडबॅग्स सारख्या अनेक सजावटीच्या वस्तू बनवत आहेत. या तंतुंपासून बनवलेल्या चपलांनाही आज खूप पसंती मिळत आहे. आज त्यांची उत्पादने लंडन आणि युरोपातील इतर बाजारपेठांमध्ये विकली जात आहेत. हीच तर आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची आणि पारंपारिक कौशल्यांचे वैशिष्ट्य आहे, जे सर्वांनाच आवडत आहे. भारताच्या या पारंपारिक ज्ञानात जग शाश्वत भविष्याचा मार्ग पाहत आहे. आपल्याला देखील अधिकाधिक जागरुक होण्याची आवश्यकता आहे. आपण स्वतःही अशी देशी आणि स्थानिक उत्पादने वापरावीत आणि इतरांनाही भेट द्यावीत. यामुळे आपली एक ठळक ओळख निर्माण होईल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे भविष्य देखील उज्वल होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Video : कोकणकड्याच्या दरीतून बैलपाड्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास..!!

वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा

Saloni Art : असे रेखाडा थ्री डी सफरचंद…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading