February 6, 2023
interview with Dr Ujwala Musale on Judiciary role
Home » स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…
गप्पा-टप्पा

स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…

पुस्तकाच्या हेतु बद्दल डॉ उज्ज्वला मुसळे यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा..

आपण सध्या काय करता ? आपल्या बद्दल थोडक्यात…

उज्वला मुसळे – सध्या मी औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर म्हणून कार्यरत आहे. चिपळूण येथे असताना मी मुंबई विद्यापीठातून बी. एस. सी. पदवी घेतली त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून एलएलबी, एलएलएम आणि पीएचडी पूर्ण केली. तसेच मानवी हक्क आणि एडीआर यातून डिप्लोमा पूर्ण केला आहे. 2009 मध्ये स्पर्धा परिक्षेतून मी दिवाणी न्यायाधीश क. स्तर म्हणून रुजू झाले. पंढरपूर, कोल्हापूर, वाशिम येथे काम केले. 2019 मध्ये वरिष्ठ स्तर न्यायाधीश म्हणून प्रमोशन मिळाले. या व्यतिरिक्त कोल्हापूर आणि वाशिम येथे मी बाल न्याय मंडळाचे कामही पाहिले आहे. रत्नागिरी लॉ महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केले आहे. माझ्या संशोधनावरच आधारित “महाराष्ट्राच्या विशेषसंदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४ च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका” हे पुस्तक इंग्रजीमधून प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक लवकरच मराठीतही येत आहे.

“महाराष्ट्राच्या विशेषसंदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४ च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका” हे पुस्तक लिहावे असे आपणास का वाटले ?

उज्वला मुसळे – वर्षानुवर्षी एकच विषय घेऊन त्यावर विचार करणे त्यावर संशोधन करणे आणि त्यानंतर त्याबद्दल अभिव्यक्त होणे. हे ध्यास घेतल्याशिवाय शक्य नव्हते. या ध्यासातूनच हे पुस्तक लिहिले गेले. शिक्षणामुळे समाज विकसित व्हावा, मन उदार, स्वागतशील व स्वीकारशील व्हावे. हृदयात माणुसकीचा नंदादीप देवत राहावा असे अपेक्षित, पण घडते आहे सर्व विपरीतच. वंशाला दिवा हवा म्हणून माणसं मुलींचा जन्म नाकारू लागले हा सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाचा, पुरोगामी म्हणवणाऱ्या व्यवस्थेचा खूप मोठा पराभव आहे. समाजातील काही हैवाणी प्रवृत्ती स्त्री भ्रुण हत्येला हातभार लावत आहेत. शिक्षित समाजाची ही शोकांतिकाच आहे. यासाठी यावर प्रबोधनाच्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले आहे.

हे संशोधनपर पुस्तक आहे. त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला ?

उज्वला मुसळे – समाजाने लेकीच्या जन्माचे स्वागत करावे हा उद्देश ठेवून हे पुस्तक लिहीले गेले. हे संशोधनपर पुस्तक आहे. त्यासाठी प्राचीन वैदिक काळापासून ते अत्याधुनिक काळापर्यंत संदर्भ साहित्याचा दांडोळा घेतला. इतिहासाचा, पुराणाचा फेरफटका मारला आणि त्या सगळ्यांच्या उजळणीतून हे पुस्तक तयार झाले.

हे पुस्तक मराठीमध्ये भाषांतरीत करावे असे आपणास का वाटले ?

उज्ज्वला मुसळे – गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या हुशार अन् प्रवाह विरुद्ध जाणाऱ्या धाडसी महिलांच्या देशात मुलगी ही वंशाचा दिवा होऊ शकते हे पटवून द्यायची वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बाहेरून कितीही पाणी ओतले किंवा पोषक खते घातली तरी जमीनतून जोवर बीज ओढून घेत नाही. तोवर ते रुजत नाही आणि आकाशाकडे झेपावणारा अंकुरही फुटत नाही. तळागाळातील मुली, महिला यांच्यापर्यंत पोहोचायचे तर त्यांच्या भाषेत बोलायला हवे, तसे केले तरच हा विचार सर्वत्र पोहोचणार व रुजणार आहे. म्हणूनच हे पुस्तक आता मराठीमध्ये लवकरच प्रकाशित करणार आहे. या जनजागृतीतून लेक जन्माला आल्यावर दाराला तोरण लावून अन् गुढ्या उभारून तिचे स्वागत नवी पिढी निश्चित करेल अशी आशा वाटते.

Related posts

जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

माधुरी पवार चक्क ब्रह्मराक्षस या कन्नड चित्रपटात…(व्हिडिओ)

…यामुळेच मिळाला जिल्हा परिषदेला शासनाचा प्रथम पुरस्कार

Leave a Comment