दानापूर येथे कै. शामराव बापू सार्वजनिक वाचनालय व स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाच्यावतीने आठव्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाचे वृत्त…
सौजन्य – सुनिल धुरडे
मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास बोली भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. बोली भाषेशीवाय मराठीला तरणोपाय नसल्याचे सांगत मायबोली आचार विचारांचं गाठोडं असल्याचे मत आचार्य ना. गो. थुटे यांनी व्यक्त केले. ते दानापूर (ता.तेल्हारा) येथे रविवारी (ता.१२) पार पडलेल्या ८ व्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कै शामराव बापू सार्वजनिक वाचनालय व स्व बापूसाहेब ढाकरे कला अकादमी दानापूर आणि मराठी बोली साहित्य संघ नागपूर यांच्यावतीने ८ व्या राज्यस्तरीय संमेलनाचे दानापूर येथे आयोजन केले होते. संमेलनाचे उदघाटन राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष आचार्य ना. गो. थुटे, मराठी बोली साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संयोजिका जेष्ठ कवियत्री डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे, सुधाकर खुमकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीकृष्ण काकड, डॉ. अजय विखे, गजानन हरणे, जेष्ठ कवियत्री अंजनाबाई खुणे, नारायण खुणे, सरपंच सपना वाकोडे, संदीप पालिवाल, सागर ढगे उपस्थित होते.
आचार्य थुटे म्हणाले की, जगभरात अनेक बोली व भाषांचा वापर न झाल्याने त्या अस्तंगत झाल्या व काही अजूनही मृत होण्याच्या अवस्थेत आहेत. भाषेचे – बोलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोक व्यवहारातील तिची उपयोगिता वाढली पाहिजे. लोकांना, कलावंतांना व शासनालाही तिची गरज निर्माण व्हायला हवी. तिच्या वापरातून आर्थिक समस्या सुटल्या पाहिजेत. तसेच सांस्कृतिक व सामाजिक समृध्दी व सौहार्द्र वाढला पाहिजे. असे झाल्यास भाषांची किंवा मायबोलींची कार्यात्मकता व कलात्मकता ह्यांना उभारी मिळते. केवळ कायदे करून भाषा टिकत नाही, कायद्यांची अंमलबजावणी महत्वाची आहे. तसेच तिची व्यक्तिगत व सार्वजनिक उपयोगिता महत्वाची ठरायला हवी आहे. यासाठी बोली व भाषा समृध्दीचे विविध व्यावहारिक उपाय शोधणे महत्वाचे आहे. सुत्रसंचालन नरेंद्र काकड यांनी तर आभार माणिक इंगळे यांनी मानले.
परिसंवाद विशेषांकाच्या माध्यमातून पोहोचवणार – अनिल गावंडे
बोली भाषा खऱ्या अर्थाने कुठल्याही भाषेचे सौंदर्य असते. त्यामुळे मराठीत असणाऱ्या प्रत्येक बोलीचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी येणाऱ्या काळात विशेषांक काढून त्यामाध्यमातून विस्तुत माहिती मराठी भाषिकांना होईल तसेच परिसंवादाच्या माध्यमातून मायबोली विषयीच्या संकल्पना खऱ्या अर्थाने स्पष्ट होतील, असे मत यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल गावंडे यांनी व्यक्त केले.
दानापूरच्या इतिहासात भर – प्रतिमा इंगोले
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अस्थी १२ ठिकाणी आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे दानापूर आहे. त्यामुळे या ठिकाणी साहित्य संमेलन होणे खरोखरच गौरवाची बाब असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच वारी येथील हनुमानाची स्थापना रामदास स्वामी यांनी केलेली नसून या संदर्भातील ते लोकदैवत आहे असा ताम्रपट उपलब्ध असल्याचेही त्या म्हणाल्या. गावात तिळापासून तेल काढण्याचे घाणे होते यावरून घाणापूर हे नाव गावास पडले पुढे दानापूर असा नावात बदल झाला असल्याचे सांगत या संमेलनामुळे दानापूरच्या इतिहासात भर पडल्याचे त्या म्हणाल्या.
दानापूरची लोकगीते गोळा करताना दानापूरच्या कोटावर तुयसी, इथं नांदते केसोराजाची मावशी अशी ओळ सापडते. त्यामुळे या गावचा कृष्णाशी संदर्भ असावा, असेही मत डॉ. इंगोले यांनी व्यक्त केले. नरनाळा किल्ला पाचव्या शतकाच्या पूर्वीपासून अस्तित्वात होता. मात्र शासनाच्या माहिती पुस्तिकेत किल्ल्याची स्थापना आठव्या शतकात झाली, अशी चुकीची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकिय पातळीवर बोलीचा वापर व्हावा – पुरुषोत्तम आवारे
प्रत्येकाने आपापसात बोलतांना बोलीभाषेचा वापर करायला हवा. बोली भाषेची लाज बाळगणे चुकीचे असल्याचे मत पुरुषोत्तम आवारे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय संमेलन हे दर्दी लोकांचे असून ते आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच बोलीभाषा शासनाच्या केंद्र स्तरावर कशी जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनासोबतच भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम घेण्याचा मानस – हरिश्चंद्र बोरकर
मराठी बोली साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हरिश्चंद्र बोरकर यांनी भाषा, बोलीचा संबंध मांडला. साहित्यिकांच्या हाती युनोस्कोचे परिपत्रक लागले, की वीस वर्षात भारतातील दोन भाषा मरणार त्यात एक मराठी आहे. तेव्हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाईंची मराठी मरणार नाही, यावर मी ठाम होतो. ही भाषा टिकवावी लागेल, असे ते म्हणाले.
बोलीशिवाय मराठीला तरणोपाय नसल्याचे मत बोरकर यांनी व्यक्त केले. तसेच मराठीला जगविण्यासाठी संमेलनासोबतच अनेक उपक्रम घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बोलीची चळवळ ही आध्यात्मिक – बंडोपंत बोढेकर
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले, संत तुकडोजी महाराज, सत्यपाल महाराज यांनी वऱ्हाडी बोलीचा सुगंध दूरपर्यंत पसरवला. त्यामुळे बोलीची चळवळ ही आध्यात्मिक आहे. ग्रामगीतेत 298 झाडीबोलीतील शब्द आहेत. 59 वऱ्हाडी, 35 इंग्रजी तर 90 हिंदी शब्द आहेत. असेही त्यांनी सांगितले.
मराठी ही ज्ञानभाषाच – राजेंद्र घोरपडे
साहित्य खऱ्या अर्थाने जगण्याला समृद्ध करणारा मार्ग असल्याचे मत कार्यक्रमाचे उदघाटक राजेंद्र घोरपडे कोल्हापूर यांनी व्यक्त केले. मराठी ही ज्ञानभाषा नाही असे सांगितले जाते मात्र ज्ञानेश्वरीत, संत साहित्यात ज्ञान सांगितले आहे. ब्रह्मज्ञानचा सुकाळ करण्याचे स्वप्न ज्ञानेश्वर माऊलीने पाहीले. त्यानंतर विविध जाती धर्मातील संत ज्ञानेश्वरी परंपरेत झाले. त्यांनी आत्मज्ञान मराठी नगरीत रुजविले. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा आहे. असेही घोरपडे यांनी सांगितले.
संमेलनातील दोन ठराव
१. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आपल्या बोली साहित्याचा समावेश परिसरातील अभ्यासक्रमात करावा.
२. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर (अकोट) यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करावे.
या कार्यक्रमाच्या यशवितेसाठी तुळशीदास खिरोडकर, सुरेश खोडे, डॉ. प्रमोद विखे, माणिकराव इंगळे, गणेश सागुणवेडे, रविंद्र दांदळे, अतुल भोंगळ, रवींद्र तायडे, सुनिल धुरडे, संदीप पालिवाल, नितीन घायल यांनी परिश्रम घेतले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.