कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अरुणचंद्र गवळी आणि कवी फेलिक्स डिसोजा यांना जाहीर करण्यात आले आहेत.
या संदर्भात माहिती देताना विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मराठीतील लक्षणीय कवीच्या एकंदर काव्यलेखन कामगिरीसाठी दिला जाणारा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ अरुणचंद्र गवळी यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अरुणचंद्र गवळी हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या ‘अरुणचंद्र गवळीच्या कविता’ या संग्रहातून मौलिक स्वरूपाची काव्यविषयक जाणिव प्रकट झाली आहे. मराठीतील मान्यवर नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून त्यांच्या कवितेतून ठळक असे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भान व्यक्त झाले आहे.
भाषिक संस्कृतीत अनेक महत्त्वाचे कवी दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. त्यापैकीच अरुणचंद्र गवळी हे एक होत. २००० साली प्रकाशित झालेला अरुणचंद्र गवळीच्या कविता हा त्यांचा एकमेव संग्रह प्रकाशित आहे. याशिवाय त्यांनी काही नियतकालिकातून लिहिलेल्या कविता उल्लेखनीय आहेत. आत्मनिष्ठ वाटणारी ही कविता बहुमुखी समाज संवेदनशीलतेची कविता आहे. तिला सामाजिक, सांस्कृतिक परिमाणे आहेत. मानवी अस्तिवार्थाचे अनेक संदर्भ या कवितेस आहेत. दिलीप चित्रे यांनी या कवितेचे असे वर्णन केले आहे. ” माणसांनीच माणसांमधून उठवलेली माणसं पुन्हा माणसांशीच बोलण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना गवळीच्या कविता ओळखीच्या वाटतील.”
नव्या पिढीतील आश्वासक काव्यलेखनासाठी दिला जाणारा ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार २०२५’ कवी फेलिक्स डिसोजा (वसई) यांना देण्यात येणार आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फेलिक्स डिसोजा यांनी ‘नोंदीनांदी’ आणि ‘आरशात ऐकू येणारं प्रेम’ या संग्रहातून अतिशय लक्षणीय स्वरूपाचे काव्यलेखन केलेले आहे.
फेलिक्स डिसोजा यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. अलीकडच्या काळातील लक्षणीय कवी. वसई परिसरातील संस्कृती आणि बोलीभाषेचा आविष्कार फेलिक्स डिसोजा यांच्या कवितेत आहे. नोंदीनांदी या संग्रहात वर्णुका सारखी उल्लेखनीय कविता आहे. मृत्यूविलाप शोकांतगीताचे तिला परिमाण आहे. “आरशात ऐकू येणारं प्रेम ” हा त्यांचा अलिकडचा संग्रह. आरसा या प्रतिकात्म शब्दरूपातून अनेक ध्वन्यर्थ प्रकटले आहेत. स्व बरोबरच समाज संस्कृतीची बिंब प्रतिबिंबे या कविताविश्वात आहेत. स्व आणि समाजाची शोधयात्रा या कवितारूपात आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा अनेक पातळ्यांवरील शोध या कवितेत आहे.
सतीश काळसेकर यांच्या कुटुंबियाकडून देण्यात येणाऱ्या देणगीमधून शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष असून यापूर्वी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, नारायण कुलकर्णी कवठेकर आणि अनुराधा पाटील यांना ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कारा’ने तसेच दिशा पिंकी शेख, वर्जेश सोळंकी व वीरधवल परब यांना ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.