वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता प्रा.देवबा पाटील यांनी लिहील्या आहेत.
– डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील
राष्ट्रपती पुरस्कार व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,
मु.पो.- घुणकी, ता.- हातकणंगले, जि.- कोल्हापूर,416112
मो.9834342124
“जे न देखे रवि, ते देखे कवी” असे कवीच्या दृष्टिकोनाबाबतचे वचन सर्वश्रूत आहे. जे साक्षात सूर्यनारायणाला दिसत नाही त्यात डोकावण्याचे सामर्थ्य कवीत असते. तो आपल्या कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर साध्या साध्या विषयातही मोठा अर्थशोध घेत असतो. शब्द आणि अर्थाची सुंदर वीण गुंफून त्यातून उत्तमोत्तम काव्यलेणी तयार करीत असतो. त्यामध्ये आशयसौंदर्य, भावसौंदर्य, काव्यसौंदर्याची पेरणी करून नवनव्या रचनांना आकार देत असतो. पण अलिकडे “जे न देखे कवी, ते विज्ञान दाखवी” असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. दिवसागणिक विज्ञान आणि तंत्रज्ञानांमध्ये, भूगोल आणि खगोलांमध्ये नवनवे शोध लागत आहेत. त्यामुळे मानवी जीवन अधिकाअधिक संपन्न आणि समृध्द बनू पाहत आहे.
बालकुमारांच्या जिज्ञासावृत्तीला चालना देऊन त्यांचे समाधान करण्याचे काम प्रा. देवबा शिवाजी पाटील लिखित “आभाळाचे गुपित” या छोटेखानी रंगीत बालकवितासंग्रहात करण्यात आलेले आहे. या बालकाव्यसंग्रहाचे महत्व खूप मोलाचे आहे. त्याचे कारण यामध्ये ज्ञान, विज्ञान व रंजन आहे. त्याचबरोबर आकलन सुलभतेसाठी त्याची सुरेखशी काव्यमय मांडणी आहे. विषयाच्या पुष्ठ्यर्थ सुंदर सुंदर चित्रांची योजना आहे. यातील कवितांच्या वाचनाने मुलांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे पण त्याचबरोबर वैज्ञानिक आणि भौगोलिक संकल्पना सुस्पष्ट होणार आहेत.
“आभाळाचे गुपित” ही कविता या संग्रहाचे प्रतिनिधित्व करते. बाकीच्या अन्य कलाकृती त्याच्या अंतर्भूत आहेत. आभाळाचे गुपित उलगडण्याचा कवीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
“”आकाशाचे रहस्य। गहन फार। ज्ञान विज्ञान। तयात अपार।।””
आकाशात अगणित तारे आहेत. ग्रह व त्यांचे उपग्रह आहेत. आकाशगंगा हा त्यांचाच समुह आहे. यातील प्रत्येकाचे सूक्ष्म तपशील नोंदवून कवीने मुलांच्या ज्ञानाला उजाळा देत स्पष्टता आणलेली आहे. त्यांच्या जाणून घेण्याच्या इच्छेचे समाधान केलेले आहे.
“”दोन वस्तुकणांत। असते आकर्षण। तयास म्हणती। गुरुत्वाकर्षण।।”” पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वांनाच ज्ञात आहे. पण ग्रह, तारे यांनाही ती प्राप्त आहे. ते सारे, ग्रह, उपग्रह गुरुत्वबलाच्या जोरावर अनुक्रमे ताऱ्याभोवती ग्रह, तर ग्रहाभोवती उपग्रह फिरतात. हे नेमक्या आणि अचूक भाषेत कवीने स्पष्ट केलेले आहे. ही निर्मिती कथा सांगतांना त्यांचे दृश्य स्वरूप तर ते सांगतातच पण त्याच्या गुरुत्वबलाचा परिणामही वर्णन करतात.
“सूर्यमाला” ही कविता ग्रह, उपग्रह, धूमकेतू, लघुग्रह यांची निर्मितीकथा उलगडून दाखवणारी कविता आहे. आपल्या पृथ्वीचा जन्मही यातूनच झाला हे सांगतांनाच सूर्य, ग्रह-तायांच्या गोलाकाराचे रहस्यही कवीने उलगडून दाखविले आहे.
“”स्वत:भोवती। फि डिग्री लागले। फिरून फिरून। गोलाकार झाले।।””
या साऱ्याचा जन्म हा सूर्याच्या स्फोटातून झाल्याचे सत्य “सूर्य” या कवितेत सांगितले आहे. हा सूर्य सूर्यमालेसह फिरतो. पृथ्वीवरून तो स्थिर भासतो. नियमित उगवतो. स्वत:च्या प्रकाशाने जगाला उजळून टाकतो. तो साऱ्या जीवनाचा आधार आहे हे सांगत असतांनाच तुम्हीही सूर्याप्रमाणे नियमितपणा अंगी बाणवा व स्वकर्तृत्वाने जीवन उजळून टाका असा प्रेमळ संस्कारी सल्लाही कवीने दिलेला आहे. सूर्याशी संबंधित “उगवता सूर्य”, “तांबडा सूर्य”, “दुपारचा सूर्य”, “मोठा सूर्य” या अन्य कविताही सूर्याच्या स्थिती-गतीचे चित्रमय वर्णन करतात.
“नवग्रह” या कवितेतून सूर्यमालेतील नवग्रहांची ओळख होते. ग्रह, त्यांचे उपग्रह, त्यांची गुरुत्वाकर्षण शक्ती, सूर्यापासूनचे अंतर, भ्रमणकक्षा यांचे साधार विवेचन यामध्ये अभ्यासवयास मिळते. पृथ्वीची जन्मकथा, तिचा रंग, तिचे रूप व आकार, वेगळेपण “पृथ्वी” या कवितेत मांडतांना ती सजीवांची मायमाऊली असल्याचा उल्लेखही ते करतात. तिचे इतर ग्रहांपेक्षा असलेले वेगळेपण मुलांच्या लक्षात आणून देतात. तर आकाशाच्या निळेपणाची उकल “निळे आकाश” या कवितेतून करतात. “”वारंवार रविकिरणात। लोपती इतर रंग। कमी तरंग लांबीचा। राहतो निळा रंग।।
हा निळा रंग। पसरतो चोहिकडे। आपणास दिसते। आकाश निळे।।””
सूर्यमालेतील ग्रहताऱ्यांच्या शृंखलेतील चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीच्या कक्षेत कसा आला, त्याचे स्वत:भोवतीचे, पृथ्वीभोवतीचे फिरणे, कला दाखवणे “चंद्र” ह्या कवितेत आस्वादावयास मिळते. तर संध्याकाळी सूर्य क्षितिजाआड गेल्यानंतर आपल्या पृथ्वीवर अंधार पडतो. त्यात तारे चमकतात. त्याच या चांदण्या असल्याचे कवी मुलांच्या निदर्शनास आणून देतो. तायांचे तापमान, त्यांची चमक, त्यांचे रात्रीचे अस्तित्व, दिवसाचे लोप पावणे याची सविस्तर माहिती “चांदण्या” या कवितेत दिली आहे.

चंद्रावर व सूर्यावर असणारे डाग नेमके कशाचे आहेत. यांचे काव्यात्म विश्लेषण “चंद्रडाग” व “सौरडाग” या कवितांतून अभ्यासावयास मिळते. सूर्यस्फोटातून निर्माण झालेल्या खडकधुळीचे तुकडे म्हणजेच उल्का आहेत. त्या गुरुत्वीय बलाने पृथ्वीच्या कक्षेत येतात व उल्कापात होतो. त्या न जळता पृथ्वीवर पडल्या की त्याला अशनी म्हणतात. मोठ्या अशनी खूप नुकसानकारक असतात अशी परिपूर्ण माहिती “उल्का” या कवितेत अभ्यासावयास मिळते. तसेच आपल्या कवितांमधून धूमकेतू, तेजोमेघ या संकल्पनाही कवीने उलगडून दाखविल्या आहेत. तसेच कृष्णविवरांची भयावताही स्पष्ट करून सांगितली आहे.
आकाशाच्या पलीकडे अपार असे अवकाश आहे. त्यात तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू व कृष्णविवरे आहेत. तसेच तेजामेघ व कृष्णमेघही आहेत. याशिवाय कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने यामध्ये फिरत आहेत. आकाश अफाट आहे तर अवकाश शब्दातीत आहे. त्याला आदि ना अंत नसल्याचे निरीक्षणही कवीने नोंदविले आहे.
“आभाळाचे गुपित” यामधील कविता मुलांच्या जिज्ञासातृप्तीची कविता आहे. ती साधार, सप्रमाण तर आहेच पण तितक्याच मनोरंजकपणे मांडण्यात आली आहे. यामधील कवितात ज्ञान आहे, विज्ञान आहे. त्याचबरोबर काव्यही आहे. साध्या, सोप्या भाषेत वैज्ञानिक, भौगालिक, खगोलीय संज्ञा अणि संकल्पनांची काव्यात्म उकल करण्याची कवीची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता प्रा.देवबा पाटील यांनी लिहील्या आहेत.