July 24, 2025
'मराठी भाषेतील शब्द !'. शब्दांच्या अंतरंगात शिरून त्या शब्दांच्या विविध अर्थरंगी छटा, तसेच एकाच शब्दाशी साम्य दाखवणारे दुसरे शब्द, कांही वेळेला साम्य दिसणारे परंतु त्यांचा अर्थ पहाता साम्य नसणारे शब्द , अशा अनेक अंगाने त्या शब्दांचा घेतलेला हा वेध !
Home » ‘शब्दरंगी रंगताना’…….अर्थात शब्दांचा शोभादर्शक !
मुक्त संवाद

‘शब्दरंगी रंगताना’…….अर्थात शब्दांचा शोभादर्शक !

अरविंद लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा ‘शब्दरंगी रंगताना..’ हा लेखसंग्रह नाट्यसृष्टीशी संबंधित असेल किं इतर विविध विषयांवर ?.. ही उत्सुकता होतीच. प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन केल्यानंतर असे लक्षात येते की विविध विषय न हाताळता एकाच विषयावरील विविध लेख हेच या संग्रहाचं वैशिष्ठ्य आहे. शिवाय विषयही अगदी अनोखा आहे.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली
९४२१२२५४९१

‘मराठी भाषेतील शब्द !’. शब्दांच्या अंतरंगात शिरून त्या शब्दांच्या विविध अर्थरंगी छटा, तसेच एकाच शब्दाशी साम्य दाखवणारे दुसरे शब्द, कांही वेळेला साम्य दिसणारे परंतु त्यांचा अर्थ पहाता साम्य नसणारे शब्द , अशा अनेक अंगाने त्या शब्दांचा घेतलेला हा वेध ! शब्दांच्या दुनियेत शिरून, स्वतः त्याचा आस्वाद घेऊन वाचकांनाही शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवणारा हा लेखसंग्रह म्हणजे, एक शोभादर्शकच आहे असंच मला वाटतं !

शोभादर्शक हातात आल्यानंतर आपण त्यातून आरपार पहाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अंतरंगात दिसणाऱ्या विविध चित्राकृती आपल्याला मोहित करतात. तो  शोभादर्शक थोडा थोडा  फिरवून निरनिराळ्या कोनातून दिसणाऱ्या सुबक, रंगीत चित्रकृती पहाण्यात आपण गुंग होऊन जातो. हे सगळं पहाताना, अनुभवताना वेळ कसा गेला तेच समजत नाही. भाषेचा दर्शक हातात आल्यानंतर त्यातून शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवताना परावर्तित होणारे विविध रंग, त्या शब्दरंगातल्या विविध छटा उलगडून दाखवाव्यात आणि त्यात रंगून जाताना वाचकालाही खिळवून ठेवावं असे सामर्थ्य या लेखांमधे प्रत्ययास येते. प्रत्येक शब्दरंगातलं हे वैविध्य अनुभवायचे असेल तर या लेखसंग्रहाच्या अंतरंगात वाचकांनी आवर्जून शिरायलाच हवे !

‘शब्द’ हे संवादाचे अतिशय प्रभावी माध्यम आहे .पण हे शब्द तयार कसे होतात ? त्यातील एखाद्या अक्षरामुळे त्याचे अर्थ कसे बदलतात ? हे समजून घेणे लेखक श्री. लिमये यांना खूप गंमतीचे आणि आनंददायी वाटते. त्यामुळेच शब्दांच्या या भांडाराकडे आणि जीवनाकडेही उघड्या डोळ्यांनी पहातातानाच हे कसे बघावे हे वाचकालाही ते शिकवतात. शब्दांची उत्पत्ती, साम्य ,विरोधाभास हे सगळं समजावून सांगताना मानवी स्वभावाचे विश्लेषणही त्यांच्या लेखातून सहजपणे झाले आहे.

पहिल्या लेखातच त्यांनी ‘स्वभाव’ या शब्दाविषयी लिहिले आहे .या शब्दातला भाव मानवी स्वभावाशी कसा निगडित आहे याचा  मागोवा घेता घेता मानवी मनातील सुप्त शक्तीची जाणीव करून देऊन स्वभाव बदलताही येऊ शकतो हे अतिशय मुद्देसूदपणे त्यांनी पटवून दिले आहे. हा लेख म्हणजे ‘स्वभावाला औषध आहे’ यांचे प्रत्यंतर देतो.

अशा एकूण सत्तेचाळीस लेखांचा हा संग्रह. प्रत्येक लेखात अभ्यासलेत एक दोन मुख्य शब्द न् त्याच्या अनुषंगाने येणारे इतरही अनेक शब्द. असा प्रत्येक लेख म्हणजे जणू अलगद उघडले गेलेले शब्दांचे भांडारच !  

उदाहरणार्थ  ‘ताल ‘ हा शब्द. या एका शब्दाबरोबरच  ताळ, ताळा, ताळतंत्र, ताळेबंद, रीत या शब्दातून विपरीत, रीतसर, रीतीभाती.. असे अनेक शब्द आपल्यासमोर येऊन उभे रहातात. एकमेकांच्या जवळ असणाऱ्या अशा शब्दांच्या अंतरंगात शिरून अर्थ समजून घेतला तर रीतीरिवाज बंधनकारक वाटणार नाहीत अशा निष्कर्षाशी वाचक सहमत होतोच.

दुसऱ्या एका लेखात ते काळजी, प्रेम आणि भीती या तीन शब्दांची व्याप्ती समजावून देतात. सकारात्मक आणि नकारात्मक भावना माणसाचे व्यक्तिमत्व घडवत असतात. या अनुषंगानेच आलेले अशा भावनांपैकी काळजी , प्रेम आणि भीती या भावना माणसाच्या मनाची आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करतात याचे विश्लेषण आवर्जून वाचायलाच हवे. मृत्यूविषयी त्यांनी काढलेले उद्गार अत्यंत काव्यात्म आहेत.

‘ जन्माइतकाच मृत्यूही सुंदर असू शकतो. किंबहुना तो शेवट नसतोच. तर ते एक वळण असते. तो पूर्णविराम नसतो तर स्वल्पविराम असतो. आपलं अस्तित्व नाहीसं होणार नसतंच. कारण ती कात टाकून परत नवीन जोमाने जगणं सुरू करण्यासाठी आवश्यक अशी एक पायरी असते.” असे शब्द जेव्हा त्यांच्या लेखणीतून उतरतात तेव्हा त्यांच्या चिंतनशील मनाचे दर्शन घडते.

एखाद्या मोठ्या फुलाची एक एक पाकळी निरखून पहावी त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक शब्द व त्यातील अक्षर यांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केलेले आहे . ‘काटेकोर’ या शब्दाविषयी लिहिताना हा शब्द अनेक व्यक्तीविशेष कसे ठळक करतो हे ते सांगतात. काटेकोरपणा , अट्टाहास, अंकुश , शिस्त या सर्व शब्दांची जवळीक स्पष्ट करताना निसर्गाकडूनही कसे शिकता येईल हेही विशद करतात.

‘नैसर्गिक शिस्तीकडे  दुर्लक्ष करून ज्या क्षणापासून माणूस भौतिक सुखामागे धावू लागला तीच त्याला अधोगतीकडे नेणारी पहिली पावले होती’ हे पटवून देतानाच, निसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर माणसाचे काही खरे नाही असा इशाराही ते देऊन ठेवतात.
अशा किती शब्दांविषयी लिहावे? 

‘संकल्प’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ?, इच्छा आणि निर्धार या शब्दांशी तो कसा जोडला गेला आहे हेही ते दाखवून देतात. संकल्प करणे पण तो तडीस न जाणे हे आता सर्वांच्याच बाबतीत नेहमीचे होऊन बसले आहे. त्यामुळे संकल्प आणि सिद्धी हे दोन शब्द वापरून गुळगुळीत झाले आहेत. परंतु संकल्प या शब्दाचा नेमका अर्थ, संदर्भ आणि व्याप्ती काय आहे हे सांगणारा हा लेख. संकल्प हा शब्द इच्छा आणि निर्धार या शब्दांशी जोडलेला आहे. इच्छा म्हणजे उत्कट इच्छा आणि संकल्प म्हणजे दृढसंकल्प ! हे दोन्ही एकत्र आले तरच संकल्पसिद्धी होऊ शकते. मनातील इच्छा या सकारात्मक न् नकारात्मकही असू शकतात. नकारात्मक इच्छा मनातून काढून टाकण्यासाठीसुध्दा दृढ संकल्पाची कशी आवश्यकता आहे हे ते सहजपणे सांगून जातात.

स्वीकारणे या शब्दाचे असंख्य कंगोरे पहाताना त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक छटा उलगडल्या जातात . मानवी गुणवैशिष्ठ्यांची ओळख करून देणाऱ्या आपल्या भाषेतील म्हणी, स्मृती या शब्दाचे भूतकाळाशी असलेले नाते, सोबत, समतोल, सजगता या शब्दामधला समान असा ‘स’, हक्क आणि जबाबदारी यांचे परस्पर नाते , किरण या शब्दाची विविध रंगरूपे , अर्थ या शब्दाचा उहापोह करताना त्यातील परस्परभिन्न असे दोन अर्थ उलगडून दाखवण्याचे त्यांचे कसब , परखड आणि अहंकारी यातील फरक, वाण, वसा, व्रत या शब्दांचा परस्परांशी असलेला संबंध, उंबरा या शब्दातून व्यक्त होणारा सांस्कृतिक आणि व्यावहारिक विचार, हाव आणि हव्यास, दार आणि दरवाजा अशा शब्दांमधील साम्य आणि भेद समजावून देताना त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या उदाहरणांमुळे हे लेखन मनाला भिडते.

याशिवाय विविधरंग – रुपे असलेली माया, बिनचूक, दृष्टी, तर्क, भूमिका, दातृत्व अशा अनेक शब्दांची नव्याने ओळख होते. ‘ हरवू पाहणारा थारा ‘ या लेखात ‘वळचण ‘या शब्दाविषयी लिहिताना पुन्हा एकदा त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीचा प्रत्यय येतो.

ते लिहितात , ‘अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच तरंग उमटत रहातात. वळचण या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोके वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगासारख्याच झुलत रहतात.’ हे शब्द आपल्या मनाला स्पर्श करून जातात.

शब्दांचे अंतरंग असे उलगडत जाताना मनातील विचारांचे तरंग नकळतपणे त्यांच्या लेखणीतून उतरु लागतात. म्हणूनच ‘ वसुधैव कुटुंबकम् ‘ या संकल्पनेविषयी ते सविस्तरपणे लिहितात.
मानवाच्या उत्क्रांतीनंतर प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर कुटुंब ही संस्था अस्तित्वात आली. कुटुंबव्यवस्था ही काळाची गरज ठरली. एकत्र कुटुंबपद्धती ही भारतीय समाजाने जगाला दिलेली वैशिष्ठ्यपूर्ण देणगी आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे आणि तोटे हे सर्वांना ज्ञात आहेत. सामाजिक बदलाबरोबर एकत्र कुटुंबपद्धती ही सुद्धा क्षीण होऊ लागली. परंतु कुटुंब हे पहिले संस्कार केंद्र आहे हे विसरून चालणार नाही.

‘वसुधैव कुटुंबकम् ‘ ही सुद्धा भारताने  जगासमोर मांडलेली एक संकल्पना आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ न साधता संपूर्ण जग हेच माझे कुटुंब आहे अशी कल्पना यातून व्यक्त होते. परंतु हे साकार करण्यासाठी प्रथम कुटुंब ही संस्था भक्कम असावी लागते .कारण प्रथम कुटुंब, मग समाज, मग देश आणि सर्व देशांचे मिळून एक कुटुंब असा हा प्रवास पूर्ण होईल.

 ‘अर्थ’ या शब्दाचे अंतरंग उलगडताना लेखक म्हणतात, ‘ एखादं बी जमिनीत पेरावं तसा एखादा शब्दही पेरता यावा, त्याला पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत.” खरं सांगायचं तर लेखकाची ही कल्पना, ही इच्छा, हे स्वप्न नकळत त्याच्याचकडून पूर्ण झालेले आहे. कारण गेली अनेक वर्षे मनाच्या केलेल्या मशागतीमुळे शब्दांची पेरणी कशी होते, ते कसे रुजतात आणि शब्दफुलांचे पीक कसे जोमाने वाढते याचे त्यांचा ‘शब्दरंगी रंगताना’ हा लेखसंग्रह हेच मूर्तरूप आहे असे मला वाटते.

पुस्तकाचे नाव : शब्दरंगी रंगताना
लेखक :अरविंद लिमये, ९८२३७३८२८८
प्रकाशक : अमित प्रकाशन, गोखलेनगर , पुणे ०२०-२५६६०५६६
मूल्य. : रु. ३८०/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading