September 27, 2023
use of power should be for the right work article by rajendra ghorpade
Home » शक्तीचा वापर योग्य कार्यासाठी हवा
विश्वाचे आर्त

शक्तीचा वापर योग्य कार्यासाठी हवा

तरुण शेतकऱ्यांच्यातील ही ऊर्जा योग्य कर्मासाठी वापरली जावी. शक्तीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. हा आग्रह शेतकऱ्यांनी ठेवून शेतीत प्रगती साधायला हवी. आत्तापर्यंत अशाच सात्विक विचारांनी प्रगती आहे. हा संशोधकबाणा शेतकऱ्यांच्या अंगी हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कां आडवोहळा पाणी आलें । म्हैसयाचें झुंज मातलें ।
तैसें तारुण्याचें चढलें । भुररें जया ।। 755 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – अथवा, आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्याची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते.

वादळी पावसाने मोठे नुकसान होते. वाऱ्याची ताकद प्रचंड असते. यात अनेक झाडे मोडतात. दगडही उडून जातात. पण हा वादळी वारा क्वचितच येतो. इतर वेळी हा वारा शांतपणे वाहत असतो. माणसाचा स्वभावही असाच आहे. कधी रागीट, कधी मवाळ असतो. कधी इतका शांत असतो, की त्याला बोलण्यासाठीही ऊर्जा द्यावी लागते. माणसाच्या मनात कोणता विचार येईल आणि त्यानुसार त्याची कोणती कृती असेल हे सांगता येत नाही. निसर्गातील वाऱ्याचेही तसेच आहे. पण ही ताकद आहे. यात शक्ती आहे. हे संशोधकांनी ओळखले. शक्तीचा वापर करून नुकसानही करता येते व त्याचा योग्य वापरही केला जाऊ शकतो. सात्त्विक मनुष्य त्याचा योग्य वापर करतो.

ही शक्ती इतर शक्तीमध्ये परावर्तित होऊ शकते का याचा विचार झाला. ती कशी परावर्तित केली जाऊ शकते यावर संशोधन झाले. यातूनच मग पवनऊर्जेचा शोध लागला. ही वाऱ्याची शक्ती पवनचक्कीच्या माध्यमातून साठविण्यात आली. यातून विजेची निर्मिती झाली. वादळी पावसाने अचानक पूर येतो. ओढे, नाले तुडुंब भरून वाहतात. या पाण्याचा वेग प्रचंड असतो. पाण्याच्या शक्तीची अनुभूती संशोधकांना झाली. यातून पाण्यापासून विजेची निर्मिती झाली.

दोन म्हशींची झुंज लागली होती. एकमेकांची ताकद दाखविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. हा ताकद दाखविण्याचा प्रकार मैत्रीपूर्ण, खेळीमेळीतील असेल तर गोष्ट वेगळी आहे. कुस्तीच्या स्पर्धेत अशी खिलाडूवृत्ती असते. पण हे भांडण खरोखरच असेल तर यात दोघांचेही नुकसान होणार. युद्धात विजय कोणाचाच होत नाही. जो विजयी होतो त्याचेही मोठे नुकसान झालेले असते.

झुंज करण्यासाठी ताकद निर्माण करावी लागते. पैलवान जोर, बैठका करून ताकद उभी करतो. ग्रामीण भागात अनेकांना अशी ताकद निर्माण करण्याचा छंद असतो. बलदंड शरीर करणारेही अनेकजण आहेत. त्यांनी ही ताकद भांडणात घालविली तर ती व्यर्थ जाते. पण हीच ताकद त्यांनी चांगल्या कर्मासाठी वापरली तर निश्चितच फायदा होतो.

शेतकऱ्यांनी ही ताकद शेतीसाठी वापरली तर फायदाच फायदा होतो. या ताकदीतूनच अनेक शोध लागले. बैलांच्या साहाय्याने होणारी नांगरट आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहे. आता अनेक यंत्रे आली आहेत. विविध शक्तीची अवजारे तयार केली जात आहेत. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शेतीमध्ये केला जात आहे. पंजाब व उत्तरेतील राज्ये यात आघाडीवर आहेत. त्यांनी यांत्रिकीकरण करून शेतीचे उत्पादन वाढविले आहे. तरुण शेतकऱ्यांच्यातील ही ऊर्जा योग्य कर्मासाठी वापरली जावी. शक्तीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. हा आग्रह शेतकऱ्यांनी ठेवून शेतीत प्रगती साधायला हवी. आत्तापर्यंत अशाच सात्विक विचारांनी प्रगती आहे. हा संशोधकबाणा शेतकऱ्यांच्या अंगी हवा.

Related posts

सत्याची कास…

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

दृढ निश्चयाने अभ्यास हवा

Leave a Comment