वाहन अपघात टाळण्यासाठी जो उपाय सांगितला जातो तो म्हणजे ज्या लेन वर वाहतूक आहे त्या लेनवर वाहन न थांबविणे तसेच पुलांवर वाहन न थांबविणे त्याचेही पालन वाहनचालकांनी केले पाहिजे. यात सर्वाधिक धोका म्हणजे ज्या मार्गावर बोगदा (टनेल) आहे त्या मार्गावर वाहन थांबवूच नये.
प्रशांत दैठणकर
गेल्या काही दिवसात आलेल्या बातम्या बघता रात्री होणाऱ्या रस्ते अपघाताचे प्रमाण आपणास वाढलेले दिसते. रात्री होणाऱ्या अपघातांमागे अनेक कारणे आहेत आणि दिवसाच्या तुलनेत रात्री प्रवास धोकादायक ठरतो पंरतु वेळ वाचविण्यासाठी रात्री प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
दिवसाच्या उजेडात होणारा प्रवास आणि रात्रीचा प्रवास यात मुख्य फरक आहे तो प्रकाश अर्थात उजेडाचा. आपण वाहन चालवतो त्यावेळी समोरील वाहतूक दिसणे देखील महत्वाचे असते. रात्री ही दृश्यमानता अतिशय कमी असते. साधारणपणे रात्री आपणास 80 टक्के कमी दृश्यमानता असते असे मानले जाते.
रात्री रस्त्यावर तुलनेत कमी वाहतूक आहे असे दिसेल कारण दिवसा रस्त्यावर धावणारी दुचाकी वाहने नसतात तसेच आपल्या देशात रस्त्यावर येणारी माणसे तसेच पशुंचेही प्रमाण अतिशय नगण्य असे असते त्यामुळे सहाजिकच रस्ता बऱ्यापैकी मोकळा असल्याने आपणास वाहन गतीने चालवता येते.
गती वाढली तरी दृश्यमानता कमी असल्याने या गतीमुळेच होणार अपघात हे प्राणघातक ठरतात हे दिसून आले आहे. गती आणि दृश्यमानता याचा संबंध आपण समजून घेतला पाहिजे. अतिशय वेगाने वाहन चालवताना रोडसाईन्स व्यवस्थित दिसत नाहीत सोबतच रस्त्याच्या बाजूला काय आहे याचेही लवकर आकलन होत नाही.
रस्त्याच्या बाजूला वाहन पार्क करायचे असेल तर इंडिकेटर लावले पाहिजेत. अशा वाहनांना रिफ्लेक्टर असणे महत्वाचे आहे. मात्र असे चित्र सर्वत्र असत नाही. विशेषत: ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीज, बैलगाड्या तसेच अनेक वाहतूकीच्या टँकर, कन्टेनर आदींवर असे रिफ्लेक्टर असत नाही. असे वाहन अचानक दिसले तरी गती नियंत्रणात आणेपर्यंत वाहन त्यावर जाऊन आदळते. अशा प्रकारच्या अपघातांचे प्रमाण भारतात अधिक आहे.
वाहन चालक रात्री वाहन चालविताना जी चूक करतात ती अधिकच धोकादायक आहे. वाहनावर आपण मागील बाजूने आदळू नये यासाठी वाहन दिसावे यासाठी हायबीम (अप्पर) वर वाहने हाकली जातात. अशा वाहनांचा प्रकाश समोरुन येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात थेट पडत असल्याने त्याची दृश्यमानता अधिक कमी होते. तो देखील अशा प्रसंगी हायबीम टाकतो त्यावेळी ते दोन्ही वाहनचालकांना धोका वाढविणारे असते.
महामार्गावर हायबीम-लोबीम (अप्पर-डिपर) चा वापर कसा करावा याचे विधीवत प्रशिक्षण मिळत नाही ही दुदैवाची बाब आहे आणि हे रात्रीच्या अपघातांमागील एक महत्वाचे कारण आहे.
वाहने चालवताना होणारी आणखी एक मोठी चूक म्हणजे सतत लेन बदलण्याची चूक. नवे महामार्ग एका बाजून साधारण 2 ते 3 लेन स्वरुपाचे आहेत. एखाद्या वाहनाची अचानक लेन बदलण्याची कृती त्याच्या मागील वाहनचालकासाठी धोक्याची असते. अद्यापही आपल्याकडे लेन बदलण्याचा संकेत देणारी वाहने मर्यादित आहेत. अशा स्थितीत लेन बदलण्याच्या घाईत गती आणि समोरील वाहनाची स्थिती याचा अंदाज चुकल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे आणि अशा अपघातात प्राण गमावणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे.
वाहन अपघात टाळण्यासाठी जो उपाय सांगितला जातो तो म्हणजे ज्या लेन वर वाहतूक आहे त्या लेनवर वाहन न थांबविणे तसेच पुलांवर वाहन न थांबविणे त्याचेही पालन वाहनचालकांनी केले पाहिजे. यात सर्वाधिक धोका म्हणजे ज्या मार्गावर बोगदा (टनेल) आहे त्या मार्गावर वाहन थांबवूच नये. अशा बोगद्यामध्ये वाहन पार्क करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून देण्यात आलेली असते त्या जागांवरच आपण वाहन थांबविले तर अपघात टाळता येईल.
या सर्व तांत्रिक बाबतीत आणखी एक महत्वाची तांत्रिक बाब म्हणजे रस्त्यांवर घाटांमध्ये असणारे धुके होय. धुक्यात अनेकदा दृश्यमानता काही फुटांपर्यंत मर्यादीत होवून जाते अशा प्रसंगी गतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक बाब आहे.
धुक्यात वाहन चालविण्यासाठी विशेष फॉग लाईट वापरले जातात. अशा लाईटसचा वापर देखील लो बीम पध्दतीने हवा. ज्या मार्गावर धुक असण्याची शक्यता असते त्या मार्गावर धुक्यासाठी रस्त्याच्या कडेला विशेष पांढरी रेषा असते त्याच्या आत आणि नियंत्रित पध्दतीने वाहन चालवावे. वाहन गती अमर्यादीत ठेवून धावणारी वाहने धुक्यात एकमेकांवर आदळून साखळी अपघात होतात. या स्थितीत आपण स्वत:च्या सुरक्षिततेला महत्व देणे आवश्यक आहे. तांत्रिक दृष्ट्या वाहन रात्री चालवताना जास्त खबदारी असणे हीच सुरक्षिततेची पहिली पायरी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.