July 27, 2024
vinal-hardikar-speech-on-indrajeet-bhalerao-poem
Home » इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…
गप्पा-टप्पा

इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं पूर्ण केली होती. ‘सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन ३१ जुलै २०१६ रोजी परभणीमध्ये समारंभपूर्वक झाले. त्यावेळी पत्रकार, लेखक आणि शेतकरी चळवळीचे एक नेते विनय हर्डीकर यांचं भालेराव यांच्या एकदंर कवितेविषयी भाषण झालं. या भाषणात त्यांनी भालेराव यांच्या कवितेचं सामर्थ्य, वेगळेपण आणि वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्या भाषणातील संपादित अंश दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने…

विनय हर्डीकर बोलणार म्हणजे बोळकांडीमध्ये डायनॉसॉरस शिरला तर धडाधडा घरं कोलमडून पडतात तसं काही घडेल अशी अपेक्षा आज कोणी ठेवू नये. कौतुक इंद्रजितचं आहे. इंद्रजित भाग्यवान आहे ! इथं बोलताना शरद जोशींची आठवण अपरिहार्य आहे. जिवंतपणी ‘समग्र’ प्रकाशित होण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. कवितेत बोरकरांनंतर ते इंद्रजितला लाभलं. राजकारणात असे लोक आहेत, जे जिवंतपणी स्वतःचे पुतळे उभे करतात. परंतु साहित्यामध्ये जिवंतपणी ‘समग्र’ हे मोठं भाग्य आहे.

शरद जोशींची आठवण अशा कारणानं झाली की, त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त काय करावं अशी चर्चा चालली होती. तेव्हा शरद जोशी नाटकी कळकळीच्या आवाजात म्हणाले, ‘काहीही करा, पण माझे चौकात कटआउटस् लावू नका.’ मग अर्थातच लोक म्हणाले की, साहेबांची पुस्तकं पुन्हा प्रकाशित करूया. त्यांचा एक सेट करू या. त्याची एक योजना करूया. त्या वेळी शरद जोशी पुन्हा म्हणाले, “समग्र शरद जोशी’ला अजून वेळ आहे!’ तसं असतानासुद्धा इंद्रजितची समग्र कविता आली हे चांगलं झालं.

अजून एक पार्श्वभूमी अशी की, आठ-दहा वर्षांपूर्वी इथं जवळाबाजारला एक कार्यक्रम होता. त्यात इंद्रजितचा सत्कार होणार होता. त्याला शंकरराव चव्हाण आणि शरद जोशी म्हणजे (त्यांचे राजकीय संबंध लक्षात घेता) अक्षरशः सापा-मुंगसाची जोडी व्यासपीठावर असणार होती आणि संयोजकांनी इंद्रजितला सांगितलं की, तुमच्यावर कोणी बोलायचं ते तुम्ही ठरवा. तेव्हा इंद्रजितने मला सांगितलं, ‘तुम्ही माझ्यावर बोलायचं आहे.’ मी म्हटलं की, हे दोघं आणि कविता हा विषय हेच मला इतकं विजोड वाटत आहे की, मी काही या कार्यक्रमाला येणार नाही. तुझ्या कवितेवर मी योग्य वेळेला परभणीतच बोलेन. त्यामुळे श्रीकांतने हे पुस्तक पाठवल्याबरोबर मी त्याला कळवलं की, हा कार्यक्रम आपण करूया. तो आम्ही एप्रिलमध्ये करणार होतो. पण एप्रिलमध्ये तुमच्या तोंडचं ‘पाणी’ पळालेलं होतं. म्हणून मी संयोजकांवर मेहेरबानी केली आणि म्हटलं की, आता नको. पण त्यामुळे इंद्रजितला पुण्याच्या एका पुरस्काराला मुकावं लागलं. तो त्याला पुढच्या वर्षी मिळेल अशी अपेक्षा ठेवूया.

शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना काय आणि किती दिलं हा स्वतंत्र विषय आहे. पण मला मात्र भरभरून दिलं. आणि काही वेळा मी हिसकावूनही घेतलं. परभणीला मी आधी पत्रकार म्हणूनही आलो होतो, मित्रांच्या घरी आलो होतो. परभणी, शेतकरी संघटना, उमरीकरांचं घर; आणि मी परभणीत आलोय, हे कळल्यावर हजर होणारा इंद्रजित असं हे ८६ सालापासून चालू आहे. इंद्रजित जर परभणीत असला तर मी ज्या दिवशी इथं येतो, त्या दिवसापासून मी पुन्हा परभणी सोडेपर्यंत तो (त्याचे कॉलेजचे तास सोडून) माझ्या ताब्यात असतो, असं म्हणायला हरकत नाही.

दुसरं कौतुक करायचं आहे ते श्रीकांतचं. इंद्रजितचं पुस्तक देखणं झालेलंच आहे. पण नुकतीच शेक्सपियरची चारशेवी मृत्युशताब्दी साजरी झाली. आणि सबंध महाराष्ट्रातून शेक्सपिअरवर फक्त दोन पुस्तकं प्रकाशित झाली. आणि ती दोन्ही जनशक्ती वाचक चळवळीची आहेत, याचा मला अत्यंत अभिमान आहे. श्रीकांतला शेक्सपिअरसंबंधी आवड निर्माण व्हायला मीही थोडाफार कारणीभूत आहे, हे श्रीकांतला मान्य आहे आणि ते खरंच आहे.

औरंगाबादच्या इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापक लता मोहरीर यांचं ‘शेक्सपियर आणि मराठी नाटक’ हे एक अत्यंत जबरदस्त अभ्यासपूर्ण पुस्तक काढलेलं आहे. तेही या पुस्तकाइतकंच देखणं आहे. शेक्सपिअरच्या सगळ्या नाटकांच्या कथा पाच खंडांमध्ये मराठीत आणण्याचं कामही श्रीकांतने केलेलं आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम या दोघांचं कौतुक करण्याचा आहे. ही पुस्तकं देखणी झालेली आहेत. परवा माधव वझेनेही परीक्षणात असा उल्लेख केला आहे की, मुद्रणदोष नसते तर ही पुस्तकं अजून सुंदर झाली असती. तेव्हा श्रीकांतने यापुढे महत्त्वाचं पुस्तक असेल तर निदान एक प्रूफ मला वाचायला द्यावं असं मी त्याला सांगतो. कारण अशी कामं पुन्हा होत नाहीत. चारशे-साडेचारशे पानांची दोन पुस्तकं एका महिन्यामध्ये काढायची यात फार मोठी गुंतवणूक असते. आणि ती पुन्हा पुन्हा करता येत नाही. गंभीर मराठी पुस्तकांचा खप लक्षात घेता ती गुंतवणूक वसूल व्हायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपण जे काम करू, ते उत्कृष्टच झालं पाहिजे. ही जागरूकता एक प्रकाशक म्हणून श्रीकांतने ठेवली पाहिजे.

१९८६-८७ मधली गोष्ट आहे. त्या वेळेला ‘इंडियन एक्सप्रेस’मधली नोकरी सोडून मी नुकताच शेतकरी संघटनेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उपलब्ध झालेलो होतो. त्यावेळचा शिरस्ता असा होता की, शरद जोशी जाऊ शकत नसतील तर ज्या माणसांनी जायचं आहे, अशी चार-पाच माणसांची यादी असायची. त्याच्यामध्ये माझं नाव असायचं. त्यासंदर्भात मी परभणीला आलेलो होतो. मराठी साहित्यावर एका कॉलेजमध्ये बोला, असं मला अनंतरावांनी सांगितलं. मी नेहमी म्हणतो की, माझं थोडंसं ‘विठाबाई’सारखं आहे. मी एखाद्या गावी गेलो की, जितक्या ठिकाणी नाचवतील तितक्या ठिकाणी मला पायात चाळ बांधून नाचावं लागतं! मघाशी श्रीकांतने त्याचा उल्लेखही केला. अनंतराव म्हणताहेत म्हणजे जायला पाहिजे.

ते ‘ज्ञानोपासक’ नावाचं कॉलेज होतं. तिथं मोठी बरॅकवजा लांबलचक जागा होती. त्यात खच्चून मुलं भरलेली होती. तेव्हा माझं वय ३७-३८ होतं. आणि तिथं २४-२५ वर्षांच्या, पाणीदार डोळ्यांच्या एका गोऱ्यापान तरुण (मराठवाड्यात गोरा रंग किती दुर्मीळ आहे, हे बाहेरच्या माणसाला जास्त जाणवतं!) प्राध्यापकाने माझी ओळख करून दिली. ओळख ठीक करून दिली. योग्य ओळख करून घ्यायलासुद्धा वक्त्याला भाग्य लागतं. नाहीतर लोक तुमच्या नावावर काय वाटेल ते ठोकून देतात. पण ती सत्य ओळख होती.

इंद्रजितच्या सुदैवानं माझं त्या वेळेला एकच पुस्तक आलं होतं. त्या पुस्तकाचा त्याने चांगला परामर्श घेतला आणि विनय हर्डीकर बोलायला उभे राहिले. माझ्या पहिल्याच तिरकस वाक्याला त्याचा एवढ्या मोठ्यानं प्रतिसाद मिळाला की, माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. मी असं म्हटलं होतं, “गाव सोडलं की, निसर्ग सुरू होतो आणि तिथं लोक नैसर्गिक क्रिया करत असतात.” असं म्हटल्याबरोबर सगळ्यात मोठ्यानं जे हास्य ऐकू आलं, त्याच्यामुळे हा चावट माणूस माझ्या लक्षात राहिला. माझा चावटपणा त्याच्या हृदयाशी जाऊन भिडला! आणि त्यानंतर जे जे मार्मिक किंवा महत्त्वाचं वाक्य असेल त्याला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत होता. मुलांना ते किती समजत होतं मला माहीत नाही, पण भालेराव सर हसले की, मुलं हसत होती (आणि भालेराव सरांना किंवा मला हसत नव्हती) आणि भालेराव सरांनी टाळ्या वाजवल्या की, मुलं टाळ्या वाजवत होती; भालेराव सरांनी ‘व्वा’ म्हटलं की, मुलं ‘व्वा’ म्हणत होती. मी म्हटलं हा भालेराव सर आपल्याला पाहिजे! आपल्याला या भागात पुन्हा पुन्हा यायचं आहे. कॉलेजेसमध्ये जायचं आहे. मग त्याची जास्त ओळख झाली.

इंद्रजित भालेरावचं कविता लेखन ९० सालानंतर सुरू झालं. पण त्या वेळी त्याच्या मनात कविता घोळायला सुरुवात झालेली असणार. या प्रसंगापासून जी सुरुवात झाली, त्याला आता जवळजवळ ३० वर्षं झाली. आमच्यातला हा संवाद अतिशय उत्कट आणि अतिशय हृद्य आहे.

इंद्रजितचं आणि माझं नेमकं नातं काय आहे? कधी मला तो धाकट्या भावासारखा वाटतो. कधी मला तो मराठीतला एक महत्त्वाचा कवी वाटतो. कधी मला तो हल्ली फारच सुस्तावला आहे, सुखासीन झाला आहे असंही वाटतं. मग मी त्याला काहीतरी टोमणे मारतो, खरवडतो. कधी कधी मला तो उगीच भलत्यासलत्या काळज्या करत बसला आहे, असं वाटतं. अजूनही इंद्रजितकडून जे सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ अपेक्षित आहे, ते आलेलं नाही, असं असमाधान कधीकधी मला त्याच्याबाबतीत वाटतं.

कधीकधी मी त्याला रागावलेलो आहे. उदाहरणार्थ, सहा वर्षं रोज त्याला जिंतूरला जावं लागत होतं. मराठी लेखक आणि विशेषतः कवी यांची हृदयं नाजूकच असतात. ते कशाला संकट म्हणतील आणि कशाला नाही याचा काही नेम नसतो. इंद्रजितने आता आपल्यावर अस्मान कोसळून पडलं आहे, असा चेहरा केलेला होता. (जिंतूरचं ते कॉलेज फार सुंदर आहे. तिथं माझा एक कार्यक्रम झाला, त्या वेळी मला हे लक्षात आलं.) तेव्हा मी त्याला म्हटलं, ‘तू मुंबई, हैदराबाद, बंगलोर इथं राहणाऱ्या लोकांचा विचार कर ना! कर्जत-डोंबिवलीपासून रोज माणसं ‘व्हीटी’ला जातात आणि परत येतात. आणि मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात.

मर्ढेकरांनी म्हटलं आहे,

या नच मुंग्या हीच माणसे
आणि
दहा दहाची लोकल गाडी
सोडित आली पोकळ श्वास
घड्याळयातल्या काट्याचा अन
सौदा पटला दीन उदास

असं जगणारी माणसं इतकं सोसून हसतमुख असतात आणि इथं तर तुझी सगळीकडे ओळख आहे. भालेराव सर गाडीत आहेत म्हटल्यानंतर ड्रायव्हरसुद्धा – तुला ड्रायव्हिंग येत असेल तर – तुला आपली जागा देईल. हे सोसावंच लागतं. आणि बहिणाबाईनेच सांगितलं आहे ना बाबा तुला?

हास हास माझ्या जीवा असा प्रपंचात हास
ईडापीडा संकटाच्या तोंडावरी काळं फास

मग आठवड्यातून पाच-सहा दिवस जिंतूरला अप-डाऊन करावं लागतं याचं इतकं वाईट वाटून घेऊ नको.’ खूप माणसांना हे सहन करावं लागतं. असे काही वेळेला रागवण्याचेही प्रसंग आमच्यामध्ये येऊन गेले.

मी प्रश्न विचारला, “या कविता लिहायला तुम्हाला किती वेळ लागला?” ते सगळे नौजवान, चुस्त फुर्तिले कवी! त्यांना वाटलं हा कुणीतरी गद्य माणूसच आहे. ते म्हणाले, “वेळ कसला लागतो? स्फूर्ती आली की, राहवतच नाही.” मी त्यांना म्हटलं, “इथंच घोटाळा होतो आहे. या तुमच्या कविता नाहीत. हे कवितेचं ‘रॉ मटेरियल’ आहे. आणि या ‘रॉ मटेरियल’वर तुम्ही शांतपणे बसून नीट प्रक्रिया केली असती तर यातल्या काही मटेरिअलच्या चांगल्या कविता झाल्या असत्या.” असं म्हटल्यावर तिथेच बॉम्बच पडला! ते म्हणाले, ‘असा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता?कवीचं काही आविष्कारस्वातंत्र्य वगैरे…” (आविष्कार हा मोठा शब्द आहे बाबांनो! ‘ट’ला‘ट’ आणि ‘री’ला‘री’ जुळवलं म्हणजे काही आविष्कार होत नाही!) अर्धा तास तरी मी शिव्या खाल्ल्या तिथं.

इंद्रजित उमदा आहे आणि बेरकीही आहे. एकाच प्रसंगात त्याने हे दोन गुण मला दाखवून दिले. बेरकीपणा हा मी गुणच समजतो. तो आवश्यक आहे. बावळट माणसाला लोक विकून खातील! इंद्रजितला एकदा गोव्याला जायचं होतं. गोव्यामध्ये धारगळ नावाचं एक गाव आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर ते आहे. गोव्यातले सगळे कार्यक्रम देवळांमध्ये होतात. तिथं ख्रिश्चनांच्या कार्यक्रमांसाठी थिएटर्स आणि हॉल असतात, पण हिंदूंचे सगळे कार्यक्रम देवळांमध्ये होतात. गोव्यातली देवळं ही देशातल्या सगळ्यात स्वच्छ, सुंदर आणि देखण्या देवळांमधली आहेत. तुम्ही देवासमोर काही ठेवत आहात की, नाही याचा पहारा करणारे, पंढरपूरसारखे आशाळभूत पुजारी तिथं नसतात! पण जिथं पुजारी नाही, तिथंही देऊळ स्वच्छ असतं.

धारगळला महालक्ष्मीचं एक देऊळ आहे. तिथं दरवर्षी एक शेकोटी साहित्य संमेलन भरतं. खरं तर तिथं येणाऱ्या कवितांचा दर्जा असा असतो की, दोन-चार कवींनाच त्या शेकोटीत टाकावं. इंद्रजित म्हणाला, “मला गोव्याला जायचं आहे आणि मला रस्ता माहीत नाही. मागच्या वेळेला कोल्हापुरातून बाहेर पडता पडता माझी पंचाईत झाली होती. त्यामुळे तुम्ही सोबत याल का? मी गाडी घेऊन येतो आहे.” मी मोकळा होतो. त्यामुळे ‘हो’ म्हणालो. सुरुवातीलाच त्याने मला मराठवाडी हिसका दाखवला. मी त्याला म्हटलं होतं की, सात वाजता तू एस. पी. कॉलेजपाशी ये. तो फर्ग्युसन कॉलेजपाशी जाऊन थांबला होता. मी पावणेसातला एस. पी. कॉलेजपाशी जाऊन उभं राहिलो. त्या वेळेला दोघांकडेही मोबाईल नव्हता. त्याने कुठून तरी घरी फोन केले. आता चार-पाच दिवस कटकट नाही म्हणून बायको आनंदानं साखरझोपेत असताना याचे फोनवर फोन! शेवटी बायको एस. पी. कॉलेजपर्यंत पळत पळत आली आणि मग एकदाची आमची गाठ पडली. मैत्री म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? सोसावं लागतं पुष्कळ!

आम्ही गोव्याला गेलो. तिथं भालेराव हे प्रमुख पाहुणे. आम्हाला कोण ओळखतं? त्यांना वाटलं एक-दोन दत्तू असतातच प्रमुख पाहुण्यांसोबत. त्याच्यातला हा थोडा सीनियर दत्तू दिसतो आहे. माझ्याकडे कोणाचंही लक्ष नाही. भालेराव सरांचा सत्कार झाला, भालेराव सरांचं स्वागत झालं. आणि त्यांनी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरू केला. संध्याकाळी शेकोटी पेटवली की, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, म्हणजे अक्षरशः ती शेकोटी विझेपर्यंत (कवितांच्या गोंगाटानं) ते कवितावाचन चालू ठेवतात. मग दुपारी जेवणानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं, आणि महाराष्ट्र शारदेच्या सुदैवानं ते संमेलन विसर्जित होतं.

निवेदकानं ओळख करून दिली आणि एकेक कवी आपापल्या कविता वाचायला लागले. त्या कविता ऐकताना वाटत होतं, वैऱ्यावरही अशी पाळी येऊ नये! साताठ कवी झाल्यावर संयोजकांनी एक घोडचूक केली. ते म्हणाले, “इतक्या छान कविता या सगळ्या कवींनी वाचल्या. आता श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारावेत.” म्हणजे त्यांनी अक्षरशः सापाला डिवचलं!

हल्ली मी एक चांगली रणनीती आखली आहे. माझ्याकडे तरुण पोरं येतात आणि म्हणतात, ‘तुम्ही कविता वाचता का?’ मी म्हणतो, ‘हो, पण मी फक्त मेलेल्या कवीच्या कविता वाचतो.’ (कारण ते अभिप्राय विचारायला येत नाहीत.) फुग्याला टाचणी लागली किंवा फुगा फुगवून गाठ न मारता सोडून दिला तर तो जसा कुठेतरी वेडावाकडा जाऊन पडतो, तसा त्या कवीचा चेहरा होतो. पण मलाही स्वतःचा बचाव केला पाहिजे. गावोगावी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलं की, साताठ कवितासंग्रह भेट मिळतात. मग मी ती पिशवी कार्यक्रमाच्या ठिकाणीच विसरायचा प्रयत्न करतो. पण तिथला शिपाई जर भयंकर कार्यक्षम असेल तर तो ती पळत पळत आणून देतो. मग मी ती गाडीत विसरायचा प्रयत्न करतो; ड्रायव्हर आणून देतो. मग मी ज्यांच्या घरी उतरलो असेल तिथं प्रयत्न करून पाहतो; तेही आणून देतात. लॉजवर उतरलो असेल तर अटेंडंट आणून देतो. एसटीमध्ये तर कुणी तुम्हाला पिशवी विसरूच देत नाही. असं करत करत ती पिशवी घरी आलीच तर मी एके दिवशी त्याच्यावरचं ‘यांना सप्रेम भेट’ लिहिलेलं पान फाडतो आणि एखाद्या ग्रंथालयाच्या दारात, आपल्याला कुणी पाहत नाही ना याची खात्री करत, ठेवून येतो. सध्या जो कवितांचा भडिमार चालला आहे, माझ्या मते त्यातल्या ९० टक्के ‘कविता’च नसतात!

मी प्रश्न विचारला, “या कविता लिहायला तुम्हाला किती वेळ लागला?” ते सगळे नौजवान, चुस्त फुर्तिले कवी! त्यांना वाटलं हा कुणीतरी गद्य माणूसच आहे. ते म्हणाले, “वेळ कसला लागतो? स्फूर्ती आली की, राहवतच नाही.” मी त्यांना म्हटलं, “इथंच घोटाळा होतो आहे. या तुमच्या कविता नाहीत. हे कवितेचं ‘रॉ मटेरियल’ आहे. आणि या ‘रॉ मटेरियल’वर तुम्ही शांतपणे बसून नीट प्रक्रिया केली असती तर यातल्या काही मटेरिअलच्या चांगल्या कविता झाल्या असत्या.” असं म्हटल्यावर तिथेच बॉम्बच पडला! ते म्हणाले, ‘असा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता?कवीचं काही आविष्कारस्वातंत्र्य वगैरे…” (आविष्कार हा मोठा शब्द आहे बाबांनो! ‘ट’ला‘ट’ आणि ‘री’ला‘री’ जुळवलं म्हणजे काही आविष्कार होत नाही!) अर्धा तास तरी मी शिव्या खाल्ल्या तिथं.

त्यानंतर प्रमुख पाहुणे भालेराव सर यांना आपल्या मित्राची दया आली. ते म्हणाले, “प्रश्न कोण विचारतं आहे, ते तुम्हाला माहीत नाही. हे विनय हर्डीकर आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे चार-पाच अध्यक्ष एका पारड्यात (खरं म्हणजे हासुद्धा माझा अपमानच आहे!) आणि विनय हर्डीकर दुसऱ्या पारड्यात ठेवले तर हर्डीकरांचं पारडं खाली राहील.” तिथं सन्नाटाच पसरला. आता हा हर्डीकर आणखी काय ऐकवतो कोण जाणे! तिथून पुढे ते संमेलन संपेपर्यंत, (एकट्या इंद्रजितचा अपवाद) सगळे कवी दबकत दबकत यायचे (आणि मला आसुरी आनंद व्हायचा, हे मी कबूल करतो!) आणि प्रत्येकाचं पहिलं वाक्य असायचं, ‘हे रॉ मटेरियल आहे की, कविता आहे, ते मला माहीत नाही. पण मी ‘मनापासून’ (हासुद्धा फार डेंजरस शब्द आहे) लिहून आणलं आहे, तर मला सादर करू द्यावं.’

गोव्याचे माजी मंत्री गोपाळराव मयेकर मला म्हणाले, “हर्डीकर, काय करून ठेवलंत? हे सगळे आपण व्यास-वाल्मिकी आहोत, अशा समजुतीत कालपर्यंत होते.” पण इंद्रजितच्या उमदेपणाचा पुरावा असा की, त्याने त्यांना सांगितलं, “हर्डीकरांच्या दृष्टीनं मर्ढेकरांच्या निम्म्या कविता ‘रॉ मटेरियल’ आहेत आणि माझ्या ८० टक्के कविता कदाचित (हा शब्द मी वापरतो आहे, पण त्याने वापरला नव्हता) रॉ मटेरियल असतील.’

प्रमुख पाहुण्यांनीच मला असा फ्री पास दिल्यावर मग मीही झाला एवढा विध्वंस पुरे झाला असं म्हणून आवरतं घेतलं. (हा माझाही उमदेपणा!) पुढे पाच वर्षांनी मी मडगावला व्याख्यानाला गेलो होतो. तिथं व्यवस्थित सुस्थितीतला एक माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला म्हणाला, ‘ओळखलं का?’ मला आठवायला एक मिनिट लागलं. मग मी म्हटलं, ‘धारगळ ना? शेकोटी साहित्य संमेलन?’ तो मोठमोठ्यानं हसायला लागला. मी म्हटलं, ‘सध्या काय चालू आहे?’ तो म्हणाला, ‘रॉ मटेरियल नाही, कविता नाही. त्या दिवसापासून आपण लिहिणंच बंद केलं.’ मी म्हटलं, ‘महाराष्ट्र सारस्वताच्या वतीनं मी तुझा ऋणी आहे.’

हा झाला इंद्रजितच्या उमदेपणाचा पुरावा; बेरकीपणाचा पुरावा असा की, त्याने आजतागायत मला पुन्हा कधीही आपल्या बरोबर नेलेलं नाही. या बेरकीपणाचंही स्वागत आहे, तोही मला तितकाच आवडतो.

इंद्रजितच्या उमदेपणाचं आणखी एक उदाहरण सांगतो. मी कुठे गेलो की, तिथल्या माझ्या काही मित्रांना वाटतं की, ह्याचं व्याख्यान आपल्या इथं झालं पाहिजे. आणि काही वेळा मला त्यांना ‘नाही’ म्हणता येत नाही. इंद्रजितच्याच कॉलेजमध्ये त्याने एकदा मला बोलायला सांगितलं. मी काही ‘सांबार’पंथी नाही. महाराष्ट्रात असे काही वक्ते आहेत, ज्यांचा विषय कोणताही असो, आशय तोच असतो. या आशयाला मी ‘सांबार’ म्हणतो. आणि हे सगळे फार मोठे वक्ते आहेत. सुदैवानं त्यातले काही गेले. ते विचारायचे, ‘तुमच्या गावी बोलायचं आहे? मागच्या वेळी मी गांधींवर बोललो होतो का? यावेळी विनोबा घ्या.’ किंवा ‘मागच्या वेळी मी रामावर बोललो होतो का? आज कृष्ण घेऊ’. किंवा उदाहरणार्थ, सावरकर आणि एखादा हिंदुत्ववादी विचारवंत’ अशा जोड्या घेतल्या की, जास्त काम करावं लागत नाही. तिकीट काढून या माणसाचं व्याख्यान एकदा ऐकल्यावर एका गावची माणसं दुसऱ्या गावी येण्याची शक्यताही नसते. त्यामुळे यांची रॅकेटस चालू राहतात. माझ्याकडे असे तयार विषय नसतात. आणि हल्ली कॉलेजमध्ये करमणूकप्रधान कार्यक्रमांचाच धुमाकूळ चालू असतो. तिथं टीव्हीवरचे स्टार्स बोलावतात. त्यात मुलांची काही चूक नाही. त्यांना ग्लॅमरचं, दृश्य प्रतिमांचं आकर्षण आहे, देखण्या व्यक्ती पाहायला त्यांना आवडतात.

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे
सावळे वा गोरटे
त्या मोल नाही फारसे

अशी बोरकरांची सुंदर कविता आहे. पण हे कळण्याचं त्या मुलांचं वय नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की, मला त्यांच्यासमोर कशाला न्यायचं? पण तरी मी ‘हो’ म्हटलं. ‘कवितेतला पाऊस’ या विषयावर मी बोलायचं ठरवलं. रामायणाल्या किष्किंधा कांडात ‘वर्षावर्णन’ असा सर्ग आहे, तिथून सुरुवात करून मी आधुनिक कवितेपर्यंत आलो. आणि शेवटी म्हटलं, ‘आता भालेराव सरांनी त्यांची एखादी पावसावरची कविता आम्हाला ऐकवावी.’ त्यावर इंद्रजित मला म्हणाला, ‘पावसावर माझ्या फारशा कविताच नाहीत.’ मला पहिला धक्का तिथं बसला. ही घटना घडली तेव्हापर्यंत इंद्रजितच्या दोन-अडीचशे कविता आलेल्या होत्या. आमच्याकडे ‘गडद गडद निळे’ ढग कवीच्या कल्पनेत जरी आले तरी कविता ‘पाडायला’ सुरुवात होते. निसर्गातला पाऊस थांबेल, पण कवितांचा पाऊस थांबत नाही. मंगेश पाडगांवकरांसारख्या कवीची पावसावरची कविता सात जूनला लिज्जत पापडच्या पुरस्कारानं येणार म्हणजे येणार! त्याचं पुलंनी फार चांगलं विडंबन लिहिलं होतं,

येता आषाढु आषाढु
लागे पावसाची झडु
आले मनात माझिया
आपणही गीत पाडु

अशा त्या सगळ्या कविता असतात. मला आठवतं त्याप्रमाणे (धक्का बसू देऊ नका) मीही पहिली कविता पावसावरच लिहिली होती. असा एकही मराठी कवी मला माहीत नाही, ज्याने पावसावर कविता लिहिलेली नाही. उन्हाळ्यावर, हिवाळ्यावर कमी कविता लिहिल्या जातात. पण प्रत्येक कवीनं पावसावर कविता लिहिलीच पाहिजे अशी मराठी कवितेत काहीतरी जणू काही सक्तीच आहे. ‘ये रे ये रे पावसा’सारख्या बालगीतांमुळे ‘पाऊस’ हा कवितेचा विषय आहे, असे संस्कार लहानपणापासूनच आपल्यावर होत असतात.

इंद्रजितने मला सांगितलं, ‘पावसावर माझी एकच कविता आहे; पण ती अवकाळी पावसावर आहे.’ शेतकऱ्यानं जमवलेलं सगळं आता तो विस्कटून टाकेल अशा काळजी त्या कवितेत आहे. मी महाराष्ट्रभर फिरलेलो आहे, ‘पाऊस आणि कविता’ या विषयावर दोन तास बोलण्याइतकी माझी तयारी आहे; पण पावसावरची अशी कविता मी वाचलेली नाही.

आलं आलं हे आभाळ नाही वारं-वावधान
वऱ्ही बसलंय्‌ हाटून खात्री फुलोऱ्यात धान
आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वानाचं
आता करील वाटोळं फुलावरल्या धानाचं
आलं आलं हे आभाळ आता पाडील इघीनं

जव्हा यावं तव्हा नाही आलं एवढ्या बिगीनं
आलं आलं हे आभाळ आता धुरडली तूर
माकोडला झाडपाला खाल्ली लागला उकीर
आलं आलं हे आभाळ आलं सुगीच्या दिसांत
माती कालविली त्यानं हातामधल्या घासात

आलं आलं हे आभाळ काय म्हणू आता याला
काळतोंड्यानें लावली कड आपली काठाला
आलं आलं हे आभाळ काळा दगोड होवून
बसलंय उरावर हात गळ्यावं ठिवून

पावसावर माझी कविता नाही हे मोकळेपणाने सांगण्यात इंद्रजित उमदेपणा तर आहेच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पावसाचा धिक्कार करणारी ही मराठीतली एकमेव कविता असेल. पावसावर आजवर किती कविता लिहिल्या गेल्या आहेत. ‘पाऊस आणि विरह’ ही परंपरा मेघदूतापासून आहे. (‘मेघदूत’ हा भारतातला पहिला पोस्टमन ना!) शास्त्रीय संगीतातही तेच. पण पाऊस हा कुणासाठी तरी चिंतेचा, घात करणारा विषय असू शकतो, हे या कवितेत पहिल्यांदा आलं आहे.

निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे, हे फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. बालकवी कुठेही असते तरी त्यांनी अशीच कविता लिहिली असती. दुर्गाबाईंना ‘ऋतुचक्र’बद्दल लोक विचारायचे. तेव्हा दुर्गाबाई म्हणायच्या, ‘मी हे पुस्तक लिहायला कुठेही डायरी घेऊन नोट्स काढत फिरत नव्हते. मुंबईच्या माझ्या दोन खोल्यांच्या जागेच्या खिडकीतून मला जेवढं ऋतुचक्र दिसलं, तेवढंच मी नोंदवलेलं आहे.’ पण ते मराठीतलं एक अप्रतिम ‘निसर्ग-उपनिषद’ आहे, असं त्या पुस्तकाविषयी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे आणि ग्रामीण कविता म्हणजे शेतकऱ्याची कविता नव्हे.

मृगामध्ये येणाऱ्या पावसाचं स्वागत असतं; तोच पाऊस पिकं तयार झाल्यानंतर आला तर घात करतो. पण महाराष्ट्रात हे काही नवीन नव्हतं. आपल्याकडे दर दोन-चार वर्षांनी तयार पिकांवर पाऊस पडतो. ज्वारी काळी पडते. बाजरी मुळातच काळी असल्यामुळे ती काळी पडत नाही, पण तिला अरगट वगैरे रोग लागतात. कोकणामध्ये कापून ठेवलेलं भात भिजतं. हे काय मराठी कवींना माहीत नव्हतं? मग कुणी तसं का लिहिलं नाही? कविता सहज अनुभवातून येण्यापेक्षा, म्हणजे कविता स्फुरण्यापेक्षा, आतून येण्यापेक्षा; ती कोण वाचणार आहे, कोणाला ऐकवायची आहे, त्यानुसार लोकांच्या आवडीची कविता (चांगला शब्द वापरायचा तर) रचणं किंवा (वाईट शब्द वापरायचा असेल तर) ‘पाडणं’ कवींना अधिक सोयीचं जातं?

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली की, इंद्रजितचा हा मोकळेपणा आणि उमदेपणा उठून दिसतो. ‘ज्या प्रकारच्या पावसाच्या कवितांची ‘फॅशन’ आहे, तशा कविता मी लिहिल्या नाहीत आणि त्या लिहिल्या नाहीत म्हणून मला त्याचं काही कमीपणाही वाटत नाही’ हा त्याचा स्वाभिमान आहे.

टप टप पडती थेंब
मनीवनीचे विझती डोंब
वत्सल ये वास
भूमी आशीर्वच बोले

गडद निळे गडद निळे
जलद भरुनी आले
शीतलतनु चपलचरण
अनिलगण निघाले

अशा आशयाची कविता या सबंध पुस्तकामध्ये एकही नाही. अर्थात बोरकरांची ही कविता काही वाईट नाही. हाही अनुभवच आहे. पण इंद्रजितच्या कवितेतला अनुभव अतिशय दाहक आहे. पण हा अनुभव फक्त शेतकऱ्याचा आहे. ग्यानबाची मेख इथं आहे!

आपल्याकडे ‘ग्रामीण कविता’ आणि ‘निसर्ग कविता’ असे दोन शब्द वापरले जातात. निसर्ग कवितांमध्ये बालकवींसारखी मोठमोठी नावं आहेत. बालकवींमधूनच निघणाऱ्या परंपरेत पाडगावकरांसारखे लोक आहेत. वसंत बापटांची ‘दख्खनची राणी’ हीसुद्धा निसर्ग कविताच आहे. पण निसर्गकवितेमध्ये बालकवींनी जी उंची गाठली, ती त्यांच्यानंतर कुणालाच गाठता आलेली नाही. बालकवींनी निसर्गकविता एका अद्भुत जगामध्ये नेली.

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती.
गूढ निळ्या वातावरणात, निर्व्याज मनाने होती डोलत,
प्रणयचंचला त्या भृलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.

आईच्या मांडीवर बसुनी; झोके घ्यावे गावी गाणी,
याहुनि ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

हे संपूर्ण सुसंगत आहे. बालकवींची ही जादूच आहे की, त्यांची कविता झपाट्यानं अद्भुतामध्ये जाते.

आकाशामधुनी जाती
मेघांच्या सुंदर पंक्ती
इंद्रधनूची कमान ती
ती संध्या खुलते वरती

रम्य तारका लुकलुकती
नीलारुण फलकावरती
शुभ्र चंद्रिका नाच करी
स्वर्ग-धरेवर एक परी

ही दिव्ये येती तुजला
रात्रंदिन भेटायाला
वेधुनि त्यांच्या तेजाने
विसरुनिया अवघी भाने

धुंद हृदय तव परोपरी
मग उसळी लहरी लहरी
त्या लहरीमधुनी झरती
दिव्य तुझ्या संगीततती

नवल न, त्या प्राशायाला
स्वर्ग धरेवर जरि आला
गंधर्वा तव गायन रे
वेड लाविना कुणा बरे

या उंचीला कुणाला जाता आलेलं नाही. मग त्यातल्याच एक-दोन कल्पना घ्यायच्या आणि त्यांचा विस्तार करायचा असं बालकवींच्या नंतरच्या कवींच्या निसर्गकवितांमध्ये दिसतं. पाडगावकरांची ‘सत्कार’ ही कविताही चांगली आहे. पण बालकवींची उंची तिथं नाही.

निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे, हे फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. बालकवी कुठेही असते तरी त्यांनी अशीच कविता लिहिली असती. दुर्गाबाईंना ‘ऋतुचक्र’बद्दल लोक विचारायचे. तेव्हा दुर्गाबाई म्हणायच्या, ‘मी हे पुस्तक लिहायला कुठेही डायरी घेऊन नोट्स काढत फिरत नव्हते. मुंबईच्या माझ्या दोन खोल्यांच्या जागेच्या खिडकीतून मला जेवढं ऋतुचक्र दिसलं, तेवढंच मी नोंदवलेलं आहे.’ पण ते मराठीतलं एक अप्रतिम ‘निसर्ग-उपनिषद’ आहे, असं त्या पुस्तकाविषयी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे आणि ग्रामीण कविता म्हणजे शेतकऱ्याची कविता नव्हे. इंद्रजित, तुझ्यामध्ये आणि महानोरांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. महानोर हा ग्रामीण कवी आहे, पण तो शेतकऱ्याचा कवी नाही. नाहीतर त्यांनी ही आचरट कविता लिहिली नसती-

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लहडून यावे…

चांदण्याचा भाव २०० रुपये क्विंटल! हे वास्तव दिसलंच नाही की, पाहिलं नाही?

चिमणे इवलाले बीज
रम्य त्यात होती शेज
दीड वितीचे कुणी रोप
घेत तिथे होते झोप

ऊन म्हणाले उठ गड्या
पाऊस वदला मार उड्या
जगांत येरे या उघड्या (हा ‘उघड्या’ शब्द खरं म्हणजे इथं बसत नाही, पण शांताबाई फार लक्ष द्यायच्या नाहीत)
करी जळाच्या पायघड्या

वायु बोलला ऊठ की रे
माझ्याशी धर फेर बरे
हंसले जर आम्हा कोणी
दावु वाकुल्या नाचोनी

भूमी म्हणाली चल बाळा (अरे, त्या रोपाला वाढवलं कुणी त्याच्यासाठी एखादं वाक्य लिहाल?)
वाजव पाण्याचा वाळा
अंगी हिरवी सोनसळा
घालुन ही दावी सकळा

झोप झटकुनी ते उठले
नंदबाळ जणु अवतरले
पाऊसवारा ऊन तसे
जमले भवती गोप जसे

अदभुत त्यांचा खेळ अहा
जरा येऊनी पहापहा
उगवे चमके पहा तरी
मोरपिसांचा तुरा शिरी

सबंध कवितेत शेतकऱ्याचा उल्लेखच नाही! केवळ निसर्ग कविता म्हणून चांगली आहे. इंद्रजित हा खऱ्या अर्थानं पहिला ‘शेतकरी कवी’ आहे, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. तसं म्हणायला शेतकरी कवी इतरही काही झालेले आहेत. मात्र ‘आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याची कविता लिहितो’ याच्याबद्दल इंद्रजितला कोणताही न्यूनगंड नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

इंद्रजितच्या नसांनसांत जे शेतकरीपण भरलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला गळेकाढू किंवा उद्दाम अभिमान नाही. पण ते त्याला सोडवत नाही आणि त्याने ते सोडायची गरजही नाही. थॉमस हार्डी नावाचा एक प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार होऊन गेला. त्याने असं म्हटलेलं आहे की, लेखक दोन प्रकारचे असतात. एक, प्रत्येक विषयातलं त्यांना थोडं थोडं कळतं. (माझ्यासारखे! हर्डीकरांचा मूळ विषय काय हा शेरलॉक होम्सलाही न सुटणारा प्रश्न आहे.) आणि दुसरे, त्यांना एका विषयातलं सगळं माहीत असतं.

‘सारे रान’मधल्या या साडेतीनशे-चारशे कविता वाचल्यानंतर मला असं दिसलं की, ही कविता शेतीतून सुरू झाली आणि ती परत शेतीमध्ये गेलेली आहे. २५ वर्षांत इंद्रजित भालेरावच्या विकसनशील जाणीवेचं वर्तुळ पूर्ण झालेलं मला या पुस्तकात वाचायला मिळालं. असंही कुणी लिहिलेलं नाही. याची खूप चर्चा करता येईल. इंद्रजित, ही वेळ अजून आली आहे की, नाही मला माहीत नाही. पण लवकरच लोक तुझ्यावर पीएच.डी. वगैरे करतील. तुला भलतेच गुण चिकटवतील. त्याला तू तयार राहिलं पाहिजेस. हे संकट प्रत्येक चांगल्या लेखक – कवीवर केव्हातरी येणार. गाईडसची दुकानं चालली पाहिजेत ना!

इंद्रजितची शब्दकळा, प्रतिमासृष्टी, भाषाशैली; इंद्रजित आणि मराठी भाषा; इंद्रजित आणि मराठवाडी भाषा असं त्याच्यावर पुढे खूप लिहिलं जाईल. पण इंद्रजितच्या कवितेत त्याच्या जाणीवेचा झालेला विकास कुणी नोंदवेल असं वाटत नाही. त्याच्या कवितासंग्रहांची नाव बघा : ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘कुळंबिणीची कहाणी’ (दीर्घ कविता), ‘गावाकडं’, ‘पेरा’, ‘टाहो’, ‘मुलुख माझा’ (यात मराठवाड्यातलं नेहमीचं राजकारण नाही, हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे), ‘भूमीचे मार्दव’.

इंद्रजितच्या नसांनसांत जे शेतकरीपण भरलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला गळेकाढू किंवा उद्दाम अभिमान नाही. पण ते त्याला सोडवत नाही आणि त्याने ते सोडायची गरजही नाही. थॉमस हार्डी नावाचा एक प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार होऊन गेला. त्याने असं म्हटलेलं आहे की, लेखक दोन प्रकारचे असतात. एक, प्रत्येक विषयातलं त्यांना थोडं थोडं कळतं. (माझ्यासारखे! हर्डीकरांचा मूळ विषय काय हा शेरलॉक होम्सलाही न सुटणारा प्रश्न आहे.) आणि दुसरे, त्यांना एका विषयातलं सगळं माहीत असतं.

इंद्रजित हा दुसऱ्या प्रकारातला कवी आहे. त्यामुळे इंद्रजितचा पडता काळ आला की, कुणीतरी त्याच्याविषयी म्हणतील, ‘इंद्रजित भालेराव पुनरुक्ती करायला लागले’. पुनरुक्तीचं हे प्रकरण गमतीदार आहे. उदाहरणार्थ, आमचे आवडते गायक भीमसेन जोशी – ज्यांच्याकडे मी नेहमी समीक्षक वृत्तीनेच पाहिलं आहे – ‘ते नेहमी तेच तेच राग गातात’ असा आक्षेप त्यांच्यावर मीसुद्धा घ्यायचो. मी आकडा काढला की, भीमसेन जोशींना मैफिलीमध्ये गाण्यासाठी २० राग येतात. संगीत समीक्षक अशोक रानडे मला म्हणाले, ‘२० म्हणजे तू जास्त म्हणतो आहेस, भीमसेन म्हणजे १६ राग.’

एके दिवशी माझ्या मनात विचार आला की, शेकडो माणसं आपल्या ओळखीची असतात, हजारो माणसं आपण पाहिलेली असतात. पण खरे मित्र किती असतात? मग एखाद्या कलाकाराला तोच परिसर किंवा गायकाला तेच राग हे आपल्या जीवाभावाचे मित्र वाटत असतील तर ते त्याचं वैगुण्य किंवा तो त्याचा दोष असं म्हणता येणार नाही. फार तर तुम्ही असा उल्लेख करा की, याने जास्त मित्र करायला हवे होते. काही माणसांशीच आपलं हृदय उघड करण्याची सवलत जशी सर्वसामान्य माणसाला आहे, तसंच भीमसेनांच्याही बाबतीत हे शक्य आहे की, गायक म्हणून असलेली त्यांची प्रतिभा काही रागांमध्येच मनापासून रमते आणि तेच राग भीमसेन गातात.

दुसरा मुद्दा असा की, त्यांच्यासारखे गायक हे शास्त्रीय संगीताचे श्रोते तयार करण्याची प्राथमिक शाळा असते. पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकाचं ज्ञान केवळ पहिलीपुरतं नसतं. (हेही म्हणायला पहिजे की, काहींचं तेवढंही नसतं) शिक्षक प्रामाणिक असेल, त्याची संस्था प्रामाणिक असेल आणि त्याला निवडणाऱ्या समितीनं प्रामाणिकपणाने मुलाखत घेतली असेल तर पहिलीला शिकवणं सगळ्यात अवघड आहे. सगळ्यात चांगला शिक्षकच पहिलीतल्या मुलांना शिकवू शकतो. ‘अर्भकाचे साठी | पंते हाते धरिली पाटी’ असं तुकारामाने म्हटलंच आहे. मराठवाड्यातली कोरडवाहू शेती, तिचे रंग, तिच्यातली पिकं, तिच्यातली माणसं, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्यामधली गुंतागुंत, त्यांच्या आशा-निराशांचे प्रसंग; माणसांकडून, निसर्गाकडून, शासनकर्त्यांकडून त्या माणसांवर होणारे अन्याय, तिथल्या दंतकथा, गूढ प्रतीकं या प्राथमिक आशयापासून इंद्रजितच्या कवितेची सुरुवात झाली. ‘पीकपाणी’ हे त्याच्या पहिल्या कवितासंग्रहाचं नाव रोखठोक आहे. पण ‘भूमीचे मार्दव’ हे अलीकडच्या कवितासंग्रहाचं नाव रोखठोक नाही; ते अमूर्त आहे. सगळे विषय तेच ठेवून इंद्रजितच्या कवितेचा विकास होताना आपल्याला या संग्रहामध्ये पाहायला मिळतो.

आपल्याकडची ग्रामीण कवितासुद्धा एका विशिष्ट साच्यामध्ये अडकलेली होती. ती कविता लिहिणारे पहिल्या पिढीतले कवी खेडेगावातून शहरात आलेले, मध्यमवर्गीय, आणि ब्राह्मण होते.

न्याहरीचा वखुत होईल
मैतरणी बिगी बिगी चाल

‘तिकडे भूक लागली असेल, तिकडे अस्वस्थ व्हायचं झालं असेल’ अशा पद्धतीचा, आपल्या नवऱ्याबद्दल (शेतकऱ्याच्या बायकोला कुठला आलाय प्रियकर?) एक मध्यमवर्गीय ‘गोड’ भाव त्या कवितेत आहे. शेतकऱ्याची बायको न्याहरी घेऊन गडबडीने शेताकडे जाईल. पण का? तर न्याहरीनंतर तिला शेतात राबायचं आहे, तण उपटायला बसायचं आहे किंवा घरी येऊन पुन्हा दहा कामं करायची आहेत. एकदा न्याहरी झाली की, तिने काय खाल्लं, की नाही खाल्लं, हे कुणी विचारणार नाही. पुलंचं म्हणणं असं होतं की, यशवंतांची ही कविता मराठीतली पहिली ग्रामीण कविता. पण ‘मराठीतल्या नागर कवींनी लिहिलेली ग्रामीण कविता’ हे तिचं वर्णन बरोबर ठरलं असतं. पण आपल्याकडे कादंबरीमध्ये, कवितेमध्ये, कथेमध्ये, सिनेमामध्ये शेतकऱ्याचं वर्णन अशाच नागर जाणीवेने केलं गेलेलं आहे.

ही नागर जाणीव शेतकऱ्याच्या व्यक्त होण्यामध्ये कशी अडथळे आणते त्याचं एक उदाहरण सांगतो. शेतकरी संघटनेने चांदवडला महिला अधिवेशन घ्यायचं ठरवलं. ‘आम्ही मरावं किती?’ ही महिला अधिवेशनाच्या बॅनरवरची ओळ नारायण सुर्व्यांच्या कवितेवरून घेतली होती-

डोंगरी शेत माझं गं
मी बेणू किती?
आलं वरीस राबून
मी मरू किती?

त्यावेळी माझं आणि शरद जोशींचं काहीतरी बिनसलं होतं. जोशीसाहेब म्हणाले, ‘मला तुमच्या कुणाची गरज नाही. मी एक अ‍ॅड एजन्सीमधला प्रोफेशनल माणूस पकडलेला आहे. तो तुम्हाला सगळ्यांना भारी आहे.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे. ‘घी देखा लेकीन बडगा नही देखा!’ बघून घेऊ तुम्हालाही.’ त्या माणसाला ते आठ दिवस ‘शेतकरी स्त्रीचं शोषण’ हा विषय समजावून सांगत होते. ‘हे सगळं लक्षात घेऊन उद्या मला पोस्टरचं डिझाईन आणून दे’ असं त्यांनी त्याला सांगितलं. ‘सर्व बाजूंनी लंबवर्तुळ असलेली एक दणदणीत शेतकरी बाई, तिच्या डोक्यावर एक पाटी, छान झकपक नऊवारी लुगडं, कडेवर कुंची घातलेलं शेतकरी पोरगं आणि ती दोघं खदाखदा हसत आहेत’ असं चित्र त्याने काढून आणलं. ‘शरद जोशींच्या वाट्याला आलेलं विकट (बिकट?) हास्य’ असं त्या चित्राचं वर्णन करता येईल. ते त्याला समजावून थकले. पण काही केल्या तो मुद्दा त्याच्या डोक्यात शिरत नव्हता.

आठव्या दिवशी शरद जोशी मला म्हणाले, “बाबा रे, मी तुला शरण आलो. मी बोललेलं सगळं विसरून जा.” मी म्हटलं, “हे व्हायचंच होतं. माझ्या डोक्यात ‘केव्हा’ एवढाच फक्त प्रश्न होता.” ते म्हणाले, “मला दोन तासात कॅम्पेन पूर्ण करायचं आहे. संध्याकाळी मी प्रचाराला बाहेर पडणार आहे. नाशिकला जायचं आहे.” मी म्हटलं, “एक माणूस आहे, माझ्यापेक्षा जास्त चक्रम आहे. पण तो जर मिळाला तर सगळं व्यवस्थित होईल.”

दिलीप माजगावकरांना मध्ये घालून मी सुभाष अवचटला फोन केला. शरद जोशी स्वतः येणार म्हटल्यावर सुभाष क्लीनबोल्डच झाला. आणि चांदवड मेळाव्याचं ते अप्रतिम पोस्टर तयार झालं. यात दोष शरद जोशींचा किंवा त्या ‘प्रोफेशनल’ चित्रकाराचा नव्हता. ग्रामीण भागासंबंधी, शेतकऱ्यासंबंधी, शेतकरी स्त्रीसंबंधी आधीच्या सगळ्या कवींनी, गीतकारांनी, सिनेमावाल्यांनी जो पूर्वग्रह दिलेला होता, त्याच्यामुळे हा घोटाळा झाला होता. आजही जाहिरातींमधले शेतकरी पाहिले तरी हेच चित्र दिसतं. जाहिरातींमध्ये मॉडेल कुठलंही घ्यायला हरकत नाही, पण त्या मॉडेलमधून विषयाची वास्तवता तर व्यक्त झाली पाहिजे? चुकीच्या फँटसी तुम्ही दाखवू नका. ‘खत असेल कसदार, पीक येईल जोमदार’ (हात उभारून दाखवून) या निव्वळ थापा आहेत. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये एक प्रसंग आहे. दुष्यंत म्हणतो, ‘शांतं इदं आश्रमपदं स्फुरतिच बाहू कुतो फलं इहास्य?’ या शांत असलेल्या आश्रमातसुद्धा माझा बाहू स्फुरण पावणार असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी भानगड करायला स्कोप आहे, असा त्याचा स्पष्ट शब्दांमध्ये अर्थ आहे. तसं हे सगळं अवास्तव आहे. अवास्तव असायलाही हरकत नाही. बालकवींची कविता कुठे वास्तव आहे?

खिल्लारेही चरती रानी
गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा
श्रावणमहिमा एकसुरे

गुराख्यांनी पावा वाजवलाच पाहिजे, हे कवींनी त्यांच्यावर लादलेलं आहे, कारण, केव्हा तरी तो कृष्ण फू फू फू करून पावा वाजवत होता. अत्र्यांनी म्हटलं होतं, “मराठी कवी उठसूट कृष्णाला बासरी वाजवायला लावतात. या कृष्णाला फेशिया पॅरालिसिस कसा झाला नाही अजून?” कुणीही फडतूस कवी उठतो आणि म्हणतो, ‘वाजिव वाजिव कान्ह्या मुरली’ आणि त्याचं चित्र असं काढतात की, तो बासरी वाजवतो आहे की, ऊस सोलून खातो आहे हेही कळत नाही. हा सगळा गोंधळ पूर्वसंकेतांमुळे झालेला आहे. निसर्ग कविता आणि ग्रामीण कविता म्हणजेच शेतकऱ्याची कविता हा समजही पूर्वसंकेतांतूनच आलेला होता. इंद्रजितची कविता यायला लागल्यानंतर हे सगळं फसवं वास्तव लोकांच्या समोर आलं.

सुरुवातीला मलासुद्धा ही कविता समजत नव्हती. माझ्याबाबतीत दोन प्रसंग असे घडले की, त्यानंतर मला इंद्रजित कुठे चालला आहे, आणि कसा चालला आहे, हे लक्षात आलं.

खानावळीही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला गरम मसाला तोच तोच भाजीपाला
तीच तीच खवट चटणी तेच तेच आंबट सार सुख थोडे दुःख फार

असंच माझ्या वाढदिवसाचंही व्हायला लागलं होतं. त्याचा एक साचा बनून गेला होता. म्हणून मग नंतर मी वाढदिवसाला दरवर्षी पुण्याबाहेर जायचो. एकदा राजन गवसच्या घरी गेलो. आणि गवसने माझी परीक्षा पाहायचं ठरवलं. त्याच्याकडे जाणारे सगळे मराठी लेखक म्हणजे शरीरानं थकलेले आणि एकजात लुळेपांगळे! कुणाला बीपी आहे, कुणाला डायबिटीस आहे, कुणाला अजून काही. काहीतरी वैगुण्य असल्याशिवाय कविता कशी लिहिणार? आतमध्ये ‘वेदना’ पाहिजे ना! पण ती अपचनाची वेदना नसावी. त्याच्यावर दुसरे उपाय आहेत, कविता नाही लिहिली तरी चालेल. ‘कुणाचा द्वेष करू नये’ हा मोठा उपाय आहे. पण ते मराठी साहित्यिक-कवींना कसं जमावं?

त्या वर्षी पाऊस वेळेवर आला होता, ‘इघीन’ म्हणून आलेला नव्हता. धो-धो पावसात आम्ही दोन दिवस फिरत होतो. शेवटचे जवळजवळ पाच किलोमीटर, एक पाय गुडघाभर चिखलात घालायचा आणि दुसरा काढायचा असं करत आम्ही घरी आलो. गवसची आई चुलीपाशी भाकऱ्या बडवत होती. भिजून आलो होतो म्हणून मी चुलीपाशी जाऊन बसलो. ती म्हणाली, ‘हा आमचा पोरगा सतरावी-अठरावी शिकला आहे. तो इतकी माणसं आणतो. मी भाकऱ्या बनवून घालते. पण तुमच्यासारखं आतपर्यंत कुणी आलं नव्हतं. काय बोलू मी तुमच्याशी?’ मी म्हटलं, ‘तुमची स्टोरी सांगा.’ आणि तिने तिची सबंध कहाणी मला ऐकवली. तिचा नवरा वारकरी होता. भारत काळेच्या कादंबरीमध्ये एक वारकरी आहे. ‘विठोबा’ म्हटल्याशिवाय त्याच्या तोंडातून शब्दच येत नाही. तसा तो होता. आता त्याला पापभीरू म्हणायचं किंवा नेभळट म्हणायचं तो तुमचा प्रश्न आहे. आणि या नवरा-बायकोच्या वाटची सगळी जमीन सासरा हडपत होता. सासऱ्याला ती जमीन दुसऱ्या मुलाला द्यायची होती. त्या बाईने सासरा आणि दिराविरुद्ध जबरदस्त लढा दिला! पण सतत तिच्या मनात भीती असायची की, आपल्याला चार मुलगे आहेत. दिराला फक्त मुलीच आहेत. आपण जर जमीन त्याला दिली नाही तर तो आपल्या मुलाला विष घालून मारेल.

कोल्हापूर जिल्ह्यामधली भाऊबंदकी ही नुसत्या शिवीगाळीवर थांबत नाही. कारण तिथं जमीन चांगली आणि थोडी. त्यामुळे जमीन म्हणजे जीवन-मरणाच्याच लढाया असतात. नंतर गवसने मला सांगितलं की, आम्ही कोल्हापुरात येईपर्यंत मी बाहेर काही खात नव्हतो. ती सबंध कहाणी मी ऐकली. मग एक दिवस ‘साधना’चा दिवाळी अंक चाळत असताना इंद्रजितची कविता मला वाचायला मिळाली. त्या दिवशी मला इंद्रजितची कविता समजली. ‘काबाडाचे धनी’मधलं हे आईचं वर्णन आहे.

माय उभी चुलीपासी राख उडते वाऱ्यानं
पान्यातल्या मासोळीशी केला संसार पाऱ्यानं
माय उभी दारापासी कुरकुरते चौकट
दार भरल्या घराचे भुंगा कोरीतो हल्कट (‘हलकट’ शब्द आलाय का मराठी कवितेत? फारसा नाही आलेला.)

माय उभी विहिरीशी डोईवरती घाघर
भुईतल्या रांजनाला कुनी फोडीले पाझर
माय उभी बांधावर भाउबंदकीचा लोंढा
थोपवून धरताना होई काळजाचा धोंडा

माय उभी नदीवर प्रवाहाला थोपवित
उलनारा ऊर उभा पदरात लपवित
माय उभी पाताळात उंच आभाळाएवढी
दुष्काळात वाहनारी नदी सुकाळाएवढी

माय उभी राउळात तुकारामाची जिजाऊ
पुसतसे पाषाणाला तुला गिळू किंवा खाऊ
माय उभी रखुमाई पंढरीच्या वाटेवर
विठू घरचा बोलावी पांढरीच्या वाटेवर

माय उभी माहेरात उभी तिथेच माहेर
मायीपासून सासर उभे दाराच्या बाहेर
माय उभ्या उभी आली तशी उभ्या उभी गेली
खाली बसाया सवड आम्ही तिला कव्हा दिली

हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या – द्वारकाबाई गवस! अशी दुसरी कविता मराठीत नाही.

शेतकऱ्याचा बाप हा मराठी साहित्यामध्ये ‘व्हिलन’ म्हणून दाखवायची पद्धत होती. अनंत यादवांचं ‘झोंबी’ नावाचं आत्मचरित्र आहे, पु. ल. देशपांड्यांनी त्याच्यावर लिहिलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की, या आंद्याच्या नशिबाला असा खलनायक बाप यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून हा इतका चांगला लेखक व्हावा याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. चांगला लेखक म्हणजे काय? शेतकरी बापाविषयी द्वेष बाळगणारा, आणि आईबद्दल कणव असणारा. पण ती कणवसुद्धा बापाच्या अत्याचाराला बळी पडणारी बाई म्हणून; जन्मभर शेतात राबून जिला काही मिळालं नाही, अशी बाई म्हणून नाही. असा हा ‘व्हिलन’ बाप इंद्रजितच्या कवितेत कसा आला आहे?

पुढे एकदा माझं आणि गवसचं काहीतरी भांडण झालं. आता गवससुद्धा महत्त्वाचा लेखक आहे, त्यामुळे भांडण तर मिटवायला पाहिजे. पण तो कोल्हापूरचा आणि मीसुद्धा कोल्हापूरचा. त्यामुळे आम्हाला भांडण्यामध्येच जास्त इंटरेस्ट! पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ‘शोले’ सिनेमा चालू राहतो! मग मी एक युक्ती केली. गवसला पत्र लिहिलं- ‘बाबा, तुझं-माझं काहीही असेल पण ही कविता तेवढी तुझ्या आईला वाचून दाखव. एवढं माझं काम कर’ आणि आमचं भांडण मिटलं.

शेतकऱ्याचा बाप हा मराठी साहित्यामध्ये ‘व्हिलन’ म्हणून दाखवायची पद्धत होती. अनंत यादवांचं ‘झोंबी’ नावाचं आत्मचरित्र आहे, पु. ल. देशपांड्यांनी त्याच्यावर लिहिलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की, या आंद्याच्या नशिबाला असा खलनायक बाप यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून हा इतका चांगला लेखक व्हावा याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. चांगला लेखक म्हणजे काय? शेतकरी बापाविषयी द्वेष बाळगणारा, आणि आईबद्दल कणव असणारा. पण ती कणवसुद्धा बापाच्या अत्याचाराला बळी पडणारी बाई म्हणून; जन्मभर शेतात राबून जिला काही मिळालं नाही, अशी बाई म्हणून नाही. असा हा ‘व्हिलन’ बाप इंद्रजितच्या कवितेत कसा आला आहे?

बाप शेत कसायाचा सारे नियम पाळून
जाता येता पाहायचे वाटसरू न्याहाळून
धुरे बंधारे बंदिस्ती नीटनेटकी राह्याची
उगा कुठं पडलेली नाही काटकी राह्याची

आधी कपाळाला माती मग पाऊल रानात
रोज शेतात निवद नेई केळीच्या पानात
उभ्या पिकात दिशेला कव्हा बसायचा नाही
कस कमी झाल्यावर रान कसायचा नाही

दोरी न लावता सारं दोरीमधी असायचं
उगवणारं धानही वरी खाली नसायचं (हे जरा मला अद्भुत वाटतं. कारण इरवड असतातच प्रत्येक शेतात. पण तेवढं इंद्रजितला माफ आहे.)
बैल वाकडातिकडा चालला की ईकायचा
गडी वाकडातिकडा वागला की हाकायचा

नांगराच्या नीट धारा तिफनीची नीट तासं
रान पितांबरावानी जरीकाठी आडतास (विठ्ठलाशी याचा सांधा आहे. ‘कासे पितांबर, कस्तुरी लल्लाटी’)
कुपाटीच्या काट्यातरी किती चोपूनचापून
जनू वाकडेतिकडे बाल घेतले कापून

गोठा आखाडा नव्हंच जनू ऋषीचा आश्रम
महादेवाच्या नंदीचे बैलं गाईची वासरं
नाही दिसणार कव्हा तिथं गोचीड गोमाशी
नाही ओढनार दावं गाय उपाशी आधाशी

शहरी आणि ग्रामीण यांच्या सीमारेषेवरचं हे वाक्य आहे. हे सगळं वर्णन वाचण्यासारखं आहे. या कवितेत शेवटी इंद्रजित म्हणतो की, इतक्या प्रामाणिकपणे ज्याने शेती केली त्या माझ्या बापाच्या वाट्याला अशी दुर्दशा आणि निराशा का येते? शेतकऱ्याच्या आईच्या वतीने, त्याच्या बापाच्या वतीने, त्याच्या भावा-बहिणीच्या वतीने हे प्रश्न इंद्रजितशिवाय दुसर्‍या कुणी विचारलेले नाहीत. हे वाचलं आणि मग मला इंद्रजितच्या कवितेतले शेतकरी कोण आहेत, ते कळायला लागलं. या कविता समजायला लागल्यावर ते कळायला लागलं आणि शेतकरी संघटनेमध्ये येऊन शेतकऱ्यांना ओळखल्यावर मला या कविता समजायला लागल्या. असा माझा दुहेरी प्रवास पाच वर्षं चालू होता.

शेतकरी संघटनेमध्ये तीन-चार स्तर होते. शरद जोशी एका पातळीवर, त्यांच्या वैचारिक पातळीच्या जवळपास असणारी दोन-चार माणसं, त्यानंतरच्या पातळीवरची महाराष्ट्रात जवळजवळ हजारभर माणसं होती आणि ती २०० तालुक्यांत विखुरलेली होती. प्रत्येक तालुक्यात पाच-सहा माणसं अशी होती, ज्यांना शरद जोशी जे सांगतात ते कळायचं, समजायचं, पटायचं आणि काही जणांना ते व्यक्तही करता यायचं. संघटनेचा बिल्ला आम्ही सगळेच लावत होतो, पण चौथी पातळी फक्त बिल्ला लावणाऱ्यांची. आणि या सगळ्यांशिवाय खूप माणसं असायची. संघटनेत असताना आम्ही फार मोठी गर्दी पाहिलेली आहे. त्यावेळी लाख माणसं जमली म्हणजे काहीच जमली नाहीत, असं आम्हाला वाटायचं.

माझा पहिल्यापासून एक नियम असा होता की, व्यासपीठावर बसायचं नाही. नाहीतर आमचे काही कार्यकर्ते असे होते की, एक जोशीसाहेबाच्या डाव्या पायाशी बसायचा आणि एक जोशीसाहेबाच्या उजव्या पायाशी. म्हणजे फोटोमध्ये हे कायम! आपण तसं कधी केलं नाही. या चौथ्या किंवा पाचव्या पातळीवर असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शरद जोशींच्या भाषणांमधलं विज्ञान, त्याच्यातलं अर्थशास्त्र, त्याच्यातला सिद्धान्त कसा पोहोचत आहे, हे पाहण्यात मला जास्त रस असायचा. ते सगळं त्यांना समजत होतंच असं नाही, पण त्यांना एक कळत होतं की, हा बामण असला तरी आपल्या भल्याचं बोलतो आहे. आणि आपल्याला शेतीच करायची आहे, दुसरं काही करायचं नाही. त्यामुळे हा माणूस आपला आहे; मग त्याची जात काहीही असो, तो शहरी असो-नसो, त्याचं याच्या आधीचं आयुष्य कसंही असो. ही माणसं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझा इंद्रजितकडे आणि त्याच्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ही खरीखुरी माणसंच त्याच्या कवितेत ‘साक्षात’ दिसत होती.

पायवाट पांढरी तयातून अडवी-तिडवी पडे
हिरव्या कुरणामधुन चालली काळ्या डोहाकडे

हे वास्तव नाही.

काट्याकुट्यातनं जातोय रस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता

हे वास्तव आहे. आणि मराठवाड्यातलं वास्तव काय सांगावं? माझा एक मित्र मुखेड तालुक्यातला. तो मला म्हणाला, ‘माझ्या गावाकडे येशील का?’ मी म्हटलं, ‘नक्की येईन. कुठे आहे तुझं गाव?’ त्याचं गाव मुखेड तालुक्यात पार आतमध्ये कुठेतरी होतं. मी त्याला विचारलं की, कसं यायचं? तो म्हणाला, ‘मुखेडपर्यंत बस येते. तिथं तू उतर. तुला घ्यायला घोडं पाठवू की, उंट पाठवू?’ मला कळेचना. आपण अरबस्तानात आहोत की, सहारा वाळवंटात? मराठवाड्याशी तो माझा पहिलाच परिचय होता. मी त्याला म्हटलं, ‘उंटाच्या लिफ्टपेक्षा मी पायी चालत येतो.’ (‘उंटावरचा शहाणा’ मी स्वतः होतोच!) असे बारीक-सारीक तपशील म्हणजे वास्तव असतं. ते कथेत भेटत नाहीत, सिनेमात भेटत नाही; नाटकामध्ये तर नाहीच. ग्रामीण भागातले अत्याचार, खुनाखुनी किंवा ग्रामीण भागातलं पुढारीपण एवढंच तिथं दिसतं. दुर्दैवानं आमच्या रा. रं. बोराड्यांसारखे ज्येष्ठ आणि ताकदवान लेखकसुद्धा ‘मरणदारी’सारख्या कादंबरीत त्याच सापळ्यात सापडले.

शेतकरी जीवन सुंदरही आहे, भीषणही आहे, आश्चर्यचकित करणारंही आहे आणि गुंतवणारंही आहे. आणि गुंतवणारं म्हणजे अडकवणारंसुद्धा आहे. शेतीमध्ये उत्पादक श्रमसुद्धा आहेत आणि ती गुलामगिरीही आहे. मानवी संस्कृतीचा इतका प्रवास झाला, पण अजूनही पाण्यावर नाक राहील, इतपतच शेतकऱ्याला ठेवायचं हा सगळ्या संस्कृतींचा आणि सगळ्या राजकीय विचारप्रणालींचा नियम आहे.

चीनची क्रांती म्हणे शेतकऱ्यांची क्रांती होती. खरं आहे; पण कुठल्या अर्थानं? क्रांतीत किती शेतकरी मेले ते सोडूनच द्या. माओच्या राजवटीत चीनमध्ये आठ कोटी शेतकरी मेले. आणि माओने आपल्या अधिकाऱ्यांना असा जाब विचारला की, मी जे धोरण आखलं होतं त्याच्यानुसार २० कोटी मरायला हवे होते. आठच कोटी शेतकरी मेले, याचा अर्थ तुम्ही सरकारी धोरणं नीट राबवलेली नाहीत. असं म्हणून माओनं त्या अधिकाऱ्यांनाही मारलं. शेतीला पोकळ उत्तेजन देणं, शेतीचं अद्भुतीकरण करणं, शेतीबद्दल प्रचंड गळे काढणं किंवा शेतकरी एकमेकांचे गळे कसे कापतात एवढ्याचंच वर्णन करणं या सगळ्यापलीकडे जाऊन शेतकरी जीवनाचं वास्तव चित्रण मला या कवितेत वाचायला मिळालं.

इंद्रजित कविता लिहीत होता, त्या वेळी आम्ही चळवळीत होतो. किंबहुना चळवळीचं काम म्हणूनच मी पहिल्यांदा परभणीत आलो होतो. तेव्हा आम्ही काही वेळा इंद्रजितवर रागावलेलो असायचो. आम्हाला वाटायचं, इंद्रजितनेही चळवळीत यावं. त्यानेही आमच्यासारखं जेलमध्ये यावं. असं वाटलं नाही ते फक्त शरद जोशींना. आणि त्यांना हे कळलं, हे इंद्रजितला कळलं म्हणून तो जोशींचा उल्लेख कायम ‘तीर्थरूप शरद जोशी’ असा करायचा. कवींनी, लेखकांनी चळवळीत यावं की नाही? चळवळीत आल्यामुळे त्यांचं काव्य, त्यांचं लेखन याच्यामध्ये चांगले बदल होतील की, वाईट बदल होतील? चळवळीसाठी लिहिणं म्हणजे केवळ प्रचारकी लिहिणं का? (मीही सगळ्या चळवळींवरती लिहिलं आहे. पण प्रचारकी अजिबात लिहिलेलं नाही.) प्रचाराचं काम कवींनी करावं का? शेतकरी संघटनेत तर कवितेच्या बाबतीत सगळा आनंदीआनंदच होता!

एकदा संघटनेच्या कार्यकारणीमध्ये चर्चा चालली होती की, आलतूफालतू संस्था-संघटनासुद्धा आपल्या गाण्यांच्या कॅसेट काढतात किंवा त्यांची कलापथकं असतात. आपली तर एवढी मोठी संघटना आणि आपली काय आई मेली? आपल्या संघटनेमध्ये एकही कवी असू नये? (यामुळेही आम्हाला वाटायचं की, इंद्रजितने आमच्याकडे यावं.) त्यावर शरद जोशी त्यांच्या खास ‘जोशी टच’ने असं म्हणाले, “हे पहा, आपल्याकडे गाणी नाहीत, कविता नाहीत म्हणून आपलं काही बिघडलेलं नाही” आणि गाणी किंवा कविता का नाहीत? तर म्हणे, “गाणी-कविता लिहायला प्रचंड निराशा लागते. बारक्या-बारक्या चळवळींच्या मागे पाच-दहा माणसं आहेत. त्यांना घोर निराशा असते. आपल्यामागे लाखो माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला निराशा येत नाही आणि आपण कविता लिहीत नाही. पण या विषयातली अधिकारी व्यक्ती विनय आहे, आपण त्याला विचारू या.” मी म्हटलं, “नेत्याची पर्सनॅलिटी चळवळीला येते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कुठे काव्याचा स्पर्श आहे?” शरद जोशींसाठी काव्य म्हणजे थेट कालिदास, भवभूती, व्यास, वाल्मिकी आणि भर्तृहरी. त्यांचं ते ज्ञान पक्कं होतं. पण त्याला शेतकरी संघटनेमध्ये वाव नव्हता. एकीकडे ‘शेतकऱ्याचा आसूड’ घेऊन उभं राहायचं आणि दुसरीकडे कालिदास – भवभूती सांगायचे, हे त्यांनी केलं नाही ते बरं केलं. नाहीतर शेतकरी संघटनेचे तेव्हाच दोन तुकडे झाले असते!

“तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमच्या आवडी-निवडी जशा आहेत; तशीच आपली संघटना आहे. टिळकांनी देश पेटवला, त्या काळात टिळकांच्या नावावर एक तरी कविता झाली का? आणि नंतरही एवढी मोठी कामगिरी करून सगळ्यात कमी काव्य ज्याच्यावर लिहिलं गेलं असा माणूस कुणी असेल तर तो टिळक आहेत. तुमचा पिंड टिळकांसारखा आहे.” (आंबेडकरांनीही एवढं मोठं काम केलं, पण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर कविता झाल्या नाहीत. आणि आता मात्र असा काय धुमाकूळ चालतो की, तो पाहून केव्हातरी बाबासाहेब ‘परित्राणाय साधूनां…’ पुन्हा एकदा अवतार घेतील आणि आधी या कविता बंद करतील असं वाटायला लागतं!) संघटनेत काव्याची परिस्थिती अशी होती. कवी, अविष्कारस्वातंत्र्य या तर आमच्याकडे शिव्याच होत्या.

इंद्रजितबाबत माझी एकच तक्रार आहे. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक’ हे गाणं त्याने कुणब्याच्या पोरांची पहिली पिढी म्हातारी झाल्यावर लिहिलं. ते त्याने दहा-पंधरा वर्षं आधी लिहिलं असतं तर आमच्या चळवळीला त्याचा उपयोग झाला असता. परभणीला आम्ही जो रौप्यमहोत्सवी मेळावा घेतला, त्याचं मुख्य गाणं ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक’ हेच होतं. आणि त्यावर शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनीच हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं की, ‘आमच्या विदर्भात ‘कुणबी’ नावाची जात आहे. त्यामुळे ‘कुणब्याच्या पोरा’ हे बदलून ‘शेतकऱ्याच्या पोरा’ असं करावं.

नाहीतरी इंद्रजित त्याच्या सगळ्या आसमंताकडे परत चाललेला आहे. शेवटच्या संग्रहातल्या त्याच्या कवितांची नावं गवत, शेत अशीच आहेत. तर ‘शेतकऱ्याचं रामायण’, ‘शेतकऱ्याचं महाभारत’ म्हणावं असं भव्य काम त्याच्याकडून व्हावं. शेतकरी संघटनेसारखी एवढी मोठी चळवळ त्याने पाहिलेली आहे, तिच्यामध्ये तो वावरलेला आहे. ते सगळे अनुभव एकत्र करायचे झाले तर या एक-दोन पानांच्या कविता त्याला पुरणार नाहीत. अशा किमान शंभर-दीडशे कविता त्याच्याकडून लिहून व्हाव्यात. आणि हे प्रचार म्हणून नाही, आम्हालाही हे सगळं समजून घ्यायचं आहे.

इंद्रजित तेव्हा अतिशय भडकला आणि संतापानं लाल झाला. पण अशा वेळी काय करायचं त्याला माहीत होतं. मगाशी म्हटलं तसा बेरकी आहेच तो! त्याने सांगितलं, ‘मी या विषयावर एक अक्षर बोलणार नाही. जे काही करायचं ते विनय हर्डीकरांना करू द्या.’ विनय हर्डीकरांकडे सोपवल्यानंतर पुन्हा तो विषय कुणीही काढणार नाही, हे त्याला माहीत होतं. त्यामुळे नंतर तो विषयच निघाला नाही. पण मला अजूनही असं वाटतं की, शेतकरी संघटनेसाठी इंद्रजितने काही गाणी लिहायला हवी होती. शेतकरी संघटना जे मांडू पाहत होती, ते त्याच्या कवितेत होतंच आणि ‘टाहो’मध्ये, ‘आम्ही काबाडाचे धनी’मध्ये ते अतिशय प्रभावी स्वरूपात आलेलं आहे.

आमची पहिल्यांदा भेट झाली ती ८५-८७च्या दरम्यान. त्या वेळी त्याने आमच्यासाठी काही गाणी लिहिली असती तर इंद्रजितचं आमच्या मनातलं स्थान जिव्हाळ्याचं आहेच, पण ते आणखी प्रेमाचं झालं असतं. शेतकरी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इंद्रजित भालेराव ‘कवी’ या अर्थानं माहीत नाहीत. समूहांसाठी लिहिण्यामध्ये मोठा आनंद असतो. मी वयाच्या सतराव्या वर्षी ‘ज्ञानप्रबोधिनी’साठी गाणं लिहिलं. ते अजूनही ज्ञानप्रबोधिनीचं एक नंबरचं गाणं आहे. कारण त्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीचं तत्त्वज्ञान, ज्ञानप्रबोधिनीचा कार्यक्रम हे सगळं आलेलं आहे. १९६६मध्ये मी ते लिहिलं. यावर्षी दसऱ्याला त्याला ५० वर्षं पूर्ण होतील. एक ५० वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि दुसरं ४४ वर्षांपूर्वी लिहिलेलं अशी दोन गाणी अजूनही ज्ञानप्रबोधिनीची दोन प्रमुख गाणी आहेत. याच्यामध्ये एक वेगळंच समाधान असतं. आमच्यासाठी इंद्रजितने काही गाणी लिहायला हवी होती, एवढी त्याच्याविषयी माझी एकच तक्रार आहे.

आणखी एक गोष्ट मला त्याला सुचवायची आहे. नाहीतरी इंद्रजित त्याच्या सगळ्या आसमंताकडे परत चाललेला आहे. शेवटच्या संग्रहातल्या त्याच्या कवितांची नावं गवत, शेत अशीच आहेत. तर ‘शेतकऱ्याचं रामायण’, ‘शेतकऱ्याचं महाभारत’ म्हणावं असं भव्य काम त्याच्याकडून व्हावं. शेतकरी संघटनेसारखी एवढी मोठी चळवळ त्याने पाहिलेली आहे, तिच्यामध्ये तो वावरलेला आहे. ते सगळे अनुभव एकत्र करायचे झाले तर या एक-दोन पानांच्या कविता त्याला पुरणार नाहीत. अशा किमान शंभर-दीडशे कविता त्याच्याकडून लिहून व्हाव्यात. आणि हे प्रचार म्हणून नाही, आम्हालाही हे सगळं समजून घ्यायचं आहे. कार्यकर्ते म्हणून आमचं जे यशापयश आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी आम्हाला वाटतात. पण आमच्याबद्दल पूर्णपणे आत्मीयता असणारा एक प्रतिभावान कवी म्हणून पूर्णपणे मोकळेपणाने, वस्तुनिष्ठपणे (पण ‘पी एच.डी. थिसिससारखं नको. ते काव्यात लिहिताही येणार नाही) असं त्याच्या हातून काहीतरी लिहिलं जावं. सध्या तो तब्येतीनं नाजूक झाला आहे. पण त्याचा त्याने फार विचार करायची गरज नाही. गेल्या महिन्यात मी ६७ वर्षांचा झालो. आणि मी शंभर वर्षं जगण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे इंद्रजित निदान अजून ३३ वर्षं तरी तुला राहायचं आहे. नाहीतर माझ्यावर कविता कोण लिहील?

काल मी अनंतरावांना असं म्हटलं होतं की, इंद्रजितचं आयुष्य एखाद्या परीकथेसारखे चाललं होतं. पण परीकथेचा असा नियमच आहे की, परीकथेत सात उद्यानं लागतात, मग सात डोंगर लागतात, मग सात जंगलं लागतात, मग सात नद्या लागतात, त्यानंतर सात वाळवंट लागतात. पण हे डोंगर, ही जंगलं, ही वाळवंटंसुद्धा परीकथेचाच एक भाग असतात. परीकथेमध्येच हे वर-खाली, कमी-जास्त घडत असतं, हे त्यानं लक्षात ठेवावं. त्याचं औषध म्हणजे त्याची कविताच आहे. ते औषध तो स्वतःच स्वतःला देऊ शकतो. आम्ही तर त्याच्या बरोबर आहोतच.

शेवटी बोलायचं ठरवलंच आहे, तर म्हटलं कवीसाठी कविताच लिहावी! ती आता म्हणतो.

बोट बहिणाबाईचं जेंव्हा जाणून धरलं
कुल-शील कवितेचं तुझ्या तिथेच ठरलं
तुकारामाचं आकाश भूमी गाडगेबाबाची
जोतिरावाचा आसूड मुळं तुझ्या कवितेची

तशी ग्रामीण कविता होती आम्हालाही ठावी
एकसुरी नटवी ती नुस्ती पिवळी हिरवी
शेणामातीचा दर्वळ तुझ्या शब्दातून आला
बळीराजाचा चेहरा प्रथमच प्रकटला

बळीराजाच्या शेजारी, उभी घरची लक्षुमी
सोसण्याचा जिचा वसा, काही पडू दे ना कमी
माय बाप दादा वैनी दूर दिलेल्या बहिणी
कष्टकरी सालदार कोमेजल्या कुळंबिणी

रंग कोरडवाहूचे, तुझ्या कवितेत आले
सारे काबाडाचे धनी माझे सोयरेच झाले
तुझ्या शब्दांच्या शेतात वाटा माझाही असू दे
शेतकरी वास्तवाचे भान सजग राहू दे !

येत होता कवितेला तुझ्या नवीन बहर
देशभर केला आम्ही आंदोलनाचा कहर !
आंबेठाणच्या मळ्याचा हाती घेऊन अंगार
लुटारूंचं कारस्थान टांगलंच वेशीवर !

लाखो रस्त्यावर आले जाब विचारू लागले
किती तुरुंगात गेले काही जिवानिशी मेले !
घरोघरच्या लक्षुम्या रणरागिण्याच झाल्या
कारभार्‍यांच्याही पुढे दोन पावलं चालल्या

विसरलो घरदार आणि बारसं बारावं
तरी आमच्या हाताला का रे अपशय यावं?
ज्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी, दिल्या प्राणांच्या आहुत्या
तरी थांबत नाहीत शेतकरी आत्महत्या !

जिथे वाहिला एकदा स्वातंत्र्याचा झंझावात
तिथे हताश हुंदके कसं घडलं आक्रित?
म्हणे भोळा बळीराजा वागे कसा विपरीत
स्वत:हून धाव घेतो कसायाच्या जबड्यात

नाही विसरत जात आणि खानदानी वैर
ज्यांना मारावं जोड्याने चालू देतो त्यांचे थेर !
सांग कविराजा, सांग काय आमचं चुकलं
बळीराजाचं स्वातंत्र्य कसं हातून हुकलं?

बळीराजाचं गणित मला सुटता सुटेना
स्वत:शीच घेतलेली माझी होडही मिटेना !
तूच म्हणाला होतास, ‘लागे करावा उपाय’
चल तोच ध्यास धरू, आणि तुला सांगू काय?

(शब्दांकन : सुहास पाटील)

मातीची वेदना सांगणार्‍या कविता - श्रीकांत उमरीकर

इंद्रजीत भालेराव यांची कविता शेतकरी चळवळीचं तत्त्वज्ञान आपल्या शब्दांत व्यक्त करते हे फार मोठं काम मराठी साहित्यात त्यांनी केलं आहे. त्यामुळे विनय हर्डीकर यांच्यातला विचारवंत समिक्षक बाजूला सारून त्यांच्यातला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता या कवितेकडे ओढल्या जातो. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचक अटीतून फळे भाजीपाला यांना वगळण्याचा आध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. एक टन कांदा विकून टेंपोचे भाडे, हमाली, तोलाई, आडत वजा जाता शेतकर्‍याच्या हातात केवळ 1 रूपया कसा पडतो हे विषद करणारे एक मोंढ्यातील बील  सर्वत्र चर्चेचा विषय नुकताच झाले होते. इंद्रजीत भालेराव यांनी 25 वर्षांपूर्वी ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घ कवितेत या समस्येवरच एक फार अप्रतिम तुकडा लिहीला होता. कापुस विकायला आडतीवर गेल्यावर सगळा कापुस विकून परत अडत्यालाच पैसे द्यायची वेळ येते. पोराने बोंदरी बोंदरी वेचून गोळा केलेला कापूस या घरच्या कापसात ठेवलेला असतो. त्याचे पैसे येतील आणि आपण चांगलं शर्ट घेवूत असं त्या छोट्या पोराला वाटते. पण बापाच्या हातात सगळा कापूस विकून पैसे तर सोडाच उलट अंगावर काही पैसे फिरतात

कापसाचा भाव आज
उतरला एकाएकी
सारी काटून उचल
आडत्याची हाय बाकी

अशी शेतकर्‍याच्या मालाच्या शोषणाची वेदना समोर येते. आपल्या कापसाचे पैसे मागणार्‍याा छोट्या पोराची पाठ बाप चाबकानं फोडून काढतो. ते सगळे वळ आपल्याच पाठीवर पडत आहेत असं वाचकाला वाटत रहातं. शेतकरी चळवळीनं मांडलेली उणे सबसिडीची आकडेवारी जी की डंकेल प्रस्तावावर सह्या करताना भारतीय शासनाला लाजेकाजेखातर कबूल करावी लागली ती  इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेतून अतिशय कलात्मकतेने मांडली.
खुद्द इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेच्या बाबत जी भूमिका मांडून ठेवली आहे ती तर फारच स्वच्छ आणि प्रामाणिक आहे.  या भूमिकेमुळे ही कविता रसिकांना समजून घ्यायला सोपं जाईल. खरं तर इंद्रजीत भालेराव हे जे काही लिहीत आहेत ती केवळ त्यांचीच नव्हे तर जगभरच्या कवी, कलाकार, चित्रकार, संगीतकार, अभिनेते या सगळ्यांचीच आपल्या कलेबद्दलची भूमिका आहे. सर्व कलाकारांचे साहित्यीकांचे प्रतिनिधी म्हणून हे इंद्रजीत भालेराव लिहीत आहेत
माझ्या कवितेला यावा

शेणा मातिचा दर्वळ
तिने करावी जतन 
काट्या कुट्यात हिर्वळ

माझ्या कवितेने बोल 
काळजातला बोलावा
उन्हाळ्यात खापराला 
जसा असतो ओलावा

असो काळा सावळाच 
माझ्या कवितेचा रंग
गोर्‍या गोमट्या कपाळी 
बुक्का अबिराच्या संगं

माझ्या कवितेचा हात 
असो ओबड धोबड
नांगरल्या मातीवानी 
व्हावं काळीज उघड

काळीज उघडं करून दाखविणार्‍या या कवीच्या कवितेचा सन्मान एक समिक्षक कवितेतूनच करतो हे मोठं विलंक्षण आहे. मातीचे गुणगाण गाणार्‍या मातीची वेदना सांगणार्‍या या कवीची कविता त्याच्या पन्नाशीत एकत्रित स्वरूपात रसिकांच्या समोर यावी हे मराठी कवितेचे आणि त्या कवीचे भाग्यच म्हणावे.

श्रीकांत उमरीकर
सारे रान : दुसरी आवृत्ती आली - 
या निमित्ताने इंद्रजित भालेराव यांची प्रतिक्रिया

मला वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्तानं श्रीकांत उमरीकर या माझ्या कवीमित्रानं माझ्या समग्र कविता एकत्रित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. २०१६ साली 'सारे रान' या नावानं श्रीकांतनं समग्र कवितेचं हे पुस्तक अतिशय देखण्या रूपात प्रकाशित केलं. विनय हर्डीकर यांच्या हस्ते परभणीत त्याचा देखणा प्रकाशन समारंभही झाला. 'सारे रान' हा शब्द शेतकरी चळवळीनं लोकप्रिय केलेल्या साने गुरुजींच्या 'आता उठवू सारे रान' या कवितेतून आम्ही उचलला होता. माझ्या कवितेसाठी आणि समग्र कवितेसाठी तो शब्द सर्वार्थानं अन्वर्थक होता.

हे पुस्तक तयार करताना श्रीकांतसमोर मंगेश पाडगावकर यांनी बोरकरांच्या पन्नाशीच्या वेळेस संपादित केलेल्या समग्र कवितेचा आदर्श होता. आपल्या आदर्शाप्रमाणं त्यानं त्याचं काम तंतोतंत केलेलं होतं. ग्रंथाची निर्मिती उत्तम केलेली होती. रवी मुकुल या माझ्या आवडत्या चित्रकाराचं मुखपृष्ठ घेतलेलं होतं. त्यासाठी पुस्तकाचं प्रकाशन काही दिवस लांबलं, तरी आम्ही थांबलो. प्रा. डॉ. एकनाथ पगार यांचा विवेचक लेख प्रस्तावना म्हणून घेतलेला होता.

तीन-चार वर्षात या पुस्तकाची आवृत्ती संपली देखील. लोक त्याची सतत मागणी करत होते. पुढची आवृत्ती प्रकाशित करताना काही अडचणी असतील तर दुसऱ्या प्रकाशकांना देऊ का ? असं मी श्रीकांतला विचारलं. पण तो म्हणाला, नाही त्याची दुसरी आवृत्ती मलाच करायची आहे. मी म्हटलं हरकत नाही. मला काहीच घाई नव्हती. पण वाचकांनीच श्रीकांतचा सतत पिच्छा पुरवला असावा. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती श्रीकांतनं पहिल्या आवृत्तीपेक्षाही दिमाखदार रूपात प्रकाशित केलेली आहे. आता ती सर्वत्र विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तकाचं नाव – सारे रान
कवी – इंद्रजित भालेराव
पृष्ठसंख्या – ४४०
किंमत – ७०० रु.
पुस्तकासाठी संपर्क – जनशक्ती वाचक चळवळ, पिनाक, २४४- समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१
संपर्कासाठी चलभाष – ९४२२८७८५७५


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

मोशीत इंद्रायणी साहित्य संमेलन…

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading