ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने…
माझा मराठाचि बोलु कौतुकें ।
परि अमृतातेंही पैजां जिंके ॥
ऐसीं अक्षरें रसिकें ।
मेळवीन ॥६.१४॥
जिये कोंवळिकेचेनि पाडें ।
दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे। जयाचेनि॥६.१५॥
ऐका रसाळपणाचिया लोभा ।
कीं श्रवणींचि होती जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकामेकां॥६.१६॥
सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा ।
परि रसना म्हणे रसु हा आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा ।
हा तोचि होईल ॥६.१७॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी ।
देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी ।
रुपाची हे ॥६.१८॥
जेथ संपूर्ण पद उभारे ।
तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलुं भुजांहीं आविष्करे ।
आलिंगावया ॥६.१९॥
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।
जैसा एकला जग चेववी ।
सहस्रकरु ॥६.२०॥
तैसें शब्दाचें व्यापकपण ।
देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥६.२१॥
हें असो तया बोलांची ताटें भलीं ।
वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली ।
निष्कामासी ॥६.२२॥
ज्ञानदेवी.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।
एक तरी ओवी अनुभवावी॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव ।
आम्हां घरी धन शब्दाचीं च रत्नें ।
शब्दाचीं च शस्त्रें यत्न करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
धन-संपत्ती.
अर्थ :- आमच्या घरी शब्दरूपी रत्नांचीच संपत्ती आहे व शब्दरूपी शास्त्र आम्ही जतन करू.॥१॥
आम्हांला जगण्यास एक उपाय शब्दच आहे व तेच धन लोकांसही देऊ.॥२॥
तुकोबा म्हणतात, पाहा, हा शब्दच देव आहे व त्याची शब्दांच्याच गौरवाने आम्ही पूजा करू.॥३॥
विवरण:
तुकोबा लौकिकातील सर्व धनसंपत्तीकडे पाठ फिरवून खऱ्या व शाश्वतच्या सुखाकडे वळले होते.त्यांच्या मुखातून जो ध्वनी शब्दरूपास आला त्याचे मोल करावे तेवढे थोडेच होणार होते. त्यांची शब्दांनी साकार झालेली ‘अभंग’वाणी खरोखरच अ-भंग आहे. लौकिक सृष्टीतील धनसंपत्ती जरी विलयास गेली; तरी तुकोबांची अभंगसंपदा कायमची टिकणारी आहे. शब्दरत्ने हेच आमचे धन, शब्द हेच आमचे जीवन, असे तुकोबा म्हणतात ते अगदी सत्य आहे. कारण तुकोबांच्या मुखातून जे जे ध्वनी उमटत ते ते परब्रह्माच्या स्फूर्तीच्या रूपाने असत. नादाला, ध्वनीला म्हणजेच शब्दाला ब्रह्मस्वरूप मानले आहे. या शब्दांनीच देवाची पूजा करायला तुकोबा निघाले आहेत आणि याच शब्दांच्या माध्यमातून ते लोकांना उपदेश करण्यास प्रवृत्त झाले आहेत. शब्दांचे खंडन करतानाही याचा गौरव ज्ञानदेवांनी अनुभवामृतात केलेला आहे. त्यांच्या मताने हा शब्द स्मरणदानीं प्रसिद्ध आहे. या शब्दामुळेच अमूर्त वस्तू डोळ्यांसमोर मूर्तिमान झालेली आहे. वस्तुब्रह्माची अनुभूती आणून देणारे तुकोबांचे शब्द खरोखरीच एक अलौकिक स्वरूपाची संपत्ती आहे.
(सौजन्य -तुकाराम.डॉटकॉम)