हरभरा पिक सल्ला – बी.बी.एफ. पद्धतीने लागवड
रब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
🌱हरभरा लागवड पद्धती
👉चार ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी (३० सें.मी. अंतरावर) घ्यावयाच्या असल्यास, सरी घेण्यासाठीच्या खुणा म्हणजेच फाळातील अंतर १५० सें.मी. ठेवावे. ट्रॅक्टरचलीत बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यामुळे १२० सें.मी. अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी ३० सें.मी. अंतरावर बसतात. दोन्ही बाजूच्या सर्या ३० सें.मी. रुंदीच्या पडतात.
👉तीन ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेताना, ९० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा लागतो. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार दोन्ही बाजूच्या सर्या ३० सें.मी. रुंदीच्या मिळू शकतात. त्यासाठी दोन फाळातील अंतर १२० सें.मी. ठेवून, बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर ठेऊन चालवावे लागते. सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सर्या या गरजेनुसार ३० सें.मी. किंवा कमी-जास्त रुंदीच्या मिळू शकतात.
👉तीन ओळी, ४५ सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ४५ सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घ्यावयाच्या असल्यास, १३५ सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा. त्यासाठी दोन फाळातील अंतर १८० सें.मी. ठेवून बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. दोन्ही बाजूच्या सर्या या ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात. त्यांची रुंदी कमी-जास्त करता येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.