श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या शुगरबीट काढणीचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. दत्तच्या संचालिका संगीता संजय पाटील- कोथळीकर यांच्या शेतामधील शुगरबीटची काढणी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.
दत्त कारखान्याने ग्रामीण भागाच्या विकासाची चळवळ तयार केली, याचा अभिमान आहे. आजवर दत्त कारखान्याने अनेक क्रांतिकारी पावले उचलली आणि सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. दत्त कारखान्याने येणाऱ्या भविष्याचा विचार करून जगाच्या स्पर्धेत उतरावे लागेल. शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावे यासाठी कारखान्याकडून मदत केली जाते. या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मोलाचे कार्य कारखाना सातत्याने करत आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवणारी चालवलेली कारखान्याची गौरवशाली परंपरा पुढेही चालूच राहील, असे गणपतराव पाटील यांनी सांगितले.
शिरोळ तालुका आणि परिसराला प्रत्येक वर्षी महापुराचा फटका बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे नुकसान होत आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. हे नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने आणि यावर पर्यायी पीक शोधण्यासाठी दत्त कारखान्याने गेल्यावर्षी राज्यातील नामवंत शेतीतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात उसाला पर्यायी पीक म्हणून शुगर बीटचा पर्याय समोर आला होता. त्यानुसार दत्तच्या ५० शेतकरी सभासदांच्या ५२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर शुगरबीटची लावण करण्यात आली होती.
या हंगामामध्ये बीट पासून साखरेचे उत्पादन, इथेनॉलचे उत्पादन तसेच इतर उपपदार्थांची निर्मिती कशा पद्धतीने करता येईल याचा सर्वांगाने विचार करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते, सेंद्रिय कर्ब आणि शेती व्यवस्थापन केल्यास एकरी साठ टनाच्या पुढे उत्पादन येऊ शकते. हा प्रयोग यशस्वी होणार याची खात्री असून आगामी काळात शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पाच महिन्यांमध्ये शुगरबीटचे उत्पादन घेतल्यानंतर उरलेल्या हंगामात भाजीपाला व इतर पिकेही घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. या प्रयोगाला शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माझ्यासोबत व्ही. एस. आय. चे कनिष्ठ शास्त्रज्ञ सचिन कदम, दत्तच्या संचालिका यशोदा कोळी, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, दिलीप पाटील कोथळीकर, ए. एस. पाटील, पत्रकार दयानंद लिपारे, राजकुमार चौगुले, संजय पाटील कोथळीकर, संभाजीपूरच्या माजी सरपंच सविता दिलीप पाटील कोथळीकर, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, वर्क्स मॅनेजर संजय संकपाळ, चीफ केमिस्ट विश्वजित शिंदे, डिस्टलरी इंचार्ज यादव, सौरभ पाटील, रोहित पाटील, शकुंतला पाटील, शेती विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
सध्या कारखान्याने उसाला शुगरबीटचा पर्याय होऊ शकतो का यावर अभ्यास सुरु केला आहे. याचा प्रयोग कारखान्यातर्फे घेण्यात येत आहे. शुगरबीटचे एकरी ६० टन उत्पादन घेतल्यास हा प्रयोग यशस्वी झाला असे म्हणता येईल. पण यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिकाच्या जाती, लागवडीची पद्धत आदी विविध घटकावर अभ्यास केला जात आहे.
गणपतराव पाटील
अध्यक्ष
दत्त सहकारी साखर कारखाना. शिरोळ, जि. कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.