हरभरा या पिकाबद्दल पूर्वीपेक्षा आता निश्चितच बरेच शेतकरी जागरूक झाले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तसेच हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी शिफारशीत जातीची निवड करणे, योग्य कालावधी मध्ये पेरणी, रासायनिक आणि फावरणीतून विद्राव्य ग्रेड खतांचा संतुलित वापर,पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन आपण भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो.
श्री. पुरुषोत्तम परळकर, बीड
(कृषि पदवीधर; प्रबंधक, कृषिसमर्पण-मराठवाडा विभाग )
डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(पीएचडी कृषी, संस्थापक-मुख्य प्रबंधक, कृषिसमर्पण समूह महाराष्ट्र राज्य)
महाराष्ट्रात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या कडधान्य पिकांपैकी हरभरा हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा पिकाची लागवड सर्वप्रथम दक्षिण पूर्व तुर्की मध्ये झाली.आज जगात भारत, पाकिस्तान आणि तुर्की मध्ये सर्वात जास्त प्रमाणात हरभरा लागवड केली जाते. कडधान्य पिके बहुतांशी खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. मात्र हरभरा हे पीक रब्बी मध्ये घेतले जाते. हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च तसेच हरभरा हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढते. हरभऱ्याच्या उपयोग दैनंदिन जीवनात डाळीचे पीठ, बेसन, फुटाणे आणि पुलाव मध्ये होतो.
हरभरा या पिकाच्या दोन जाती आहेत. देशी हरभरा (मायक्रोस्पर्मा) आणि काबुली हरभरा ( मॅक्रोस्पर्मा ).
🌿 हरभरा लागवड तंत्र 🌿
हरभरा पीक उत्पादन वाढीच्या महत्वाच्या मुख्य बाबी* :-
- जास्त उत्पादन देणाऱ्या, शिफारशीत,रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर
- योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत
- वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य शिफारशीत अंतर
- बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा शिफारशीत योग्य वापर
- तण व्यवस्थापन
- पाण्याचे योग्य नियोजन
- रोग आणि किडी पासून पिकाचे संरक्षण
* जमिन व हवामान* :-
हरभरा या पिकास मध्यम ते भारी साधारणतः सामू ५.५ ते ८.५ असावा.पाण्याचा चांगला निचरा होणारी,कसदार भुसभुशीत जमीन आवश्यक असते.अशा जमिनीत कोरडवाहू हरभऱ्याचे पीक चांगले येते.उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो परंतु त्यासाठी पाणी देण्याची सोय असावी लागते.हलकी किंवा चोपण,पाणथळ,क्षारयुक्त जमीन हरभरा पिकासाठी निवडू नये.हरभरा या पिकास थंड व कोरडे हवामान तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो.असे वातावरण हरभरा पिकास चांगले मानवते.
*जाती* :-
सुधारित वाण :
देशी हरभरा : हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्या ते पिवळसर असतो. दाण्याच्या आकार मध्यम असतो.
भारती (आय.सी.सी.व्ही. १०) : हा वाण जिरायती, तसेच बागायती परस्थितीत चांगला येतो. हा वाण मररोग प्रतिबंधक असून, ११० ते ११५ दिवसात कापणीस तयार होतो. जिरायतीत हेक्टरी १४ ते १५ क्विंटल तर ओलितामध्ये ३० ते ३२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
विजय (फुले जी-८१-१-१) : जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे. मररोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्टरी १५ ते २० क्विंटल व ओलिताखाली ३५ ते ४० क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास १६ ते १८ क्विंटल प्रतिहेक्टर अशी उत्पादनक्षमता आहे.
जाकी ९२१८ : हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
काबुली हरभरा :
हा हरभरा छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
श्वेता (आय.सी.सी.व्ही.-२) : मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये ८५ ते ९० दिवसात तर ओलिताखाली १०० ते १०५ दिवसांत पक्व होतो. जिरायतीमध्ये ८ ते १०, तर ओलिताखाली २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
पीकेव्ही काबुली-२ : मर रोग प्रतिकारक्षम. पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरेपणावर परिणाम होतो. म्हणून या वाणाची लागवड योग्यवेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टर मिळते.
विराट : हा काबुली वाण टपोऱ्या दाण्याचा आहे. हा वाण मररोग प्रतिकारक्षम असून, ओलिताखाली ३० ते ३२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
पीकेव्ही काबुली- ४ : या वाणाच्या दाण्याचा आकार अतीटपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या वाणाचे सरासरी उत्पादन १५ क्विंटल एवढे मिळते.
गुलाबी हरभरा :
गुलक- १ : टपोऱ्या दाण्याचा वाण. मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक असून, दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात. फुटाणे तसेच डाळे तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी-८ पेक्षा जास्त आहे.
हिरवा हरभरा
- दाण्याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.
- पीकेव्ही हरिता : हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक. उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल प्रति हेक्टर आहे.
पूर्वमशागत :-
खरीपाचे पीक काढणी झाल्यानंतर चांगली खोल नांगरट करून घ्यावी, तसेच दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करून घ्यावे, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे. हरभऱ्याचे मुळ बऱ्यापैकी खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत मोकळी करणे गरजेचे आहे.
हरभरा पेरणीचा योग्य कालावधी :-
हरभरा हे पीक रब्बी हंगामाचे असल्याने त्यास कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. कोरडवाहू जमिनीमध्ये जिथे पाण्याची अजिबात सोय नाही अशा जमिनी मध्ये २५ सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्या आधी १० ऑक्टोबर पर्यंत करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी.आणि दोन रोपांतील अंतर हे १० सें. मी. ठेवावे. कोरडवाहू जमिनीसाठी विजय,दिग्विजय किंवा आकाश या जातीचा वापर करावा.कोरडवाहू जमिनीत हरभरा बियाणे खोलवर १० सें.मी. पेरणी करावी. आणि बागायती साठी जेथे पाण्याची सोय आहे तेथे १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ५ सें.मी.खोलीवर पेरणी केली तरी चालेल.पेरणी करण्यास उशीर झाल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते आणि रोगराई,किडीला पीक बळी पडण्याची शक्यता वाढते.घाटे भरणा होत नाही अशा समस्या निर्माण होतात.बागायती पेरणीसाठी काबुली वाण निवडावे. उदा ,विराट, श्वेता, कृपा, इ.
*बियाणे प्रमाण व बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन *
हरभरा दाण्याच्या आकारानुसार बियाण्यांचे प्रमाण वापरल्याने व्हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो तर विशाल, दिग्विजय, आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रति व्हेक्टर या प्रमाणात बियाणे वापरावे.तसेच कृपा आणि पी.के.व्ही-४ या जास्त टपोऱ्या काबुली वाणाकरिता १२५ ते १३० किलो प्रति व्हेक्टर बियाणे वापरावे.
हरभरा पिकाची चांगली,निरोगी जोमदार उगवण होण्यासाठी व रोप वाढीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने पेरणी आधी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे.किंवा मग २ ग्रॅम कार्बन्डझिम किंवा थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.यानंतर पुन्हा १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाणी त्यात १२५ ग्रॅम गुळ घेऊन,गुळ विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.नंतर एकतास सावलीत वाळवून लगेचच मग पेरणी करावी.अशी बीजप्रक्रिया व जिवाणू संवर्धनाचा वापर केल्याने हरभरा पिकाच्या मुळावरील गाठीचे प्रमाण वाढून जेणेकरून हवेतील नत्र जास्त प्रमाणात शोषून घेऊन हरभरा पिकास पुरवठा केला जातो.
पेरणी :-
देशी हरभऱ्याची पेरणी दुचाडी पाभरीने करावी. दोन ओळीत ३० व दोन रोपात १० से.मी. अंतरावर होईल असे ट्रक्टर वर चालणारे पेरानियत्राद्वारे करावी. जातीपरत्वे पेरणीसाठी ६५ ते १०० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. भारी जमिनीत हरभऱ्याची पेरणी सरी वरंब्यावर ९० से.मी. अंतरावर साऱ्या सोडून बियाणे सरीच्या दोन्ही बाजूस १० से.मी. अंतरावर टोकण पद्धतीने लागवड करावी. त्याचप्रमाणे हरभ-र्याची बी.बी.एफ. प्लान्टरने सुद्धा लागवड करता येते.
आंतरमशागत :-
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत हे सुरुवाती पासूनच तणविरहित ठेवावे.हरभरा पीक २० दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी,आणि दुसरी कोळपणी ही हरभरा पीक एक महिन्याचे झाल्यावर करावी.कोळपणी केल्याने जमिनीत हवा खेळती राहते.तसेच हरभरा पिकाची जोमदार वाढ होते.कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. पिक पेरणी नंतर परंतु उगवणी अगोदर तण नियंत्रणासाठी पेन्डी मेथिलीन हे तणनाशक १ ली. प्रति एकर वर २०० लिटर पाण्यातून जमिनीत पुरेसा ओलावा असतांना फवारावे.
खत व्यवस्थापन :-
हरभरा लागवडी नंतर १० ते १५ दिवसांनी,१९:१९:१९, २.५-३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य २.५ – ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.त्यानंतर हरभरा पिकास १ महिना झाल्यावर २० टक्के बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी,किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य २.५ – ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.हरभरा फुलोरा अवस्तेथ आल्यावर ००:५२:३४, ४ – ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.आणि घाटे पोसत असताना पुन्हा ००:५२:३४, ४ – ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी. याप्रमाणे हरभरा वाढीच्या स्थितीनुसार फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच भरघोस उत्पादनात वाढ होईल.
अन्नद्रव्य कमतरता :-
स्फुरद कमतरता : स्फुरदाच्या कमतरतेमुळे झाडांची व मुळांची वाढ खुंटते व उभट होते,फुलगळ होते व घाटे ही पोसली जात नाहीत,पाने ही मागील बाजूस वळतात,झाडाची पाने हिरवे व जांभळट होतात.
उपाय- ००:५२:३४, ४ – ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन :-
पाणी व्यवस्थापन हा जरी साधा मुद्दा असला तरी महत्वाचा आहे.बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणीच गडबड होते.बागायती हरभऱ्याची पेरणी जमिनीत ओल असताना केली असल्यास पहिले पाणी २५ ते ३० दिवसांनी गरज असल्यास द्यावे.पेरणी जर जमीन ओलवून केली असल्यास ३५ ते ४० दिवसांनी द्यावे.पीक चांगले फुलोऱ्यात असताना अजिबात पाणी देऊ नका.तेंव्हा पाणी दिल्यास फुलोऱ्याची गळ होऊन,अनावश्यक वाढ होऊन पीक माजते.असे झाल्याने हरभऱ्याला घाटे कमी लागतात.सरळ घाटे लागल्यानंतर जेंव्हा पूर्ण फुल बंद होईल त्यावेळेस गरज असल्यास दुसरे पाणी द्यावे.
हरभरा पिकास तुषार सिंचन (स्प्रिंकलर) पद्धतीनं पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ झालेली दिसते.सारा,पाट, वरंबा,यासारख्या पद्धतीनं पाणी दिल्यास,जमीन हि दाबून बसते.तसेच जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो,आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.तुषार सिंचनाचा (स्पिंक्लर) उपयोग केल्याने हरभरा पिकाला गरजे एवढे आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते.तसेच मूळकूज सारखे रोग टाळता येतात.यामुळं पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होऊन त्यांची अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता वाढते आणि उत्पादनात वाढ होते.
आंतरपिकांचे नियोजन* :-
हरभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी किंवा करडईची एक ओळ या प्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारी च्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे.उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सेंमी अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.त्याबरोबरच हरभऱ्याची बेवड उसाला उपयुक्त ठरते.उसामध्ये हरभरा आंतरपीक घेताना पिकास योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते,अन्यथा ऊसाला जास्त पाणी दिले असता हरभरा पीक उभळून जाते.याप्रमाणे हरभरा आंतरपिकांचे नियोजन करावे.
संजीवकाचा वापर
हरभरा पिकात फुलांतील पुंकेसर फुल उमलण्याच्या एक दिवस अगोदर मुक्त होतात,अशावेळेस स्त्रीकेसर हे पुंकेसर पासून दूर असतात.पुंकेसर असलेले देठ नंतर हळुवार पणे स्त्रीकेसर कडे वाढत जाऊन त्यावर पुंकेसर मुक्त करतो,नंतर परागीभवन होऊन फळधारणा होते.ही क्रिया हरभरा पिकात दिवसभर चालू असते.
फुलोरा व फळधारणा* :-
बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची कायिक वाढ जास्त होते.हरभरा दाटतो व घाट्याची संख्या घटते अशा वेळेस कायिक वाढ नियंत्रित करण्यासाठी क्लोरोकोट क्लोराईड ची (लिहोसिन) फवारणी करावी,फुल लागल्याबरोबर करावी त्यासोबत एखादे अळीनाशक घ्यावे जेणेकरून अळीचे नियंत्रण होईल.त्यानंतर दुसऱ्या फवारणी मध्ये एखादे स्टीमुलन्ट जसे भरारी,झेप,एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य(परिस स्पर्श,किसाईट- जी) यापैकी एकाचा वापर करावा.
पीक संरक्षण :-
घाटेअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन :-
हरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात अडचण म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव,घाटे अळी हरभरा पिकावर २ जीवनक्रम पूर्ण करते.घाटे अळीचा जीवनक्रम अंडी – अळी – कोष – पतंग या चार अवस्था असतात.विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव दिसतो.
घाटे अळीची ओळख :- घाटे अळी पोपटी रंगाची ४-५ सेंमी लांब आणि अंगावर तिच्या तुटक करड्या रेषा दिसतात.
हरभरा पिकात घाटे अळीमुळे होणारे नुकसान :- सर्वप्रथम लहान अळ्या ह्या पानावरील आवरण खरडून खातात,अशी पाने काही अंशी जाळीदार पांढरी पडलेली दिसतात.नंतर अळी ही कळ्या व फुले कुरतडून खातात.पूर्ण वाढ झालेली अळी ही तोंडाकडील भाग घाटयात घालून आतील दाणे खाते,साधारणतः एक अळी ३० – ४० घाटेचे नुकसान करते. हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ४० टक्के पर्यंत आढळतो.
प्रादुर्भाव वैशिष्ट्ये :-
काबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो.टपोरे देशी वाणावर घाटे अळीचा लहान दाण्यांच्या वाणापेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.हरभऱ्यामध्ये कळी,फुलोरा अवस्थेपेक्षा घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसान कारक ठरतो.दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
घाटेअळी एकात्मिक कीड नियंत्रण :-
- उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी,त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात व पक्षी ते वेचून खातात. चार-पाच दिवस सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धु-यावर फेकावा त्याकडे पक्षी, चिमण्या आकर्षित होऊन अळीभक्षण करतील. क्षी थांबे (अँटिना) एकरी 10 ते 20 लावावे किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्याचे दाणे टाकावे, त्यावर पक्षी बसून आळ्या नियंत्रणाचे काम होईल.
- शिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे,तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
- घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळामध्ये ल्युरचा वापर करावा.
- हरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.
- मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
- वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा,( निंबोळीअर्क ५%,) अळीचा प्रादुर्भाव दिसताच वापर करावा.किंवा अँझाडीरॅक्टटिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी.
- जैविक कीटकनाशक एचएनपीव्ही व्हेक्टरी ५००एल.ई म्हणजे ५००मिली विषाणू ५००लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ५०० मिली स्टिकर आणि अर्धा लिटर पाण्यात ५०ग्रॅम राणीपॉल टाकून फवारणी करावी.ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्तेथतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
- बिव्हेरिया बॅसियाना(१ टक्के विद्राव्य) ३ किलो प्रति व्हेक्टरी प्रति ५००लिटर पाणी.६० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण :-
कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून साध्या(नॅपसॅक)पंपाने फवारणी करावी. पॉवर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकाचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.
१) क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली
२)ईमामेकटिन बेंझोएट ५ टक्के ४.५ ग्रॅम
३)डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही,१० मिली.
४)लॅमबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १२.५ मिली
५) क्लोअँन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिली
६)सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही ८ मिली
७) फ्लूबेंडीअमाईड ४८ टक्के प्रवाही २.५ मिली
८)ट्रायझोफॉस ३५ टक्के+डेल्टामेथ्रीन १ टक्का हे मिश्र कीटकनाशक प्रवाही २५ मिली
९)क्लोरोपायरीफॉस २० टक्के २५ मिली. यापैकी कोणत्याही एक कीटकनाशक१० लिटर पाण्यामध्ये मिसळून (नॅपसॅक)पंपाने फवारणी करावी.पॉवर पंपाने कीटकनाशक प्रमाण तिप्पट करावे.
इतर किडी –
१)गोनोसेफँलम भुंगा :-भुंग्याचा रंग काळपट,भुरकट असतो.किडीची मादी जमिनीत अंडी घालते.अळी अवस्था जमिनीत राहते,प्रौढ वरच्या थरात फटीत राहतात.भुंगे सहजासहजी दिसत नाहीत.
नियंत्रण :- पेरणीच्या वेळी फोरेट (१० जी) १० किलो प्रति व्हेक्टरी जमिनीत मिसळावे.पीक उगवणीनंतर २०दिवसांनी क्लोरोपायरीफॉस २० ई .सी २०मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
२) लष्करी अळी (स्पोडोपटेरा) :- या अळीचा प्रौढ पतंग हा मध्यम आकाराचा असतो.अंडी फिकट रंगाची गोलाकार असतात.अंडी पानावर किंवा फांदीवर सरासरी १५० च्या समूहामध्ये दिली जातात.अळी पानावर आणि घाटयावर प्रादुर्भाव करते.
नियंत्रण :- अळीचा प्रादुर्भाव दिसताच क्लोरोपायरीफॉस २० टक्के २५मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
३) देठ कुरतडणारी अळी :- ही अळी तपकिरी रंगाची मऊसर चपटी ४० ते ४५ मिमी लांब असते.दिवसा या अळ्या ५ ते १० सेंमी खोल जमिनीत भेगांमध्ये ढेकळच्याखाली लपून राहतात.रात्रीच्या वेळी जमिनीलगत रोपांची देठे तसेच फांद्या व खोड कुरतडून खातात.याकिडीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या प्रदेशात आढळतो.
नियंत्रण :- या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २०टक्के २५ मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
४) घाटे अळी :- घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे. यामुळे हरभऱ्याचे आर्थिक नुकसान होते.ही कीड अळी अवस्थेपासून पिकाचे मोठे नुकसान करते.सुरुवातीच्या काळात अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात,यामुळे पानावर पांढरे डाग आढळून येतात.
नियंत्रण :- घाटे अळीच्या नियंत्रणसाठी इमामेकटींन बेंझोएट ५ टक्के ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा क्लोरअँन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
रोग नियंत्रण :-
१) मर रोग :- मर हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे या रोगाचा प्रसार होतो.ही बुरशी ६ वर्षापर्यंत जमिनीत वास्तव्य करते.कोवळी रोपे कोमेजतात,या रोपांचे प्रमुख लक्षण म्हणजे कोमेजलेल्या रोपांचा रंग टिकून राहतो.संपूर्ण झाड वाळून जाते.या रोगामुळे १५ ते २० टक्के पर्यंत नुकसान होते.
उपाय :- मर या रोगाच्या नियंत्रणासाठी मर रोग प्रतिकारक्षम वाण विजय,विशाल,दिग्विजय या देशी व विराट या काबुली वाणाची पेरणी करावी.पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) कोरडी मूळकूज :- हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे होतो. फुलोरा व घाटे भरतेवेळी,पाण्याच्या कमतरतेमुळे हा रोग होतो.यामुळे संपूर्ण झाड राखाडी रंगाचे होते आणि मुळाना तंतूमुळे कमी असतात किंवा नसतात.
उपाय :- या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिकारक वाणांची पेरणी करावी तसेच पिकाची फेरपालट करून त्यास पाण्याचा ताण देऊ नये.
३) ओली मूळकूज :- हा रोग फ्युजेरियम सोलेनी बुरशीमुळे होतो.या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत अधिक ओलावा असेल तर आढळतो.जास्त ओलाव्यामुळं खोड व मुळे कुजतात.
उपाय :- या रोगाच्या नियंत्रणासाठी भारी जमीन लागवडीसाठी टाळावी.जमिनीचा पाण्याचा निचरा उत्तम असावा,पिकाला जास्त पाणी देऊ नये,पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
४) मानकुजव्या :- मानकुजव्या रोगाचा प्रादूर्भाव रोपावस्थेत म्हणजे पीक साधारणतः ४० ते ४५ दिवसापर्यंत दिसून येतो.
उपाय :- खरिपातील पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करावी,तसेच खरिपातील सोयाबीन पिकानंतर हरभरा पीक घ्यायचे असल्यास सोयाबीन पिकाचे अवशेष काडीकचरा वेचून नायनाट करावा.
५) करपा रोग :- या रोगामुळे पानावर तसेच घाटयावर लहान गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात.
उपाय :- या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाविस्टिन ०.१% किंवा डायथेन एम-४५ (०.२५%) फवारणी करावी.
काढणी व उत्पादन :-
हरभरा पीक काढणीस सरासरी ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते.हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात.घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी,नंतर धान्यास ६-७ दिवस चांगले कडक ऊन द्यावे.हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा त्यामध्ये कडूलिंबाच पाला(५%)घालावा त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
सुधारित आणि शिफारशीत वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याचे सरासरी २५ ते ३२ क्विंटल प्रति हेक्टर येते.