February 29, 2024
A degree from a university of enlightened saints in spirituality is required
Home » अध्यात्मात आत्मज्ञानी संतांच्या विद्यापीठाचीच हवी पदवी
विश्वाचे आर्त

अध्यात्मात आत्मज्ञानी संतांच्या विद्यापीठाचीच हवी पदवी

तै मी तेणें आतां जाणेन । हें सरले तया दुःस्वप्न ।
जालां ज्ञातृज्ञेया विहीन । चिदाकाश ।। ९७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – तेंव्हा मी आपल्या स्वरुपाला जाणीन, हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय या भेदावाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला.

मी आत्मा आहे याची अनुभुती आल्यानंतर, ओळख पटल्यानंतर पुन्हा काय जाणणार ? स्वरुपाला जाणण्याचे स्वप्न पुन्हा पुन्हा कसे पडणार ? एखादी गोष्ट माहीत झाल्यानंतर पुन्हा त्यात जाणण्यासारखे, शोधण्यासारखे काय असते ? प्रयोग सिद्ध झाल्यानंतर, निष्कर्ष निघालानंतर तोच तोच प्रयोग करून पुन्हा नवा कोणता असा निष्कर्ष आपण काढणार आहोत ? एखादा सिद्धांत मांडल्यानंतर पुन्हा पुन्हा तो प्रयोग करून पाहण्यात काय अर्थ आहे ? एकदा माहीत झाले की आपण आत्मा आहोत. मग त्यानंतर जाणण्याचे काही शिल्लकच राहीले नाही. प्रयोगाचा निष्कर्ष आपण आत्मा आहोत हे मांडल्यानंतर पुन्हा त्याला जाणण्यात काय अर्थ आहे ?

प्रयोगात मांडण्यात आलेला निष्कर्ष व्यवहारात उपयोगात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच त्या प्रयोगातून खरे यश मिळाले असे म्हणता येईल. जगभरात वेगवेगळे शोध घेतले जातात. निष्कर्ष मांडले जातात. पण त्याचा दैनंदिन जीवनात, व्यवहारात उपयोग नसेल तर त्या निष्कर्षांचा उपयोग काय ? विद्यापीठात होणारे संशोधन जनतेच्या उपयोगासाठी व्यवहारात आणणायला हवे. शेतीतले प्रयोग केवळ विद्यापीठातच सिद्ध होत असतील तर त्याचा उपयोग काय ? कृषी विद्यापीठातील प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध व्हायला हवेत. शेतकऱ्यांच्या शेतात उपयोगी ठरायला हवेत. तरच त्या प्रयोगांचे खरे यश म्हणता येईल. शेती विकासाला यातून खरी चालना मिळेल.

अध्यात्मात केलेले संशोधनही व्यवहारात उपयोगी आणायला हवे. मी आत्मा आहे, ही अनुभुती आल्यानंतर त्याचच पडून राहाता कामा नये. प्रयोग पुढे सुरु राहायला हवा. त्या स्वप्नातून बाहेर यायला हवे. त्यातच गुंतून राहाण्यात काहीच प्रगती नाही. मी आत्मा आहे या सिद्धांताचा उपयोग व्यवहारात करायला हवा. व्यवहारातील प्रत्येक गोष्टीत त्याची अनुभुती घ्यायला हवी. जेव्हा असे होईल तेव्हाच आध्यात्मिक प्रगती साधली जाईल. हे जग त्या ज्ञानाने भरलेले आहे याची अनुभुती येईल. यातूनच खरे परिवर्तन आपणामध्ये घडेल.

हे सर्व व्यक्तिगत पातळीवर आहे याचे ज्ञान असायला हवे. काहीजण उगाचच आपली परीक्षा पाहण्यासाठी काही प्रयोग करत असतात. अशा परिक्षेत आपण पास झालो नाही तरी चालते, कारण ही परीक्षा आपल्यासाठी नसते. यात अपयश आले, तर त्याचा त्रास करून घेऊ नये. कारण तो प्रयोग आपल्यासाठी नव्हता, तर त्यांच्यासाठी होता. यातून त्यांनाही काहीच मिळत नसते. आपली परीक्षा ही आत्मज्ञानी सद्गुरु घेत असतात. त्यांच्या परिक्षेत पास होणे आपणासाठी महत्त्वाचे असते. आत्मज्ञानी सद्गुरुंच्या विद्यापीठाची परीक्षा आपण पास होणे महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे. अन्य कोणत्याही परीक्षेची आपणास गरज नाही. आत्मज्ञानी सद्गुरुंच्या विद्यापीठाच्या पदवीला महत्त्व आहे. विद्यापीठाची परीक्षा आहे तर विद्यापीठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचाच अभ्यास करावा लागेल. तरच विद्यापीठाची पदवी मिळेल. सद्गुरुंच्या विद्यापीठाची परीक्षा आहे तर त्यांच्या कृपाशिर्वादानेच आपणास पदवी प्राप्त होईल. बाकीच्यांनी कितीही परीक्षा घेतल्या तरी त्यांची पदवी ही अधिकृत असेलच असे नाही. अध्यात्मात आत्मज्ञानी सद्गुरुंच्या विद्यापीठाने घेतलेली परीक्षाच अधिकृत पदवी देऊ शकते. त्या पदवीचेच ज्ञान होणे महत्त्वाचे आहे.

Related posts

रानमाणूस प्रबोधनात्मक लघुपट (व्हिडिओ)

स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

एकरुपता साधल्यास निसर्ग ब्रह्मही बोलते

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More