पुणे : मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेला नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशन यांच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिवाळी अंक स्पर्धा 2025’ जाहीर करण्यात आली आहे. दिवाळी अंक निर्मितीत नावीन्य, दर्जा आणि साहित्यिक वैविध्य जपणाऱ्या संपादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मराठी प्रकाशनविश्वात दिवाळी अंकांची असलेली समृद्ध परंपरा अधिक नावीन्यपूर्ण आणि अर्थवाही बनवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी उत्साहात पार पडते. या उपक्रमामुळे प्रतिभावान संपादक, लेखक आणि बालसाहित्य निर्मात्यांना प्रोत्साहन मिळून साहित्यिक क्षेत्रात नवे प्रयोग घडण्यास हातभार लागतो.
स्पर्धेत ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक’ या प्रमुख पुरस्कारासाठी रोख रु. ५१,००० इतक्या रकमेचा सन्मान देण्यात येणार आहे. तसेच ‘पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंक’ या गटातील विजेत्यांना रोख रु.१५,००० इतका पुरस्कार दिला जाणार आहे.
याव्यतिरिक्त उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक, उत्कृष्ट एका विषयाला वाहिलेला दिवाळी अंक, उत्कृष्ट दिवाळी अंक (इतर) या तीन विशेष गटांमध्येही दिवाळी अंकांना गौरवले जाणार आहे. संपादकांनी आपापले दिवाळी अंक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टिळक रोड, पुणे–411030 येथील कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सतीश देसाई (मो. ९८२२०३८२७२) यांच्याशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
