या संग्रहातील कविता बालकांना विश्वातील माणसांना प्रेमाच्या धाग्याने गुंफण्याचा आशावाद देतात. शिवाशिवीचा खेळ खेळत मैत्री फुलवतात. सहभोजनातून एकत्र जेवणाची मज्जा देतात. तर आता गट्टी फू सुटू दे म्हणत बालपणीचा निखळ आनंद देतात. हा कविता संग्रह आकर्षक चित्रांनी अत्यंत सुरेख सजलेला आहे.
✍🏼 गुलाब बिसेन
मो. नं. 9404235191
कथा, कादंबरी, ललित, कविता अशा साहित्य प्रकारांतून कसदार लेखन करणारे साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचीत असलेले डाॅ. कैलास दौंड यांनी बालकांसाठी माझे गाणे आनंदाचे हा बालकविता संग्रह लिहिला आहे.
बालमनाला आपल्या सभोवती असलेल्या गोष्टी, घडणार्या घटनांबद्दल कुतूहल असते. त्याविषयी जाणून घेण्याची उत्कट इच्छा असते. सभोवतीच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खुणावत असतात. त्यांच्याशी खेळण्या बागडण्यातून त्यांचा संवाद होत असतो. अशा विविध दैनंदिन अनुभवांची माळ गुंफलेल्या कविता बालमनाला आनंदाची अनुभूती करून देणार्या आहेत. या कविता संग्रहात कवी,
‘कठीण असती डोंगरवाटा
दगड आणि चुकवीत काटा
टाळून धोका सांभाळून जाऊ
चला मुलांनो आपण सारे फिरायला जाऊ.’
असे म्हणत निसर्गाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची तसेच निसर्ग निरीक्षणाची नवी दृष्टी देतात.
कवी कैलास दौंड मुलांचे मन जाणतात. बालमनाला पडणारे स्वप्न, भेडसावणारे प्रश्न कवी नेमकेपणाने हेरून आपल्या कवितांतून मांडतात. परीच्या पंखांची गादी, आकाश निरीक्षण,स्वप्नातील शाळा, खिडकी, एकदा यासारख्या कविता मुलांना आनंदाने चिंब भिजवून टाकतात.
‘माळरानी पानोपानी
रानीवनी गाऊ गाणी
माळरानी उनाड वारा
पडत्या पावसात, वेचू गारा’
अशा ओळींतून कवीने निसर्गाला गुरू मानत मुलांच्या मनात निसर्ग पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्ग हाच संपूर्ण सजीव सृष्टीचा जीवनदाता आहे. त्याच्याविषयी बालमनात आपूलकीची भावना निर्माण करण्याचा कवी आपल्या कवितांतून प्रयत्न करतात.
पाऊस, उन्हाळा, सूर्योदय, थोडं फिरायला जाऊ, वाढ बाई वाढ, पक्षी, उन्हाळ्याची चाहूल, झाडापाशी खेळताना, पाणवेडी या कविता मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. बालकांना आपल्या सभोवतीच्या निसर्गाची ओळख करून देतात. या बाल कवितासंग्रहातील बहुतांश कविता या सभोवतीच्या निसर्गाशी नाळ जोडणार्या कविता आहेत.
कवी या कवितांतून जसा निसर्गाशी बालमनाची नाळ जोडतात तसेच ते बाबांची सुट्टी, माझे गाव, सहभोजन, आजीचे बोल अशा कवितांतून बालमनाला वेगळ्या अनुभवांची अनुभूतीही देतात.
‘काळीभोर माती कणांत रूजते
हिरवाई देते रानभर
माझ्या मनी येते, आपणही द्यावे
काहीतरी व्हावे आपणही’
अशा ओळींतून निसर्गाप्रमाणे आपणही इतरांना काहीतरी देणे लागतो. ही भावना बालमनात रूजवण्याचा प्रयत्न कवीने केला आहे.
‘काय व्हायचंय?’ ही कविता बालमनाचा कानोसा घेत-
‘कुणासाठी काहीतरी
मला सुद्धा व्हायचंय
देशासाठी, लोकांसाठी
मला सुद्धा उरायचंय.’
म्हणत आपले जीवन सत्कारणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त करतोय. सर्वत्र आनंदाची पेरणी करणारी ‘माझे गाणे आनंदाचे’ ही कविता,
‘नवतेचे अन् नवतेजाचे
सृष्टीमधल्या सामर्थ्याचे
भूमी होऊनी जगण्याचे
माझे गाणे व्यापकतेचे’
म्हणत व्यापकतेची जाणीव बालमनात फुलवण्याचा आशावाद देते. या संग्रहातील कविता बालकांना विश्वातील माणसांना प्रेमाच्या धाग्याने गुंफण्याचा आशावाद देतात. शिवाशिवीचा खेळ खेळत मैत्री फुलवतात. सहभोजनातून एकत्र जेवणाची मज्जा देतात. तर आता गट्टी फू सुटू दे म्हणत बालपणीचा निखळ आनंद देतात.
हा कविता संग्रह आकर्षक चित्रांनी अत्यंत सुरेख सजलेला आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.
पुस्तकाचे नाव : माझे गाणे आनंदाचे (बाल कविता)
कवी – डाॅ. कैलास दौंड
प्रकाशक – अनुराधा प्रकाशन
पृष्ठे – ४४ , किंमत – ५० रू.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.