February 1, 2023
Need of Conservation of Bandhan traditional Tribal Community work
Home » नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…

नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा गरजेचे आहे. लोकसहभागातून कामे करताना पर्यावरणाचाही विचार यामध्ये व्हायला हवा. ही कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाली तरच समस्या सुटणार आहे. अन्यथा यातून पर्यावरणाच्या ऱ्हासासह इतर अनेक समस्याही उत्पन्न होणार आहेत. हे अभियान राबविताना याचा विचार व्हायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल -9011087406

पर्यावरण संवर्धनाच्या विचार आदिवासींच्या जीवनशैलीत दिसून येतो. कारण त्यांचे जीवनच मुळी पर्यावरणावर अवलंबून असते. जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनावर त्यांचा चरितार्थ चालतो. त्यामुळे जंगल आणि पर्यावरणाचे संवर्धन हेच त्यांचे प्रमुख कर्तव्य असते. गेल्या काही वर्षात वाढत्या वसाहतींमुळे आता जंगले घटू लागली आहेत. शहर, खेड्यांचा वाढता विस्तार अन् घाटमाथ्यावरील जंगलाकडे श्रीमंतांचा ओढा यामुळे आदिवासींचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. वाढत्या वसाहतींमुळे पाणी प्रदुषणाची, कचऱ्याची समस्या आता मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे. नदींचे संवर्धन करण्याचा उद्देशाने चला, नदी वाचवूया हे अभियान आज जोर धरू लागले आहे. पण हे अभियान राबवताना शास्त्रोक्त अभ्यास होत नसल्याचे आता समोर येऊ लागले आहे. असे झाल्यास पर्यावरण संवर्धना ऐवजी पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.

चिपळूण तालुक्यात गेल्या महिन्याभरात सतीच्या नदीवरील १४ बांधणे उद्धस्त करण्यात आली. यामुळे या बांधणावर उपजिविका करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आदिवासींना आता आंदोलन करणे भाग पडले. नदीचे संवर्धन करताना ही गोष्ट प्रशासनाने विचारात घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्य आदिवासींचे जीवन उद्धवस्त करून विकास करणे किती योग्य आहे ? एका बांधणासाठी या आदिवासींना २५ ते २७ हजार रुपये खर्च येतो. अशास्त्रोक्त पद्धतीने होत असलेला गाळ उपसा थांबविण्यात यावा व संबंधीत आदिवासींना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आदिवासी आदिम कातकरी संघटना, श्रमीक सहयोग, राष्ट्र सेवा दल, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघनांनी एकत्र येऊन सत्याग्रह आंदोलन उभारले आहे. आता तरी प्रशासना या प्रश्नाकडे गांभियाने पाहाणार का ?

गाळ उपशाचा हा प्रश्न केवळ चिपळूण तालुक्यापुरता मर्यादित नाही. सर्वच ठिकाणी गाळ उपसा केला जातो त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होणे गरजेचे आहे. मग तो तलावातील असो वा नदीतील असो. पाणथळ जागातीलही गाळ उपसा शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवा. कारण या गाळ उपशातून जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. मोठ मोठ्या मशीनरी घालून वाट्टेल तसा केला जाणारा गाळ उपसा हा तेथील पर्यावरणाला मारक आहे. या पाणथळ जागावर उपजिविका करणारे विविध प्राणी, पशुपक्षी जीव यांचेही अस्तित्व नष्ट होते याचा विचार होणे आवश्यक आहे. या पाणथळ जागांमुळे परिसरातील वनस्पतींचीही वाढ उत्तम होत असते पण गाळ उपसा करताना या वनस्पतींचेही अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. वाढत्या गरजांमुळे आपण वाट्टेल तशी कामे करू लागलो आहे. कमी वेळात जास्तीत जास्त काम कसे होईल हेच आपण पाहातो याचा फटका पर्यावरणासह अन्य घटकांना बसत आहे. पर्यावरणाचा विचार करूनच पाणथळ जागा, नदी, नाल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. विशेषतः गाळ उपसा करताना तरी याचा विचार होणे गरजेचे आहे.

कोल्हापूर शहरानजकच्या ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ उपशानंतर त्यातील पाणी साठ्यावर परिणाम झाल्याचेही दिसून आले. गाळ काढताना वाट्टेल तसे खोदकाम केल्याने तलावाच्या पाण्याला भूर्गर्भातून गळती लागल्याचे प्रकार घडले आहेत. तलावातील विहिरीचाही विचार न करता गाळ उपसा होतो. गाळ काढल्यानंतर तो काठावर किंवा आसपासच्या परिसरात टाकला जातो. काही वर्षानंतर पुन्हा तो गाळ या तलावात साचतो. अशाने या कामांना काहीच अर्थ राहात नाही. पाणथळ जागा, तलाव बांधताना राजर्षी शाहू महाराजांनी तलावात कोठून व कशा प्रकारचे पाणी येऊ शकते. त्यासोबत कोणती माती वाहून येऊ शकते. त्याचा पाण्यावर काय परिणाम होऊ शकतो ? अशा छोट्या छोट्या गोष्टीही विचारात घेऊन काम करण्याचे आदेश दिले होते. याची नुसती अंमलबजावणी केली तरीही आजच्या पाणथळ जागांचे संवर्धन योग्य प्रकारे होऊ शकेल. पण आज कामाच्या पद्धतीत तसे होताना दिसत नाही. शास्त्रोक्त विचार न करताच कामे केली जात असल्याने याचे गंभीर परिणाम भावीकाळात आपणासच भोगावे लागणार आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे.

चिपळूण तालुक्यात बांधणे हटवण्याचा प्रकार फारच गंभीर आहे. पर्यावरण अभ्यासक मल्हार इंदुलकर यांच्यामते, पारंपारिक बांधण बांधण्यासाठी नदीत दगड, गोटे असणे गरजेचे असते. नदीचा तळही दगड गोट्यांचा असावा लागतो. बांधण बांधण्यासाठी धासरवेली, शेरनी झुडुपे, बांबु-वासे आदी नैसर्गिक वस्तू लागतात. सध्या वशिष्ठी नदीतील गाळ उपशामुळे शेरनीची झुडपे दुर्लभ झाली आहेत. मुळात बांधणामुळे पाण्याच्या प्रवाहाला कोठेही अडथळा होत नाही. पबांधणाची रचना नदी तळाला समांतर असते. या गोष्टी गाळ उपसा करताना विचारात घ्यायला हव्यात. मासे पकडण्यासाठी हे बांधण बाधले जाते. यावरच या आदिवासींची उपजिविका चालते याचाही विचार होणे गरजेचे आहे.

पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या म्हणण्यानुसार बांधण बांधण्याची प्रक्रिया आहे ती सर्व नैसर्गिक आहे. नदीच्या प्रवाहाला बांधणमुळे कोणताही अडथळा निर्माण होत नाही. नैसर्गिक प्रवाह विचारात घेऊन आदिवासी बांधव हे बांधण उभा करतात. नदीतील गाळ काढण्यासाठी बांधण काढायचे किंवा त्याचे नुकसान करायचे याला काहीच अर्थ नाही. जर काढायचे असेल तर कमीत कमी त्या आदिवासी बांधवांना विचारणे तरी आवश्यक आहे. मासे पकडण्यासाठी बांधण्यात येणारे हे बांधण जमिनीतील प्रवाहाची विशिष्ट रचना असते अशा ठिकाणीच बाधण्यात येते. चिपळूण तालुक्यात सुमारे विविध नदी, नाल्यावर सहासे ते सातशे बांधण मासेमारीसाठी बांधण्यात आली आहेत. ही बांधणे काढताना शास्त्रोक्त विचार होणे आवश्यक आहे. ही काढण्याची खरचं गरज आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. नदीतील गाळ काढण्याची ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर यांच्यामते, चिपळूणच्या पुराचा प्रश्न विचारात घेताना केवळ गाळामुळे पुर आला का की काही अन्य गोष्टीही त्याला कारणीभूत आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. सह्याद्री घाटमाथ्यावर होणारी वृक्षतोड, होऊ घातलेले मोठे रस्ते, यासाठी होत असलेली खुदाई अशाने हा गाळ निर्माण झाला आहे. गाळ नदीत येणार नाही याचा विचार प्रथम आपण करायला हवा. यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत. पण असे होताना दिसत नाही.

या सर्वाचा विचार केला तर असे दिसते की गाळ निर्मितीपासूनच या प्रश्नाचा विचार होणे गरजेचे आहे. पूर्वीच्याकाळी याचा विचार केला जात होता. राजर्षी शाहू महाराज यांनी संस्थानमधील पाणथळ जागांच्या विकासासाठी दिलेल्या आदेशात तसे स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतात. पण आजकाल अशा पद्धतीने कामे होताना दिसून येत नाही. शास्त्रोक्त पद्धतीनेच गाळ उपशाची, नदी, नाले, पाणथळ जागा संवर्धनाची कामे झाली तरच खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. नदी नाल्यात कचरा येणार नाही याचाही विचार गांभिर्याने करायला हवा. केवळ गाळ उपसा केला म्हणजे पुराची समस्या मिटते असे नाही तर त्याला कारणीभूत सर्व बाबींचा विचार हा व्हायला हवा. पर्यावरणाचा विचार करून कामे केल्यास जैवविविधतेसह अन्य बाबींचेही संवर्धन होणे सोपे होईल.

Related posts

गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणे जपणे आवश्यक

प्लास्टिक बंदी पोकळ बडगा

माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा

Leave a Comment