September 9, 2024
Chhatrapati Shivaji Maharaj name to a new species of plant at Vishalgad
Home » विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
संशोधन आणि तंत्रज्ञान

विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

  • विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
  • न्यू कॉलेज, कोल्हापूरच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

जवळजवळ तीन शतके गुलामगिरीच्या वरवंट्याखाली भरडलेल्या अंधारमय महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या छत्रपती शिवरायांना कंदीलपुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त संधी आम्हाला मिळाली.

डॉ. नीलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर

कोल्हापूर – विशाळगड परिसरात कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतीची नवीन प्रजाती न्यू कॉलेजमधील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार तसेच चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूला आढळली. या शोधलेल्या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवरायीना असे नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रति कृतज्ञता या सर्वांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. अश्या प्रकारे शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांकडून घेतली जाणार आहे.

अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली. भारतामधील कंदीलपुष्प वर्गाचे तज्ज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे पण सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली असता ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी अंतिम निरीक्षणानंतर ही कंदलपूष्प वनस्पतीची नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब केले, आणि त्या संबंधी शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठविण्यात आला.

या नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. या नवीन प्रजातील महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणले आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच राखीव केली. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी “गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न दयावी” असे आवाहन केले, यावरून छत्रपती शिवराय जैवविविधता संवर्धनाच्या बाबत किती अग्रेसर आणि काटेकोर होते हे लक्षात येते.

या संशोधन कामासाठी या संशोधकांना न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

ग्रामजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा कथासंग्रह-तारणहार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading