February 6, 2023
Need of Research view in Farmer
Home » शेतकऱ्यांनी संशोधक वृत्ती ठेवून शेती करण्याची गरज
विश्वाचे आर्त

शेतकऱ्यांनी संशोधक वृत्ती ठेवून शेती करण्याची गरज

विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून शेती करायला हवी. तरच शेतीचा विकास झपाट्याने होईल. गटशेतीतून शेतकऱ्यांमध्ये संशोधनाच्या चर्चा घडविल्या गेल्यातर शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

मद्यपाआंगीचें वस्त्र । लेपाहातीचें शस्त्र ।
बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ।। 532 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसें त्या चित्रास भान नसते. अथवा बैलाच्या पाठीवर लावलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.

देशातील कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होते. नवनवे तंत्र विकसित केले जाते, पण अद्यापही हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचले नाही? या तंत्राचा वापर किती शेतकरी करतात. साधेच उदाहरण घ्यायचे झाले तर ठिबक सिंचनाचे घेता येईल. राज्यातील किती शेतकरी ठिबक सिंचनाने शेती करतात. पाण्याची बचत होते. विजेची बचत होते. उत्पादन खर्चात बचत होते. उत्पादनही वाढते. मग ठिबक सिंचन शेतकरी का करत नाहीत ? शंभर टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन वापरावे यासाठी का प्रयत्न होत नाहीच. यासाठी अनुदानही दिले तरीही ही योजना यशस्वी का होत नाही. हे शास्त्र अद्याप शेतकऱ्यांना का रुजले नाही. संशोधन तर झाले आहे. उत्तम आहे याचीही माहिती आहे. मग हे शास्त्र वापरण्यात आपण मागे का ?

बैलाच्या पाठीवर शास्त्र बांधले. त्या बैलाला याची कल्पना नसते..ते शास्त्र आहे की कागदाचे ओझे आहे. त्याला काहीच फरक पडत नाही. दारूड्याला आपण दारू पिऊन कोठे पडलो आहे याचे भानही नसते. अंगावर कपडे आहेत की नाही याचीही कल्पना त्याला नसते. अशी अवस्था आज कृषी संशोधनाची झाली आहे. संशोधन अमाप झाले आहे. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. ते संशोधन माहीत झाले आहे. पण त्याचा वापर शेतकरी करताना दिसत नाही. नुसते पुस्तकी ज्ञान काय कामाचे ?

हजार वेळा ज्ञानेश्वरी वाचली पण एक ओवीही समजली नाही. अशा वाचनाचा काय उपयोग. एखादे पारायण जरी मन लावून केले असते, ते ज्ञान समजावून घेतले असते तरी चालते. नुसते वरवरचे वाचन उपयोगी नाही. काही काम धंदा नाही म्हणून वाचन करून काय उपयोग? उतारवयात वेळ जात नाही. मग काय उद्योग. तर धार्मिक पुस्तकांची पारायणे करायची ? चांगली गोष्ट आहे. पुस्तके जरूर वाचावीत. पण ती समजून घेऊन वाचावीत. नुसते वरवरचे वाचन नसावे. घरात सर्व शास्त्राची पुस्तके आहेत. पुस्तकांच्यासाठी उत्तम फर्निचरही तयार केले आहे. अगदी नवी कोरी पुस्तके आहेत. त्यावर धूळ पडणार नाही. किंवा त्याला कीड लागणार नाही याची काळजीही घेतली आहे. पण ती पुस्तके कधी उघडून पाहण्याचे धाडस कधी केले नाही. मग त्या पुस्तकांचा काय उपयोग? इतकी उत्तम दर्जाची सुविधा त्यासाठी उपलब्ध करून काय उपयोग ?

आजकाल तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले आहे. झटपट लोकांपर्यंत पोहोचते. मोबाईल तर आता प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. मग असे असताना शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही ? त्याचा वापर शेतकरी का करत नाही ? या प्रश्नाचा कधी आढावा घेतला गेला आहे का ? नुसती आकडेवारी सादर करून चर्चा करण्याने प्रश्न सुटत नाहीत. या चर्चेतून प्रश्नावर शोधलेले उत्तर अमलात आणावे लागते. तसे होत नाही. यामुळेच हे संशोधन विद्यापीठातच राहिले आहे. ज्ञान विस्तार ही प्रक्रिया हळू आहे. कोणतीही गोष्ट शेतकरी पटकन स्वीकारत नाही. त्याने पटकन स्वीकारावे असा आत्मविश्वास आपल्या देशातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने निर्माण केला आहे का? ते का करता आले नाही.

ठिबक सिंचनाचा विचार संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात सांगितला. झाडाच्या मुळाशी, रोपाच्या मुळाशी पाणी दिले तरच ते झाडाला मिळते. त्या काळात मडकी जमिनीत पेरली जायची. सध्याचे डिफ्युजर तंत्रज्ञान त्याकाळात वापरले जात होते. मग आत्ता हे तंत्र शेतकरी का वापरत नाही. ते वापरण्यात शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी आहेत. याचा विचार तरी झाला आहे का? आकडेवारीच्या पाहणीनुसार जमीनदार शेतकरीच शासनाच्या योजनांचा लाभ घेतात असे दिसते. केवळ पाच टक्केच सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ घेतो. असे का? त्यातही तो समाधानी नसतो. शासनाची योजना आहे. लाभ मिळतो आहे म्हणून तो त्याचा वापर करतो. प्रत्यक्षात ते तंत्रज्ञान वापरण्यात त्याला फारसा रस वाटत नाही. असे का? त्याची मानसिकता अशी का झाली आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे.

शासनाने आता ठिबक सिंचनाची सक्ती केली आहे. भावी काळात पाण्याची टंचाई विचारात घेता तसे नियोजन हवेच. पूर्वी पाणी साठविण्याच्या फारशा सुविधा नव्हत्या. धरणेही नव्हती. विहिरींची संख्याही कमी होती. अशा काळात पाण्याचा वापर हा काटकसरीने केला जात होता. पाणी उपशाच्या सोयी नव्हत्या. मोटेच्या साहाय्याने पाणी किती ओढणार यालाही मर्यादा होत्या. पण झाडाच्या मुळाशी पाणी देण्याचे शास्त्र शेतकऱ्यांना अवगत होते. तसा ज्ञानविस्तारही केला जात होता. इतके जुने तत्त्वज्ञान असूनही सध्या याबाबत ज्ञानविस्तार का करावा लागतो. विचार केला तर आता शेतीचा विस्तार कमी होत आहे. कमी क्षेत्रावर आता अशाप्रकारे ठिबक सिंचन वापरणे खर्चाचे झाले आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारण्यातच अनुदान संपते. शासकीय योजनांचा लाभ केवळ मोठ्या शेतकऱ्यांना होतो कमी क्षेत्रावर लाभच पोहोचत नाही. अशा या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबकच्या योजनांचा लाभ कसा द्यायचा हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारावेच लागेल कारण देशातील 70 टक्क्यांच्यावर शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शेतीच्या योजना आखताना आता अल्पभूधारक विचारात घेऊनच योजना आखायला हवी. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गटाला ठिबक सिंचनाखाली आणता येऊ शकते. गटच ठिबक सिंचनाखाली आला तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शेतही ठिबक खाली येईल. गटशेतीचे इतरही फायदे या शेतकऱ्यांना मिळाल्याने निश्चितच शेतकऱ्यांचा विकास होईल. शेतीकडे पाठ फिरवणारे शेतकरीही पुन्हा शेतीकडे वळतील.

गटागटाने शेतीला प्रोत्साहन मिळेल. पूर्वीच्या काळीही गटागटानेच शेती केली जात होती. आजही दुर्गम भागात, कमी विकसित भागात गटागटानेच शेती केली जाते. शेतीची कापणी एकत्रित केली जाते. पेरणीही एकत्रित केली जाते. अशामुळे आज यांच्या शेतात पेरणी केली की उद्या दुसऱ्याच्या शेतात पेरणी होते. काढणीही त्याचप्रमाणे होते. कामाची, वेळेची बचत होते. पण काळाच्या ओघात शेतकऱ्यातील हे ऐक्य कमी झाले. मध्यंतरीच्या काळात नवनवे शोध लागले. पाणी उपसण्याची साधने बदलली. मोटेची जागा पंपाने घेतली. विजेच्या वापराने उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले. पाण्याची मुबलकता झाली. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचे तोटे सुरू होतात. पाण्याचा वापरही वाट्टेल तसा होऊ लागला. तसे ठिबक सिंचनाचा विचार मागे पडला. पाटाने पाणी देण्याची पद्धत विकसित झाली. आता पुन्हा पाण्याची वाढती टंचाई जाणवू लागल्यानेच ठिबक सिंचनाचा विचार आता जोर धरू लागला आहे.

विसरलेले शास्त्र आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. पुराणातील वांगी पुराणात असे म्हणणे चुकीचे आहे. जुने तेच सोने आहे. संतांनी सांगून ठेवलेले शास्त्र नेहमीच उपयोगाचे आहे. काळ बदलला तरी तेच शास्त्र उपयोग आणणे गरजेचे आहे. त्या शास्त्राचा आधार धरूनच विकास करणे गरजेचे आहे. शास्त्र सोडून विकास केल्यानंतर सुरवातीला फायदा होतो पण पुन्हा तोटे सुरू होतात. तोटा होऊ लागल्यानंतर पुन्हा पुराणांच्या पोथ्या उघडाव्या लागतात. सेंद्रिय शेतीचेही तसेच आहे. रासायनिक खतांचा शोध लागण्यापूर्वी देशात सेंद्रिय शेतीच केली जात होती. उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढला. पण उत्पादन पहिल्या टप्प्यात वाढले नंतर उत्पन्नात फरक जाणवू लागल्याने आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे.

आरोग्यासाठी आता तर सेंद्रिय शेतीचाच आधार आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असा विचार आता पुढे येत आहे. शास्त्राचा आधार सोडून विकासाचे आराखडे तयार केल्यानेच हे प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतीमध्ये तरी आता पुन्हा साधुसंतांनी सांगितलेल्या विचाराने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे. सिंचनाचे प्रश्न असो किंवा पावसाची अनियमितता असो, मानवामध्ये वाढते आजाराचे प्रमाण असो किंवा जागतिक तापमानवाढ असो, वाढते हवा, पाण्याचे प्रदूषण असो किंवा जमिनीची बिघडलेले पोत असो या सर्वांची उत्तरे एकच आहेत. शास्त्राचा आधार सोडून विकास केल्यानेच हे प्रश्न भेडसावत आहेत.

अनेक थोर शास्त्रज्ञांनीही आता हे मान्य केले आहे. विकास करताना फायदा विचारात घेण्याबरोबरच भावी काळात कोणते तोटे होणार आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल. कारखाने झाले. लोकांना रोजगार मिळाला. वसाहतींचा विकास झाला. विविध सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या. पण त्याबरोबरच विकास करताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याने आता रोगराई वाढली आहे. विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. आता औद्योगिक क्षेत्रात पाणीही शुद्ध मिळत नाही. अशाने विकास कोणता केला हा मोठा प्रश्न आहे. विकास करताना या जमिनीवरील वृक्षांची तोड झाली. पिकाऊ जमीन वाया गेली. केवळ औद्योगिक क्षेत्रामुळे जमिनींचा भाव वाढतो या विचाराने विकास केला. भाववाढ केली पण प्रश्नही वाढविले. अध्यात्मशास्त्रात विकास करू नका, असे कोठेही सांगितले जात नाही. विकास करा पण विचार करून विकास करा, शास्त्र सोडून विकास करू नका असे सांगितले जाते. नेमके हेच होत नाही. यामुळेच अध्यात्म शास्त्रास नावे ठेवली जात आहेत.

कृषी विद्यापीठांमध्ये सर्वांगीण विचार करून संशोधन विकसित केले जाते. बऱ्याचदा यात चुका होतात. बऱ्याचदा संशोधन अयशस्वी ठरते पण संशोधन केले जाते. ही निरंतर प्रक्रिया आहे. संशोधन विकसित करण्याअगोदर त्याचे विविध क्षेत्रावर प्रयोग केले जातात. ते योग्य आहे की नाही हे तपासले जाते. पण आता या विकासामध्येही राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. बियाणे कंपन्यांच्या नफ्यासाठी वाट्टेल तशी मंजुरी दिली जात आहे. नियंत्रण राहिलेले नाही. अशामुळे उत्पादनवाढ होणारे बियाणे पहिल्यावर्षी उत्पादन देते मात्र नंतर बियाणे खराब निघते. अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याचीही गरज आहे. संशोधनाचा प्रसार करताना नियम हे पाळले जाणे गरजेचे आहे. पिकांच्या जाती विकसित झाल्या. उत्तम जातींचा प्रसारही झाला. पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत.

शेती अशी करा? शेती तशी करा? असे सल्ले विद्यापीठाकडून दिले जातात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत हे सल्ले पोहोचतात का? विविध कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे चुकीचे सल्लेही दिले जात आहेत. कीडनाशक, खते यांच्या फवारणीचे नियंत्रण राखले जात नाही. चुकीच्या पद्धतीने फवारण्या होत आहेत. यात नुकसान कोणाचे? शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्याबरोबरच शेतमाल खाणाऱ्या जनतेचेही आरोग्य बिघडत आहे. यावर नियंत्रण कसे ठेवणार. योग्य शास्त्र विकसित करण्यासाठी आवश्यक ते कायदे करण्याची गरज आहे.

आज सेंद्रिय शेतीचा प्रसार केला जात आहे. पण याला शासनाकडून किती प्रतिसाद मिळतो. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाची किती मदत मिळते. हासुद्धा आता संशोधनाचा विषय आहे. शेतीमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचीही गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने शेतीचे खरे शास्त्र विकसित करता येईल. शेतीचे शास्त्र आता शेतकऱ्यांनीच विकसित करण्याची गरज आहे. विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून शेती करायला हवी. तरच शेतीचा विकास झपाट्याने होईल. गटशेतीतून शेतकऱ्यांमध्ये संशोधनाच्या चर्चा घडविल्या गेल्यातर शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होईल.

गावागावात शेतकऱ्यांचे गट झाले तर एकमेकांमध्ये तंत्रज्ञानावर चर्चा होऊन शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सुटण्यास मदत होईल. शेतीचे शास्त्र समजून घेण्यातही सहजता येईल. पूर्वीच्याकाळी अशीच शेती केली जायची. बागायतदार शेतकऱ्यांची मुले मामाच्या, काकाच्या शेतात जाऊन त्यांच्याकडून शेतीचे धडे घेत होते. बागायतदार आहे म्हणून मुलांना शेतीची कामे लावायची नाहीत. त्यांना कष्टाची कामे द्यायची नाहीत असा कोणताही नियम तेव्हा नव्हता. उलट बागायतदार स्वतःच्या मुलाला हे तंत्र समजावे यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याकडे शिक्षणासाठी ठेवत असत. कामाची सवय लागली की आपोआप विकास होतो. मानसिक तयारी होते. चांगले वळण लागते. शास्त्र शिकण्यासाठी, समजावून घेण्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. वडिलांना पुस्तकांची आवड असते. पुस्तकांचे वाचनालयच त्यांनी घरात उघडलेले असते; पण त्यांची मुले ही पुस्तके कधी वाचताना दिसत नाहीत. असा विरोधाभास बऱ्याच घरामध्ये पाहायला मिळतो. असे का होते ? तर मुलांची वाचनाची आवड ही निर्माण करावी लागते. त्यासाठी त्याची मानसिकता बदलावी लागते. तशी तयारी करवून घ्यावी लागते. तरच ही सवय लागते.

Related posts

आध्यात्मिक तेज

व्यक्ति तितक्या प्रकृती

मनाच्या योग्य स्थितीतच बीजाची पेरणी फलदायी ठरते

Leave a Comment