बोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोली अभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि, बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक मराठीत अद्याप नव्हते. ही उणीव ‘बोलीविज्ञान’ या पुस्तकाने भरून काढली आहे.
नंदकुमार मोरे
बोली अभ्यासाच्या प्रारंभापासून आजपर्यंतची सारी स्थित्यंतरे या पुस्तकातून सांगितलेली आहेत. काळानुसार बोली अभ्यासात परिवर्तन झाले. हे परिवर्तन बोली अभ्यासाची बदलत गेलेली उद्दिष्टे अधोरेखित करते. या उद्दिष्टांनुसार झालेला अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर येतो. बोलींच्या मराठीतील अभ्यासाची स्थिती पाहता, बोलीविज्ञानातील स्थित्यंतरे अभ्यासकांना अपरिचित आहेत असे दिसते. त्यासाठी अभ्यासकांनी ‘बोलीविज्ञान’ समजून घेणे महत्त्वाचे आहे.
हे समजून घेणे समग्र भाषाविज्ञानाच्या आकलनासाठीही आवश्यक आहे. कारण, भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञानाचा विकास परस्पर समन्वयाने झाला असून तो एकत्रित अभ्यासणे उद्बोधक ठरेल. हा विकास येथे नेमकेपणाने सांगितला गेला आहे. या पुस्तकामुळे मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना नवी दिशा मिळेल. अभ्यासकांमध्ये नवी दृष्टी रुजेल आणि त्यातून नव्या अभ्यासाला गती मिळेल, असा विश्वास वाटतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.