July 27, 2024
Teachers concept of Primary Education Deepak Mengane Book Review by Nandkumar More
Home » प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ
काय चाललयं अवतीभवती

प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ

दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. त्यांनी या अस्वस्थेतून प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतून शिक्षकांबद्दलचे एक आशादायी वर्तमान लोकांसमोर येते आहे. हे वर्तमान वाचून महात्मा गांधीच्या स्वप्नातील ‘नयी तालीम’ आठवते. कारण या सर्वच शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी नानाविध कल्पना सूचवलेल्या आहेत.

डॉ. नंदकुमार मोरे

प्राध्यापक, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 

भुदरगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी संपादित केलेले ‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक वाचताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमाबद्दल झालेल्या विचारमंथनाची आठवण होते. या विचारमंथनात महात्मा गांधी यांची शिक्षण परिषदांमधील भाषण आठवतात. त्याबरोबरच पंजाबमध्ये शिक्षणाच्या माध्यमाबद्दल निर्माण झालेल्या पेचाची सोडवणूक करण्यासाठी आयोजित केलेली निबंध स्पर्धाही आठवते. ही निबंध स्पर्धा १९२३ साली तत्कालीन अखंड पंजाब राज्यात घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेचा विषय ‘पंजाबच्या भाषा आणि लिपिची समस्या’ असा होता. या स्पर्धेत शहीद भगतसिंग यांना प्रथम पारितोषिक मिळाले होते. या घटनेनंतर आठ वर्षांनी भगतसिंग फासावर चढले. त्यावेळी स्पर्धेचे परीक्षक असणाऱ्या प्रो. विद्यालंकार यांनी आपल्या प्रिय विद्यार्थ्याचा जपून ठेवलेला निबंध प्रकाशित केला. हा निबध राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे माध्यम म्हणून भाषा आणि लिपीचे स्थान अधोरेखित करणारा होता. आपल्याला भगतसिंग देशासाठी फासावर गेले इतकेच माहित असते. परंतु, वास्तविक फासावर जाणारे भगतसिंग भारतीय शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्याची चिकित्सा करणारे एक महत्त्वाचे विचारवंत होते, हे आपण कधी पाहात नाही. भगतसिंग आपल्या त्यागाने स्वातंत्र्यकांक्षेचे धगधगते प्रतीक बनले. परंतु, त्यांच्या जाण्याने भाषा आणि शिक्षणाचा मूलभूत, सहिष्णू विचारांचा थोर विचारवंत ‍आणि एक राजकीय नेतृत्वही हरपले. हा निंबध आठवण्यासाठी वरील पुस्तक कारण ठरले. 

घडी विस्कटल्याचे वास्तव

‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ हे पुस्तक प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी केलेल्या चिंतनपर निबंधांचे संकलन आहे. या पुस्तकाची निर्मिती एका विशिष्ट मानसिक अस्वस्थतेतून झालेली आहे. ही अस्वस्थता काय आहे, हे संध्या वास्कर आपल्या निबंधात नेमकेपणाने सांगतात. त्या लिहितात, नोकरीची सुरुवातीची वर्षे छान गेली. ‘पाठ्यपुस्तकांत जे आणि जसं दिलं आहे ते आणि तसंच मुलांच्या गळी उतरवणे म्हणजे अध्यापन असं वाटायचं. मुलंही पोपटासारखी बोलायची, छान चाललं होतं. पण हल्ली थोडसं अस्वस्थ झालं होतं. कशामुळे ते मात्र समजत नव्हतं. कुठेतरी काहीतरी बिघडलें होतं. घडी विस्कटल्यासारखं’ (२८) हे घडी विस्कटल्याचे वास्तव प्राथमिकच नव्हे, तर सर्व स्तरावरच्या शिक्षणक्षेत्राचे वास्तव आहे.

गांभीर्याने विचार करणारे शिक्षक हे आशादायी

सरकारने शिक्षकांना आपले पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत करता यावे म्हणून त्यांचे वेतन वाढवले आहे. त्यांचे काम बौद्धिक असल्यामुळे कामाच्या ठिकाणी राहण्याचे बंधन त्यांना असते. परंतु, बरेच शिक्षक दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा अधिकचे काही कसं मिळवता येईल यात गुंतलेले असतात. कोणी एलआयसी एजंट, तर कोणी स्टेशनरीचे दुकान टाकतात. खेडोपाडी शाळेपेक्षा शेतीकडे जास्त लक्ष देणारे शिक्षक आहेत. तर अनेक शिक्षक प्लॉट खरेदीविक्री ते वडापच्या गाडीपर्यंत नाना प्रकारचे धंदे करताना दिसतात. भौतिक सुखसोयींच्या हव्यासाने मुलांचे शिक्षण आणि इतर काय वाट्टेल ती कारणे पुढे करत ते निर्धास्थपणे शहरात येऊन राहतात. शंभर-शंभर किलोमिटरचा प्रवास करत अगदी धापा टाकत नोकरीच्या स्थळी पोहचतात. असे शिक्षक ना विद्यार्थ्यांना न्याय देतात ना कुटुंबाला. अशा शिक्षकांमुळे आज शिक्षण क्षेत्र पुरते बदनाम झाले आहे. तथापि, शिक्षणाच, विद्यार्थ्यांचा गांभीर्याने विचार करणारे शिक्षक आणि अधिकारीदेखील आहेत. हे वास्तक खूप आशादायी आहे. हे सर्व चांगले काही व्हावे यासाठी सजगपणे सतत धडपडत असतात. आपल्या आपल्या पातळीवर काही नावीन्यपूर्ण प्रयोग करतात. शाळेच्या वेळेपेक्षा अधिकचा वेळ विद्यार्थ्यांच्यासाठी देऊ इच्छितात. त्यामुळे सारेच बिघडले आहे, असेही म्हणता येणार नाही. काही चांगलेही होत आहे. काही चांगले शिक्षक आज अस्वस्थ आहेत. ते नव्या कल्पना अमलात आणू इच्छिताहेत.

‘त्या’ कल्पना आमलात आणणे शक्य

दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. त्यांनी या अस्वस्थेतून प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतून शिक्षकांबद्दलचे एक आशादायी वर्तमान लोकांसमोर येते आहे. हे वर्तमान वाचून महात्मा गांधीच्या स्वप्नातील ‘नयी तालीम’ आठवते. कारण या सर्वच शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी नानाविध कल्पना सूचवलेल्या आहेत. त्यातील कोणत्याची कल्पना अनाठायी नाहीत. थोडीशी इच्छाशक्ती असेल, आणि थोडी धडपड केली तर त्या सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात आमलात आणता येतील अशा आहेत. 

चित्र चिंता करणारे, पण आशादायीही

दीपक मेंगाणे यांनी घेतलेल्या या स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील ५३० प्राथमिक शिक्षकांपैकी केवळ ७० शिक्षक सहभागी झाले. हे चित्र चिंता व्यक्त करणारे आहे. परंतु, आशादायीही आहे. कारण सहभागी न झालेल्यांचा विचार करताना सहभागी झालेल्या कल्पक शिक्षकांच्या स्वप्नांकडे, कल्पनांकडे आणि त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होऊ नये. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सोळा निबंध सदर पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. प्रारंभी मेंगाणे यांनी या निबंधांमधून वाचकांनी ‘प्रत्यक्ष वर्ग आणि शाळेत काम करणारी आम्ही मंडळी प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय विचार करतो, कोणत्या कल्पना बाळगतो इतकंच समजून घ्यावं’ ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांची ही अपेक्षा वाचकांनी समजून घेतल्यास आणि आपल्या पातळीवर या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी थोडी धडपड केल्यास प्राथमिक शिक्षणाचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. 

भयावह वास्तव समोर

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करणाऱ्या आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी, प्राथमिक शिक्षणातील गोंधळ दूर करता आलेला नाही. त्यासाठीच हे सारे शिक्षक नव्या कल्पना घेऊन आले आहेत. त्या कल्पना मनापासून समजून घेणे आवश्यक आहे. अशोक कौलवकर आपल्या निबंधात आपली शाळा प्रेमाच्या पायावर उभी असेल असे लिहितात. पुढे आपले स्वप्न व्यक्त करताना जे लिहितात ते वाचून आपली आपल्याला लाज वाटायला लागते. कारण ते अपेक्षितात त्या प्राथमिक गोष्टीही आपल्या राज्यकर्त्यांना मागील सत्तर वर्षात पूर्ण करता आलेल्या नाहीत.  कौलवकर यांनी अपेक्षिलेल्या प्राथमिक गोष्टीही आज शाळांमध्ये नाहीत हे भयावह वास्तवच यातून समोर येते.

मंदिराला लाखोंच्या देणग्या, पण….

ते लिहितात, ‘शाळेची इमारत नव्या युगाची गरज ओळखून सुसज्ज बांधलेली असेल. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र खोली असेल. खोलीत पुरेसा प्रकाश असेल. बैठक व्यवस्था, वायुवीजन यांची सोय असेल. प्रत्येक वर्गखोली अध्ययन, अध्यापनाच्या साधनांनी परिपूर्ण असेल.’ इत्यादी इत्यादी. या गोष्टीत कोणतीच गोष्ट अनाठायी नाही. खरे तर या अपेक्षा मुलांच्या प्राथमिक हक्काच्या आहेत. या गोष्टी स्वप्नवत वाटाव्यात अशा पद्धतीने आपले शिक्षक मागताहेत हे वाचून मन खजील होते. या सर्व मूलभूत सुविधाही अद्याप प्राथमिक शिक्षकांना मिळत नाहीत हे वाचून एक चीड मनात उत्पन्न होते. आज देशातील बहुतांश शाळांच्या इमारती कोंदट, स्वच्छ प्रकाश नसलेल्या, अस्वच्छ, अडचणीच्या ठिकाणी बांधलेल्या आणि देखभाल न केलेल्याच आहेत. बसायला पुरेशी आणि योग्य जागा मिळणे, हेही स्वप्न असल्याचे वाचून मान लाजेने खाली जाण्यावाचून राहात नाही. या अपेक्षा म्हणजे नाकर्तेपणाचा कळस आणि आपणच केलेला आपला पराभव आहे. एकीकडे गावोगावी भव्यदिव्य मंदिरे बांधली जात आहेत. त्यासाठी लाखोंच्या देणग्या लोक देत आहेत. तर गावोगावच्या प्राथमिक शाळा बंद पडताहेत. पालकांना जिल्हा परिषदांच्या कोंदट आणि पडक्या इमारतीत आपल्या मुलांना पाठवायला लाज वाटू लागली आहे. या गोष्टीचा पुरेपुर फायदा खाजगी ‍शाळा घेत आहेत. शासनालाही याबाबतीत अंग झटकायचेच आहे. त्यामुळेच खाजगी शाळांना त्यांचा छुपा पाठिंबा आहे. कोणताही विचार न करता ते अशा शाळांना मान्यता देत सुटले आहेत. प्राथमिक शिक्षणाबाबत अशी अनास्था आणि उणिवा ठेऊन देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणे म्हणूनच मुर्खपणाचे ठरेल. 

चांगले शिक्षक निर्माण करणारी यंत्रणा भ्रष्ट

या अपेक्षेमध्ये चांगल्या विचारांचे शिक्षक ही एक महत्त्वाची बाब सांगितली आहे. चांगल्या विचारांचे शिक्षकच काही चांगले करू शकतात. भव्य स्वप्न पाहू शकतात. नव्या कल्पना राबवू शकतात. परंतु, आज चांगले शिक्षक निर्माण करणारी यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. ती एका गर्तेत अडकली आहे. तिच्यावरचे शासनाचे नियंत्रण सुटले आहे. या समस्येचे मूळ तेथे आहे. वशिल्याचे तट्टू आणि लाखोंची देणगी देऊन आलेले शिक्षक चांगली स्वप्न बघू शकत नाहीत. असे शिक्षक बोगस डीएड, बीएड कॉलेजातील पदवीचा कागद विकत घेऊन व्यवस्थेत शिरले आहेत. हे महाभागच आज शिक्षण संपवताहेत. आपले अधिकारी आणि राज्यकर्तेदेखील अशा महाविद्यालयांच्या वाढीला पोषक वातावरण तयार करताहेत. थोड्याशा लालसेने त्यांचा गैरकारभार डोळ्याआड करताहेत. परंतु, यातून अंतिमत: अनेक पिढ्यांचे आणि देशाचे भवितव्य अंधकारमय होऊ लागले आहे, हे वास्तव ते विसरताहेत. अशा अनेक गोष्टी हे पुस्तक ऐरणीवर आणते आहे. 

शिक्षकांनाच नव्याने शिकवण्याची गरज

निसर्गशिक्षण, खेळ या गोष्टीही अलीकडे कालबाह्य होताहेत. गावाच्या सार्वजनिक जागा विकासाच्या नावाखाली बिल्डर हडप करताहेत. मुलांची क्रीडांगणे बळकावली जात आहेत. निसर्ग तर चित्रातच राहतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी मोकळी जागा हेही स्वप्नच बनले आहे. हे सर्व वाचताना अभय बंग यांचे ‘माझी शाळा’ हे पालक आणि मुलांसाठी लिहिलेले छोटेखानी पुस्तक आठवते. या पुस्तकातील शिक्षणाचे प्रयोग गांधीजींच्या स्वप्नातील शाळा समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या ‘नयी तालिम’मधील अनेक प्रयोगच हे सर्व शिक्षक आपल्या अपेक्षा म्हणून व्यक्त करताहेत. मूल्यशिक्षण, वैज्ञानिक दृष्ट‍िकोन, संवेदनशीलता, सहिष्णूता, विवेक, स्त्रीपुरुष समानता या गोष्टी शिक्षकांनाच नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय या निबंधातून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत.

शिक्षकांचे ‘वाचन’ शिक्षणातील मूलभूत गोष्ट

एस. पी. पाटील या शिक्षकाने योगाभ्यास, सकारात्मकता, वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग, परिपाठ, गटचर्चा या गोष्टींची गरज अधोरेखित केली आहे. तर आनंदा आरेकरांनी शिक्षकांच्या वाचनावर बोट ठेवले आहे. शिक्षकांचे ‘वाचन’ ही शिक्षणातील मूलभूत गोष्ट आहे. त्यामुळे यावर अनेकांगी विचार होणे आवश्यकच आहे. कारण चांगले ग्रंथच शिक्षणाचा पाया मजबूत करतात. त्यामुळे सर्व शिक्षक वाचनाकडे वळले पाहिजेत. त्यांनी धरलेला अधिकचा व्यासंग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असणार आहे. संध्या वास्करांनी अपेक्षिलेल्या अनेक गोष्टींमध्ये ‘निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा’  ही महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

वास्करांची कल्पना फार महत्त्वाची

ही कल्पना वाचताना गो. ना. मुनघाटे यांची ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही शिक्षणप्रयोगाचे प्रारूप ठरावी अशी कादंबरी आठवते. या कादंबरीत आदिवासी मुलांच्या कल्पना गुरुजी ऐकतात. त्यांच्या अचाट कल्पना सत्यात आणतात आणि स्वत: ज्ञानसमृद्ध बनतात. या आदिवासी मुलांचे ज्ञान पाहून ते थक्क होतात. मुलं म्हणतात झाडाखाली शाळा भरवू, नदीकाठी शाळा भरवू, एक दिवस डोंगरावर शाळा नेऊ. गुरुजी मुलांचे ऐकतात. मुलांच्या निर्णयांची कदर करतात. त्यामुळे मुलंही आनंदी होतात. त्यांना शाळा, गुरुजी आणि शिक्षण आपले वाटू लागते. त्यामुळे वास्करांची ही कल्पना फार महत्त्वाची आहे.

दारिद्र्य ही फार मोठी समस्या

मुलांच्या सहभागातून त्यांच्या आवडीनिव‍डीचे कल तपासता येतील. त्यांना कोणत्या विषयात गती आहे, ते जाणता येईल. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला, मताला योग्य किंमत दिली गेली पाहिजे. त्यांच्यावर आपल्या गोष्टी सतत लादत राहण्यापेक्षा त्यांचेही ऐकले पाहिजेत. त्याशिवाय त्या शेतीशिक्षणाचे धडे मूल्यशिक्षणाचा भाग समजले आहेत. नवीन पिढी ‍शेतीपासून तुटू न देण्यासाठी हे फार आवश्यक आणि आश्वासकही आहे. त्यांनी पालात राहून कष्ट करणाऱ्या श्रमकरी वर्गाच्या मांडलेल्या शिक्षणसमस्याही भारतीय समाजशास्त्र समजून घेण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. कारण भारतीय समाजात दारिद्र्य ही फार मोठी समस्या असून ती आजही अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवते. त्यामुळे शिक्षणाचा विचार करताना ही गोष्ट दुर्लक्षित करून पुढे जाता येणार नाही.  

मातृहृद्यी शाळेची कल्पना

बाजीराव पाटील, श्रीकांत माणगांवकर यांनीही काही मूल्यं सांगून आपल्या अनुभवांच्या आधारे सांगितलेले प्रयोग विचारप्रवृत्त करणारे आहेत. याच्या विचारांमध्ये विद्यार्थीकेंद्री शिक्षणाच्या कल्पना आहेत. विद्यार्थ्यांची भावना जपत केलेले प्रयोग नक्कीच शिक्षणाची गोडी वाढवणारे असतील यात शंका नाही. राजेंद्र शिंदे यांनी दिव्यांग, अपंग मुलांना आपल्याच शाळेत परंतु, विशेष सुविधा देऊन आणि त्यांची सर्वस्वी काळजी वाहणाऱ्या आईची मदत घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. ही मातृहृदयी शाळेची कल्पना म्हणजे मोठा मानवतावादी विचार आहे. 

पारंपरिक पद्धतीने शिकवण्याचे दिवस संपले

संजय नानंग आणि सचिन देसाई यांनी इतर शिक्षकांप्रमाणे अनेक प्रयोग सांगत खासगी इंग्रजी शाळांना तोंड देण्यासाठी आपल्या मुलांना परकीय भाषा शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. थोड्याशा परिश्रमाने आपली मुले इंग्रजीसारखी भाषा कशी शिकतील, त्यासाठी काय प्रयत्न अपेक्षित आहेत हे सूचवले आहे. सागर मोरे यांनी विद्यार्थांच्या नजरेतून शिक्षकांनी जग पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगतिले आहे. त्यासाठी शिक्षक निरंतर शिकणारा हवा. त्याचे वाचन चतुरस्त्र हवे. तो  स्वप्रज्ञ असावा. त्याची स्वत:ची दृष्टी असावी. स्वत:ची मते हवीत. त्याबरोबर त्याचे चारित्र सदाचारी, सदाशयी हवे, असे सांगत आता अभ्यासक्रम पारंपरिक पद्धतीने शिकवण्याचे दिवस संपले असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे. 

केवळ पुस्तकी शिक्षण नको

ज्योती चौगले आपल्या कल्पनेतील शिक्षण सांगताना कृती‍शील स्वयंशिक्षणाचे महत्त्व सांगतात. मुले अनेक गोष्टी करून पाहतात, स्वत: अनुभव घेतात पण हे सारे शाळेच्या चार भिंतीत अशक्य असल्याची खंत त्या व्यक्त करतात. त्यासाठी शाळेबाहेरच्या आणि कौशल्यंविकासाच्या शिक्षणाची गरज त्या अधोरेखित करतात. तर भगवान मुंढे आपल्या कल्पनेतील शाळेत परिसर स्वच्छता, परसबाग, सूतकताई, स्वयंपाक, समाजसेवा, कार्यानुभव या उपक्रमांना महत्त्व देतात. त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण नको आहे. हे करत त्यांना चुकीचे इंग्रजी शिकवणाऱ्या खासगी इंग्रजी शाळांशी सकारात्मक स्पर्धा निर्माण करायची आहे. आपले विद्यार्थी चंगळवादाला बळी पडू नयेत याची त्यांना काळजी घ्यायची आहे. नितीन बागुल यांनाही असेच काही प्रयोग करायचे आहेत. त्यासाठी प्रसंगी पाठ्यपुस्तके गुंडाळून ठेवण्याचे धाडस दाखवण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना गोष्टी, गाणी, नाटके, चित्रपटांची रेलचेल वर्गात हवी आहे. मुलांचा गळून पडलेला श्रवण हा टप्पा त्यांना मजबूत करायचा आहे. बागुलांसमोर लीलाताई पाटील यांच्या शाळा आदर्श शिक्षणाचे मॉडेल म्हणून आहेत. 

‘घोका आण ओका’

नव्या स्पर्धेच्या युगात ताणतणावांना दूर करण्यासाठी शाळांमध्ये वाचन संस्कृतीची रुजूवात करण्याचे स्वप्न संजय शिंदे बघताहेत. त्यासाठी विद्यार्थांना ते ‘एक तास वाचनासाठी’ हा उपक्रम राबण्याची कल्पना सांगताहेत. आज विद्यार्थ्यांपेक्षा पालक तणावाखाली आहेत. त्यांच्यासाठीही ते वाचनालयात पालक विभाग कल्पिताहेत. त्यांच्या आदर्श वाचनालयात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असे विभाग असतील. तर दशरथ कोटकर गुणांची सूज आणि फुगवटा कमी करण्यासाठी काही कल्पना सांगताहेत. त्यासाठी ‘घोका आण ओका’ आणि खासगी क्लास प्रवृत्तीवर ते नेमकेपणाने भाष्य करतात. मुलांच्या सर्जनशीलतेला आणि मानसिकतेला ते विशेष महत्त्व देताहेत. शेवटच्या निबंधात विठ्ठल कोळीही मुलांच्या मेंदूशी मैत्री करण्याची भन्नाट कल्पना सांगताहेत. ते राजर्षी शाहू आणि साने गुरुजींच्या स्वप्नातील आनंददायी विद्यार्थी घडवू इच्छिताहेत. 

प्रयोग करण्याची आवश्यकता

प्रस्तुत पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पुस्तकात समाविष्ट न केलेल्या निबंधावर संपादकांनी दीर्घ चर्चा केली आहे. त्यामध्ये शिक्षण हे व्यक्तीला सुजाण नागरिक बनवण्यासाठी आणि जात, धर्म, पंथ, लिंग भेद, अज्ञान, अंधश्रद्धांपासून दूर ठेवण्यासाठी दिले पाहिजेत अशा कल्पना सांगितल्या आहेत. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो. माणूस निर्भयपणे जीवनातील समस्यांना तोंड देतो. श्रमाला प्रतिष्ठा देतो. विवेकी बनतो. त्यासाठी योग्य ते प्रयोग करण्याची आवश्यकता येथे चर्चेत घेतली आहे. उर्वरित निबंधांची सांगोपांग चर्चा मेंगाणे यांनी केली असून शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण, तंत्रज्ञान, प्रशासन, विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रिया, मानवी मूल्ये, राष्ट्रपुरुषांचे विचार अशा अनेक गोष्टी केंद्रवर्ती ठेवून लिहिलेल्या निबंधांची केलेली सविस्तर चर्चा मुळातून वाचली पाहिजेत. 

पुस्तकाची ‍निर्मिती विषयाला साजेशी

एकूणच हे पुस्तक प्राथमिक शिक्षणाच्या पर्यायाने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांच्या माफक अपेक्षांचे, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचेच संकलन आहे. या शिक्षकांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी पैशांपेक्षा इच्छाशक्तीची गरज आहे. त्यांनी मांडलेल्या अपेक्षा अवास्तव नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांचे हक्क आहेत. जी मुलं उद्या देशाचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यांच्यासाठी इतक्या माफक अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या देशाचे भविष्य नक्कीच अंधकारमय असेल. त्यासाठी या पुस्तकातील शिक्षकांच्या अपेक्षा नवे शिक्षण धोरण ठरवताना, अभ्यासक्रम रचताना आणि अगदी शाळांसाठी नव्या इमारती बांधतानाही विचारात घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या आहेत. या पुस्तकाची ‍निर्मिती विषयाला साजेशी असून, मुखपृष्ठ, आतील रेखाटणे, मांडणी आणि पुठ्ठा बांधणी आतील मूल्ययुक्त लेखनाला साजेशी आहे. शिक्षणाबद्दल अनास्था बळावत चाललेल्या या दिवसात शिक्षण क्षेत्रानेच नाही तर संपूर्ण समाजाने अशा पुस्तकांचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. 

पुस्तकाचे नाव – आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण

संपादक : दीपक मेंगाणे

प्रकाशक : दर्या प्रकाशन, पुणे

पृष्ठे : १५५, किंमत : २५० 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक

डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध

धारासुरम येथील ऐरावदेश्वर मंदिर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading