अध्यात्माच्या या महासागरात प्रवेश केल्यानंतरही असेच नियम आहेत. योग्य मार्ग शोधायचे असतात. आत्मज्ञानाचा तीर गाठण्यासाठी त्यातील टप्पे अभ्यासायला हवेत. मार्ग दाखविणारे होकायंत्र शोधायला हवे. गुरू हे होकायंत्र आहेत. सर्वप्रथम त्यांचा शोध घ्यायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते ।। १५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा
ओवीचा अर्थ – आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ( ब्रह्मत्वाला ) पोचले.
विशाल, अथांग अशी उपमा सागरास आहे. सागराची खोली, लांबी, रुंदी मोजता येते, पण त्याचे स्वरूप हे विशाल आहे. अशा या महाकाय सागरात प्रवेश करताना त्याचा पूर्ण अभ्यास असणे आवश्यक आहे. किनाऱ्यावरही पोहताना सागराच्या खोलीचा अंदाज येत नाही. सतत लाटांची होणारी आदळआपट यामुळे कोठे खड्डे पडले आहेत याची कल्पनाही करता येत नाही. यामुळे पोहायला गेलेले अनेकजण बुडाल्याच्या घटना या वारंवार घडत असतात. पट्टीचा पोहणाराही येथे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा भयाण सागरात प्रवेश करताना, हा सागर पार करताना योग्य नियोजन हवे. तरच हा सागर आपण पार करू शकणार. त्याचे मार्ग अभ्यासणे गरजेचे आहे.
कोलंबस सागरीमार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, पण तो पोहोचला अमेरिकेत. जायचे होते एका तीरावर, पोहोचला दुसऱ्याच तीरावर. यासाठी सागराच्या या विशालतेचा अभ्यास हवा. जहाज समुद्रात गेल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसते. पण यातून मार्ग शोधून निश्चित लक्ष्य गाठायचे असते. निसर्गात रस्ता चुकविणारे भूलभुलैया आहेत. पण त्यातून मार्ग सांगणारे उपायही अस्तित्वात आहेत. फक्त त्यांचा शोध घ्यायला हवा. दिशादिर्शक होकायंत्राचा शोध यातूनच लागला. आपण कोणत्या दिशेला जात आहोत ते यातून समजते. मार्ग चुकू नये यासाठी आवश्यक ते टप्पे माहीत करून घ्यावे लागतात.
अध्यात्माच्या या महासागरात प्रवेश केल्यानंतरही असेच नियम आहेत. योग्य मार्ग शोधायचे असतात. आत्मज्ञानाचा तीर गाठण्यासाठी त्यातील टप्पे अभ्यासायला हवेत. मार्ग दाखविणारे होकायंत्र शोधायला हवे. गुरू हे होकायंत्र आहेत. सर्वप्रथम त्यांचा शोध घ्यायला हवा. होकायंत्रात चुंबक हवा. नुसती क्षणिक चुंबकीय शक्ती असणारी फसवे होकायंत्र नको. आत्मज्ञानाचा शोध घेतानाही गुरू हा आत्मज्ञानी असायला हवा. तरच तो आपणास योग्य मार्ग दाखवेल.
गुरू आत्मज्ञानी नसेल, तर आत्मज्ञानाचा तीर जवळ असूनही गाठता येणार नाही. क्षणिक मनकवडेही आज पाहायला मिळतात. यांच्यापासून दूर राहायला हवे. क्षणिक मार्ग दाखविणाऱ्या विद्यांनी मार्ग सापडत नाहीत. व्यर्थ भटकंती मात्र होईल. आत्मज्ञानी गुरूंनी दिलेल्या मार्गाने आत्मज्ञानाचा तीर सहज गाठता येतो. त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप नियमित करायला हवा. त्यामध्ये मन रमवायला हवे. सागरात प्रवेश केल्यानंतर वादळ, वारे येत असतात. तसे या सागरातही अडीअडचणी येत राहणार. त्यांचा सामना करत, मार्गक्रमण करावे लागणार. वाट दाखवणारे सद्गुरू असल्यानंतर या वादळ, वाऱ्यात बुडण्याची भीती कसली. तारणारे तर तेच आहेत. फक्त आपण त्यांनी दिलेल्या मार्गाने जायला हवे.