May 30, 2024
Book review of Bolivigyan
Home » बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक
काय चाललयं अवतीभवती

बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक

भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्‍या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्‍याने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरते.

डॅा. सुखदेव एकल

भाषाविकास संशोधन संस्था, कोल्‍हापूर या संस्थेने ‘बोलीविज्ञान’ हे औदुंबर सरवदे यांचे अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित केले. बोलीविज्ञानाची अध्ययनशाखा ही एकोणिसाव्‍या शतकाच्‍या उत्तरार्धात अस्‍तित्‍वात आली. भौगोलिक सीमारेषांच्‍या आधारे भाषाभेदांचा आधारे अभ्यास करणे हे या शाखेचे मुख्य उद्दिष्ट असलेले दिसते. आज जगभरामध्ये होत असलेल्‍या बोलीअभ्यासामुळे या शाखेचे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्‍या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्‍याने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरते.

मांडणी दहा प्रकरणांमध्ये

औदुंबर सरवदे यांनी प्रस्तुत पुस्तकाची मांडणी दहा प्रकरणांमध्ये केली आहे. पुस्तकाच्या भाषा आणि बोली या पहिल्या प्रकरणांमध्ये भाषा आणि बोली यांचा संबंध तसेच त्यांच्यातील फरक विचारात घेतला आहे. या प्रकरणांमध्ये बोलीविषयक सैद्धांतिक मांडणी करून बोली ची संकल्पना स्पष्ट केली आहे. तसेच यासंदर्भातील विविध भाषातज्ज्ञांची बोली आणि भाषा संदर्भातली मतांचा विचार लेखकाने पुस्तकात मांडला आहे. यामध्ये प्रामुख्याने हडसन, ह्यूजन यांच्या मतांचा विचार तसेच बोलीभेद नेमका कशा स्वरूपाचा असतो, ते समवाक आरेखन रेषेच्या माध्यमातून स्पष्ट केला आहे. एककालिक, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या दृष्टीने भाषा आणि बोलीतील भेदाकडे कसे पाहता येते याचेही पुस्तकात स्पष्टीकरण केले आहे. बोलीविज्ञानामध्ये बोलीचा अभ्यास करताना कोणत्‍याही धारणांतवर आधारित व्याख्या स्‍वीकारली जात नाही, तसेच ज्याप्रमाणे भाषा आणि बोली यातील निश्चित फरक सांगता येत नाही त्याप्रमाणे बोली बोली मधील संबंध त्यांच्यातील फरक निश्चित आणि मांडता येत नाही. हे लेखकाने आवर्जून नमूद केले आहे.

बोलींच्‍या निर्मिती प्रक्रियेचा विचार

पुस्तकातील दुसरे प्रकरण बोलीवैविध्य असून यामध्ये बोलींच्‍या निर्मिती प्रक्रियेचा आणि भाषेच्या विविध स्तरावरील वैविध्यांचा सविस्तर विचार या प्रकरणात केला आहे. परिवर्तन हा भाषेचा स्थायीभाव आहे. अशा भाषेच्‍या परिवर्तनाच्या प्रमुख तीन कारणांचा उहापोह लेखकाने केला आहे. या प्रकरणात भाषिक वैविध्याचा पद्धतशीर रचनात्मक आणि अनुषंगिक भाषिक वैविध्य या दोन्ही पद्धतींचा विचार मराठी बोलीतील उदाहरणे देऊन केला आहे.

बोली भूगोल

बोली भूगोल (पारंपरिक बोलीविज्ञान) या पुढील प्रकरणाची मांडणी लेखकाने दोन विभागात केली आहे. त्यामध्ये पहिल्या विभागात पाश्चिमात्य बोली भूगोलासंदर्भातील काही प्रकल्पांचा विचार केला आहे. तसेच प्रकरणाच्या दुसऱ्या भागात पारंपरिक बोलीविज्ञानात उपयोजलेली अभ्यास पद्धती तसेच माहिती संकलनाच्या काही तंत्राचा विचार केला आहे. या अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या जॉर्ज वेन्कर यांनी 1876 साली पहिले बोलीसर्वेक्षण जर्मनी मध्ये सुरू केले. त्या प्रकल्पाची माहिती दिली आहे. तर 1896 साली फ्रान्सच्‍या जुलेस गिलियरॉन यांच्‍या भाषिक सर्वेक्षण प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. तसेच प्रकरणाच्‍या दुसऱ्या विभागांमध्ये प्रामुख्याने बोलीअभ्यासासाठी वापरलेली अभ्यासपद्धती, प्रश्नावली, भाषिक नकाशे, निवेदिकाची निवड यांचा विस्तृतपणे चर्चा केली आहे.

भाषाविज्ञान अन् बोलीविज्ञानाचा परस्परसंबंध

पारंपरिक बोलीविज्ञानावरील टीका या चौथ्या प्रकरणात भाषा तज्ज्ञांनी केलेल्या टीकेचे विवेचन केले आहे. याचा परामर्श समाजशास्त्रीय आणि भाषावैज्ञानिक दृष्टीने केला आहे. बोलीविज्ञान ही भाषाविज्ञानाची एक शाखा आहे असे नेहमीच बोलले जाते. त्यामुळे दोन्हीमध्ये फरक साम्य याचा विचार फारसा होताना दिसत नाही त्यामुळे भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञान यांचा परस्परसंबंध नेमका कसा आहे याचा विचार प्रकरण पाच आणि सहा मध्ये पहावयास मिळतो.

भाषिक वैविध्याशी परस्पर संबंध

पारंपरिक बोलीविज्ञानावर भाषाविज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून झालेल्या टीकेमुळेच 1950 नंतरच्या काळात सामाजिक आणि शहरी बोलीविज्ञानाची सुरुवात झाली. यामध्ये एकाच प्रदेशातील विविध सामाजिक समूहांच्या भाषेच्या अभ्यासाला जोमाने सुरुवात झाली. या अभ्यास अंतर्गत शहरी आणि ग्रामीण समाजाच्या बोलींचा अभ्यास केला जाऊ लागला. प्रस्तुत प्रकरणात विल्यम लबोव यांचे अमेरिकेतील दोन तर पीटर ट्रजिल यांचा इंग्लंडमधील मधील नॉर्विकबोली संशोधन अभ्यास लेखकाने प्रस्तुत प्रकरणात विचारात घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वर्ग, लिंग, शिक्षण, जात, धर्म इत्यादी बाबींचा भाषिक वैविध्याशी असलेल्या परस्पर संबंध स्पष्ट केला आहे.

विस्थापितांसाठीच्‍या भाषा संपर्काचे स्वरूप

बोलीअभ्यासाच्या नव्या दिशा या प्रकरणांमध्ये दोन बोलींच्‍या सीमेलगतच्‍या भागात बोलीची संक्रमणक्षेत्रे कशी निर्माण होतात याचे विवेचन आले आहे. विस्थापन ही आजच्या काळातील प्रमुख बाब आहे. आधुनिकीकरण, जागतिकीकरण, शहरीकरण इत्यादी कारणांमुळे विस्थापितांचे प्रमाण वाढत आहे. विस्थापितांसाठीच्‍या भाषा संपर्काचे स्वरूप हे सीमावर्ती भागामध्ये निर्माण होणाऱ्या भाषा संपर्कापासून वेगळी असते, अशावेळी विस्थापित स्वतःची बोली निर्माण करतील किंवा संबंधित बोलीचा स्वीकार करतील या दृष्टिकोनातून हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. हे स्पष्ट करताना पुस्तकात दिलेला राजेंद्र मेस्त्री यांचा बोलीअभ्यास महत्त्वाचा ठरतो.

बोली अभ्यास प्रकल्पांचा विचार

या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणांमध्ये भारतातील बोली अभ्यास प्रकल्पांचा विचार केला आहे. त्यामध्ये ग्रिअर्सन यांचा भारतीय भाषा सर्वेक्षण प्रकल्प, ए. एम. घाडगे यांचे मराठीचे बोली सर्वेक्षण, राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेला महाराष्ट्राचा भाषिक नकाशा हा प्रकल्प आणि गणेश देवी यांचा भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण यांचा समावेश केला आहे. या प्रत्येक प्रकल्पाचे पाश्चिमात्य बोली अभ्यास पद्धती च्या अनुषंगाने परीक्षण करण्यात आलेले आहे.

बोलीविज्ञानावर मराठी मध्ये लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळे पाश्चिमात्त्य देशातील विविध बोलीअभ्यासकांच्या आणि बोलीअभ्यासामध्ये वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या संकल्पनांचा अभ्यासकांना परिचय व्‍हावा यासाठी शेवटी दोन परिशिष्टे दिली आहेत. पहिल्या परिशिष्टामध्ये बोलीअभ्यासकांचा परिचय करून देण्यात आला आहे, तसेच दुसऱ्या परिशिष्टामध्ये बोलीअभ्यासातील विविध संकल्पनांचे विवेचन केले आहे. त्यामुळे अभ्यासकांना बोलीअभ्यासासंदर्भात नवी दृष्टी मिळण्यास मदत होईल. सरवदे यांनी पुस्तकामध्य विश्लेषण करताना दिलेली आकृती नकाशे यामुळे वाचकाना आशय समजण्यास अधिक मदत होते. ही या पुस्‍तकाची जमेची बाजू आहे. तसेच डॉ. नंदकुमार मोरे यांचा ब्लर्ब या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करतो. गणेश विसपुते यांचे बोलके मुखपृष्ट आणि मुखपृष्टावरील पाश्चिमात्त्य भाषाअभ्यासकांची नावे बोलीविज्ञान या शीर्षकास समर्पक ठरतात. एकूणच वाचक या पुस्तकाचे नक्कीच स्‍वागत करतील.

पुस्तकाचे नाव – बोलीविज्ञान
लेखक – औदुंबर सरवदे
प्रकाशक – भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
पृष्ठे 221, किंमत 280 रुपये
ग्रंथासाठी संपर्क : 7385588335

Related posts

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

दिखाऊ नको आरोग्यास प्राधान्य देऊन हवीत उत्पादने

संस्कृती संवर्धनासाठी हवा माणूसकीचा वृक्ष

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406