आज मदर्स डे. खुप जण आईवर तिच्या महतीवर लिहीतीलच. मी मात्र उद्याच्या होऊ घातलेल्या आईसाठी…आणि माझ्या आईपणाच्या अनुभवातून मत मांडणार आहे. आपल्या आईने आपल्याला जन्म देऊन आई होण्याची संधी दिली म्हणुन देखिल मी आईची ऋणी आहेच. तिच्या मुळेच आज मी जी काय थोडीफार यशस्वी असेन ती आहे असे मला वाटते.
सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
पुर्वीच्या काळी मुलींचा जन्म व्हायचा. अगदी सात आठ मुली पण असायच्या. मुलगा होईपर्यंत. पण तरी आई कधी त्या मुलींना गौण वागणुक नाही द्यायची. मला तरी मी स्त्री म्हणुन जन्माला आल्याचे कधी वाईट वाटत नाही. प्रथम “आई” होण्याची चाहुल लागली तेव्हा मी माझे आणि माझ्या पतीच्या प्रेमाचे सुंदर प्रतिक आता सतत नजरेसमोर असणार म्हणुन हरखुन गेले. दोघांचा अंश घेऊन एक नवा जीव आपण जन्माला घालणार या विचारानेच मी खुश झाले.
आपण शिक्षणासाठी वयाची 20 ते 25 वर्षे देतो. नंतर व्यवसाय किंवा नोकरीत स्थिरावण्यासाठी पण काही वर्षे देतो. तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, मग आईपणासाठी जर काही वर्षे द्यावी लागली तर वाईट वाटण्यासारखे काय आहे ? त्यात करियर संपेल किंवा संधी हुकली असे वाटायला नको. संधी काय एकदा गेली तरी परत येत असतेच. आपणच त्या गेलेल्या संधीसाठी हळहळत बसुन येणार संधिकडे लक्ष देत नाही. समजा चार वर्षे जर तुम्ही दिली तरी नंतर तुम्ही पुन्हा आपले काम सुरु करु शकता की. तुमचे शिक्षण काही आई झाल्यामुळे बदलले नसते. उलट आई झाल्यावर तुम्हाला व्यवस्थापन हा विषय पुस्तकात वाचुन कळला नसेल त्यापेक्षा बाळाच्या संगोपनाने कळला जातो.
अर्थात आमच्या काळी म्हणजे पंचवीस तीस वर्षांपूर्वी मुली आजच्या इतक्या करियरकडे वळणाऱ्या नव्हत्या. कमी प्रमाणात होत्या. पण तेव्हा मुल सांभाळतांना घरातल्यांची म्हणजे सासु जाऊ वगैरेची किंवा क्वचित शेजारची मदत घ्यायला संकोच वाटत नसे. वेळ पडली की त्यांच्या मदतीला आपणही जायचे ही भावना असायची. आणि हो नोकरी व्यवसायात कितीही ताणतणाव असले तरी घरी आल्यावर बाळाच्या बाळलीला बघुन त्याची चिवचिव सुखवायची आणि दिवसभराचे श्रम नाहीसे व्हायचे. म्हणुन ही तेव्हा योगा वगैरे मनःशांतीसाठी कधी आवश्यक वाटले नाही. शिवाय घर ऑफिस सांभाळुन बाळाचे करतांना आपोआप व्यायाम होऊन वजन आटोक्यात रहायचे. सोबत आनंद मिळायचा ते वेगळेच. बाळाच्या बाळलीलेत बाकीचे ताण कमी व्हायचे. मी कुणी अभ्यासक तज्ञ नाही पण माझे अनुभवाचे बोल आहेत. काही मिळवायचे तर काही द्यायला लागते हे तर मान्य कराल ना ?
जसा करियरचा आनंद आहे तसा आईपणाचा पण आनंद आहेच की. पण तो अनुभवल्याशिवाय कळणार कसा ?
माझ्या आईने एक परंपरा दिली तीच मी माझ्या मुलाला म्हणजे पुढच्या पिढीला देऊ शकते. आपल्या मुलांनी जसे व्हावे असे वाटते नकळत आपणही तसे वागण्याचा प्रयत्न करतो त्याच्या व्यक्तीमत्व विकासासोबत आपले व्यक्तिमत्व सुध्दा विकसित होत असतेच. सुजाण नागरिक घडवण्याचे थोर काम आई करते ते कमीपणाचे कसे असेल.?
आईबाबा दोघांचाही आयुष्यात समान दर्जा आहे. पण आई बाळाच्या संगोपनात जास्त वेळ असते आणि आपल्या शरीरात मुल वाढवते म्हणुन तिची महती जास्त गायली जाते. एक चांगली आई होऊन दाखवणे यापेक्षा स्वतःच्या आईला अजुन कोणता “मानाचा मुजरा” असेल असे मला तरी वाटत नाही. तेव्हा आईपणामुळे कुठलेच करियर किंवा सामाजिक कार्य थांबत नाही तर तिथुनच ते सुरु होते.
माझ्या आईच्या स्मृतिला अभिवादन करुन माझ्यातल्या आईला देखिल वंदन.” आईपण स्त्रित जन्मतःच असते तेच रुजुन पोटी जन्म घेते. सलाम तिच्या मातृत्वाचा करु आईपणा साजरा “आईपणाचा जागर सतत राहो. हीच या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. चांगली आई होणे हाच आईला मानाचा मुजरा…..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.