September 16, 2024
Carved and natural tunnels in Junnar taluka
Home » जुन्नर तालुक्यातील कातळकोरीव अन् नैसर्गिक भुयारे
फोटो फिचर

जुन्नर तालुक्यातील कातळकोरीव अन् नैसर्गिक भुयारे

जुन्नर तालुक्यातील या विविध भुयारी मार्गांविषयी विविध भाकडकथा प्रचलित आहेत. याचा उलघडा करण्याचे मी ठरवले. प्रत्येक भुयारात घुसून त्या भाकडकथांविषयी असलेली सत्यता प्रत्यक्ष जागेवर जाऊन जाणुन घेण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. विविध गोष्टींचा यामाध्यमातून मला उलगडा होत गेला व सत्यता समजण्यास मदत झाली. मित्रांनो दहा भुयारीमार्ग मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. कदाचित आपण या ठिकाणाला भेट देत असाल तर सुरक्षिततेसाठी सुरक्षित साधनांचा नक्कीच वापर करावा. मी अनुभवलेली जुन्नर तालुक्यातील कातळकोरीव अन् नैसर्गिक १० भुयारे अशी…

  • Carved and natural tunnels in Junnar taluka

१ ) किल्ले शिवनेरीच्या साखळदंडाच्या तोडाशी असलेल्या टाकीतील तीन भुयारी मार्ग.

सांगितले जायचे कि किल्ले रायगड, किल्ले नारायणगड व किल्ले शिवनेरीच्या गर्भा जाण्यासाठी व फिरण्यासाठी हे मार्ग आहेत. परंतु गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी २०१५ ला रात्री ठिक १:३० वाजता या टाकीत मी शिरून हे मार्ग मित्राच्या मदतीने चेक केले. परंतु येथे काहीही नसुन ते फक्त तीन ते चार फुट आडवे कोरलेले असून शत्रुंना संभ्रमात पाडण्यासाठी अतिशय चातुर्याने केलेला हा प्रयत्न आहे.

२ ) पंचलिंग मंदिराच्या जवळ असलेला भुयारीमार्ग.

हा भुयारीमार्ग नसुन एक भुयारी पाण्याची टाकी आहे की जिचा जमिनीत ३० ते ३५ फुट आडवा बांधीव तोडीतील विस्तार असुन. पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचा साठा येथे केला जायचा व उत्कृष्ट पध्दतीने तो वर्षभर पंचलिंगाच्या मंदिराच्या समोरील टाकीत तो चालू राहील याची केलेली ती सुविधा आहे. तो कोणत्याही प्रकारचा भुयारी मार्ग नाही.

३ ) हटकेश्वरावरील भुयारीमार्ग. ( साळुंकी)

आपणास नेहमीच ऐकवले जाते की अष्टविनायक लेण्याद्री “गिरीजात्मजाचे” आपण जे रूप पहात आहोत तो भाग हा पाठीमागील भाग आहे व गणेशाचे तोंड पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारीमार्गाकडे आहे. हा भुयारीमार्ग हटकेश्वरावर असलेल्या भुयारातुन सुरू होतो कि ज्याच्या तोंडाशी एक शिवलिंग आहे. मित्रांनो या भुयारीमार्गाच्या तोंडाशी शिवलिंग आहे हे खरे आहे परंतु हा मार्ग पंधराफुट सरळ जाऊन उत्तरेकडे पंधरा फुट गेलेला असून तेथेच संपतो.

४ ) किल्ले जिवधनच्या जुन्नर दरवाजा मार्गाच्या मध्यावर उजव्याहाताला असलेला भुयारीमार्ग.

मी किल्ले जीवधनवर अनेक वेळा गेलो व अनेक वेळा सांगितले जायचे कि हा मार्ग संपूर्ण जीवधन मध्ये अंतर्गत फिरण्यासाठी कोरलेला आहे. परंतु तसे काहीही नसुन तो तीस फुट कोरत नेलेला असुन पुढे दहा बारा फुट आडवा कोरला असून तेथे आराम करण्यासाठी सुविधा केली आहे.

५ ) किल्ले जिवधनच्या जुन्नर दरवाजाच्या जवळ असलेले भुलभुलैया भुयार.

हे भुयार ४० ते ४५ फुट आत खोल असुन पुढे हे भुयार दोन ठिकाणी विभागले असुन तेथे साधारणतः आतमध्ये 20 फुट लांब व दोन फूट रूंदिचा चौकोण तयार करण्यात आला आहे. हे एक भुल भुलैया केला आहे.

६ ) किल्ले जीवधनच्या पुर्व व दक्षिण कोपर्‍यात असलेले भुयार.

हे भुयार ३० फुट लांब असुन हे गाडलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे जाताना विशेष काळजी घ्यावी.

७ ) बोतार्डेगावच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरावरील रांजण मार्ग.

स्थानिक सांगतात की पुर्वी या मार्गाने तांबे गावला जायला आठ दिवस लागायचे. परंतु असे काहीही नसून डोंगराच्या आतून येणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक चाळीसफुट लांबीचा मार्ग तयार झाला असून यात सरपटत पुढे शेवटार्यंत जाता येते. व त्यापुढे टिपटिप पाणी येईल येवढेच छिद्र आहे. या मध्ये प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी कारण खूपच दमछाक होते. नैसर्गिक तयार झाल्याने त्यातएकरूपता नसल्याने किटक व प्राणी असू शकतात.

८ ) किल्ले हडसरच्या पेठेच्या वाडीकडून मध्यभागी जेथे राॅकपॅच सुरू होतो तेथील भुयारी मार्ग.

हा मार्ग गाडवेला असून तो पण ३० फुट आतमध्ये आहे. हे पण भुयार गाडलेल्या स्वरूपात आहे.

९ ) किल्ले शिवनेरीच्या पश्चिम भागातील एक भुयार

हे एक भुयार आहे की हे सपाट भागात आहे. या भुयारात मी जवळपास 100 फुट आतमध्ये गेलो. परंतु श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने या भुयाराच्या शेवटपर्यंत पोहचू शकलो नाही. या भुयाराच्या आत उतरण्यासाठी दोराचा वापर करावा लागतो. प्रथमतः बसुन पुढे सरकत जावे लागते व नंतर सहज उभे राहून जाता येते. हे धोकादायक असल्याने येथील ठिकाण सांगण्यात आले नाही.

१० ) किल्ले चावंड वरील भुयारे

उत्तरेला एक पश्चिम तर एक पुर्व भागात भुयारे पहावयास मिळतात. या दोन्ही भुयारांमध्ये सुंदर अशा पाण्याच्या टाक्या कोरण्यात आलेल्या दिसुन येतात. पश्चिमेकडील भुयार सहज निदर्शनास पडते तर पुर्वेकडील भुयार विस्मृतीत गेलेले दिसते. खरेतर किल्ले चावंडवरील जलसाठा जर विषारी करण्यात आला तर कदाचित अतितातडीची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या दोन मार्गात असलेली असावी असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

परमार्थ मय व्यवहार हो !

दातृत्व शक्तीचे सामाजिक स्थान

कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय आहे ?

1 comment

The Bridge August 26, 2024 at 8:56 AM

याची माहिती भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठान (भारत सरकार) ला देऊन त्यांच्या अन्वेषण टीम च्या द्वारे सुरक्षा तपासणी करून, कठोर नियम बनवावेत.
खरमाळे स्वतः जंगी पलटण चे माजी सैनिक असल्याने भापप्र शी संपर्क आणि सक्षम व्यक्ति म्हणुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading