यंदाच्या निवडणुकीत मनसे स्वबळावर उतरली आहे. मनसेच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी असा रणसंग्राम चालू असताना एकाच वेळी या दोन्ही शक्तींशी त्यांना लढायचे आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांची उमेदवारी मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून जाहीर झाली आणि यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात मनसे आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावणार असल्याचे राज ठाकरेंनी संकेत दिले. मनसेची स्थापना सन २००६ मध्ये झाली तेव्हा या नव्या पक्षाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणात मोठे आकर्षण होते. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते. मनसेला मिळालेल्या यशाने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या सर्वच पक्षांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचे शहरी भागातील मतदारांना आजही आकर्षण आहे. पण २००९ नंतर आजतागायत या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पुन्हा असे यश मिळाले नाही. राज ठाकरे यांच्या सभांना आजही प्रचंड गर्दी जमते. सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नसताही त्यांच्या सभांना लोक गर्दी करतात. मराठी वृत्तवाहिन्या त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण करतात, कारण त्यांच्या भाषणांना टीआरपी मोठा असतो. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचे मतांमध्ये मात्र रूपांतर होत नाही, हेच मनसेचे मोठे दु:ख आहे. सामाजिक प्रश्नांवर सर्वाधिक आंदोलने करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. पण पक्ष संघटना बांधणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि पक्षाची भूमिका वेळोवेळी बदलत असल्यानेच मतदारांचा विश्वास संपादन करण्यात मनसेला अपयश येत असावे.
ठाकरे परिवारातील आता चौथी पिढी सार्वजनिक जीवनात उतरलेली दिसते. स्वत: शिवसेनाप्रमुखांनी शेकडो सामान्य शिवसैनिकांना नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर, मंत्री, केंद्रीयमंत्री केले. मनोहर जोशी व नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसवले. पण स्वत: शिवसेनाप्रमुखांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा सत्तेचे पद स्वीकारले नाही. मनसेप्रमुख राज यांच्याकडे हाच गुण आहे, त्यांनी स्वत: कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.
शिवसेनाप्रमुखांकडे सर्वपक्षीय नेत्यांची ऊठबस असायची, देशातील दिग्गज नेते मातोश्रीवर त्यांना भेटायला यायचे. राज ठाकरे यांचेही शरद पवारांपासून नरेंद्र मोदी-अमित शहांपर्यंत सर्वांशी व्यक्तिगत संबंध आहेत. पण शिवसेनाप्रमुख किंवा मनसेप्रमुखांनी आपल्या विचारांशी कधी तडजोड केली नाही. जे आवडले त्याचे दोघांनी मुक्तकंठाने कौतुक केले पण जे मान्य नाही, त्यावर दोघांनी कठोर प्रहार केले. बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरे यांना गृहीत धरून कोणालाही राजकारण करता आलेले नाही. राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत, असे सांगणारे सर्वच पक्षात अनेक नेते आहेत, पण त्यांना राज यांना गृहीत धरून राजकारण करता आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा आणि दूरदृष्टी याचे राज यांनी अनेकदा कौतुक केले पण त्यांनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयावर कडाडून टीकाही केली होती.
यंदा लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत महायुतीच्या प्रचारासाठी मोठी सभा झाली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना विनाअट पाठिंबा दिला होता. पंतप्रधानांच्या सभेला राज हे व्यासपीठावर होतेच पण मोदींच्या अगोदर त्यांना भाषणाची संधी देऊन भाजपने त्यांचा सन्मानही राखला. मोदींना पाठिंबा देताना त्यांनी जाहीरपणे मुंबई व महाराष्ट्राचे प्रमुख प्रश्न मांडले व निवडून आल्यानंतर मुंबई-महाराष्ट्राकडे लक्ष द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यासपीठावर पंतप्रधानांची स्तुती करणारी नेहमीच भाषणे होत असतात. तुमच्या आशीर्वादानेच सारे काही चांगले घडत आहे, असे व्यासपीठावरील अन्य नेते भाषणातून ठसवून सांगत असतात. पण निवडून आल्यानंतर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा, असे पंतप्रधानांच्या समोर दुसरा कोणी नेता सांगू शकतो का? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी याच सभेत राज ठाकरे यांनी जाहीरपणे पंतप्रधानांकडे केली होती. महिन्याभरापूर्वी केंद्राने निर्णय जाहीर केला तेव्हा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर घाईघाईने येऊन पंतप्रधानांचे अभिनंदन करणारे वेगळेच दिसले…
राज ठाकरे यांचे आक्रमक नेतृत्व व प्रभावी वक्तृत्व यामुळे राजकारणात त्यांचे आकर्षण तरुण वर्गाला मोठे आहे. मनसेच्या स्थापनेला अठरा वर्षे झाली, पण मनसेला अजून बाळसे धरता आले नाही. संघटनेच्या वाटचालीत यशापेक्षा अपयश जास्त आहे. चढावापेक्षा उतारच संघटनेने जास्त अनुभवले. पण राज ठाकरे कधी निराश झाले असे दिसले नाहीत. मी काही कमविण्यासाठी पक्ष काढलेला नाही, मला माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, असे सांगत त्यांनी दि. ९ मार्च २००६ रोजी दादर येथील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा उदय झाला व त्यांचे महत्त्व वाढू लागले तसे राज ठाकरे यांना दूर ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतच हे सर्व घडले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे सन २००३ मध्ये कार्याध्यक्ष झाल्यापासून राज यांना निर्णयप्रक्रियेतून डावलण्यास सुरुवात झाली. २००४ च्या निवडणुकीतही राज यांनी केलेल्या उमेदवारांच्या शिफारसींना जेव्हा डावलले गेले तेव्हापासून त्यांच्यात अस्वस्थता वाढली. शिवसेनेत घुसमट वाढू लागल्यावर, विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असे सांगत ते शिवसेनेतून बाहेर पडले. गेल्या तीन दशकांत शिवसेनेतून छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणेंपासून एकनाथ शिंदेंपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी मातोश्रीचा निरोप घेतला. ते सर्व वेगवेगळ्या पक्षात गेले. सत्तेच्या परिघात त्यांचा राजकीय प्रवास आजही चालूच आहे. पण राज ठाकरे यांनी कोणत्याही दुसऱ्या पक्षात न जाता स्वत:चा स्वतंत्र वेगळा पक्ष स्थापन केला, हे त्यांचे वेगळेपण आहे.
सन २००७ मध्ये मनसेने महापालिका निवडणूक लढवली, यश मिळाले नाही पण मते बऱ्यापैकी घेतली. नंतरचा काळ मनसे विविध आंदोलनामुळे गाजली. रेल्वे भरतीत मराठीला प्राधान्य मिळावे, मराठी चित्रपटांना हक्काचे स्थान मिळावे, शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, मोबाईल व लोकल्स ट्रेनमध्ये मराठीतून सूचना मिळाली पाहिजे, दुकाने व अस्थापनांवर मराठीतून पाट्या लागल्या पाहिजेत, अशा आंदोलनांनी मनेसने मुंबई दणाणून सोडली.
सन २००९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली. मनसेच्या काही उमेदवारांना एक ते दीड लाख मते मिळाल्यावर अन्य पक्षांनाही त्याची दखल घ्यावी लागली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले. ही आजवरची मनसेची सर्वात मोठी कमाई म्हटली पाहिजे. हर्षवर्धन जाधव (कन्नड), उत्तमराव ढिकले व वसंत गीते (नाशिक), मंगेश सागळे (विक्रोळी), प्रकाश भोईर (कल्याण), शिशिर शिंदे (भांडुप), राम कदम (घाटकोपर), प्रवीण दरेकर (मागाठाणे), बाळा नांदगावकर (शिवडी), नितीन सरदेसाई (माहीम), रमेश वांजळे (खडकवासला) अशा आमदारांनी इतिहास घडवला. उत्तमराव ढिकले नि रमेश वांजळे हयात नाहीत, पण मनसेच्या तिकिटावर आमदार झालेले अन्य नेते आज कुठे आहेत, काही वेगळ्या पक्षांत गेले, काही नंतर पुन्हा आमदारही झाले.
सन २०१० मध्ये मनसेला इंजिन हे अधिकृत चिन्ह मिळाले. सन २०१२ मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. नाशिक महापालिकेत मनसेचे ४० नगरसेवक विजयी झाले. नाशिकला महापौर आणि पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून मनसेने स्थान मिळवले. पण २०१४ पासून मनसेचा आलेख घसरत गेला. २०१२ मध्ये रझा अकादमीच्या मोर्चाने आजाद मैदानावर धुडगूस घातला, रस्त्यावरील शेकडो वाहनांची आंदोलकांनी मोडतोड केली, महिला पोलिसांचे विनयभंग झाले. त्यानंतर मनसेने अडीच लाखांचा काढलेला विराट निषेध मोर्चा अजून मुंबईकर विसरलेले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हीडिओ म्हणत व लोकांना पडद्यावर दाखवत सभांचा धडाका लावला होता. पण त्याचा अपेक्षित लाभ मनसेला झाला नाही.
मराठी अस्मिता व मराठी माणसांचे हित हा तर मनसेचा पाया आहे. मोदींचे समर्थन जरूर केले पण न पटणाऱ्या मुद्द्यावर भाजपाला विरोधही केला. मशिदींवरील लाऊड स्पिकर्स हटवा अशी मागणी करण्याची हिम्मत राज ठाकरेच दाखवू शकतात. अंगावर भगवी शाल पांघरून हिंदुत्ववादी प्रतिमाही त्यांनी पुढे आणली. मोदी-शहा यांच्याशी त्यांचे थेट संबंध आहेत. एकनाथ शिंदे व नारायण राणे हे त्यांचे निकटवर्तीय आहेत.
यंदाच्या निवडणुकीत मनसे स्वबळावर उतरली आहे. मनसेच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी असा रणसंग्राम चालू असताना एकाच वेळी या दोन्ही शक्तींशी त्यांना लढायचे आहे. शिवसेना व उबाठा सेनेशी सामना करीत अमित ठाकरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे हे मनसेपुढे आव्हान आहे. विधानसभेत चांगले स्थान निर्माण करणे ही मनसेची कसोटी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.