February 23, 2025
Dr Subhash Athalye who implements the movement for environmental conservation through action
Home » कृतीतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबविणारे डॉ. सुभाष आठले
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृतीतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबविणारे डॉ. सुभाष आठले

निसर्गाशी गप्पा मारा, त्याच्याशी मैत्री करा. तो तुमचा होईल अन् तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. अशी निसर्गाशी मैत्री करणारा अन् मैत्री करायला शिकवणारा प्रेमळ मनुष्य आज सोडून गेल्याचे समजले. थोडावेळ यावर विश्वासच बसला नाही. मग पुन्हा पुन्हा त्याची पडताळणी केली. खरचं वयाच्या ८७ व्यावर्षी डॉ. सुभाष आठले निघुन गेले. आमच्या मनात पर्यावरण संवर्धनाचे बीज रोवणारा एक गुरु आज सोडून गेला याच दुःख आहेच पण आता आपली जबाबदारी वाढली आहे. पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

नव्वदच्या दशकात पर्यावरण संवर्धन हा विषय तसा फारसा महत्त्वाचा वाटत नव्हता. कारण रासायनिक खतांनी उत्पादन वाढते अन् ही काळाजी गरज आहे यामुळे गांडुळ खत हा विषय तसा चेष्टेचाच होता. कोल्हापूरमध्ये आमच्या साळोखेनगर वसाहतीमध्ये प्रयोगपरिवारचे श्रीपाद दाभोळकर राहात होते. ते टेरेसवर गांडूळ शेती करत. साहजिकच घराजवळ राहायला असल्याने त्यांच्याकडे येणे जाणे होत असे. मौनी विद्यापीठामुळे त्यांचा तसा परिचय होताच. वसंत पळशीकरांसह अनेक अभ्यासक विशेषतः पर्यावरण अन् ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे अनेक अभ्यासक त्यांच्याकडे येत असत. त्यामुळे त्याच्याकडे जाणे नेहमीच होत असे. टेरेसवरच गांडूळ शेती करणाऱ्या दाभोळकरांच्या बंगल्याला अनेक अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी भेट देत असत. एकेदिवशी असेच त्यांच्याकडे गेले होतो. त्यावेळी डॉ. सुभाष आठले दाभोळकरांना भेटायला आले होते. अन् तेथे त्यांची ओळख झाली.

बोलता बोलता साधना साप्ताहिकात आलेल्या एका लेखावर या दोघांची चर्चा सुरू झाली. हा लेख कोणाचा होता आता मला आठवत नाही तसे सालही आठवत नाही, पण त्या लेखाच्या संदर्भावरून त्यात दिलेल्या आकडेवारीवरून भारतात शेतीची अशीच परिस्थिती राहीली तर रासायनिक खताबरोबर गायीचे शेणही विकत आणावे लागेल असा दाभोळकर आणि आठले यांचा चर्चेचा विषय होता. त्यावेळी मला उत्सुकता होती साधना साप्ताहिकाची. डॉ. सुभाष आठले यांच्याकडे साधना साप्ताहिक नियमित येते मग काय त्यांच्या घरी जाऊन साधना साप्ताहिक वाचने असा आमचा उपक्रम सुरू झाला. अन् डॉक्टरांची ओळख वाढली.

घरच्या बैठकीत पर्यावरण अन् निसर्गाच्याच गप्पा व्हायच्या. नुसती पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांची ओळख नव्हती तर त्यांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती डॉ. आठले अन् त्याच्या परिवारात होती. शास्त्रोक्त अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे त्यांच्या बोलण्यातून नियमित जाणवायचे. एखाद्या वनस्पतीचे नुसते स्थानिक नाव नव्हेतर त्याचे शास्त्रीय नाव अन् त्याचे महत्त्व जाणून घेणे त्यांना पसंत असायचे. यातूनच ते इतरांनाही तसे प्रबोधन करायचे.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या चळवळीचा तो काळ होता. मेधा पाटकर यांची चळवळ जोर धरू लागली होती. त्यामुळे पुर्नवसनाच्या प्रश्नासह पर्यावरणाचाही गांभिर्याने विचार होऊ लागला अन् पर्यावरणाच्या गप्पा रंगु लागल्या. डॉ. आठल्ये, सुरेश शिपुरकर, शिरगावकर अशी चारपाच मंडळी नियमित सकाळी भेटत असत अन् अशा प्रश्नावर चर्चा करत असत. कधी कधी अशा त्यांच्या बैठकामध्येही आमचे येणे जाणे झाले.

सांगण्याचा उद्देश इतकाच की या नियमित बैठकात ते गांभिर्याने विविध विषयावर प्रबोधनात्मक चर्चा करत असत. आजच्या पिढीत मला याच गोष्टीचा अभाव वाटतो आहे. आजच्या पिढीच्या बैठका होत असतील पण चर्चेचे फलित वादातच अधिक झाल्याचे पाहायला मिळते. ही गोष्ट डॉ. आठले आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून शिकण्यासारखी आहे. मित्र परिवार कसा असावा याचा उत्तम पाठच त्यांनी घालून दिला आहे. चर्चा करायच्या पण त्यातून काहीतरी समाजासाठी चांगले करण्याचा उद्देश असावा. एखादा चांगला विचार रुजवायचा असेल तर तो कसा रुजवायला हवा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकायला हवे.

रानभाज्यांचे महत्त्व हा सुद्धा डॉ. आठले अन् त्यांच्या निसर्गमित्रांचा चर्चेचा विषय असायचा. केवळ चर्चा करून प्रश्न सुटत नसतात तर त्याबाबत योग्य प्रबोधन करायला हवे त्यासाठी कृतीही तितकीच महत्त्वाची आहे असा त्यांचा नियम होता. मग स्वतःपासून त्यामध्ये बदल करणे यावर त्यांचा भर होता. केवळ गप्पातून प्रबोधन नव्हे तर कृतीतून प्रबोधन अन् निसर्गाचे संवर्धन त्यांनी केले. अनेकदा या निसर्गप्रेमींच्या बैठकीतही जाण्याचा योग आला. दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात ही बैठक होत होती. बैठक म्हटल्यानंतर चहापाणी नाष्टा वैगरे असणारच. पण यांच्या बैठकीतला नाष्टा मात्र वेगळाच असायचा. रानभाजांची भाजी किंवा त्यापासून तयार केलेला वेगळा पदार्थ असा मेनू असायचा. रानभाजा फक्त पौष्टिक आहेत असे सांगून नव्हेतर खाद्यपदार्थांच्या कृतीतून सांगण्याची ही पद्धत खरोखरच प्रशंसनीय आहे. एकदा एका बैठकीत नीरफणसाच्या वड्या करून आणल्या होत्या. त्या खूपच चवीष्ट होत्या. रानभाजांचे महत्त्व का मग पटणार नाही तुम्हीच सांगा ?

कृतीतून चळवळीचे विचार राबवणे यावर डॉ. आठल्ये यांचा भर होता. हे त्यांचे विचार नव्या पिढीत चळवळ राबविणाऱ्यांनी घ्यायला हवेत. पर्यावरणाची चळवळ जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायची असेल तर फक्त इव्हेंट करून प्रबोधन होत नाही तर त्यासाठी विचार रुजविणारा उपक्रम राबवायला हवा. तशा बैठका नित्य नियमाने घ्यायला हव्यात. तरच चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. हीच डॉ. आठले यांना खरी आदरांजली ठरेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading