मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – फळाला उत्पन्न करणारे जें कर्म ते जेंव्हा दूर होते, तेंव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळें पूर्ण शांती पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते.
फळाची आशा न ठेवता कर्म करायला हवे. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि संस्कृतीमध्ये हे विचार पटणे जरा कठीणच वाटते. कारण सध्याच्या काळात कोणतेही काम हे फळाची अपेक्षा ठेवूनच केले जाते. पगारवाढ मिळावी, पदोन्नती व्हावी, वरचे पद मिळावे, ही अपेक्षा ठेवूनच आपण काम करत असतो. देशातील कामाच्या अनुभवावर परदेशात मोठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, अशा अनेक फळांची अपेक्षा असते. यासाठीच आपण कर्म करत असतो. अधिक ना मिळावा या हेतूने व्यापारी काम करत असतो. सध्याच्या काळात तरी सर्वत्र हेच सुरू आहे.
फळाच्या आशेनेच प्रगती होत असल्याचे अनेक जण मानतात. यामुळे नव्या पिढीला फलत्याग हा विचार रुजणे जरा कठीण वाटते, पण फळाचा त्याग करूनच कर्म करायला हवे. तसे पाहता ही त्यागी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. ज्यांच्यामध्ये ही त्यागी वृत्ती नसते, तो कर्मातून योग्य लाभ मिळाला नाही तर निराश होतो. यातून तो भरकटतो. आत्महत्या अशा निराशेतूनच होत आहेत. पगारवाढ नाही, योग्य पैसा मिळत नाही, उत्पन्नात घट झाली, मोठा तोटा झाला, पदोन्नती मिळाली नाही, अशा कारणाने निराशा येते.
मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात. यातून नैराश्य येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तर फलत्याग हा सोपा मार्ग आहे. फलत्यागातूनच शांती, समाधान मिळते.
आध्यात्मिक साधना करतानाही फळाची आशा ठेवू नये. साधना करत राहावे. यातूनच पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत करता येते. सोहमवर मन नियंत्रित करण्यासाठी त्यातून काय फळ मिळते म्हणून कर्म करत राहीलो तर काहीच मिळणार नाही. साधनेत मन रमण्यासाठी, आत्मसंतूलन साधन्यासाठी फळाचा त्याग करूनच, तो विचार सोडूनच कर्म करत राहील्यास निश्चितच आत्मज्ञानाचा, परमशांतीचा लाभ होऊ शकतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.