February 22, 2024
Uses of eggshell research article
Home » अंड्याच्या कवच्याचे उपयोग
संशोधन आणि तंत्रज्ञान

अंड्याच्या कवच्याचे उपयोग


जगात सर्वाधिक अंडी उत्पादन हे चीनमध्ये होते. 2018 मध्ये चीनमध्ये 458 अब्ज अंड्याचे उत्पादन झाले. त्या खालोखाल संयुक्त राष्ट्रामध्ये 109 अब्ज तर भारतात 95 अब्ज अंडी उत्पादन झाले. याचा विचार करता अंड्याच्या कचराही भावी काळात मोठी समस्या होऊ शकते. 2017 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्याच्या कवच्याचा कचरा तयार होतो. संयुक्त राष्ट्रात 1,50,000 टन तर इंग्लडमध्ये 1,10,000 टन इतका अंड्याच्या कवच्याचा कचरा तयार होतो. या कवच्याचे विघटन योग्य प्रकारे न झाल्यास यापासून दुर्गंधी उत्पन्न होते. तसेच आरोग्यासही अपायकारक ठरू शकते. यासाठी या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने काही संशोधकांनी याचे उपयोग शोधून काढले. यासंदर्भात रिसर्च गेटमध्ये तेहरान विद्यापीठातील एच. फरीदी व अकबर अरबहोस्सीनी याचा आणि अमरनाथ येरनमला यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याचे उपयोग विचारात घेता भावी काळात यातून नव्या उद्योगांची निर्मिती करता येणे शक्‍य आहे. याचे औद्योगीक वापर विचारात घेता हा कचरा नव्हे तर हे सोने ठरू शकते.यासाठी कचऱ्याकडे आता पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. असा बदल झाल्यास कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनातून नवनिमिर्ती होऊ शकते.

अंड्याच्या कवच्यातील रासायनिक घटक –

कॅल्शियम कार्बोनेट – 94 टक्के
मॅग्नेशियम कार्बोनेट – 1 टक्के
कॅल्शियम फॉस्फेट – 1 टक्के
सेंद्रीय पदार्थ – 4 टक्के

संशोधकांनी शोधलेले कवचाचे उपयोग –

  • कवच हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असल्याने त्याचा वापर खत, जनावरांच्या खाद्यातील घटक म्हणून केला जातो.
  • अमु यांच्या संशोधनानुसार कवच्याची पावडर धारक क्षमता वाढवत असल्याने जमिनीची प्रत सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
  • ए. जे. ओलरेवाजु यांच्या संशोधनानुसार रस्त्यांच्या निर्मितीमध्ये मातीचे स्थिरिकरण करण्यासाठी उपघटक म्हणून कवच उपयुक्त ठरते.
  • बायोडिझेल उत्पादन करताना होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी अंड्याचे कवच घन उत्प्रेरक म्हणून वापरण्यात येते. तसेच बायोडिझेलचा उत्पादन खर्चही कवच्याच्या वापरामुळे कमी होतो.
  • प्रदुषित पाण्यातील पर्यावरणास हाणी पोहोचवणारे जड धातू शोषण्यासाठी अंड्याच्या कवचांचा वापर करता येतो.
  • हाडातील उती पुर्नस्थापित करण्यासाठी बायोमटेरियल म्हणून कवचांचा उपयोग होतो.
  • अंड्याच्या कवचापासून हायड्रोझायपेटाईट प्रक्रियेतून कृत्रिम हाडांची निर्मितीही शक्‍य आहे.
  • अंड्याचे कवच म्हणजे CaCo3 याचा Tio2 शी संयोग करून CaTiO3 मिळवता येऊ शकते. याचा उपयोग न्युक्‍लिअर कचऱ्यावरील प्रक्रियेत करता येतो.
  • महिलांना आवश्‍यक कॅल्शियमचा पुरवठा करणारी गोळी तयार करण्यासाठी. CIPCAL-500 ला पर्याय ठरणाऱ्या गोळीसाठी कवचाचा वापर.

अंड्याचे कवच खत म्हणून…

अंड्याचे कवच हे कॅल्शियम कार्बोनेटचा उत्तम स्त्रोत आहे. अन्य नैसर्गिक स्त्रोतापेक्षा कवचापासून मिळणाऱ्या कॅल्शियममध्ये विषारी घटकांचे प्रमाण कमी असते. कवचापासून तयार केलेले खत जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक चुनखडीच्या साठ्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदतगार ठरू शकते. हे खत ब्लासुम इन्ड रॉट (बीईआर) रोगाची तिव्रता कमी करण्यास उपयुक्त ठरते.

बायोडिझेल उत्पादनासाठी उपयुक्त –

बायोडिझेल उत्पादनासाठी एकजिनसी उत्प्रेरकचा वापर करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे उत्प्रेरक स्वतंत्र करण्याच्या प्रक्रियेसाठी उच्च तापमान लागते. यामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या उद्भवू शकते तसेच झिज होण्याचा धोकाही असतो. बायोडिझेल उत्पादनात भेडसावणारी ही समस्या विजातीय उत्प्रेरकांच्या वापरामुळे सोडवता येते. अंड्याच्या कवचामध्ये असणाऱ्या अंतर्गत छिद्र रचनेमुळे तसेच सर्वाधिक कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रमाणामुळे यापासून विजातील उत्प्रेरक म्हणून वापर करणे शक्‍य झाले. या उत्प्रेरकांची झिज होत नाही. त्याचा पुर्नवापरही शक्‍य आहे व शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत सहजपणे स्वतंत्र होऊ शकते.

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी

औद्योगिक प्रक्रियांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. जड धातूंच्यामुळे ते पाणी शुद्ध करण्यातही अनेक अडचणी उद्भवतात. अशा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोळशाची पावडर, भुसा आदीचा वापर करण्यात येतो. यामध्ये आता अंड्याच्या कवच्यांचाही वापर करून पाण्यातील जडधातू वेगळे करता येतात. अंड्याचे कवच उत्तम अधिशोषक असल्याने प्रदुषित सांडपाण्यातून हायड्रोजन सल्फाईड काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. यासाठी अंड्याचे कवचाची भुकटी करून 800 अंश तापमानाला दोन तास ठेऊन त्याचे कॅल्शिफिकेशन करण्यात येते. तसे नैसर्गिक अंड्याच्या कवच्यामध्ये कॅडमियम, क्रोमियम, लिड वेगळे करण्याचे गुणधर्म आहेत. कॅलशिन्ड अंड्याचे कवच सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पामध्येही वापरण्यात येते.

कृत्रिम हाडांच्या निर्मितीसाठी उपयोग

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. देवेंद्र एस. भांगे यासंदर्भात म्हणाले, अंड्याच्या कवच्यापासून तयार केलेल्या पावडरमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा भरपूर असते. ही पावडर तापवल्यानंतर त्याचे कॅल्शियम ऑक्‍साईडमध्ये रुपांतर होते. कॅल्शियम ऑक्‍साईड, ईडीटीए ह्या रसायनाबरोबर अभिक्रिया करून शुद्ध रुपात आणले जाते. योग्य प्रमाणात फॉस्फेटबरोबर अभिक्रिया करून हे कॅल्शियम हायड्राक्‍सी ऍपेटाईट रुपात आणले जाते. याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, कृत्रीम हाडांच्या निर्मितीसाठी, हाडांची वाढ होण्यासाठी पुरक म्हणून केला जातो. कवच्यापासून कृत्रिम हाडांच्या निर्मितीसाठीचे पेटेंट पेरियार विद्यापीठ व एसआयबीएआर इन्सिट्यूट ऑफ डेंटल सायन्स, गुटूंर यांनी मिळवले आहे. अंड्याच्या कवचाचा उपयोग सिमेंट निर्मितीसाठी सुद्धा केला जाऊ लागला आहे. सिमेंटमध्ये असलेले कॅल्शियम ऑक्‍साईड अंड्याचे कवच 850 सेल्सिअस तापवून मिळवले जाते.

Related posts

निर्णय घेण्याची संधी दिल्यास विचारांना मिळते चालना

शारीरिक तप भरास येण्यासाठी…

उसाची कणसे निरूपयोगी…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More