ज्ञानेश्वरांच्या काळाचा विचार करता. त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. बहुजनसमाजही या ज्ञानाचा हक्कदार व्हावा ही तळमळ त्यांच्यामध्ये दिसते. हे ज्ञान हे समस्त मानवासाठी आहे. यासाठी ते जगभर पोहोचले जावे असेही त्यांना वाटते. यासाठी त्यांनी जग या ब्रह्मज्ञानाने भरून टाकण्याचे स्वप्न पाहीले. तशी प्रार्थना ते गुरुंजवळ करत आहेत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
इये मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।
घेणें देणें सुखचिवरी । हों देई या जगा ।। १६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणें देणें होऊं दे.
मऱ्हाठियेचिया नगरी याचा अर्थ मराठी भाषेच्या गावात असा अर्थ बऱ्याच अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी केला आहे. पण केवळ मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञान उपलब्ध व्हावे असे ज्ञानराजांचा म्हणायचे नाही. हे लक्षात घ्यायला हवे. ज्ञानराजांना तर विश्वची माझे घर करायचे आहे. या संपूर्ण विश्वात, या जगात ब्रह्मज्ञानाचे सुख उपलब्ध करून द्यायचे आहे. यामुळे मऱ्हाठियेचिया याचा अर्थ व्यापक अर्थाने घेणे आवश्यक आहे. माचणूरचे संत बाबा महाराज आर्वीकर यांनी मऱ्हाठियेचिया या शब्दाचा विवेक सुलभ भाषा असा आहे असे मत मांडले आहे. मराठी वा कानडा हे शब्द स्थान वा देश निर्देश करणारे नसून गुणवाचक आहेत, असेही त्यांनी नमुद केले आहे. आर्वीकर यांच्या मते, अभंगातील कानडा हा विठ्ठलु, कानडिया विठोबा इत्यादि उल्लेख ‘कळावयास कठीण वा जो आकलन होणे दुर्लभ आहे असा’ या अर्थाने झाले आहेत. म्हणूनच त्याविरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे कळावयास सुलभ असा मऱ्हाठी या शब्दानें भावार्थ प्रकट होतो, असे मत मांडले आहे.
ज्ञानेश्वरीतील विचार हे व्यापक अर्थाने घेणे आवश्यक आहे. विश्वभारती, आंतरभारती या संकल्पनाही व्यापक अर्थाने घ्यायला हव्यात. राष्ट्रनिर्मितीसाठीची, राष्ट्रीय एकात्मतेसाठीची बीजे या संकल्पनेमध्ये आहेत, हे विचारात घ्यायला हवे. सध्या प्रांतिक वाद आहेत. भाषिक वाद आहेत. पण जागतिकीकरणाचा विचार करून या वादावर पांघरून घालून आंतरभारती, विश्वभारती विचारांची कास घरायला हवी. ज्ञानेश्वरीतील विश्वव्यापक विचार जगभरात पोहोचवायला हवा. अशा अर्थाने राष्ट्र उभारणी करायला व्हावी. संस्कृतमध्ये कडीकुलपात बंद करून ठेवलेले, संस्कृतभाषानिष्ठ लोकांची मक्तेदारी होऊन बसलेले हे ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी, बहुजन समाजासाठी उघड करून सांगितले. सर्वसामान्यांच्या बोलीत, त्यांना हे तत्त्वज्ञान सहज आकलन होईल अशी उदाहरणे देऊन हे ज्ञान सर्वांसाठी, मानवासाठी उपलब्ध करून दिले.
ज्ञानेश्वरांच्या काळाचा विचार करता. काहींची मक्तेदारी होऊन बसलेले हे ज्ञान त्यांनी सर्वांसाठी खुले केले. त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. बहुजनसमाजही या ज्ञानाचा हक्कदार व्हावा, ही तळमळ त्यांच्यामध्ये दिसते. हे ज्ञान हे समस्त मानवासाठी आहे. यासाठी ते जगभर पोहोचले जावे असेही त्यांना वाटते. यासाठी त्यांनी जग या ब्रह्मज्ञानाने भरून टाकण्याचे स्वप्न पाहीले. तशी प्रार्थना ते गुरुंजवळ करत आहेत. विश्वाच्या कल्याणाचा व्यापक विचार ज्ञानेश्वर महाराज करतात. मग ते केवळ मराठीतच बंदीस्त करून का ठेवावे बरे ? ते ज्ञान जगभर पोहोचेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न मात्र प्रथम करायला हवा. आत्मज्ञानाबरोबरच ज्ञानेश्वरीत शिक्षण विचार आले आहेत. खगोलशास्त्र, आयुर्वेद, वनस्पती, शेती विषयक उदाहरणातून विज्ञानही आले आहे. मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाने मोठी प्रगती साधली आहे. पण प्रत्यक्षात ही प्रगती सुखकारक आहे, की दुखकारक आहे हे पाहणे गरजेचे आहे. कारण सृष्टीमध्ये सुखाबरोबरच दुःखही येते. पावसाने पाण्याचा सुकाळ होतो. पण त्याबरोबर येणाऱ्या पुराने घाणीचे दुःखही वाहून येते. हे आरोग्यासाठी घातक असते. यापासून संरक्षणासाठी प्रयत्न करावे लागतात. सध्याची प्रगती ही अशीच आहे. सुखाबरोबर दुःख देणारीही आहे. पण ज्ञानेश्वरांना केवळ सुखाचा सुकाळ हवा आहे. दुःख देणारे सुख नको आहे. ब्रह्मज्ञानाने हे जग सुखी करायचे आहे. यासाठी त्यांचा हा विचार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये शांतीचा विचार आहे. तृप्तीचा विचार आहे.
विज्ञानाच्या ज्ञानाने इंग्रजी भाषा जगभरात परिचयाची झाली. मग आपल्याकडे असणाऱ्या ब्रह्मज्ञानाच्या ठेव्याने मराठी जगभरात का परिचयाची होणार नाही ? मराठीतील हा तत्त्वज्ञानाचा विचार, ब्रह्मज्ञानाचा विचार जगातील अन्य भाषेत झाल्यास ज्ञानेश्वरांचे ब्रह्मज्ञानाचे सुकाळ करण्याचे स्वप्न जगभर पोहोचेल. यासाठीच हा विचार सुलभ भाषेत त्यांनी मांडला आहे. जगभरातील अन्य सुलभ भाषेत तो मांडला जावून जग ब्रह्मज्ञानाने सुखी व्हावे, हेच ज्ञानेश्वरांचे स्वप्न आहे. मानवाला समजण्यासाठी सोप्या असणाऱ्या सर्व भाषात हे तत्वज्ञान यासाठीच मांडले जावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.