मुलं शिकली पाहिजेत पण सारं विनासायास नको. आज पुस्तक वाटताना बालपण आठवलं, आमच्या बालपणात फुकट काही मिळत नव्हतं. जुनी पुस्तकं निम्या किमतीत किंवा पाऊन किंमतीत विकत घ्यायची. यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप काम करायचो.
रवी राजमाने, ravirajmane51@gmail.com
7709999860
अलीकडच्या काही शैक्षणिक वर्षात मुलांना भरभरून मोफत पाठ्यपुस्तक मिळतात. पहिल्याच दिवशी मिळणाऱ्या पुस्तकांनी मुलं हरखून जातात. आणि मोफत गणवेश मिळाला तर तुपात साखर… आणि एखाद्या राजकारण्याने सायकल दिली तर विचारूच नका मज्जाच… मज्जा.. नाहीतर खाजगी शाळांची गाडी दारापर्यंत येते. अगदी कोपऱ्यापर्यंत ही कुणाला चालू वाटत नाही.
सोपं झालय सगळं. श्रमाची सवयच नको. सार काही सहज साध्य व मोफत हव. त्यात मुलांचा दोष नाही म्हणा. मुलं शिकावीत मोठी व्हावी ही भावना सरकारची असावी, कदाचित सामाजिक न्यायाचा भाग असावा. पण एवढ सर्व देऊनही मुलं अस्खलितपणे वाचू शकत नाहीत. वळणदार लिहू शकत नाहीत. प्रयत्न एकट्या दुखट्याचा नसावा सार्वजनिक व सामाजिक जबाबदारी आहे सर्वांची.
मुलं शिकली पाहिजेत पण सारं विनासायास नको. आज पुस्तक वाटताना बालपण आठवलं, आमच्या बालपणात फुकट काही मिळत नव्हतं. जुनी पुस्तकं निम्या किमतीत किंवा पाऊन किंमतीत विकत घ्यायची. यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप काम करायचो.
पानंदीला खूप मोठी करंजीची झाड असायची. ठिक्क- ठिक्क करंज्या गोळ्या करायचो. त्या फोडायच्या व बुधवारच्या बाजारात चार रुपये किलोने विकायच्या. हे काम महिनाभर चालायचं, एरंड्या फोडून बिया काढून विकायच्या. शंभर दीडशे रुपये साठले की पुस्तक घ्यायची. हुशार मुला मुलींची पुस्तक जबाबदारीने वापरलेली असायची. पुस्तक चांगली मिळाली की कुठ ठेवू आणि कुठ नको असं वाटायचं. पहिल्याच दिवशी पुट्टा घालायचा. बाभळीच्या झाडावर चढून काढलेल्या डिंकाने तो व्यवस्थित चिकटवून घ्यायचा.
वह्या घ्यायला पैसे नसायचे मग जुन्या वहीतली पानं काढून मोठी वही बाइंडिंग करून आणायची. वर्षभर कितीही उदाहरणसंग्रह सोडवा वही संपायचीच नाही. पेन्सिल, खोड रबर, पट्टी, खूप जपून वापरायची. दहावीला जाईपर्यंत फुल पॅन्ट मिळत नव्हती अर्धी खाकी चड्डी रफू केलेली. पायात चप्पल नसायचं पण शिकायच मोठ व्हायची आस होती.
शाळा बुडवन, उतारा न काढणं हे शब्दही शब्दकोशात नव्हते. गुरुजींच्या, सरांच्या बद्दल प्रचंड आदर होता. मराठीची कविता, धडे तोंडपाठ होते. देशभक्तीपर गाणी शाळेबरोबरच गल्लीत घुमायची. सावधान, विश्राम, दहिने बाहे, पीछे, तेज चल, अंगात उत्साह संचारायचा. मुलांच्या निखळ मैत्री असायची. आता सारखी गर्व, अस्मिता, अभिमान कुठेच नव्हता. शाळा, पाटी, पुस्तक, मित्र, दप्तर, वही, पेन, पास, गृहपाठ वही याशिवाय कुठला विषयच नसायचा. रात्रंदिवस पुस्तकात हरवून जायचं.
पण आता या मिळणाऱ्या नव्या पुस्तकात मुलं हरवल्यासारखी दिसत नाहीत. मुलांना पुस्तक वाटताना मी मात्र माझ्या बालपणात पुस्तकात उगाचच हरवून गेलो.
रवी राजमाने
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.