आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे मुलभूत ज्ञानाने/विज्ञानाने पुरवलेल्या भरभक्कम पायाचा आधार आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. शिवाय त्या मुलभूत ज्ञानाला उपयोजित ज्ञानात बदलवणाऱ्या आणि मानवी जीवन सुखकर करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.
संजय सोनवणी
सध्या अभ्यासक्रमातून सध्याच्या संघी विचारसरणीच्या लोकांना अमान्य असणारा इतिहास वगळण्याची प्रक्रिया सुरु आहे. याविरुद्ध विवेकी नागरिक आवाज उठवत आहेतच. सरकार आपले मत रेटून नेण्यात वाकबगार असल्याने तो आक्रोश हवेत विरून जाईल हेही स्पष्ट आहे. मुळात कोणाचाही इतिहास हा एक प्रकारे जागतिक इतिहास असतो आणि सारे इतिहास हातात हात घालून चालत असतात. एखादी कडी वगळली किंवा त्या इतिहासाच्या कडीचे स्वत:ला हवे तसे चित्रण केले म्हणजे स्वत:च्या खोट्या अस्मितांचा इतिहास लिहिला गेला आहे आणि तो विद्यार्थ्यांवर लादत स्वानुरुप पिढी बनवता येते हा एक भ्रम आहे. मुळात शिक्षण म्हणजे काय आणि ते का आणि कशासाठी द्यायचे असते याचे भान भारतीयांना कधीही नव्हते असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रतीभेचे नागरिक क्वचित घडवता आले आहेत.
शिक्षण हे प्रगल्भ, विवेकी, कल्पक, उद्यमी आणि भविष्यवेधी नागरिक घडवण्यासाठी असते. मानवाच्या जीवनातील शारिरिक कष्ट कमी करुन त्याचे जीवन अधिकाधिक सुखकर कसे बनेल यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणारे व त्यातून संपत्तीनिर्मिती व अर्थार्जन करणारे नागरिक निर्माण व्हावेत हा शिक्षणाचा व्यावहारिक उद्देश्य झाला. तो महत्वाचा आहेच. प्रत्येक व्यक्ती ही अंतत: भांडवलदारच असते. श्रम, बौद्धिक क्षमता, कल्पकता, ज्ञाननिर्मितीच्या क्षमता हे त्याचे प्राधान्यक्रमाचे भांडवल असते. या अमूर्त भांडवलाला प्रत्यक्ष म्हणजेच मुर्त भांडवलाची आवश्यकता असते हे काही प्रमाणातच खरे असते. मुर्त भांडवलाच्या अभावात अथवा कमतरतेतही ते निर्माण करता येऊ शकते. पण अमूर्त भांडवलाच्या अभावात मूर्त भांडवल उभे राहत नाही. भांडवल त्यालाच म्हणायचे जे अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी पायाभूत ठरते. हे व्यावहारिक उद्देश्य झाले. पण त्याहीपलीकडॆ ज्यामुळे मानवी ज्ञानाच्या, विचारांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावतील अशी निर्मिती करण्याची योग्यता असलेले नागरिकही निर्माण करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू झाला.
साधनस्त्रोत वा आर्थिक भांडवल व त्याची निर्मिती हे दुय्यम असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे. प्रगल्भ व कल्पक नागरिकांच्या अभावात आर्थिक भांडवल अथवा साधनसंपत्ती कितीही असली तरी उपयुक्त संपत्तीची निर्मिती होणार नाही. संपत्ती येथे पुन्हा मूर्त आणि अमूर्त या आधारावर मोजली पाहिजे. ते मोजण्याचे मापदंड अथवा त्याचे (व्यवहारात निरुपयोगी असले तरी) एक चलन असले पाहिजे. त्याखेरीज आपण कोठे आहोत याचे भान येणार नाही हे निश्चयाने समजावून घ्यावे लागणार आहे.
आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे मुलभूत ज्ञानाने/विज्ञानाने पुरवलेल्या भरभक्कम पायाचा आधार आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. शिवाय त्या मुलभूत ज्ञानाला उपयोजित ज्ञानात बदलवणाऱ्या आणि मानवी जीवन सुखकर करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. व्यापारी/उद्यमी/सेवक वर्गाने ते सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान उपयुक्त स्वरुपात पोहोचवले त्याचेही योगदान विसरता येणार नाही.
या सर्वांनी मिळून आजची व्यवस्था बनवली आहे. राज्यव्यवस्था त्यात कधी प्रोत्साहनात्मक तर कधी अवरोधात्मक भूमिका बजावते. किंबहुना भांडवल निर्मिती होणार की नाही हे शासकीय धोरण ठरवते. शासन कोणती विचारधारा पाळते यावर ते अवलंबून असते. म्हणजे शासनही कधी भांडवलदार बनून जाते तर कधी भांडवल निर्मितीला खिळ घालते. दुर्दैवाने सध्याचे सरकार या प्रक्रियेत अवरोध आनंयाचेच कार्य करत आहे हे लक्षात येईल.
प्रत्येक व्यक्ती भांडवलदार आहे आणि त्याची निर्मिती हे त्याच्या भांडवलाची उपज आहे हा विचार आम्हाला सुचलेला नाही. शिक्षण हे व्यक्तीच्या ज्ञानात्मक भांडवलात भर घालणारे असले पाहिजे हे आम्ही समजावून घेतलेले नाही. अमूर्त भांडवल हेच श्रेष्ठ भांडवल आहे हे आम्ही ओळखलेले नाही. भांडवलाची अधिकाधिक निर्मिती प्रत्येक भांडवलदार म्हणजे प्रत्येक व्यक्ती करू शकते याची जाणीव नसल्याने आमची शिक्षणाची रचना फसलेली आहे.
मानवाच्या मनाच्या जाणीवा, विचार, ज्ञानाच्या कक्षा आणि दिशा रुंदावणारे नवे ज्ञान निर्माण करणारे, मूळ भांडवलाचे स्त्रोत निर्माण करणारे, व्यवहारात त्यांच्या निर्मितीला तसे दुय्यम स्थान असणारे दिशादर्शी समाजाला आवश्यक असतात. आज आम्ही ही निर्मिती समाजावरच ऐच्छिकपणे सोडून दिली आहे. भारतात तत्वज्ञान हा विषय सर्व महाविद्यालयांत शिकवला जातो. पण आम्ही किती नवतत्वज्ञान सांगणारे अथवा जुन्याच तत्वज्ञानाचा नवीन दिशादर्शी विकास करणारे तत्वज्ञ निर्माण केले हे पाहिले तर निराशाच पदरी येईल. तीच बाब शास्त्राची. तीच साहित्याची आणि कलांची.
मानवी मन सृजनात्मक होण्याची प्रक्रिया जेथे अडखळू लागते, थांबते तेथे समाजाचा मृत्यू जवळ आलेला असतो. समाज झोंबीप्रमाणे उथळ भावनोद्रेकांत व्यस्त होऊ लागतो. येथेच मुर्त – अमूर्त भांडवलाची निर्मिती खुंटते आणि तो समाज वेगाने दिवाळखोरीकडॆ वाटचाल करू लागतो.
प्रत्येक व्यक्तीत एक विशिष्ट अमूर्त भांडवल दडलेले असते. ते बाहेर काढणे व त्यालाच अधिक संस्कारित करत व विकसनशील बनवत त्यातील उच्च दशा गाठायला सहाय्य करणे हा शिक्षणाचा मुलभूत उद्देश हवा. ज्या देशात अशा भांडवलदारांची अधिकाधिक निर्मिती होते तोच देश अथवा समाज ऐहिक आणि बौद्धिक भांडवलाने ख-या अर्थाने समृद्ध आणि प्रगत होऊ शकतात.
श्रम हे भांडवल आहेच पण त्या भांडवलाचीही बौद्धिक भांडवलासारखीच दशा आहे. त्याचे मूल्य काय आणि ते कसे ठरवायचे याचे उत्तर उपयोगितेनुसार व मागणी-पुरवठ्यातील असमतोलानुसार दिले जाते. पण यात गफलत आहे. तत्कालची उपयोगिता आणि भविष्यातील उपयोगिता याचा परस्परसंबंध निशित करता यायला हवा. त्यामुळे उपयोगितेचा सिद्धांत पुन्हा एकदा तपासून नव्याने त्याचे रचना करायला हवी.. त्याच वेळीस श्रमिकाला त्याच्या भांडवलाचे उन्नयन करण्यात कोणत्या सामाजिक/राजकीय/शैक्षणिक अडचणी आहेत यावर विचार झाला पाहिजे. उदाहणार्थ शेती-कामगारही श्रम-ज्ञान भांडवल वृद्धींगत करू शकतो. त्याला शाळेतच जायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पण तशीही व्यवस्था आमच्या शिक्षणपद्धतीत आहे काय हा एक प्रश्नच आहे. शिक्षणाच्या आणि दृष्टीकोनाच्या अभावात कोणतेही कौशल्य आणि व्यक्तीच्या भांडवलात भर पडणार नाही, त्यांची एकुणातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढणार नाही. शिस्तबद्ध धोरणाच्या अभावात प्रत्येकाचे उपजत भांडवल, कोणत्याही क्षेत्रातील असले तरी, ते अनुत्पादक किंवा तोट्याचे ठरणार हे उघड आहे. म्हणजेच व्यक्तीचे उपजत भांडवल वाढवत नाही, किंबहुना त्याचा संकोच करत शेवटी मारून टाकते ती शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे हे उघड आहे. खरे तर या दिशेने विचार होणे आवश्यक आहे. इतिहास बदलून राष्ट्रोपयोगी पिढी तयार होऊ शकत नाही!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.