‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वत:ची शैली निर्माण करणारा, सगळं हलाहल पचवत वाचकांना अस्सल तेच देणारा हा ताकदीचा कवी आहे.
ऐश्वर्य पाटेकर
समकाल अनेक व्यथांनी आणि समस्यांनी ग्रासलेला तर आहेच, शिवाय माणसाच्या माणूसकी हरवल्याच्या कितीतरी घटना आसपास घडताहेत. मूल्यांची अतोनात पडझड सुरु आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात गावगाडा चिणून गेला आहे. सत्वाचा र्हास झाला आहे. या आणि अशा अनेक अनिष्ट गोष्टींनी भवताल ग्रासलेला असताना, आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग दूर जाण्याच्या पार्श्वभूमीवर कवी प्रशांत केंदळे यांची कविता निसर्गाचे विविध विभ्रम मांडून मनाला आल्हाददायक गारवा देणारी आणि मनाला थंडावा देणारी आहे. निसर्गाच्या सन्मुख घेऊन जाणारी आहे. त्यामुळे मला या कवितांचं खूप मोल वाटतं आहे.
‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वत:ची शैली निर्माण करणारा, सगळं हलाहल पचवत वाचकांना अस्सल तेच देणारा हा ताकदीचा कवी आहे. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही आघाड्यावर भक्कम राहत ‘कवितेसाठी जगलो तेव्हा कवितेनेही मला जगवले’ अशी कृतार्थतेची, कृतज्ञतेची भावना जपणार्या मोजक्या कवीत प्रशांत यांचा समावेश करावा लागेल. संत कवी, तंत कवी आणि पंत कवी या परंपरेनंतर आधुनिक मराठी कवितेची नेमकी दिशा काय आहे आणि तिचं सामर्थ्य कितपत आहे, पडताळून पहायचं असेल तर प्रशांत केंदळे यांचा ‘गुलमोहराचं कुकू’ हा कवितासंग्रह एक उत्तम प्रमाण आहे’’ अशी घनश्याम पाटील यांची पाठराखण निश्चितच सार्थ ठरविणारी कवी प्रशांत केंदळे यांची कविता आहे.
प्रशांत केंदळे यांच्यातील माणसाने ग्रामीण कृषीवलाचं जगणं त्याच्या व्यथा, वेदना आणि असंख्य समस्या या स्वत: भोगलेल्या आहेत. हे त्यांच्या कवितेतून पाझरलं आहेच पण त्या व्यथा वेदनांचं बिलकूल भांडवल त्यांनी केलेलं नाही. ते दु:ख त्यांच्या कवितेच्या तळाशी ठेऊन त्यावरच त्याच्या भोवतालच्या निसर्गाच्या कळा त्यांनी लयीत घेऊन कवितेला निसर्ग प्रतिमांच्या कशीद्यात गुंफलं आहे. तो कशिदा इतका मनोहारी आहे की कवीच्या दु:खभोगाकडे सहजी आपला कानाडोळा होतो. कवितासंग्रहाचं शीर्षक ठरलेली ‘गुलमोहराचं कुकू’ ही इतकी नितांत सुंदर निसर्गकविता आहे. खरंतर मी तशी तुलना करायला नकोय पण प्रशांत केंदळे यांच्यातील वास्तवाला धरून निसर्गाची पखरण करत जाणारा कवी मला सांगायचा आहे. इथे बालकवींच्या ‘फुलराणी’ कवितेचा संदर्भ मला मुद्दाम आठवतो. तो एवढ्याचसाठी की बालकवीची कविता निखळ निसर्गकविता आहे. तसं ‘गुलमोहाराचं कुकू’ ही कृषिवलाच्या आयुष्यात पावसाचे काय महत्त्व आहे हे अधोरेखित करते. ही कविता प्रथमदर्शनी प्रेमकविता भासेल पण ती नुसतीच प्रेमकविता नाहीये. कवितेला आशयाची अशी डूब आहे की हिच्या मुळाशी कृषीवलाचं जगणं आहे. तो पावसाच्या भरवशावर पेरून देतो. तो आला तर समृद्धी नाही तर वर्षभराची उपासमार. म्हणून हे कृषीवलासाठी पावसाचं आळवणी गीत ठरलेलं आहे.
कधी पावसा मातीला फारकत नको देऊ
तिच्या आधाराला राहो तुझे आभाळाचे बाहू
सूर्य लावील नादाला तुला बोलवील वर
तरी पावसा तू तव्हा सोडू नको रे संसार
गुलमोहराचं कुकू तुझं ठरू दे रे खरं
या ओळीच इतक्या बोलक्या आहेत की शेवटचं वास्तव सांगून जातात. समृद्ध निसर्ग मांडणारा हा कवी म्हणूनच मला खूप निराळा वाटतो. ज्याला मातीच्या आतड्याचा पीळ उमगला आहे..
ऊन वाढत जाताना
आटत जातं तळ
मला मातीच्या आतडीचा
कळू लागतो पीळ
एका बाजूला या कवीला निसर्गाचे विभ्रम खुणावतात अन दुसर्या बाजूला आयुष्यातील रखरखित वास्तव. म्हणूनच कवी वास्तवावर निसर्गाची शाल धीमे धीमे पांघरवत नेतो. यासाठी प्रेमाचं हलकंफुलकं गाणं तो गात बसत नाही. तो कवितेला खोल आशयाची अशी डूब देतो की रसिक आपोआपच तल्लीन होऊन जातो. ‘कवितेने माझ्या’ या कवितेची सुरुवात जेव्हा कवी करतो तेव्हा आपल्याला असे वाटून जाते की एखाद्या प्रेयसीचं वर्णन तिच्यात आलं असावं. ती वाचून संपली की लक्षात येतं की अरे ही तर कवितेसाठीची कविता आहे. ती मुद्दाम इथे ठेवतो,
ती हसावी जराशी आम्रतरू मोहरावा
ती लाजावी अशी की गहू शहारून जावा..
अशी सुरुवात कवी जेव्हा करतो अन शेवटाकडे आपल्याला घेऊन जातो
पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी
कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी द्यावी
खरं तर माझ्या या विवेचनासाठी सपूर्ण कविताच इथे देण्याचा मोह होता पण तो टाळावा लागतोय. आपण ती नक्की अभ्यासावी. तिच्यात निसर्गप्रतिमांची जी पेरणी कवीने केलीय ती अतिशय लाजवाब आहे. कवी वास्तवाचा विस्तव जरी समोर ठेवत असला तरी त्याचा आशावाद अतिशय चिवट आहे. नाही असं नाही त्याच्यातला कृषीवल हतबल होतो. प्राप्त परिस्थिती समोर हातही टेकतो पण त्याची आळवणी त्याच्यातली सकारात्मकता दर्शवते.
दुष्काळाची दैना
सारी ही सरू दे
कुणब्याला स्वप्न
हिरवं पेरू दे
पदरात टाक
पावसाचे मोती
भरू दे आभाळा
धरणीची ओटी..
चारविभागात विभागलेला ही संपूर्ण कवितासंग्रहच मला खूप मोलाची भासला. कवी आणि रान आणि रानाचा साज गाणारा हा कवी खरोखरच रानकवी आहे. रानाला आपल्या शब्दकळेनं त्यानं असं काही पेश केलं की वास्तवाची खंजिरी हातात घेऊन रानाच्या निसर्गाचा पोवाडा गाणारा तो शाहीर ठरला आहे. शब्दांचं निराळेपण आहे. त्यास भाषेचा गोडवा आणि वेगळ्या प्रतिमांची साथ आहे. या कवीची कविता खरंतर व्यासपीठावरून रसिकांच्या दालनात दाखल कधीचीच झालीय. आता संग्रहाच्या रूपाने मराठी साहित्य प्रवाहास दखल घ्यायला लावेल असा ठाम विश्वास देणारा त्यांच्या ‘गुलमोहराचा कुकू’ हा काव्यसंग्रह आहे
पुस्तकाचे नाव – गुलमोहराचं कुकू
कवी – प्रशांत केंदळे
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पाने – 88, मूल्य – 120 रु.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.