छत्रपतींचा सुंदर इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रच नव्हे तर संरक्षण शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील आदराचे स्थान. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी लिहिलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज’ याच नावाचे पुस्तक वाचनात आले. ६७१ पानांचे हे पुस्तक मिळाले. सहज चाळता-चाळता त्यामध्ये कधी गुंतलो आणि पाहता पाहता पुस्तक वाचून संपले.
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
डॉ. व्ही. एन. शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्त्वाचे वर्णन करणारी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. वाचलीही आहेत. मात्र या पुस्तकाने झपाटून टाकले. पठाण सरांनी या पुस्तकाची मांडणी बारा प्रकरणांमध्ये केली आहे. सर्वात शेवटी संदर्भसूची दिली आहे. या पुस्तकाला प्रस्तावना डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये पठाण सरांनी ‘हिंदवी स्वराज्य स्थापनेपूर्वीचा महाराष्ट्र’ कसा होता याची सविस्तर माहिती दिली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये भोसले कुलाचा इतिहास दिला आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम येतो.आठव्या प्रकरणापासून दहाव्या प्रकरणापर्यंत पुढे हिंदवी स्वराज्याचे परकीय सत्तांशी असणारे संबंध, महाराजांचा मुलकी राज्यकारभार, लष्करी प्रशासन याबाबतचा सविस्तर इतिहास वर्णिला आहे.
सुंदर पद्धतीने अनेक प्रश्नांची उकल
दहाव्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी आणि अंतकाल याबाबतचे लेखन येते. तर अखेरच्या प्रकरणामध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्ययुद्ध दिले आहे. पुस्तक लेखनासाठी घेण्यात आलेले संदर्भ प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आणि पुस्तकाच्या शेवटी देण्यात आले आहेत. या लेखनासाठी घेण्यात आलेले संदर्भ तार्किक पातळीवर तपासून मांडले आहेत. आग्र्याहून सुटकेचे वर्णन करताना महाराज पेटीत बसून औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले नसावेत तर ते वेषांतर करून बाहेर पडले असावेत असे लेखकाने नमूद केले आहे. शूर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसले असते आणि चूकून पेटी तपासली गेली असती तर महाराजांना प्रतिकार करण्याची संधी मिळू शकली असती का? हा प्रश्न स्वाभाविक येतो. अशा अनेक प्रसंगाची उकल सुंदर पद्धतीने लेखकांने या पुस्तकामध्ये केली आहे.
सुंदर अन् भावणारी भाषा
पुस्तकाचे सर्वात महत्त्वाची, जमेची बाजू म्हणजे लेखकाची भाषा. लेखकाच्या ओघवत्या भाषेमुळे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर खाली ठेवावेसे वाटत नाही. लेखकाचे भाषेवरील प्रभुत्त्व जाणवते. महाराजांच्या विविध गुणांची, पैलूंची ओळख करून देताना वापरलेली भाषा सुंदर आणि भावणारी असली तरी लेखकाने लेखन करताना इतिहास लेखनाच्या वैशिष्टांना कोठेही बाधा येऊ दिलेली नाही. कथा किंवा कादंबरीचे रूप येऊ दिलेले नाही. खांदेरी किल्ल्याचे बांधकाम करताना आलेल्या अडचणींचे वर्णन याचे उत्तम उदाहरण आहे. वैशिष्ट म्हणजे लेखकाचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील या पुस्तकापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांवरील पुस्तक प्रकाशीत झाले आहे. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचे अनेक दाखले
पुस्तकामध्ये जागोजागी त्यांनी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचे दाखले दिले आहेत. महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलेसे केले. सैन्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतले. त्यांनी जीवाची बाजी लावत महाराजांना साथ दिली. मात्र पोर्तुगीजांनी सक्तीचे धर्मांतर करण्याचा आणि धर्मांतर न करणाऱ्या लोकांना गोवा सोडून जाण्याचे फर्मान काढले, तेव्हा महाराजांनी पोर्तुगिजांना मोठा धडा शिकवला. एरवी कोणत्याही धर्माच्या मंदिरांना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यायला सांगणारे महाराज त्यावेळी मात्र धर्मगुरूंना दंडीत करतात. हे वाचताना महाराजांचा अन्यायाला प्रतिबंध हेच सूत्र जाणवते.
बारा बलुतेदार हा तर मावळा
अतिशय चांगल्या पद्धतीने छत्रपतींचा इतिहास पठाण सरांनी सादर केला आहे. शिवरायांनी नवराष्ट्राची निर्मिती केली. इतर राजसत्ताप्रमाणे सत्तेसाठी सत्ता निर्माण करण्याचा त्यांचा विचार कधीच नव्हता. यामागे राज्यातील प्रजा ही सुखी आणि समाधानी राहिली पाहिजे, हेच सूत्र कायम राहिले. त्यामुळे हे राज्य, हिंदवी स्वराज्य निव्वळ हिंदूंचे नव्हते. सर्वधर्मसमभावाचे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपले. सर्व भूमीपुत्रांचे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांचे होते. बारा बलुतेदार हा तर त्यांचा ‘मावळा’ होता. त्यालाच हिंदवी स्वराज्य असा शब्द आला आहे, हे बिंबवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. आजच्या सामाजीक पार्श्वभूमीवर प्राचार्य डा. इस्माईल पठाण यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रसिद्ध झालेले हे पुस्तक खूप महत्त्वाचे वाटते.
पुस्तकाचे नाव – छत्रपती शिवाजी महाराज
लेखक – प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण (९४२११०१६४१)
प्रकाशक – महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर
पृष्ठे – ६७१ मूल्य – रूपये ८००