शिरंबे येथील अद्भुत तळ्यातील मल्लिकार्जुन !
शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. हे मार्ग सावर्डे वहाळ फाटा, खेरशेत नायशी फाटा आणि आरवली माखजन कासे मार्गे आहेत.
जे. डी. पराडकर
श्रावण महिन्यात हिरवाईच्या सुंदर साजाने नटलेला कोकण यांचे जसे परस्परांमध्ये गुढ नाते आहे असंच काहीसे नाते कोकण आणि शिवमंदीरांमध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये असलेली शिवमंदिरे आगळ्यावेगळ्या स्थान महात्म्यासाठी आणि सुंदर रचनेसाठी नावाजलेली आहेत. संगमेश्वर तालुक्याच्या एका टोकाला असलेले शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदीर चहू बाजूंनी वेढलेल्या निर्मळ आणि स्वच्छ पाण्यामध्ये असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवमंदीराची अशी एकच रचना आहे. श्रावण सोमवारी हजारो भक्तगण येथील तळ्यात स्नान करण्यासाठी आणि शंभू महादेवांपुढे नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत . संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर , कर्णेश्वर , संगम मंदिर , रामेश्वर पंचायतन , सप्तेश्वर राजवाडी येथील सोमेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्त भक्तगणांची मोठी गर्दी होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात देवरुख जवळील मार्लेश्वर मंदीर जसं ख्याती पावलेलं आहे तसंच संगमेश्वर जवळच्या कसबा येथील चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर अप्रतिम शिल्प कलेसाठी प्रसिद्ध आहे. या दोन मंदीरांच्या तुलनेत स्थान महात्म्याला सारखेच महत्व असूनही शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदीराची ख्याती भौगोलिक दृष्टीने ते एकाबाजूला असल्याने सर्वदूर पोहचू शकली नाही. विशेष म्हणजे रचनेत आणि पावित्र्यात एकापेक्षा एक सरस असणारी ही मंदिरे संगमेश्वर तालुक्यातच आहेत. कसबा येथे उंच डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असणारे सप्तेश्वर मंदिर , कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिर , राजवाडी येथील सोमेश्वर मंदिर ही सारी शिवमंदिरे प्राचीन असून शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत.
शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे वहाळ फाटा येथून तसेच खेरशेत नायशी फाटा येथुन आणि आरवली माखजन कासे मार्गे असे तीन मार्ग उपलब्ध आहेत. संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीतील शेवटच्या टोकाला असलेले मल्लिकार्जुन मंदिर फारसे परिचित नसले, तरी आता गाडी रस्ता मंदीरा पर्यंत नेण्यात आला असल्याने वयोवृद्ध मंडळींची चांगली सोय झाली आहे. मल्लिकार्जुन मंदिराची रचना अत्यंत लोभसवाणी असून चाळीस बाय चाळीस चौरस फूट आकाराच्या तळ्याच्या मध्यभागी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पूल उभारण्यात आला आहे. तळ्याची बांधणी मजबूत जांभ्या दगडात करण्यात आली आहे. हे सर्व दगड काटकोनात रचण्यात आले आहेत. मंदिराच्या पाण्यामध्ये असणारा चौथराही जांभ्या दगडातील असून चारही बाजूने स्वच्छ आणि वाहते पाणी आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची रचना अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही.
तळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिराच्या चारही बाजूने सारखेच अंतर सोडण्यात आलेले असल्याने सभोवती खेळते असणारे पाणीही सारखेच आहे. परिणामी चहू बाजूंनी पाहिले असता. मंदिराचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब फारच सुरेख दिसते. या तळ्यातील पाण्याची पातळी वर्षाचे बारा महिने सारखीच असते. मुख्य तळ्यातून वाहणारे पाणी बाजूच्या छोट्या तळीत आणून तेथून पुढे सोडण्यात आले आहे. बाहेरुन सोळा खांबांवर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या पाण्यातील प्रतिबिंब खास उठाव निर्माण करते.
मल्लिकार्जुन मंदिराचे विशेष आणि स्थान महात्म्याचे पावित्र्य म्हणजे येथील शिवलिंग पाण्यामध्ये आहे. मंदिराच्या सभा मंडपातून गर्भगृहात जातांना चिंचोळा दरवाजा आहे. गाभारा सभा मंडपापेक्षा खूप खाली असून त्याची रचना तळ्यातील पाण्याच्या उंची प्रमाणे करण्यात आली आहे . शिवलिंग तळ्यातील पाण्याच्या पातळी प्रमाणे असल्याने ते निम्मे अधिक पाण्यातच आहे. ही रचना म्हणजे शंभू महादेवांवर सतत जलाभिषेक सुरु असल्यासारखीच आहे. मंदिराभोवती असणारे वातावरण निसर्गरम्य असून येथील परिसरात प्रवेश केल्यानंतर लगेचच स्थान महात्म्याची जाणीव होते. मंदिरा समोर दोन छोट्या दिपमाळाही आहेत. मल्लिकार्जुन मंदिराजवळच ग्रामदेवता आणि गणपतीचे मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिराची आख्यायिका मोठी रंगतदार आहे. मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार १९७३ साली करण्यात आला. येथील तळ्यामधील पाणी स्वच्छ ठेवण्यात मंदिर व्यवस्थापन समितीला यश आले आहे. येथील तळ्यात पाणसर्प असतात आणि शिवलिंगावर नागराज विराजमान होतात. याप्रसंगी होणारे दर्शन पवित्र समजले जाते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.